मुंबईत बॉम्बस्फोट झाला तेंव्हाची गोष्ट. माणसं सैरावैरा धावत होती. कितीतरी जखमी लोक स्वतःहून दवाखाना शोधत फिरत होते. अतिरेकी पण तोंड लपवत फिरत होते. घरात असलेले लोक टीव्हीला चिटकून बसले होते. काळजाचा थरकाप उडवणारी घटना होती. घराबाहेर पडण्याची हिंमत नव्हती कुणाची. सरकारी दवाखान्यात काम करणारा शरद आज घरी येणार नाही हे बायकोला माहित होतं. अशी काही घटना घडली की शरदला रात्रभर थांबावं लागायचं. वॉर्डबॉय होता तो. दोन दिवस सलग दवाखान्यात राहिला. जखमी लोक. त्यातले कित्येक दवाखान्यात आल्या आल्या प्राण सोडलेले. त्यांचे आक्रोश करणारे नातेवाईक. डेड बॉडीची ओळख पटवण्यासाठी चाललेले कष्ट. आपला माणूस असू नये अशी देवाकडे प्रार्थना करत शवागाराकडे जाणारे नातलग. आपला माणूस असला की जोरात हंबरडा फोडणारी माणसं. आपला माणूस नसला की हायसं वाटणारी माणसं. शरद सगळं बघत होता जवळून. हळू हळू त्याचं दुखः गोठून गेलं होतं.
तिसऱ्या दिवशी भरपूर झोप काढून मित्रांसोबत मैदानात बसला होता गप्पा मारत. दवाखान्यातल्या सगळ्या गोष्टी सांगत. एका म्हातारीचा मुलगा तिची बॉडी घ्यायला तयार नव्हता. जोपर्यंत तिच्या अंगावरचं सोनं देत नाही तोपर्यंत बॉडी घेणार नाही म्हणाला. दवाखान्याच्या लोकांनी तिचं सोनं काढून घेतलं असं म्हणणं होतं त्याचं. अतिरेक्यांपेक्षा दवाखान्यातल्या लोकांना जास्त शिव्या देत होता. एक तरुण स्त्री होती. तिचा नवरा तान्हं मुल हातात घेऊन फिरत होता. मुलाचं काय करावं हा प्रश्न होता. त्याला दूध पाजायचं होतं. आणि आई मात्र…
चंदन सगळ्या गोष्टी मान खाली घालून ऐकत होता. बाकी मित्र अतिरेक्यांना शिव्या देत होते अधूनमधून. पण वसंतरावची गोष्ट ऐकून मात्र चंदनला राहवलं नाही. शरद सांगत होता वसंतराव नावाचा एक म्हातारा भरती झालाय. बेशुध्दच आहे. मुका मार असणार डोक्याला. फारतर एखाद दिवस जगेल असं वाटतं. शुद्धीत नाही. दोन दिवसांपासून त्याच्या नातेवाइकांना शोधायचा प्रयत्न चालू आहे. पण कुणाचाच पत्ता नाही. कागद नाहीत. बिचारा किती दिवस शवागारात पडून राहिल माहित नाही. का तसाच जाळून टाकावा लागेल पोलिसांना सांगता येत नाही. सगळे वसंतरावच्या गोष्टीने हळहळले. शरद जेवायला निघून गेला मुलाने बोलवलं म्हणून. चंदन एकटाच विचार करत बसला.
दुसऱ्या दिवशी चंदन सरकारी दवाखान्यात हजर झाला. त्याने वसंतराव आपले चुलते आहेत असं सांगितलं. ओळखपत्र दाखवलं. डुप्लिकेट कागद बनवणे चंदनच्या डाव्या हाताचा मळ होता. दवाखान्यातल्या स्टाफला बरं वाटलं. वसंतराव बेवारस मरणार नाही. चंदन दिवसभर वसंतरावच्या बाजूला बसून राहिला. कधी पाय चोळायचा. कधी हात चोळायचा. कधी हळवा होऊन काहीतरी बोला म्हणायचा. त्याचं वसंतराववरचं प्रेम बघून नर्सच्या डोळ्यात पाणी यायचं. आजूबाजूच्या खाटेवर असलेल्या पेशंटचे नातेवाईक चंदनला धीर द्यायचे. एक बाई तर चंदनला शेजारीच असलेल्या चर्चमध्ये घेऊन गेली स्वतःसोबत. एका मंदिराचे लोक प्रसाद घेऊन आले होते आरतीचा. काही लोक जेवण वाटत होते नातेवाइकांना. चंदन रात्रीपण तिथेच थांबला. शरद ड्युटीवर आला. त्याने चंदनला पाहिलं आणि धक्काच बसला त्याला. पण चंदन म्हणाला म्हातारा असा बेवारस मरणार हे सहन नाही झालं यार. शरदला बरं वाटलं. आपला मित्र किती मोठ्या मनाचा आहे हे आज लक्षात आलं त्याच्या.
आता दोन तीन दिवस झाले होते. वसंतराव अजून शुद्धीत येत नव्हते. हळूहळू दवाखान्याच्या आवारात भांडणं सुरु झाले होते. गर्दी खूप होती आणि बेड कमी. पहिले दोन तीन दिवस लोक जेवण वाटत होते. चहा फुकट देत होते. प्रसाद घेऊन येत होते. देवाचे फोटो देत होते. आता ते सगळे गायब झाले होते. लोक तरी किती दिवस येणार? समाजसेवेचा उत्साह फार दिवस टिकत नाही. आणि एकदा टीव्हीचे कॅमेरे कमी झाले की समाजसेवकांची संख्या पण कमी होत जाते आपोआप. दुःखाचा बाजार मांडून झाला होता. वेदनेचा टी आर पी आता कमी झाला होता. पुन्हा लोकांना कोणत्या हिरोईनचं वजन किती कमी झालं हे बघायचं होतं टीव्हीवर. दवाखान्यात आता फक्त पेशंटचे जवळचे लोक. त्यांची पण संख्या रोडावत चाललेली. बाजार संपला की जसे मोकाट जनावरं चरायला लागतात तसे काही लोक आता दिसू लागले. सरकारने जखमी झालेल्या आणि मृत पावलेल्या लोकांना मदत जाहीर केली होती. जखमींना दोन लाख. मृत पावलेल्या लोकांच्या नातेवाईकाला पाच लाख. शरदच्या डोक्यात आता प्रकाश पडला. चंदन का दवाखान्यात ठाण मांडून बसलाय हे त्याच्या लक्षात आलं. आधी दवाखान्यातल्या कामामुळे या गोष्टीचा विचार सुद्धा त्याच्या डोक्यात आला नाही. पण आता दररोज सरकारी मदतीवरून होणार्या गोंधळात त्याला चंदनचं हेतू लक्षात आला.
चंदन घरून पळून आला होता. कोणत्या गावचा होता हे त्याने कधीच कुणाला सांगितलं नाही. सात आठ वर्ष तो पंधरा वीस नौकर्या करून थकला. सगळीकडून त्याला काढलं गेलं. झटपट श्रीमंत व्हायच्या नादात गाव सोडून आलेला चंदन बहुतेक वेळा चोरीच्या आरोपावरून कामावरून काढून टाकण्यात आला. आता एवढा बदनाम झाला होता की काहीच काम मिळत नव्हतं. चाळीत एका खोलीत सहा लोक राहायचे. चंदन त्यांच्यासोबत असायचा. भाडं द्यायचा नाही. लोकांना गांजा आणून द्यायचा म्हणून तो अजून तिथं टिकून होता. त्याने पैसे उधार घेतले नाहीत असा आता एकही ओळखीचा माणूस नव्हता. पैसे परत देण्याचा विषय तर त्याच्या डोक्यात कधीच आला नाही. आता त्याने वसंतरावला गाठलं होतं. वसंतराव गेले की त्यांच्या नावाने मिळणारे पाच लाख रुपये चंदनला मिळणार होते. तसे सगळे कागद त्याने बनवून ठेवले होते. दवाखान्यातल्या लोकांचं मन तर त्याने कधीच जिंकून घेतलं होतं. पुतण्या असून बापाच्या वर सेवा करतो म्हणून चंदन बद्दल डॉक्टरपण खूप चांगलं बोलायचे. आसपासच्या बेड वरचे पेशंट, नातेवाईक भरभरून बोलायचे. आता फक्त वसंतराव कधी एकदा शेवटचा श्वास घेतात ते बघायचं होतं.
वसंतराव मात्र भारीच चिवट निघाले. सहाव्या दिवशी शुद्धीवर आले. अजून बोलता मात्र येत नव्हतं. चंदनला आता दरदरून घाम फुटायची वेळ आली होती. बाजूच्या बेडवरचे पेशंट आता आशीर्वाद द्यायचे चंदनला. तुझा काका नक्कीच बरा होणार बघ म्हणायचे. चंदन घाबरून जायचा. म्हातारा बोलायला लागला तर आपली वाट लागणार हे त्याला माहित होतं. पण वसंतराव मात्र काहीच बोलत नव्हते. एकटक बघत बसायचे. डॉक्टर, नर्स त्यांना सांगायच्या तुमच्या पुतण्याने खूप सेवा केली बरं तुमची. वसंतराव फक्त बघायचे चंदनकडे. चंदनला त्यांच्या बघण्यात कधी राग वाटला नाही. कधी संशय वाटला नाही. उलट मायाच असायची वसंतरावच्या नजरेत. पण त्यांच्या तोंडून एक शब्द मात्र कधी निघाला नाही. कधी कधी त्यांच्या छातीत जोरदार कळ यायची. ओरडायचे. डोळ्यात पाणी यायचं. बस. बाकी वसंतरावची काही हालचाल नसायची.
वसंतराव शुद्धीत आल्याने शरदला खूप आनंद झाला होता. त्याला चंदनचा हेतू माहित होता म्हणून. पण चंदनने आता परत जायचं ठरवून टाकलं होतं. वसंतराव शुद्धीवर आल्यामुळे त्याचा सगळा बेत बारगळला होता. पाच लाखात काय काय करायचं ह्याची सगळी योजना तयार होती त्याची. किती स्वप्न पाहिले होते त्याने. पण त्याच्या सगळ्या स्वप्नांवर पाणी फिरलं होतं. तो वसंतरावच्या पायावर डोकं ठेवून निघाला. जाता जाता शेवटचं वळून पाहिलं त्याने. वसंतरावला पुन्हा कळ आली होती. ते ओरडू लागले. चंदन .. चंदन… वसंतराव चक्क त्याचं नाव घेऊन ओरडत होते. वसंतराव ओरडताहेत आणि चंदन असा का बघतोय लोकांना कळत नव्हतं. चंदन भानावर आला. धावत वसंतरावकडे गेला. वसंतरावची छाती चोळू लागला. वसंतराव नॉर्मल झाले. काही वेळ तसेच शांत पडून राहिले. चंदन त्यांच्या शेजारी बसून राहिला. बसल्या बसल्या त्याला कधी झोप लागली कळलच नाही. रात्री जाग आली तेंव्हा त्याच्या लक्षात आलं वसंतराव त्याचा हात घट्ट धरून झोपले होते. चंदन खूप कष्ट करून त्यांचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत होता. कसाबसा त्याने त्यांचा हात सोडवला. चोरपावलाने परत निघाला. पुन्हा एकदा वसंतरावचा आवाज त्याच्या कानी पडला. चंदन. चंदन जागच्या जागी थबकला. म्हणाला पाणी घेऊन येतो. चंदन पाणी घेऊन आला. वसंतराव पुन्हा एकदा त्याचा हात घट्ट धरून झोपी गेले.
दोन दिवसात डॉक्टर म्हणाले वसंतराव एकदम बरे झालेत. त्यांना आता तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. इथं चंदनचीच राहायची सोय नव्हती. तो आता वसंतरावला कुठे नेणार होता? त्याचीच खायची बोंब होती. सगळं आयुष्य त्या पाच लाखावर अवलंबून होतं. ते तर मिळणारच नव्हते. वसंतरावला कुठलीच जखम नसल्याने त्यांना जखमींना मिळणारी मदत मिळायला अडचण होती. आता वसंतराव पेक्षा चंदनच जास्त आजारी दिसत होता. वसंतराव टवटवीत वाटत होते. वसंतरावांनी मनोमन ठरवलं होतं चंदन नेईल तिथे जाऊ. पण आपल्या अमेरिकेत असलेल्या पोराने आपल्याला जिथे भरती केलं त्या वृद्धाश्रमात जायचं नाही. त्यांना आपल्या पोटच्या पोरापेक्षा दिवस रात्र हातपाय चोळून देणारा चंदन आता जास्त जवळचा होता. वसंतराव हा विचार करत होते. आणि चंदन?
– अरविंद जगताप.

The following two tabs change content below.
अरविंद जगताप

अरविंद जगताप

Writer, Lyricist, And Curious About Everything at ArvindJagtap.com
Arvind Jagtap was born on 20th September 1977. He is a poet, lyricist and scriptwriter well-known for his exploits in Marathi Cinema, the Art and Literature circuit and Television Industry. He is also a voracious reader who has developed his own heart-touching and candid writing style which incorporates colors of foolery, comedy, humor, political satire and pragmatism. Arvind has penned thought provoking articles on important issues such as farmers suicides, draught, life in rural Maharashtra, pseudo progress, urbanization and its social & ecological impact, to name a few. His work is a reflection of his ideology. It weighs in favor of generating awareness among the masses rather than simply creating pure nonchalant entertainment.
अरविंद जगताप

Written by अरविंद जगताप

Arvind Jagtap was born on 20th September 1977. He is a poet, lyricist and scriptwriter well-known for his exploits in Marathi Cinema, the Art and Literature circuit and Television Industry. He is also a voracious reader who has developed his own heart-touching and candid writing style which incorporates colors of...
Read more

Leave a Reply