दीपिका पडुकोणचा आणि उंदीरवाडीचा तसा काहीच संबंध नव्हता. राणी पद्मावतीचा तर अजिबात नाही. दीपिका पडुकोणला तरी लोकांनी पाहिलं होतं टीव्हीत. पण उंदीरवाडीत कुणाला राणी पद्मावतीविषयी काहीच माहित नव्हतं. पण आता गावातून थेट सरपंच निवडायची वेळ जवळ आली होती. सगळ्यांना आपण सरपंच होऊ शकतो असं वाटत होतं. आता छोट्या गावात सगळेच एकमेकांना राम राम घालतात. पण म्हणून कुणी आपण खूप लोकप्रिय आहोत असा गैरसमज करून घ्यायचं काही कारण नसतं. आणि गावातला प्रत्येक माणूस तसा जमिनीवर असतो. त्याला स्वतःबद्दल असे गैरसमज कधीच नसतात. पण निवडणूक आली की काय होतं काय माहित? भले भले माणसं जमिनीपासून चार इंच वरच चालल्यासारखे दिसू लागतात. माणिकराव तसे बोलायला पहिल्यापासून फटकळ. रोज एक तास पेपर वाचायचा आणि बारा तास त्याच्यावर बोलायचं हा त्यांचा आवडता उद्योग. असे खूप लोक आपण बघतो अवती भवती. त्यातलेच माणिकराव. पेपरमधल्या बातम्यावर तावा तावाने बोलने म्हणजेच सामजिक कार्य असा काही लोकांचा गैरसमज असतो. त्यातलेच माणिकराव. आणि म्हणूनच त्यांना आता निवडणूक लढवायची इच्छा झाली होती. खरतर समोर रघुनाथराव सारखा बेरकी माणूस उभा राहणार होता. रघुनाथराव कड पैशाला कमी नव्हती. माणिकराव कड फक्त रद्दी होती. पेपरची. निवडणूक लढवायला नोटा लागतात. पण माणिकरावनी सगळी योजना बनवली होती.
माणिकरावनी सगळ्या वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये जाऊन एक निवेदन दिलं. उंदीरवाडी गटात जर कुणी दीपिकाचं नाक कापून आणलं तर त्याला एक लाख रुपये बक्षीस देणार असं जाहीर केलं. एका पत्रकाराने माणिकरावला सांगितलं की दीपिकाचं नाक का कापायचं त्याचं कारण पण लिहा निवेदनात. माणिकराव ते विसरूनच गेले होते. मग त्यांनी पद्मावती सिनेमात अश्लील दृश्य असल्यामुळे तिचं नाक कापायचं असं लिहिलं. पत्रकार बिचारा जरा जागरूक होता. त्याने पुन्हा माणिकरावला समजवून सांगितलं की पद्मावती सिनेमात अश्लील दृश्य नाही. इतिहास चुकीचा आहे असा काही लोकांचा आक्षेप आहे. मग पुन्हा माणिकरावनी निवेदन बदलून दिलं. पुन्हा पत्रकाराने चूक काढली तेंव्हा मात्र माणिकराव वैतागले. म्हणाले दीपिकाचं नाक एवढ महत्वाचं नाही. तुम्ही फक्त माणिकराव एक लाख बक्षीस देणार हे ठळक छापा. पत्रकार शांत बसला. त्याला डोकं लावायला वेळ नव्हता. आणि असे नमुने त्याला दररोज दहा भेटायचे. पण कशी का होईना दुसर्या दिवशी माणिकरावची बातमी छापून आली. एकच गोंधळ झाला. रघुनाथरावसारखा तयारीचा गडी सुद्धा हादरून गेला. कारण गावा गावात तिच चर्चा सुरु झाली. खरतर गावातल्या लोकांना माहित होतं माणिकरावची एक लाख द्यायची ऐपत नाही. पण चर्चेला विषय मिळाला. माणिकरावला माहित होतं गावात कोण दीपिका कड जाणार? गेलं तरी नाक कापायचा तर विषयच येत नाही. म्हणून त्यांनी एक लाख जाहीर करून टाकले. सगळ्या पेपरला माणिकरावचं नाव बघून रघुनाथरावचा तिळपापड झाला. त्यांनी संपादक लोकांना फोन करून हैराण केलं. शेवटी त्यांना एका संपादकाने युक्ती सांगितली. त्याप्रमाणे माणिकरावने निवेदन तयार केलं.
दुसऱ्या दिशी सगळ्या पेपरात छापून आलं, उंदीरवाडीचे ग्राम पंचायत सदस्य रघुनाथराव यांनी दीपिका पडुकोणच्या नाकाचं रक्षण करण्याची जवाबदारी घेतली आहे. जो कोणी दीपिकाचं नाक कापायचा प्रयत्न करेल त्याच्या हाताचे बोटं कापून टाकीन अशी धमकी सुद्धा रघुनाथराव यांनी दिली आहे. झालं दुसर्या दिवशी पण दीपिकाच्या नाकाची चर्चा सुरु झाली. माणिकराव आनंदात होते. फुकटात त्यांची प्रसिद्धी चालू होती. पण दुसऱ्याच दिवशी रघुनाथरावनी बाजी मारली होती. माणिकराव रागारागात रघुनाथरावला भेटले. बाकी लोक पण होते. माणिकराव म्हणाले इथं उंदीरवाडीत बसून तुम्ही दीपिकाच्या नाकाची राखण करणार व्ह्य? रघुनाथराव म्हणाले, आन तुम्ही इथं उंदीरवाडीत बसून दीपिकाचं नाक कापणार व्ह्य? माणिकरावचं म्हणणं होतं की मी स्वतःच थोडी कापणारय. जो कापणार त्याला बक्षीस देणारय मी. तर रघुनाथराव वैतागून म्हणाले आरे आळशी माणसा, एक काम तरी सोता कर. मायला नाक कापायचं तर ते पण लोकांनी. आन तू काय सोताच्या नाकात बोट घालून बसणार व्ह्य गावात? रघुनाथरावच्या बोलण्यावर लोक हसू लागले. माणिकरावला राग आला. त्यांनी सांगितलं जर मला राग आला तर मी काहीपण करू शकतो. रघुनाथराव म्हणाले करून दाखवा. माणिकराव आणखी जोरात म्हणले दाखवतोच. मग रघुनाथराव किंचाळले, अरे तुझ्या सोताच्या नाकावरची माशी उठत नाही लवकर. आन तू दीपिकाचं नाक कापणार व्ह्य शहाण्या? आता मात्र माणिकराव संतापले. रघुनाथराव अजून पुढ म्हणाले, एका बापाचा असशील तर आन कापून तिचं नाक? सगळे लोक माणिकरावकड बघाय लागले. गर्दीत एकजण म्हणालं, मायला त्या दीपिकाच्या नादात माणिकरावचंच नाक कापलं गड्या. हे ऐकून माणिकरावनी रागाच्या भरात सांगितलं की एका आठवड्यात दीपिकाचं नाक कापून आणलं नाही तर एका बापाची औलाद नाही. एवढ बोलून माणिकराव रागारागात तिथून निघून गेले. जमलेल्या लोकांना प्रश्न पडला माणिकराव खरंच जातो का काय आता दीपिकाचं नाक कापायला? काही लोकांनी चिंता करायला सुरुवात केली. पण रघुनाथराव म्हणाले, आरे त्याला बायकू हात लाऊ देत नाही लवकर. त्यो दीपिकाचं नाक कापून आणणारय व्ह्य? हे ऐकून सगळे एकदम शांत होऊन हसायला लागले.
माणिकरावचा मात्र डोळ्याला डोळा लागत नव्हता. सात दिवसात दीपिकाचं नाक कापून आणतो असं बोलून तर बसलो चार चौघात. पण हे एवढ सोपंय का? आपल्या पोराचे नख कापायचे त त्यो रडून गाव गोळा करतो. तिचं त नाक कापायचंय. बरं तिला सिनेमात बघायला शंभर रुपये लागतेत. प्रत्यक्षात जाऊन बघायला किती पैसे लागतेन? असंही गणित त्यांच्या डोक्यात सुरु झालं. हळू हळू झोपेची गुंगी वाढू लागली. दीपिका नाक कापलेल्य अवस्थेत दिसू लागली. नाक कापल्यावर दीपिका फारच वाईट दिसेल असंही त्यांना वाटून गेलं. पण आता हा विचार करून चालणार नव्हतं. एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं. पण आपण जर दीपिकाचं नाक कापलं तर पोलीस आपल्याला सोडतील का? बरं पोलीसांच जाऊ द्या. तो रणवीर सिंग जर तिच्या सोबत असला तर? कसा पैलवानासारखा दिसतो त्यो. त्यानी यक उलट्या हाताची दिली त डाव्या बाजूचे दात उजव्या बाजूला फीट होतेन आपले. असं काय काय माणिकरावला स्वप्नात दिसू लागलं. त्यात पोलिसांनी आपल्याला तुरुंगात टाकलंय असं पण स्वप्न पडलं आणि ते झोपेतून उठून बसले. आपण एक दिवस घरी नसलो तर म्हशीची धार काढायची अडचण येती. बायकोला काही म्हैस हात लावू देत नाही. शेजाऱ्याला बोलवावं लागतं. शेजारचा विलास बायकोशी जरा जास्तच अघळ पघळ बोलतो. त्यात आपण तुरुंगात असलो तर त्याला मोकळं रानच भेटल. माणिकरावच्या मनात अशा शेकडो गोष्टी येऊ लागल्या. त्यांनी उशाशी ठेवलेल्या तांब्यातल पाणी चार घोटात संपवलं. शेजारी झोपलेल्या बायकोकडे एकटक बघत राहिले. पुन्हा विचार सुरु झाले. आपली बायको एवढी तरुण. दीपिकाच्या नाकाच्या भानगडीत आपली बायको आपलं नाक कापायची गावात. उगच त्या दीपिकाच्या नाकाचा विषय काढला. आता जाऊन माफी मागावी असं त्यांना वाटलं. पण आता माघार घेऊन चालणार नव्हती. काय करावं सुचत नव्हतं. तो नालायक रघुनाथराव काही न करता हिरो होणार होता. माणिकरावची अस्वस्थता वाढत होती.
दुसर्या दिवशी माणिकराव घराबाहेर पडले. लोक त्यांच्याकडे बघत होते. काही आगावू पोरं जोरात विचारत होते. माणिकराव, काय झालं दीपिकाच्या नाकाचं? माणिकराव खाली मान घालून पुढे चालत होते. एकाने त्यांना विचारलं, बरं नाक कापायला गेले त एखादा फोटोबी घेऊन या. पुन्हा चान्स भेटायचा नाही. माणिकराव आता कुणाचं काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांना अद्दल घडली होती. अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ अशी भानगड केली होती. राहून राहून ते हाच विचार करत होते की माझ्यासारखी देशात खूप लोकांनी धमकी दिली होती. दीपिकाचं नाक कापायची. त्यांचं काय झालं? त्यांना काही अडचण का नाही आली? आज ना उद्या माणिकरावच्या लक्षात येईल की अशा पोकळ धमकी देऊन पब्लिसिटी मिळवणाऱ्या लोकांना एक रघुनाथराव पुरून उरतो. सध्या ह्या देशात रघुनाथरावची कमी आहे. नाहीतर असले फालतू धमक्या देणारे कधीच घरात बसले असते. पण त्यांनाही कधी ना कधी रघुनाथराव भेटणारच. फुकट मिरवणारा असला तर जिरवणारा पण असतोच.
– अरविंद जगताप.

The following two tabs change content below.
अरविंद जगताप

अरविंद जगताप

Writer, Lyricist, And Curious About Everything at ArvindJagtap.com
Arvind Jagtap was born on 20th September 1977. He is a poet, lyricist and scriptwriter well-known for his exploits in Marathi Cinema, the Art and Literature circuit and Television Industry. He is also a voracious reader who has developed his own heart-touching and candid writing style which incorporates colors of foolery, comedy, humor, political satire and pragmatism. Arvind has penned thought provoking articles on important issues such as farmers suicides, draught, life in rural Maharashtra, pseudo progress, urbanization and its social & ecological impact, to name a few. His work is a reflection of his ideology. It weighs in favor of generating awareness among the masses rather than simply creating pure nonchalant entertainment.
अरविंद जगताप

Written by अरविंद जगताप

Arvind Jagtap was born on 20th September 1977. He is a poet, lyricist and scriptwriter well-known for his exploits in Marathi Cinema, the Art and Literature circuit and Television Industry. He is also a voracious reader who has developed his own heart-touching and candid writing style which incorporates colors of...
Read more

Leave a Reply