दिन्या आणि पश्या आठवीत आहेत. एकाच शाळेत जातात. एकाच वाटेने सायकल चालवत जातात. दोघांना क्रिकेटची आवड. उन्हातान्हात गावात, शाळेच्या मैदानात दोघं क्रिकेट खेळताना दिसतात. सायकलवर शाळेत जाताना आणि येताना क्रिकेटवर बोलत असतात. दिन्या चांगला फलंदाज आहे आणि पश्या चांगला गोलंदाज आहे. दोघांची चांगली जुगलबंदी रंगते मैदानात. पण एकदा खेळ संपला की दोघं एकदम घट्ट मित्र. सामना कुणीही जिंकलं तरी पैज लावलेल्या एक रुपयात दोघं एक चिंगम घेणार. अर्ध वाटून घेणार आणि फुगे करत गावापर्यंत सायकलवर जाणार. दोघांची मैत्री गावात चर्चेचा विषय होती. गावात दोघांच्या टीम होत्या. दर शनिवार रविवारी सामना असायचा. सामना झाला की गप्पा. प्रत्येकाचे आवडते खेळाडू वेगळे. मग आपला आवडता खेळाडू कसा चांगला आहे ते सांगताना वाद. इथेच गोंधळ झाला. दिन्याला तेंडुलकर आवडायचा आणि पश्याला वासिम अक्रम. खरंतर पश्याला वासिम अक्रम आवडायचा हे काही गावात कुणाला आवडायचं नाही. पण पश्याला टीव्हीवर जुने सामने पहायचा नाद होता. वासिम अक्रमची बॉलिंग बघून त्याला वेड लागायचं. त्याचा स्विंग, त्याचा छोटा रनअप, त्याची जिद्द. पश्या अक्रमचा fan होता. त्याला स्वप्नात सुद्धा वसीम अक्रम दिसायचा.
पश्याच्या खूप मित्रांनी त्याला समजावून सांगितलं की तू दुसरा कुणीतरी भारतीय खेळाडू आवडून घे. तुला वासिम अक्रम आवडतो हे काही आम्हाला आवडत नाही. पश्याला कळत नव्हतं की आपल्याला अक्रम आवडतो यात काय प्रॉब्लेम आहे मित्रांना? पण खरंच त्याच्या मित्रांना पश्या रोज अक्रमचं कौतुक करतो हे आवडायचं नाही. दिन्याला सुद्धा. दिन्याला पश्याची एवढी एकच गोष्ट आवडायची नाही. दिन्याने एकदोनदा प्रेमाने पश्याला सांगून पाहिलं. पण पश्याला कळत नव्हतं की कोणता भारतीय बॉलर आवडून घ्यायचा? एकतर पश्या स्वतः डाव्या हाताने बॉलिंग करायचा. त्यामुळे त्याला वासिम अक्रम जास्त आवडायचा. पण कुणी त्याला समजून घ्यायला तयार नव्हतं. हळू हळू पश्या नसताना दिन्या आणि त्याच्या मित्रांचं बोलणं व्हायचं. सगळ्यांना पश्याच्या या गोष्टीचा राग यायचा. दिन्याने खूप समजवून पश्या काही ऐकायला तयार नव्हता.
टीव्ही बघून बघून मित्रा मित्रांनी ठरवलं की आपण आपल्या आपल्यात आयपीएल घेऊया. टीमची नावं काय ठेवायची हा प्रश्न होता. कारण अख्ख्या गावात दिन्या आणि पश्याचीच टीम होती फक्त शाळेतली. त्यांच्या वयाची. त्यात पण पाच सहाच प्लेयर होते प्रत्येकाच्या टीम मध्ये. तरी दोन्ही टीम मध्ये सामने ठरले. तीन तीन सामने होणार. त्यात जो जास्त जिंकणार तो विजेता. प्रत्येकाने पैसे गोळा केले. पन्नास रुपये झाले. सगळं काही नीट चालू होतं. पोरं रात्री जेवायच्या आधी जमली होती. अचानक पुन्हा वासिम अक्रमचा विषय निघाला. सगळे पुन्हा पश्याला चिडवायला लागले. पिंट्या चिडून म्हणाला तुला एवढाच वासिम अक्रम आवडतो तर तुझ्या टीमचं नाव पाकिस्तान ठेव. पश्या भडकला. मी असं नाव का ठेवू? म्हणून भडकला. शेवटी भांडण वाढत गेलं. दिन्या शांत होता. त्याने सांगितलं की भारत पाकिस्तान नावाने खेळलो की मजा येईल. आपण नाणेफेक करू. हेड आलं तर आम्ही भारत. टेल आलं तर आम्ही पाकिस्तान. पश्या तयार झाला. मन्याने खिशातून एक रुपया काढला. हवेत उडवला. हेड आलं. पश्याला आणि त्याच्या टीमला पाकिस्तान म्हणून खेळावं लागणार होतं. पश्याची टीम पाकिस्तान आणि दिन्याची टीम भारत असं ठरलं. पश्याच्या टीम मधल्या लोकांनी आधी विरोध केला. दुसऱ्या दिवशी सगळे आपण पश्या कडून खेळणार नाही असं ठरवून मोकळे झाले. रात्री पुन्हा मिटिंग होती. पण अचानक मन्याने हॉटेलच्या गल्ल्यात मोठा हात मारला. तो दिन्याच्या भारत टीम मध्ये होता. त्याने पन्नास रुपयांची आयपीएल आता थेट पाचशे रुपयांवर नेली. त्याला आता पश्याला कायमचा धडा शिकवायचा होता. पाचशे रुपये फेडायची पश्याची ताकद नव्हती. पण आता दिन्या आणि मन्याच्या भारत टीमने पाचशे रुपयांची शर्यत लावली होती. पश्याच्या टीममध्ये सगळे गरीब होते. पण आता पाकिस्तान नावामुळे खेळणार नाही असं ठरवलेले पोरं अचानक खेळायला तयार झाले. त्यांना खात्री होती की आपण जिंकणार. आपल्याला पाचशे रुपये भेटणार. नक्की. पश्या जरा घाबरला. आपण हरलो तर? पाचशे रुपये कुठून देणार? पण पोरं म्हणाले आपण हरणार नाही. पाचशे रुपये सोडायचे नाही. अशी संधी पुन्हा पुन्हा भेटत नाही.
पैसे वाढले आणि नेहमी शांततेत चालणारे सामने एकदम बदलून गेले. शाळेतल्या भिंतीवर भारताचा जयजयकार सुरु झाला. भारत जिंकणार असं सगळीकडे लिहिलं जाऊ लागलं. शाळेतल्या पोरांना लक्षात आलं की हे पश्या आणि दिन्याच्या क्रिकेटचं आहे. पण सगळ्यांना उत्सुकता होती की दुसर्या टीमचं नाव काय आहे? कारण फक्त भारताची टीम सगळ्या भिंतीवर लिहित होती. दुसरी टीम काहीच लिहित नव्हती. काही मुलांनी विचारलं सुद्धा दुसर्या टीमचं नाव काय? पण दिन्याचे मित्र म्हणायचे विचारा त्यांना. थोबाड उघडलं तर सांगा. खूप दिवस हा अपमान पश्याला आणी त्याच्या मित्रांना सहन करावा लागला. एकतर त्यांना स्वतःला पाकिस्तान टीम असं लिहायची इच्छा नव्हती. ते फक्त तोंडी ठरलं होतं. पण आता पाकिस्तान पाकिस्तान म्हणून हळू हळू मन्याने सगळ्या शाळेत त्यांची बदनामी सुरु केली. पश्याने दिन्याला सांगितलं. शाळेत असं बोलायचं नाही हे आपलं ठरलं होतं. पण परिस्थिती आता दिन्याच्या सुद्धा हातात नव्हती. मन्याने सगळ्या शाळेत केलं होतं. पश्यावर सगळे संतापले होते. पश्या आता शाळेत चेष्टेचा विषय झाला होता. पश्याला आता सामना खेळण्यात काही इंटरेस्ट उरला नव्हता. पण त्याच्या टीम मधले मित्र अजूनही म्हणत होते की आपल्याला फक्त जिंकायचंय. आपल्याला पाचशे रुपये घालवायचे नाहीत. पश्या कसाबसा तयार झाला.
सामना जवळ आला तसा दिन्या एकदम टेन्शन मध्ये आला. त्याच्या टीम मधला चांगला बॉलर तापाने आजारी होता. पश्याकडे चांगला फलंदाज होता. पश्या स्वतः चांगला बॉलर होता. दिन्याकडे आता कुणीच बॉलर नव्हता. ही गोष्ट सामना हरवू शकणारी होती. दिन्याने हा पराभव एवढा मनावर घेतला की तो सुद्धा आदल्या रात्री जागा राहिला. उद्या काय होणार ही चिंता तशी त्याला एकट्याला नव्हती. पश्याला पण होती. पश्याला आपण पाकिस्तान नावाने खेळतोय हेच मान्य नव्हतं. पण त्याला पराभव पण मान्य नव्हता. त्याला कुठल्याही परिस्थितीत जिंकायचं होतं. आपण जिंकायचं का हरायचं ह्या गोष्टीवर त्याने खूप विचार केला. पण त्याला लक्षात आलं की आपण हरलो तर पाचशे रुपये फेडणार कसे? आपण खेळायला पाहिजे हे त्याला पक्कं माहित होतं. सगळे खूप विचार करून उशिरा झोपी गेले. उद्या सकाळी मस्त खेळायचं हे लक्षात ठेवून. आपल्याला जिंकायचं हे प्रत्येक खेळाडूने ठरवून टाकलं होतं.
सकाळी सामना सुरु व्हायची वेळ मात्र आली नाही. गावात कुणीतरी पाकिस्तानचा झेंडा लावला म्हणून दंगल सुरु झाली होती. गावातल्या लोकांना पोरांचा सामना आहे हे माहित सुद्धा नव्हतं. मैदानाजवळ असलेल्या लिंबाच्या झाडाला भारताचा झेंडा होता. पण दुसर्या बाजूला असलेल्या वडाच्या झाडाला पाकिस्तानचा झेंडा कुणी लावला हा वादाचा विषय होता. आधी काही लोक येऊन ओरडून गेले. मग पोलिसात तक्रार झाली. पुढे वाद आणखी चिघळला. मारहाण सुरु झाली. शिवीगाळ सुरु झाली. एवढे दिवस शांत असलेलं गाव एकदम हिंसक झालं. एकमेकांच्या जीवावर उठलं. गावात सहा लोकांचे जीव गेले दंगलीत. राजकीय लोकांनी पोळी भाजून घेतली. देशभक्ती दाखवायची याच्यासारखी संधी मिळणार नव्हती. लोकांनी खूप बोलून घेतलं. लिहून घेतलं. दंगल हळू हळू शहरात पसरली. जिल्हा एक दिवस बंद राहिला. लोक चारपाच दिवस भीतीने काम धंदा सोडून घरी बसले. शाळेला पण सुट्टी होती गावात. हळू हळू वातावरण शांत झालं. पुन्हा दिन्या आणि पश्या सायकलवर शाळेत जात होते. दिन्या पश्याला म्हणाला, आम्ही उगीच पाकिस्तानचा झेंडा लावला. आम्हाला वाटलं तुम्ही काही पाकिस्तानचे झेंडे लावणार नाही. आम्हीच झेंडा लावतो. म्हणजे तो झेंडा बघून आमच्या टीमला जिंकायची जिद्द निर्माण होईल. पण तो झेंडा लावला आणि भलताच गोंधळ झाला. पश्याला आता कुठे लक्षात आलं की झेंडा कुणी लावला होता. दंगल सुरु व्हायचं नेमकं कारण काय होतं. पश्या उगीच झेंड्याच्या भीतीने चार पाच दिवस नीट झोपला नव्हता. फक्त मित्रांनी क्रिकेटची गोष्ट कुणाला सांगितली नाही म्हणून त्याच्या पाकिस्तान टीमबद्दल कुणाला माहित नव्हतं.
दिन्या म्हणाला आपण आपल्यात एवढा समजुतदारपणा दाखवला. पण हे मोठे माणसं मात्र लहान मुलांसारखे भांडत होते. कुणालाच माहित नव्हतं झेंडा कुणी लावला. तरी एकमेकांचा जीव घ्यायला उठले.शाळा बंद होती हे बरं झालं पण आपली आयपीएल कॅन्सल झाली ना यार.पश्या म्हणाला, तरी पण पाकिस्तानचा झेंडा लावायची गरज नव्हती राव. दिन्या म्हणाला, ते पण आता लक्षात आलं. आपल्या टीमला जिंकायचं स्वप्न दाखवायचं असलं तर शत्रूचा झेंडा वापरायची गरज नाही. आपल्या झेंड्याला बघून पण जिंकायची जिद्द निर्माण झाली पाहिजे. इथून पुढे आपल्या गावात फक्त आपला तिरंगा असणार. त्यांचं बोलणं गावातल्या मोठ्या माणसांनी ऐकायला पाहिजे होतं.
– अरविंद जगताप.

The following two tabs change content below.
अरविंद जगताप

अरविंद जगताप

Writer, Lyricist, And Curious About Everything at ArvindJagtap.com
Arvind Jagtap was born on 20th September 1977. He is a poet, lyricist and scriptwriter well-known for his exploits in Marathi Cinema, the Art and Literature circuit and Television Industry. He is also a voracious reader who has developed his own heart-touching and candid writing style which incorporates colors of foolery, comedy, humor, political satire and pragmatism. Arvind has penned thought provoking articles on important issues such as farmers suicides, draught, life in rural Maharashtra, pseudo progress, urbanization and its social & ecological impact, to name a few. His work is a reflection of his ideology. It weighs in favor of generating awareness among the masses rather than simply creating pure nonchalant entertainment.
अरविंद जगताप

Written by अरविंद जगताप

Arvind Jagtap was born on 20th September 1977. He is a poet, lyricist and scriptwriter well-known for his exploits in Marathi Cinema, the Art and Literature circuit and Television Industry. He is also a voracious reader who has developed his own heart-touching and candid writing style which incorporates colors of...
Read more

Leave a Reply