Violence

December 16, 2017

लेखन

arvind jagapat patra

हिंसा या शब्दाचा आपण खूप एकांगी विचार करतो.

 

हिंसा या शब्दाचा आपण खूप एकांगी विचार करतो. कुणीतरी कुणावर तरी केलेला हल्ला आपल्याला हिंसा वाटते. कुणीतरी कुणाचातरी केलेला छळ आपल्याला हिंसा वाटते. पण माणसं स्वतः स्वतःलासुद्धा छळत असतातच की. त्यांचा विचार कुणी करायचा? आजी जे अतिरेकी उपवास करायची त्याचं मला कधीच कौतुक वाटलं नाही. तो तिने चालवलेला छळ होता स्वतःचा. पण तिच्या मनावर असलेला पगडा एवढा मजबूत होता की तिला कुठलाच नातेवाईक समजवू शकला नाही. तिने तिला माहित असलेल्या सगळ्या देवांचे उपवास केले. अशी खूप उदाहरण आपल्या भोवती असतात. आमचा एक मित्र नेहमी फिरायला सोबत येतो. आम्ही सगळे मांसाहारी. तो एकटा शाकाहारी. त्याच्या नजरेत आमच्या ताटातल्या कोंबडीविषयी असलेलं आकर्षण आम्ही ओळखू शकतो. पण तरीही तो हट्टाने मांसाहार करत नाही. त्याला काहीतरी देवाचं कारण. पण मुळात त्याला आम्ही खातो ते आवडत असतं. तो मला ग्रेव्हीचा वास आवडतो वगैरे कारणं सांगून आमच्यात बसतो. पण त्याचं असं स्वतःला बंधनात ठेवणं आम्हालाच खूप वाईट वाटतं. माणसाचं स्वतःवर नियंत्रण असावं हे मान्य. पण नको त्या गोष्टीत? पाणीच प्यायचं नाही. चप्पलच घालायची नाही. केसच कापायचे नाहीत. असे काही नियम लोक बनवून घेतात तेंव्हा अस्वस्थ व्हायला होतं. कुठेतरी श्रद्धा सुद्धा हिंसेकडे वळू लागते. नकळत. धार्मिक कारणाने जगभर लोक किती हिंसक होतात हे आपण बघतोच. आजवर कुठल्या रोगाने किंवा भूकंप, सुनामीने गेले नसतील एवढे जीव धर्माच्या नावाने गेलेत. हे सगळं या धर्माच्या लोकांनी त्या धर्माच्या लोकांना मारलं एवढ सरळ आहे. पण आपल्याच धर्माच्या परंपरा पाळता पाळता लोक स्वतःचा किती छळ करतात हे सुद्धा नीट बघायला पाहिजे. कुठलाच धर्म याबाबतीत मागे नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे.

सामान्य माणसं हिंसेपासून चार हात दूर असतात असा आपला समज असतो. म्हणजे मटन आणायला गेल्यावर एक किलो का दोन किलो सांगून रांगेत उभं राहणं, शक्यतो बोकडाच्या मानेवर सुरी चालवली जात असताना नजर फिरवणं वगैरे. पण त्यानंतर चाप देना किंवा लेग पीस देना अशी मागणी करत मटणाचे बारीक तुकडे करताना बघायला मात्र काही वाटत नाही. त्याबाबतीत आता समाजाची भीड चेपली आहे असं म्हणायला हरकत नाही. पण कुणाचा जीव जाताना बघायचं नाही असं ठरवलं म्हणजे आपण हिंसाचारी नाही असं असतं का? किंवा आपण मांसाहारी नाही म्हणजे आपण हिंसाचारी नाही असं असतं का? नशीब आपल्याच देशाच्या शास्त्रज्ञाने शोध लावलाय की वनस्पतींना पण जीव असतो. हे ऐकून बर्नार्ड शॉच्या डोळ्यात पाणी आलं होतं म्हणे. आपण शाकाहारी आहोत पण किती हिंसक आहोत असं काहीसं वाटून. माणसाने मग एवढ टोकाचं शाकाहारी असलं पाहिजे. पण आपण एवढे हळवे होऊ शकत नाही. हळवं असण्याचा थोर अभिनय करण्यात आपण सगळेच पटाईत असतो. पण कितीही हिंसक घटनेवर आपली प्रतिक्रिया क्षणिक असते. प्रिन्स नावाचा मुलगा विहिरीत पडला होता तेंव्हा लाखो लोक टीव्ही पुढे बसले होते. काही बायका तर देव पाण्यात घालून बसल्या होत्या. पण हे सगळे लोक जेवायच्या वेळी जेवत होते. कुणाची भूकच हरवलीय असं झालं नाही. अर्थात असं काही होण्याची गरज होती असं नाही. पण व्यक्त होताना आपण त्या घटनेएवढेच हिंसक असतो. कुठलं संकट आलं म्हणून जोरजोरात देवळातल्या घंटा वाजवायच्या ही काय पद्धत आहे? दंगलीसारख्या काळात मशिदीत जोरजोरात भोंगे वाजवायचे हा काय प्रकार आहे? रस्त्यात कुणी कुणाला चाकूने भोसकलेलं पाहून जेवढी दहशत बसत नाही तेवढी दहशत अशा सामुहिक गोष्टींनी निर्माण होते. औरंगाबादमध्ये मुस्लीम आमदार निवडून आला तेंव्हा अशी मिरवणूक काढली गेली जणू काही या देशात इस्लामी राजवट आली. या गोष्टींनी हिंदू जास्त संतापले. हिंदूंची मिरवणूक निघते त्याने मुस्लीम असुरक्षित होतात. कुठल्याही दंगलीपेक्षा या गोष्टी जास्त हिंसक असतात. कारण दंगलीत इतर धर्मियांनी एकमेकांना मदत केल्याच्या खूप घटना घडतात. पण जेंव्हा असं हिंसेचं अदृश्य सावट असतं तेंव्हा कुणीच कुणाची मदत करू शकत नाही. हे सावट किती गडद आहे याचा कुणालाच अंदाज येत नाही.

आपल्याला हिंसेचा तिटकारा आहे हे आपण भासवत असलो तरी हिंसेविषयी आपल्याला सुप्त आकर्षण असतं. आपल्याला ते आकर्षण सतत वाटत राहण्यासाठी आपल्याभोवती काही लोक, काही संस्था, काही गट सातत्याने काम करत असतात. हिटलर आपल्याला आवडायचं काही कारण नसतं. पण त्याची गोष्ट एवढ्या फिल्मी पद्धतीने आपल्यासमोर आणली जाते की आपण त्याच्या प्रेमात पडतो. खरंतर हिटलरचं व्यक्तिमत्व, त्याची ती मिशी यात कुठे दरारा आहे? आणि त्याच्या आयुष्याचा शेवट तर किती दयनीय आहे. तरी तो बाजूला सारून आपल्याला एक वंशश्रेष्ठत्व मिरवणारा हिटलर सांगितला जातो. जातीच्या, घराण्याच्या अभिमांनाच बाळकडू आपल्याला घरीच मिळालेलं असतं. त्यात भर पडते हिटलर सारख्या वंश अभिमानी लोकांची. आणि आपलं घरातून फुकट भेटलेलं बाळकडू आणखी कडू होऊ लागतं. हिंसा आपल्याला संस्कारात शिकवली जाते. कितीतरी बाप अभिमानाने सांगत असतात की मी मुलाला सांगतो मार खाऊन यायचं नाही. कुणी एक मारली तर तू दोन मारून ये. मी बघतो बाकीचं. आता यात कुणी आपल्या मुलाला मार खाऊन ये असं सांगावं असं आपलं म्हणणं नसतं. पण चर्चा करून प्रश्न सोडव असं कुणी सांगतं का? मुळात असं सांगणं हास्यास्पद वाटतं ना? कारण या गोष्टीवर आपल्याला विश्वास राहिलेला नाही. आपल्याला अमिताभ बच्चन आणि अमरीश पुरी चर्चा करून प्रश्न सोडवताहेत किंवा सलमान खान गुंडांना मार्गदर्शन करतोय हे पटणार नसतं. आपल्याला हाणामारी बघायची असते. त्यामुळे सिनेमावाले वेगवेगळ्या पद्धतीने मारामारी दाखवतात. आपण ती चवीने पाहतो. आपल्याला आवडणारे संवाद बघा. कितने आदमी थे? आदमी तीन और गोली दो किंवा काय. मैं जहां खडा हूं वहीं से लाईन शुरू होती है. बहुतेक संवाद बघा आक्रमक असतात. त्यात साहित्यिक मूल्य वगैरे नावाला नसतं. पण त्यातली आक्रमकता आपल्याला भावते. म्हणून सिनेमा एवढा लोकप्रिय आहे. सिनेमातल्या गाण्यांची भाषा बघा. मार डाला, दिल चीर के देख, तेरी आंखो ने मारा रे, दिल के टुकडे, कम्बख्त इश्क, अखियों से गोली मारे… अशी हजारो उदाहरण देता येतील. ही प्रेमाची भाषा आहे आपली. एवढी हिंसक. मराठीत पण नजरेचे बाण असतातच. तलवारीसारख्या भुवया आणि नजरेने घायाळ वगैरे. हे हिसंक संस्कार आपल्यावर पद्धतशीरपणे चालू असतात. ज्या सिनेमात नट नटी जीव देतात किंवा त्यांचा जीव घेतला जातो, किंवा दोन घराण्यात एकमेकांचा बदला घेण्याची स्पर्धा लागते ते जास्त आवडतात लोकांना. हळू हळू आपण हिंसा पहायला सरावतो. व्यसन लागतं.

अमुक जातीच्या किंवा धर्माच्या लोकांना धडा शिकवला पाहिजे असं सामान्य माणसं बोलत असतात. ज्यांनी उभ्या आयुष्यात झुरळाला पण धडा शिकवलेला नसतो. त्यामुळे एक सुप्त इच्छा असते. फक्त हे काम कुणीतरी करावं आणि आपल्याला ते पहायला मिळावं असं वाटत असतं बऱ्याच लोकांना. सोशल मिडीयावर असे शूरवीर खूप दिसतात. धर्माची भांडणं झाली की हे लोक युद्धाची भाषा बोलू लागतात. थेट चीनला धडा शिकवायची भाषा. कुणाच्या जीवावर? टीव्हीवर युद्धाच्या बातम्या बघून सोशल मिडीयावर लिहिणाऱ्या लोकांनी आक्रमक होण्याचं प्रमाण खूप वाढलंय हे मात्र मान्य करावं लागेल. हा एक नवीन आजार आहे. रोज कुणालातरी धडा शिकवायची भाषा लोक बोलताहेत. नशिबाने आज त्यांची संख्या कमी आहे. पण ही संख्या वाढायला वेळ लागणार नाही. कारण सोशल मिडीयावर आपली आक्रमकता दाखवायला पैसे लागत नाहीत. गावात जत्रा असली की कुस्त्यांची स्पर्धा असायची. मुख्य पैलवानांची कुस्ती खूप उशिरा असायची. तोपर्यंत जमलेल्या गर्दीसमोर छोटे छोटे पैलवान लढायचे. त्यांना कुठलं बक्षीस नसायचं. फक्त रेवड्या मिळायच्या. जिंकला तरी आणि हरला तरी. आज सोशल मिडीयावर लाईक मिळतात. या लाईकसाठी काडी पैलवान आक्रमक भाषेत शाब्दिक लढाया करत असतात. ज्याला अजून बारावी पास झाल्याचं सर्टिफिकेट भेटलं नाही तो देशभक्त आणि देशद्रोही असल्याचे सर्टिफिकेट लोकांना वाटत असतो. या सोशल मिडीयावरच्या युद्धाने आता विकृतीची सीमा ओलांडली आहे. लोक एकमेकांशी आपल्या विचारसरणीवरून वाद घालायचे. आता आपली विचारसरणी आपला पक्ष कसा बरोबर आहे यासाठी खोट्या गोष्टी पसरवायला सुरुवात झालीय. चीन कसा भारताला घाबरला असं तद्दन खोटं पसरवलं जातं. यात आपण स्वतःला फसवतोय हे सुद्धा लोक विसरून जातात. एक महिला नेता आपल्या पक्षाच्या नेत्याच्या मुलाचा बचाव करताना खोटे फोटो वापरते. एका मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवते. एवढी वेळ का आलीय? आपण किती आक्रमक आहोत हे दाखवायच्या नादात आपण किती मूर्ख आहोत हे सिद्ध करण्याची चढाओढ सुरु आहे. सोशल मिडियावरच्या अपप्रचाराने दंगली पेटतील किंवा खरंच युध्द होईल या भीतीपेक्षा आणखी एक मोठी भीती आता दिसतेय. ती म्हणजे व्यक्त होण्याची भीती.

माणसं व्यक्त व्हायला घाबरू लागलीत. आपल्या म्हणण्याचा वेगळा अर्थ तर निघणार नाही ही भीती आता कित्येकांना सतावतेय. पूर्वी जात ओठात होती ती आता पोटात आहे. खूप काळापासून. त्याचं विष झालंय. ते विष समाज माध्यमात झिरपत जाताना दिसतंय. कधी नव्हे एवढे जातीपातीचे ग्रुप तुम्हाला समाजमाध्यमात दिसतील. राजीव दीक्षित नावाच्या आता जिवंत नसलेल्या माणसाने सुचवलेली औषध लोक भक्तिभावाने घेतात. या गोष्टींच्या परिणामांची जवाबदारी कुणी घेणार आहे का? आमटे, नाना पाटेकर यांच्या सारख्या लोकांच्या नावाने खोट्या गोष्टी बेमालूमपणे पसरवल्या जातात. याला आळा कसा घालणार आहोत आपण? कुणी कुंभमेळ्यात खूप खर्च होतो असं म्हणालं की लोक अंगावर धावून येतात. कुणी बोलायचंच नाही का? पुन्हा अमुक धर्मावर का बोलत नाही हा पांचट प्रश्न आहेच. अरे माणूस जे भोवताली घडतं त्यावर बोलेल ना. भारतातला माणूस मोदींवर बोलणार का ट्रम्पवर? गायी सारख्या सगळ्यात दयाळू प्राण्यावरून ज्या प्रकारे हिंसा होतेय तो या देशाला शाप आहे. हे तथाकथित लोक गाईबद्दल असणारा आदर कमी करायला कारणीभूत ठरणार आहेत. भीती दाखवून आदर वाढत नसतो. आदर मनात असावा लागतो. गांधीजीबद्दल आजही जगाला आदर का आहे याचा शोध घेतला तरी खूप प्रश्नांची उत्तरं मिळतील. लोकांना हिंसेबद्दल आकर्षण आहे आणि अहिंसेबद्दल प्रेम आहे.

खरंतर एकमेकांचा धर्म बुडवायला निघालेले, देश उध्वस्त करू पाहणारे लोक जगात सगळीकडे आहेत. त्यांना हिंसा हवी आहे. पण स्वतः निराळे राहून. सैन्य लढायला पाहिजे. विजय यांच्या नावावर. कार्यकर्ते एकमेकांना जखमी करू देत. निवडणूक हे जिंकणार. हे खूप भीषण आहे. पण या लोकांच्या हिंसे पेक्षा मला वेगळ्या प्रकारच्या हिंसेचं जास्त दुखः होतं. या लोकांच्या हिंसेत एक विचारसरणी आहे. एक प्रचारतंत्र आहे. एक कारस्थान आहे. त्याला बळी पडलेले कार्यकर्ते आहेत. पण काही लोक जे अशा कुठल्याच कटाचा भाग नसतात ते हिंसेचे बळी होताहेत याचं जास्त दुखः आहे. उदाहरणार्थ लहान मुलांच्या आत्महत्येच्या प्रमाणात झालेली वाढ. हे असं का होतंय? मुलं एवढ्या सहजपणे आपल्या आई वडलांचं स्वप्न असं चिरडून कसं टाकतात? छोटीशी गोष्ट पण त्यांना का सहन होत नाही? कुणी अभ्यास करायला सांगितला म्हणून जीव देतोय. कुणी खेळायला दिलं नाही म्हणून जीव देतोय. त्या छोट्याशा जीवांच्या डोक्यात आयुष्य संपवण्याचे हिंसक उपाय कसे शिरले? सगळ्यात जास्त हेलावून टाकणारी हिंसा आहे ती ही. एका निर्वासित मुलाचा मृतदेह किनाऱ्यावर पडलेला पाहून आपण सगळेच किती अस्वस्थ झालो होतो. मला आजवरचं सगळ्यात क्रूर आणि करून दृश्य वाटलं ते. तो हिंसाचार जास्त चिंता वाढवणारा आहे. धर्मासाठी, साम्राज्यासाठी लढाया होतात. जीव जातात. पण हेलावून टाकणारी घटना असते शाळेत शिकणाऱ्या मुलांवर होणारा गोळीबार. तो पाकिस्तानात किंवा अमेरिकेत होत असला तरी माणसं एवढी विकृत कशी झाली हा प्रश्न पडतो. मुलगी झाली म्हणून किंवा गर्भात मुलगी आहे म्हणून ती मारून टाकणे ही गोष्ट अजूनही चालू आहे हे जास्त हिंसक आहे. इथे कुठे धर्म नावाची अफूची गोळी आहे? इथे कुठे साम्राज्यावादाची नशा आहे? मग एवढी क्रूर हत्या सामान्य माणसं कशी करू शकतात? ज्या ज्या हत्येत सामान्य माणसं सहभागी असतात ती हत्या जास्त थरकाप उडवणारी असते. ज्या हिंसेत सामान्य माणूस सहभागी असतो, साक्षीदार असतो ती जास्त घातक असते. म्हणून समूहाने लोक एकत्र येऊन ज्या हत्या करतात, मारहाण करतात ते जास्त धोकादायक आहे. लोकांना अचानक कायदा हातात घ्यावा वाटणं हे कायद्याचं राज्य नसल्याचं लक्षण असतं किंवा त्यांचा सरकारवर विश्वास नसल्याचं प्रतिक असतं. या गोष्टीचा सरकारला विचार करावा लागणार आहे. पण आपल्याला विचार करायचाय तो शेतकरी आत्महत्येसारख्या गोष्टीचा.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *