चला हवा येवू दया किर्तन
नमस्कार! रामराम!
संत जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई सारख्या स्त्री संतांची परंपरा आपल्या मराठी भाषेला आहे. ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणणाऱ्या मुक्ताबाई सारख्या समंजस बहिणीची आपली अध्यात्मिक परंपरा. त्या काळात स्त्री फक्त उंबऱ्याबाहेर पडली नाही तर तिने स्वतः घराबाहेर पडून तुकारामासारखा गुरु शोधला. विठ्ठलाशी भांडण केलं. साक्षात विठ्ठलाला खडे बोल सुनावणारी स्त्री होती या महाराष्ट्रात. आज तिचा आवाज कुठे आहे? घराचा कारभार तिनीच सांभाळायचा हा नियम आहे. पण राज्यकारभार सांभाळायची संधी तिला कधी मिळणार? संत जनाबाईच्या लाडक्या विठोबाचं दर्शन घ्यायला, महापूजा करायला एखादी महिला मुख्यमंत्री कधी जाणार? मुख्यमंत्री बाईचा नवरा पण पूजेच्या वेळी उपस्थित होता अशी बातमी कधी येणार? बाप्पाहो, तुमच्यातले काही शहाणे म्हणतीन का बॉ महिला मुख्यमंत्री काय फक्त महापूजा करणार का? तसं नाही रे बावाहो. पण एवढ्या वेळा महापूजा होते पण पाउस काही मनासारखा पडत नाही. म्हणून मनात येतं का रुख्मिणीची त काही तक्रार नाही? एक चान्स एखाद्या बाईला पण भेटला पाहिजे असं विठ्ठलाच्या बाजूला उभ्या रुक्मीणीला सुद्धा वाटत असल ना? पण महाराष्ट्राला कधी वाटणार काय माहित? असो.
प्रश्न फक्त सत्तेचा नाही. आपल्याकडे त लोक घरी बायकोला पगार आणून दिला तरी उपकार केले असं समजतात. आमचा एक दोस्त त ऑफिसमधून घरी आला की त्याची बायको पाणी गरम करून उभीच असते. त्याला हातपाय धुवायला. एक दिवस पाणी जास्त गरम नव्हतं. त्याला पायाला थंड लागलं. पठ्ठ्याने लगेच तिला शिवी दिली. म्हणाला हेच शिकवलं का तुझ्या आईनी? बिचारी तोंड बारीक करून मला सांगत होती. बघा ना भाउजी हे नेहमी असंच बोलतात मला. मी म्हणलं चूक तुझीय बाई. तू पाणी जास्त गरम करायला पाहिजे होतं. ती म्हणाली भाउजी पाणी गरमच होतं. मी म्हणलो गरम म्हणजे चांगली उकळी आली पाहिजे पाण्याला. असं उकळत पाणी घ्यायचं आणि थेट अंगावर टाकायचं. पुन्हा ह्या जन्मात ओरडला नाही पाहिजे नवरा. आन ओरडला तरी सोताच्या आईचं नाव घेतलं पाहिजे. बायकोच्या आईचं नाही. आता मी काय चूक सांगितलं सांगा बरं मंडळी.पण माझं बोलणं बायकांना पटत नाही. आता एक बाई म्हणाली महाराज माझी सासू मला खूप त्रास देती. घरातले सगळे कामं आटोपून मी जरा मोबाईल हातात घेतला की म्हणते तू दिवसभर मोबाईलवर गेमच खेळत बसती. मी त्या बाईला म्हणलं तू सासूला सांग की आजपासून मी मोबाईलवर गेम खेळणार नाही. आपण दोघं कबड्डी कबड्डी खेळू. चालल का? आता ह्यात काय चूकय? काही लोक म्हणतात की महाराज तुम्ही बायकांना उलट बोलायला शिकवू नका. उलट उत्तर देणं आपल्या परंपरेत बसत नाही. मी म्हणतो फालतू प्रश्न विचारणं पण आपल्या परंपरेत बसत नाही. सासू नीट बोलली तर सून पण नीट बोलणार. सून गुणाची असल तर सासू पण आपोआप मोठ्या मनाची होणार. नाहीतर आदळ आपट चालूच राहणार.
मंडळी मला सांगा आपल्याकड घरात बिल भरून फोन लवकर लागत नाही. पण भांड्याला भांडं लागायला काहीच टाईम लागत नाही. फुकटात दोन मिनिटात लागतं. कसं काय? ज्या घरातला पुरुष आळशी त्या घरात फुटकी कळशी. आदळ आपट होणारच. आता नवरा जर एकही कामाला हात लावणार नसला तर बायको चीड चीड करणारच. ती बेड आवरून ठेवणार आणि हा लोळणार, ती रद्दी आवरणार आणि हा पेपर चाळणार त कसं चालल ? माझी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा ज्या घरातला पुरुष दिवसातून एकदा तरी स्वतः चहा करून बायकोला देतो त्या घरात नेहमी शांती नांदत असते. आणि ज्या घरातला पुरुष उठता बसता बायकोलाच चहा ठेव गं म्हणतो त्या घरातली बाई एक भांडं जागेवर ठेवत नाही. बायको चहा करती त्या घरात नवऱ्याला मान आसल पण कपाला हमखास कान नसतो. ध्यानात ठेवा रे बाबानो.
मंडळी, एक गोष्ट सांगतो. एका शाळेत एका मास्तरनी मुलांना जगातले सात आश्चर्य लिहून काढायला सांगतिले. खूप मुलांना माहित नव्हते. ज्यांना माहित होते त्यांनी लिहून काढले. आयफेल tower आन काय काय. ज्यांना माहित नव्हते त्यांनी मनानीच ठोकून दिलं. एकानी लिहिलं रस्त्यातले खड्डे. दरवर्षी पावसाळ्यात आमची महानगरपालिका सेम साईझचे खड्डे बनवते. हे एक आश्चर्य आहे. एकाने लिहिलं एकानी त हाईट केली. त्यानी लिहिलं माझे वडील प्रत्येक श्रावणात न चुकता संध्याकाळी सात वाजताच घरी येतात हे एक आश्चर्य आहे. पण गुरुजीला हे वाचून जेवढा धक्का बसला नाही तेवढा धक्का एका मुलीने लिहिलेले आश्चर्य वाचून बसला. तिने सात आश्चर्य काय लिहिले होते मंडळी? तिनी लिहिलं होतं मला माझ्या कानाने ऐकू येतं हे पहिलं आश्चर्य. मला माझ्या डोळ्यांनी दिसतं हे दुसरं आश्चर्य. मला फुलांचा वास येतो हे तिसरं आश्चर्य. असे श्वास घेता येतो पासून सगळे आश्चर्य तिच्या यादीत होते. किती छोट्या छोट्या गोष्टी त्या मुलीला महत्वाच्या वाटत होत्या. स्त्रिया एवढ्या हळव्या असतात. छोट्या छोट्या गोष्टीतलं महत्व त्यांना कळलेलं असतं. कारण या देशातल्या स्त्रीला खूप लहान वयात जवाबदारीची जाणीव करून दिली जाते. गावोगावी आजही हीच परिस्थिती आहे. अपेक्षांचं ओझं मुलांच्या खांद्यावर आणि कामाचं ओझं मुलींच्या खांद्यावर. मुलाला लाखांच्या गोष्टी सांगायच्या आणि मुलीला काटकसर शिकवायची ही पद्धत आजही आहे. मुलाला परदेशात आणि मुलीला सासरी गेलेलं बघायची स्वप्न आई बाप बघत असतील तर कसं होणार?
जग बदलतय. आपल्याकडेही चांगले बदल होताहेत. बायका नवऱ्याला नावानी हाक मारायला लागल्या हा एक भारी बदल झाला. नाहीतर आधी काय व्हायचं? एक बाई अहो म्हणायची आन चार लोक वळून बघायचे. आपल्याला हाक मारली का? आता नावच घेतात बायका त्याच्यामूळ प्रोब्लेम नाही. आता काही शहाणे म्हणतील का बॉ जुन्या चालीरीती बदलणं वाईट आहे. वाईट आहेच. पण जुन्या काळात नवरे सुद्धा बायकांना अहो जाहो बोलायचे. तुम्ही बोलणार का? अहो नम्रता, जरा टीव्हीचं रिमोट देता का? तुम्ही म्हणा. मी बायकाला म्हणायला सांगतो. पण असं होणार नाही. तरीपण पुरुष मंडळी आता सावध झालं पाहिजे. लग्न जमायचे वांधे झालेत. कित्येक ठिकाणी पोराचे बाप फिरायला लागलेत. पोरगी भेटायचा पत्ता नाही. पोरी विचारतात शिक्षण कितीय पोराचं? समानतेच्या दिशेने पाउल टाका. नाहीतर थोड्याच वर्षात नवरदेवाकडून हुंडा मागायला सुरुवात होईल. त्याच्यापेक्षा आताच हुंडा नको म्हणा. पद्धत बंद करून टाका. आता मुलगा झाल्यावर पेढे वाटतात. आणी मुलगी झाल्यावर बर्फी तरी वाटतात. पण एकदा का मुलाला हुंडा द्यायची वेळ आली तर आई बाप मुलगा झाल्यावर पेढे जाउद्या फुटाणे सुद्धा वाटणार नाही. जग बदलत चाललय. आता क्रिकेटचंच बघा. अचानक पुरुषांच्या टीम कडून देशाला फार अपेक्षा राहिली नाही. बायकांचीच टीम वर्ल्ड कप जिंकणार म्हणू लागले लोक. आधीच मुलींचं गुणवत्ता यादीत येण्याचं प्रमाण जास्तय. पास होण्याचं प्रमाण जास्तय. आता पुरुषांनी कष्ट करायला सुरुवात केली पाहिजे. सगळ्यांनीच अभ्यास केला पाहिजे किंवा मैदान मारलं पाहिजे असं नाही. बाकीच्यांनी घरकामात मदत केली तरी बायकोला अभिमान वाटेल. बाजारातून भाजी घेऊन येणारा नवरा किंवा गिरणीतून दळण घेऊन येणारा नवरा शतक पूर्ण करून आलेल्या विराट कोहली सारखाच दिसतो बायकांना. बाकी तुम्ही ठरवा.
-अरविंद जगताप.

The following two tabs change content below.
अरविंद जगताप

अरविंद जगताप

Writer, Lyricist, And Curious About Everything at ArvindJagtap.com
Arvind Jagtap was born on 20th September 1977. He is a poet, lyricist and scriptwriter well-known for his exploits in Marathi Cinema, the Art and Literature circuit and Television Industry. He is also a voracious reader who has developed his own heart-touching and candid writing style which incorporates colors of foolery, comedy, humor, political satire and pragmatism. Arvind has penned thought provoking articles on important issues such as farmers suicides, draught, life in rural Maharashtra, pseudo progress, urbanization and its social & ecological impact, to name a few. His work is a reflection of his ideology. It weighs in favor of generating awareness among the masses rather than simply creating pure nonchalant entertainment.
अरविंद जगताप

Written by अरविंद जगताप

Arvind Jagtap was born on 20th September 1977. He is a poet, lyricist and scriptwriter well-known for his exploits in Marathi Cinema, the Art and Literature circuit and Television Industry. He is also a voracious reader who has developed his own heart-touching and candid writing style which incorporates colors of...
Read more

Leave a Reply