सुमनला बारावीत ८० टक्के भेटले. टाकळी गावात पहिल्यांदाच एखाद्या पोरीला एवढे मार्क भेटले. तिच्या आई बापाला रात्रभर झोप लागली नाही. आई रडत होती. तिला शिकायचं होतं. शिकता आलं नव्हतं. पोरीनी शिकून तिचं नाव काढलं. बापाच्या डोळ्यात अश्रू नव्हते. पण मनातल्या मनात रडत होता रंगनाथ. पोरगी पुढ शिकायचं म्हणती का काय? हीच धास्ती होती त्याला. सकाळी उठल्यावर घरी पाहुणे सुरु झाले. गावातले लोक सुमनला शिकवायला पाहिजे म्हणू लागले येऊन येऊन. सरपंच पण येऊन गेला. पेढे देऊन गेला. आणि पोरीला पुढ शिकवा हा सल्ला पण देऊन गेला. सुमनची आई विमल मनातल्या मनात आनंदी होत होती. तिला माहित होतं आपला नवरा काही फार उत्साही नाही पोरीला शिकवायला. पण चार लोकं असे येऊन सागंत होते तेंव्हा त्याला पण हो म्हणणं भाग पडत होतं.

एक एक्कर शेती. लहान पोरगा पण शिकतोय शाळेत. किरण. खरंतर मुलीने शिकू नये आणि मुलाने शिकावं असं पण वाटत नव्हतं रंगनाथला. कसं वाटणार? तो स्वतः एम ए झालाय. मराठीत. नौकरी मिळाली नाही. आता उरली सुरली शेती करतो. अर्धी शेती विकून एका संस्थेत काही वर्ष शिक्षक म्हणून लागला होता. पैसे देऊन. पण पुढे ज्याला पैसे दिले त्या संचालकाला अटक झाली. रंगनाथला कुणी वाली उरला नाही. राग काढायला माणूस नव्हता. शेतात लक्ष घातलं. बाकी कुठं काही काम भेटलं ते केलं. घर चालवलं. पोरं हुशार निघाली. सुमनला ट्युशन नव्हती तरी ८० टक्के घेतले. रंगनाथने विचार केला आपल्याला शिकून अपयश आलं पण पोरांचं असंच होईल असं नाही. सुमनला कॉलेजला पाठवायचं ठरवलं त्याने. सुमन रोज शहरात जाऊ लागली बसने. सकाळी जायची कॉलेजला ते संध्याकाळी यायची. ओढाताण चालू होती पण सुमन रात्री दिवा लावून अभ्यास करताना दिसली की कष्ट विसरून जायचा रंगनाथ. बायको पण लोकांच्या शेतात काम करत होती. रंगनाथला मदत करत होती. बाकीच्या बायका म्हणायच्या आता सुमन एकदा हापिसर झाली की राणीसारखी ठेवून बाई विमलला. विमलच्या अंगात अजून बळ यायचं काम करायला. सुमन अधिकारी झालीय हे स्वप्न एका रात्रीत चारदा पडायचं तिला.

एक दिवस सुमन रंगनाथला कॉलेजला घेऊन गेली. मास्तरने कौतुक केलं. पोरगी खूप चांगली आहे. भाषण पण छान करते. म्हणाले तिला कोल्हापूरला पाठवतोय भाषण करायला. रंगनाथ खुश झाला. पोरगी नाव काढणार याची त्याला खात्री झाली. त्या रात्री रंगनाथ आणि त्याची बायको पहाट होई पर्यंत काहीतरी बोलत बसले. आयुष्यातला खूप मोठा निर्णय घ्यायचा होता त्यांना. दुसऱ्या दिवशी रंगनाथने त्याची अंगठी विकली आणि जवळचे साठलेले पैसे घालून सुमनला मोबाईल घेऊन दिला. पोरगी बाहेर जाणार. तिच्या जवळ फोन पाहिजे असं वाटलं त्यांना. मोबाईल बघून सुमनला किती आनंद झाला. तिला माहित नव्हतं बापानी अंगठी विकलीय. आता घरात फक्त आईच्या मंगळसुत्रातले मणी सोडले तर सोन्याचा पत्ता नाही. सुमन दिवसभर मोबाईल हातात घेऊन बसली होती. एकदा कौतुकानी भावानी फोन घेतला तर सुमन ओरडली त्याच्यावर. आपली बहिण पहिल्यांदा अशी ओरडली हे जाणवलं नितीनला. पण आईनी सांगितलं महागाची वस्तूय. जपून ठेवली पाहिजे. तू खेळू नको मोबाईलशी.

कोल्हापूरला सुमनचा भाषणात दुसरा नंबर आला. कप घेऊन आली बक्षिसाचा घरी. घरात असली वस्तू पहिल्यांदाच आली होती. रंगनाथ कितीतरी वेळ कौतुकाने बघत होता. सुमन मात्र मोबाईल आल्यापासून फक्त मोबाईलकडच बघायची. तशी ती जरा बदलली होती. बोलण्यात लक्ष नसायचं. कामात चुका करायची. आईच्या लक्षात आलं होतं पण अभ्यासाच्या टेन्शन मुळे होत असेल असं वाटायचं आईला. कधी कधी रंगनाथला जाग यायची रात्री बेरात्री. पोरगी मोबाईल बघत बसलेली दिसायची तिच्या खोलीत. पण आता पोरीला बोलायचं तरी काय? कळती झाली होती. रंगनाथ बायकोजवळ चिडचिड करायचा. पण बायको समजूत काढायची. आता अभ्यासाचं पण मोबाईल मध्ये असत म्हणायची. रंगनाथला जग खूप बदललय हे माहित होतं. पण एवढ बदललं असेल असं वाटत नव्हतं. राहून राहून त्याला कसलातरी संशय यायला लागला होता. त्याची झोप उडाली होती. घाईत एक वेणी घालून जाणारी आपली पोरगी आता अर्धा अर्धा तास आरशापुढे वेणी घालत असते. मैत्रिणीचे ड्रेस घेऊन येते. क्रीम वापरते. तरुण पोरगी जास्त आनंदात दिसली तरी बापाची चिंता वाढते. सुमनचं सतत आनंदी दिसणं पण रंगनाथला त्रास देत होतं.

रंगनाथची शंका खोटी नव्हती. सुमन प्रेमात पडली होती. तिच्या कॉलेजमधला प्रशांत वक्तृत्व स्पर्धेत तिच्या सोबत असायचा. बोलायचा चांगला. सुमनच्या जातीचा नव्हता. जात खालची असली तरी त्याचे विचार खूप मोठे होते. तोंडात सिगरेट धरून तासंतास तो शोषणावर बोलायचा तेंव्हा सुमन ऐकत राहायची. मार्क्स आणि लेनिन त्याच्या बोलण्यात हमखास यायचे. भांडवलशाहीवर तुटून पडायचा प्रशांत. त्याच्या अंगावर प्रत्येक गोष्ट ब्रांडेड होती पण त्याला विदेशी कंपन्या शोषण करतात याची खात्री होती. सुमन एकदा त्याच्या खोलीवर गेली होती. खरंतर ती खूप घाबरली होती. पण प्रशांतने तिला स्कार्फ घेऊन दिला. तो तोंडाला बांधला की कोण मुलगी आहे काही कळत नाही हे तिला समजवून सांगितलं. सुमनने तोंडावर स्कार्फ बांधून आरशात बघितलं. तिच्या लक्षात आलं आपल्याला कुणीच ओळखू शकणार नाही. खरंतर मुलींना आपली ओळख निर्माण करायला शिकण्याच वय असतं हे. पण नेमक्या याच वयात तोंडावर स्कार्फ बांधून आपली ओळख लपवण्याच शिक्षण मिळत जातं त्यांना या वयात. प्रशांतच्या खोलीवर मार्क्स सारख्या लोकांचे पुस्तकं असतील अशी समजूत होती तिची. पण खोलीवर सगळ्या बाटल्याच पडलेल्या. भांडवलशाही पार संपवून अशी रिकाम्या बाटल्यांच्या रुपात कोपऱ्यात टाकून दिली होती प्रशांतने खोलीत. हळू हळू सुमनला लक्षात आलं प्रशांतचे विचार आणि आचार यात जमीन आसमानाचं अंतर आहे. पण ती आता प्रेमात पडली होती. तिने चार मुलींसारखी त्याला शप्पथ घातली. दारू प्यायची नाही म्हणून. प्रशांत बाकी कसाही असला तरी शब्दाचा पक्का होता. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तो सुमनवर मनापासून प्रेम करत होता. त्याने खरंच दारू सोडली.

सुमनच्या प्रशांतकडे चकरा वाढल्या. बायको असल्यासारखी ती त्याची खोली आवरू लागली. अधून मधून स्वयपाक करू लागली. कधी कधी स्पर्धेचं निमित्त काढून प्रशांतच्या खोलीवरच थांबू लागली. कितीही लपवून ठेवलं तरी अशा गोष्टी लपून राहत नाहीत. रंगनाथच्या गावातला गजा प्रशांतच्या शेजारच्या खोलीत दूध घालायला यायचा. त्याने एकदा सुमनला पाहिलं तिथं. सुमन घाबरून गेली होती. गजाने शेजारी चौकशी केली. त्याला कळल सुमन नेहमी यायची तिथं. गजाने गेल्या गेल्या रंगनाथला गाठलं. रंगनाथचं अवसान गळाल. खरंतर तो ह्याच दिवसाची वाट बघत होता. ही बातमी येणार ह्याची त्याला खात्री होती. रात्री बेरात्री बघावं तेव्हा पोरगी मोबाईलवर टाईप करताना दिसायची. दुसरं काय होणार? आपण तिला आधीच अडवायला पाहिजे होतं. खरंतर  मोबाईलमुळे आईच सुमनवर खूप नाराज होती. सारखी रंगनाथला सांगायची. पोरगी रात्री बेरात्री तोडावर चादर घेऊन मोबाईल बघत बसती. पण आता रंगनाथ लक्ष द्यायचा नाही. त्याने गावोगाव जाऊन कुल्फी विकायला सुरुवात केली होती. दिवसभर दहा बारा शाळेत जायचा गावोगाव. थकून भागून घरी यायचा. शाळेतल्या पोरांचा गलका कानातून जायचा नाही. कसाबसा शांत होत झोपी जायचा रंगनाथ. रोज पोरांचा अभ्यास कसा झालाय हे विचारणारा, कोडे घालणारा, कविता मुकपाठ म्हणून दाखवणारा बाप हरवला होता त्याच्यातला. आता घरातल्या भांडणामुळे बारावीत गेलेल्या पोराला पण मोबाईल घेऊन द्यायचा होता. मोबाईल मुळे घरातलं बोलणं मात्र बंद झालं होतं. भाऊ सुमनला मोबाईल देत नाही म्हणून बोलत नव्हता. आई सुमन सारखी मोबाईल बघत बसते म्हणून बोलत नव्हती. रंगनाथ पोराला मोबाईल घेऊन द्यायचा म्हणून डबल कष्ट करत होता. बोलायचं त्याच्यात त्राण पण नसायचं.

आज मात्र त्याला पश्चाताप होत होता. सुमन घरी आल्यावर त्याने तिच्यासमोर विषाची बाटली ठेवली. इथून पुढ त्या पोराला भेटशील तर मी जीव देईन असं सांगितलं. सुमन काय बोलणार? तिने आधीच प्रशांतला सांगितलं होतं आता आपली भेट होईल असं वाटत नाही. तर प्रशांतने तिला रात्रीच घरून पळून यायला सांगितलं होतं. नाहीं आलीस तर जीव देईन म्हणाला होता. काय करायचं तिनी? एकीकडे बाप. एकीकडे प्रियकर. कितीतरी वेळ एकटीच मोबाईलकड बघत बसली. मोबाईल वाजत होता. प्रशांत फोन करत होता. पण सुमन फोन उचलत नव्हती. सुमन फोन उचलूच शकणार नव्हती. तिने आत्महत्या केली होती.

काही दिवसांनी रंगनाथ पुन्हा शेतात रमला. प्रशांत वक्तृत्व स्पर्धेत बक्षीस मिळवू लागला. त्याने पुन्हा दारू सुरु केली. कधी कधी न राहवून नशेत रात्री बेरात्री तो सुमनच्या फोनवर फोन लावतो. रंगनाथला फोन नंबर पाठ झालाय. फोन उचलत नाही. बायको म्हणते एकदा चेक तरी करा कोणय? रात्री बेरात्री फोन करतो. रंगनाथ शून्यात बघत बोलू लागतो, आता काय फायदा? जवा चेक कराय पायजे होतं तवा नाही केलं. मोबाईलपेक्षा लेकरांना टाईम द्याय पायजे. रंगनाथ बोलत राहतो. मोबाईलवर लिहून येतं, मिस कॉल. आपल्या आयुष्यात असे मिस कॉल येत असतात. फक्त ते वेळच्या वेळी आपण तपासले पाहिजेत. खूप उशीर व्हायच्या आधी.

– अरविंद जगताप.

The following two tabs change content below.
अरविंद जगताप

अरविंद जगताप

Writer, Lyricist, And Curious About Everything at ArvindJagtap.com
Arvind Jagtap was born on 20th September 1977. He is a poet, lyricist and scriptwriter well-known for his exploits in Marathi Cinema, the Art and Literature circuit and Television Industry. He is also a voracious reader who has developed his own heart-touching and candid writing style which incorporates colors of foolery, comedy, humor, political satire and pragmatism. Arvind has penned thought provoking articles on important issues such as farmers suicides, draught, life in rural Maharashtra, pseudo progress, urbanization and its social & ecological impact, to name a few. His work is a reflection of his ideology. It weighs in favor of generating awareness among the masses rather than simply creating pure nonchalant entertainment.
अरविंद जगताप

Written by अरविंद जगताप

Arvind Jagtap was born on 20th September 1977. He is a poet, lyricist and scriptwriter well-known for his exploits in Marathi Cinema, the Art and Literature circuit and Television Industry. He is also a voracious reader who has developed his own heart-touching and candid writing style which incorporates colors of...
Read more

Leave a Reply