प्रिय टीव्ही 

               आजवर तुला बोलायची कधीच वेळ आली नाही. तुझ्यावर फार विचार करायची सुद्धा वेळ आली नाही. खूप लोक तर बोलतात टीव्ही आल्यापासून लोकांनी विचार करणच सोडून दिलं. कमी केलं. काही ठिकाणी असं घडत असेल. पण आपण एखाद दुसऱ्या उदाहरणावरून सरसकट विधान करण्यात आघाडीवर असतो. असो. टीव्ही असतो हे ऐकून होतो. त्यात माणसं दिसतात हे माहित होतं. पण टीव्ही पहिल्यांदा पाहिला ते मला ठळक आठवतंय. खूप लहानपणी. इंदिरा गांधींची हत्या झाली होती तेंव्हा. ८४ चा काळ. एका वाड्यात पन्नास साठ लोक जमले होते. इंदिरा गांधींचे अंतिम संस्कार चालू होते. लोक रडत रडत ते बघत होते. ते सगळं अविश्वसनीय होतं. इंदिरा गांधी यांच्या हत्ये एवढच. दिल्लीत चालू असलेली गोष्ट आपण इथे आपल्या गावात पाहू शकतो ही गोष्ट केवढी अविश्वसनीय होती. त्यानंतर काही दिवसांनी मित्राची आजी वारली. तो धावत ज्यांच्याकडे टीव्ही होता त्या वाड्यात गेला. त्याला वाटलं आपली आजी पण आता टीव्ही वर दिसणार. आमच्या भागातल्या खूप मुलांना माणसं मेली की टीव्हीवर दिसतात असं वाटायचं. कारण आम्ही टीव्ही तेवढ्यापुरताच पाहिला होता. ज्यांच्याकडे टीव्ही असायचा ते तिजोरीसारखा जपून ठेवायचे. टीव्ही झाकायला एक खोकं असायचं लाकडी. आणि त्यावर कव्हर किंवा कापड असायचं. पाचशे पाचशे भाग चालणार्या मालिकांचा जीव किती छोटा असतो ना? अगदी तेवढा त्या खोक्यातला टीव्ही असायचा. पण तोच खूप मोठा वाटायचा. पुढे हळू हळू आमच्या भागात पंधरा वीस टीव्ही आले तेंव्हा जरा टीव्हीशी जास्त परिचय झाला. पुढे टीव्ही रंगीत झाला. टीव्ही नेहमी घरची आर्थिक परिस्थिती दाखवून देणारा ठरतो. रंगीत टीव्ही असणारी माणसं श्रीमंत आणि black and white वाली मध्यमवर्गीय असं सरळ समीकरण होतं त्याकाळी. गरीबाकडे टीव्ही असण्याचा प्रश्नच नव्हता. जागतिकीकरणानंतर हा भेद संपला. सगळ्यांकडे रंगीत टीव्ही दिसू लागले. अगदी झोपडपट्टीला पाण्याचा नळ नसेल एकवेळ पण सेट टॉप बॉक्स दिसू लागला. याचा अर्थ फरक संपला  असं नाही. आजकाल ढोबळमानाने वाढलेल्या पोटाची चिंता असणाऱ्या लोकांकडे flat टीव्ही दिसतो. पोट भरण्याची चिंता असणाऱ्यांचा टीव्ही मात्र धष्टपुष्ट असतो. टीव्हीसोबतच तेंव्हा टेपचा जमाना होता. राधा कृष्णा सारखे टीव्ही आणि टेप एकत्र नांदायचे. टेप नेहमी टीव्हीच्या डोक्यावर असायचा. पुढे त्याचा सीडी प्लेअर झाला. तेंव्हा लोक कॅसेट भरून घ्यायचे आवडीच्या गाण्यांची. पण या टेपने एक गोष्ट केली होती. सकाळी सकाळी मोठ्या आवाजात लागणाऱ्या गाण्यावरून माणूस कोणत्या जाती धर्माचा आहे हे स्पष्ट ओळखू यायचं. त्यातल्या त्यात देवांमध्ये पण स्पर्धा लागायची. आमच्या डाव्या बाजूला राहणारा साई बाबाचा भक्त होता. आरत्या लावायचा. उजव्या बाजूला राहणारा बाबा महाराज सातारकर यांचा चाहता. प्रवचन लावायचा. खूप वेळा दोन्हीपैकी काहीच ऐकू यायचं नाही. टीव्हीने अशा खूप गोष्टीतून सुटका केली. सगळ्या घरातून एकच आवाज ऐकू येऊ लागला. ही खरंतर समानतेची नांदीच वाटली असेल तेंव्हा. पुढे अनेक channel आले आणि पुन्हा समाजात भाषिक, सांस्कृतिक विषमता निर्माण झाल्यासारखं वाटलं. तो भाग वेगळा.    

tv

                     प्रिय टीव्ही उर्फ इडियट बॉक्स, हो तुला इडियट बॉक्स असंही म्हणतात लोक. पण तुझ्या निमित्ताने खरंच खूप वेडेपणा अनुभवलाय आम्ही. टीव्ही असणार्या घरांना त्याकाळात एवढ महत्व होतं की ठरवलं असतं तर केवळ टीव्ही आहे या एकाच गोष्टीमुळे ते नगरसेवक म्हणून निवडून आले असते. गेली कित्येक वर्षं शेजारच्यांच्या टीव्हीच्या आवाजाने वैतागलेले अनेक लोक आपण पाहतो. पण त्याकाळात शेजारच्यांनी टीव्हीचा आवाज वाढवावा म्हणून विनंती कारायचे लोक. घर बसल्या चित्रपटांची गाणी आणि बातम्या ऐकायला मिळायच्या. टीव्ही असलेल्या घराची मालकीण श्रीदेवी एवढाच भाव खायची. आणि टीव्ही असलेल्या घरातली मुलं जस्टीन बिबर सारखी. नेभळट असली तरी उगाच श्रीमंत वाटायची. टीव्हीचा सुरुवातीचा काळ माझ्या दृष्टीने सुवर्णकाळ होता. लोक म्हणतात तसा आशय आणि विषय या अर्थाने नाही. त्या काळात टीव्ही काही ठराविक तासच दिसायचा. बाकीचं काळात फक्त खरखर. त्याला आम्ही टीव्हीला मुंग्या आल्या असं म्हणायचो. तर ठराविक वेळ कार्यक्रम दिसत असल्याने एक प्रकारची शिस्त होती. त्यातल्या त्यात शनिवार आणि रविवार हेच टीव्ही बघण्याचे वार होते. आणि छोटे मोठे सगळे मिळून टीव्ही पाहणे हे एक दुर्मिळ दृश्य. जेवढा वेळ टीव्हीवर कार्यक्रम असायचे तेवढा वेळ लोक अधाशासारखे टीव्ही बघायचे. आम्ही मुलं मुलं तर कर्णबधिरांसाठीच्या बातम्या पण एकटक बघत बसायचो. टीव्हीवर जे जे काही दिसायचं ते आवडायचं. भारावून टाकायचं. रविवारची दुपार आम्ही एकमेकांना बातम्यांसारख्या खुणा करून बोलत असायचो. कुणाचं कुणाला काही कळायचं नाही. पण आम्हाला गम्मत यायची. कधी कधी असं वाटतं की टीव्ही मुळे बालपण समृध्द झालेली आमची शेवटची पिढी असेल का? 

                          आम्ही आजकाल घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा दोष टीव्हीला देतो. पण प्रत्येक पिढीला आपल्या काळाबाबत हा गैरसमज असतो. जगासोबत जाणाऱ्या पिढीचे विचार वेगळे असतात. आम्ही तासनतास सागरगोटे खेळायचो, किंवा चिंचोके खेळायचो असं एखाद्या आजीने नातीला सांगितलं तर नात भजनी मंडळात जाणाऱ्या बाईने बे वॉच बघावं तसं बघेल आजीकडे. एवढा मोठा फरक आहे दोन पिढीत. मुलं कार्टून कसे बघू शकतात तासनतास? असं बापाला वाटतं. तर बाबा टीव्हीवर बातम्या कशा काय बघतात? असं मुलाला वाटतं. रिमोट आल्यापासून या सगळ्या भानगडी सुरु झाल्या आवडी निवडीच्या. नाहीतर आधी एकच कार्यक्रम सगळे बघायचे. तक्रार नव्हती. आम्ही लहानपणी क्रिकेटचे सामने बघायचो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध match असली की मोठी अडचण व्हायची. ते सामने पहाटेच सुरु व्हायचे. मग पहाटे पाच वाजताच ज्याच्या घरी टीव्ही असेल त्याचा दरवाजा वाजवायचा आणि हळूच त्याच्या घरात घुसून टीव्ही पुढे निर्लज्जपणे बसायचं ही एक वेगळीच कला होती. रामायण चालू असताना तर जाहिरातीच्या वेळी आम्ही अगदी शुकशुकाट असलेला रस्ता बघायला जायचो. कर्फ्यू लागल्यासारखं वातावरण असायचं. मग रामायण संपलं की पोरं आपापले धनुष्य बाण घेऊन बाहेर यायचे. सगळेच राम असायचे. रावण सापडायचा नाही. मग आपण सोडून सगळे रावण असं समजून बाण सोडायला सुरुवात व्हायची. रामायण बघतानाच खूप लोकांना देशात रामराज्य येईल असं वाटलं होतं. पण भावाला सिंहासन सोपवून राम वनवासात गेला त्याच दिवशी माझ्या टीव्हीचा antena का हलवला म्हणून एक भाऊ शेजारी राहणाऱ्या दुसर्या भावाला दगड घेऊन मारायला धावला. टीव्ही आपल्याला बदलू शकत नाही हे खरंतर खूप आधीपासून लक्षात आलं होतं. पण आपल्या राहणीमानात नक्कीच बदल करू शकतो याची सुद्धा जाणीव झाली होती. 

                              टीव्ही महाशय आपण यायच्या आधी डोक्याला छटाकभर तेल चोपडून आईच्या हाताने भंग पाडला की प्रत्येक मुलाला आपण सगळ्यात सुंदर असं वाटायचं. त्यात आई काजळ लावायची दृष्ट लागू नये म्हणून. मग तर खात्रीच व्हायची की आपण नजर लागण्यासारखी चीज आहोत. पण नंतर नंतर टीव्हीत दिसणारे चेहरे, त्यांचे कपडे, त्यांचे केस आपल्यापेक्षा खूप वेगळे आहेत हे कळू लागलं. सिनेमा ही खूप दूरची गोष्ट होती. टीव्ही जवळ होता. सिनेमापेक्षा टीव्हीमधली छोटी छोटी माणसं आपली वाटायची. अजूनही वाटतात. हळू हळू केबलचा जमाना आला. मोठ मोठे antena जगात आहेत नाहीत तेवढ्या दिशांना हलवत एक जण गच्चीत उभा असायचा. खाली दारात एक जण आणि घरात टीव्ही पुढे एक जण. टीव्ही पुढचा सांगायचा,  मुंग्या गेल्या की नाही? मग तो निरोप antena फिरवत बसलेल्याला दिला जायचा. मग तो आपल्या हिशोबाने पुन्हा antena फिरवायचा. मग मध्येच चिडवल्यासारखं चित्र दिसायचं. आशा वाटायची. पुन्हा मुंग्या. असं दिवस दिवस चालायचं. नव्या युगाचं चित्र उभं करण्यासाठी अशा प्रकारे आम्ही खूप कष्ट घेतले याची आजही ठळक आठवण आहे.

                         टीव्हीला दोष देणारे लोक खूप आहेत. पण मेरीट मध्ये आलेल्या मुलाचं श्रेय आई बापांनी घ्यायचं आणी नापास झालेल्या मुलाचं श्रेय टीव्हीने घ्यायचं हा अन्याय आहे. एखाद्या मुलीने नकार दिला की तिचं चारित्र्य वाईट असा प्रकार. टीव्ही आपण बंद करू शकतो हा जगातला महत्वाचा शोध आहे. आणि सुदैवाने ही सोय जगातल्या पहिल्या टीव्ही पासून आहे. तरीही टीव्हीला दोष दिला जातो हे वाईट आहे. जगातल्या कित्येक ज्येष्ठ नागरिकांचा कितीतरी मोठा काळ टीव्हीने सुसह्य केलाय. कितीतरी बायकांचा लेकरांना जेवू घालण्याचा प्रश्न टीव्हीनेच सोडवलाय. हळू हळू टीव्हीची जागा मोबाईल घेऊ लागलाय एवढाच काय तो बदल. आपण खूप सहजपणे हा बदल स्वीकारतोय. पण घरातला सदस्य झालेला टीव्ही हा बदल कसा स्वीकारणार हा प्रश्न मला पडतो. कित्येक गावात लोकप्रिय मालिका चालू असताना प्रियकर प्रेयसी बिनधास्त भेटायचे. घरात हमखास असलेल्या इतर बायकांना पत्ता लागायचा नाही आपल्या घरातला मुलगा किंवा मुलगी घरात नाही. कित्येक मालिकांचे टायटल सॉंग ही पोरा पोरींची भेटायची खुण होती. टीव्हीचा काही प्रेमविरांसाठी असाही फायदा. केबलचा जमाना आला तेंव्हा टीव्हीच्या जगात खूप बदल झाला. लोकांच्या गच्चीवर बिनधास्त जाऊन वायर चेक करण्याचा परवाना असलेले केबलवाले. कित्येक केबलवाल्यांसोबत गल्लीतले पोरं एक्स्पर्ट म्हणून जायचे. आपल्या प्रेयसीला एकदा भेटता येईल, बघता येईल ह्या उद्देशाने. त्यात केबलला एकदा सुई किंवा टाचणी टोचली की केबल नसताना पण channel दिसतात असले काय काय शोध पोरांनी लावून ठेवले होते. केबलवाला एरव्ही प्रत्येक घरातल्या बाईचा भाऊ असायचा. दादा असायचा. पण भारत पाकिस्तान सारख्या सामन्याच्या वेळी जर channel दिसत नसेल तर घरातले पुरुष आपल्या ह्या बळजबरीच्या मेहुण्याला मनसोक्त शिव्या द्यायचे. नंतर केबलच्या धंद्यात लोकांना पैसा दिसला आणि गुंडगिरी सुरु झाली. या धंद्यातली आपली वाटणारी माणसं अचानक गायब झाली. नाहीतर आधी या केबलवाल्यांशी लोकांचं एवढ घट्ट नातं होतं की ओळख वाढवून आपल्याला आवडते सिनेमे दाखवायला लावण्यापर्यंत मजल गेली होती. काही लोक तर रात्री बारा वाजताचे सिनेमे पण कोणत्या दिवशी दाखवायचे हे ठरवून घ्यायचे. ही सगळी चाळ संस्कृतीच होती. पण अचानक मोठे मासे शिरले आणि छोट्या मास्यांचा गुण्या गोविंदाने चाललेला संसार उध्वस्त झाला. 

                                आता टीव्ही पुढे मोबाईलचं आव्हान आहे. टीव्ही काही अंतरावर असतो. मोबाईल हातात. खिशात. टीव्ही आता पालक वाटतो. मोबाईल मित्र. तेवढी जवळीक असलेला. पण आज कधी नव्हे तो टीव्ही घरात गरजेचा वाटू लागलाय. टीव्हीच्या निमित्ताने तरी कुटुंब एकत्र येतं. आपापल्या मोबाईलच्या स्क्रीन ऐवजी एकाच टीव्हीच्या स्क्रीनकडे बघत बसणारं कुटुंब अचानक एकत्र कुटुंब वाटू लागतं. त्यामुळे टीव्हीवरच्या मालिकेतल्या कुटुंबापेक्षा मला एकच मालिका बघणाऱ्या कुटुंबाविषयी जास्त आनंद वाटतो. मालिका संपल्यावर कोण चुकीचं होतं आणि कोण बरोबर होतं यावर दोन मिनिट का होईना यावर चर्चा होते. आपण आपल्या चुकांवर बोलणं बंदच केलंय. पण लोकांच्या चुकांवर बोलण्याच्या निमित्ताने का होईना आपण बोलतोय तरी. आपले फोटो फेसबुकवर टाकून त्याच्या लाईक मोजत बसण्याची आपली आत्मकेंद्रित वृत्ती यानिमित्ताने थोडी विस्तारते. आपण आपल्या पलीकडे जग बघतो. मी विज्ञाना आणि तंत्रज्ञानात फार कमी अक्कल असलेला माणूस. कदाचित म्हणून विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी जरा जास्तच आदर आहे मला. पण नव्या नव्या शोधांचा कितीही अभिमान असला तरी एका शोधाविषयी मला खूप आक्षेप आहे. तो शोध म्हणजे सेल्फी कॅमेरा. हा शोध खूप घातक वाटतो मला. या सेल्फी मुळे आपण तटस्थपणे बघू शकत नाही जगाकडे. अगदी टीव्हीकडे पण नाही. असो. 

                 माझ्या कुटुंबातली एक महत्वाची जागा असलेला टीव्ही. तू काही घरात सावत्र आई, सावत्र बायको आहेस. काही घरात चेटकीण किंवा भानामती आहेस. पण काही घरात दिवसभर एकट्या असलेल्या मुलांची पालक आहेस. आपलं राज्य, आपला देश सोडून परक्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांचं हक्काचं माणूस आहेस. चाळीत राहणाऱ्या आमच्या एका मित्राने सांगितलं, रात्री वर्तमानपत्रात ड्युटी करून घरी गेला की तो एक वाजता टीव्ही लावतो. त्या आवाजात आठ जणांच्या कुटुंबात तो पडद्यामागे आपल्या बायकोच्या कानात सांगतो की तू त्या मालिकेतल्या त्या नटी एवढीच भारी आहेस. टीव्ही तुझे लोक सांगतात त्यापेक्षा खूप जास्त फायदे आहेत. आमचा मुलगा नापास झाला हे सांगणं पालकांना खूप जड जातं. त्यापेक्षा तो खूप टीव्ही बघतो हे सांगणं सोपं असतं. गल्लीतली एक मुलगी पळून गेली तिच्या प्रियकरासोबत तर तिच्या घरच्यांसकट सगळ्या भेटायला येणार्यांनी टीव्हीलाच दोष दिला. तिच्या घरच्यांचं दुखः थोडं हलकं झालं. आपले दोष झाकायला एवढी अप्रतिम गोष्ट नव्हती मोबाईलच्या आधी. तरीही घरबसल्या खूप गोष्टी दाखवल्या बद्दल आभारी आहे.

                       एकच गोष्ट सांगतो. स्वातंत्र्य दिनाचा दिवस. घरबसल्या देशभक्त असल्यासारखं वाटतं ते संचलन बघताना. पण कधी कधी खूप अस्वस्थ होत जातो आम्ही तुझ्यामुळे. प्रिन्स नावाचा मुलगा आठवतोय? तो बोअर साठी केलेल्या खड्ड्यात पडला होता. त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न चालू होते. सगळा देश प्रार्थना करत होता. प्रत्येकाला त्याचीच चिंता होती. असं वाटलं की असे सगळे खड्डे बुजवले जातील. काळजी घेतली जाईल. पण असे कित्येक प्रिन्स खड्ड्यात पडतातच अजूनही. मुंबईवर झालेला अतिरेकी हल्ला असो किंवा सुनामी असो. आम्हाला दुर्घटना बघायला आणि भाऊक होऊन प्रार्थना करायला जाम आवडतं. काळजी घ्यायला अजिबात नाही. पण तुझ्यामुळेच आम्ही तेंडुलकरचा पराक्रम पाहू शकलो. कित्येक उत्तम कथा, अप्रतिम अभिनेते आणि वेड लावणारी गाणी पाहू शकतो. आम्ही तुझे ऋणी आहोत अशी भाषा वापरणार नाही. कारण तू आमची भाषा बदललीस. या देशातल्या सामान्य माणसाला जगाच्या भाषेचं ज्ञान टीव्ही मुळे झालं. आम्हाला आमचे शिक्षक इंग्रजी बोलणं शिकायला टीव्हीवरच्या बातम्या ऐकायला सांगायचे. मराठीचे शिक्षक काही अभिनेत्यांचं नाव सांगून त्यांचे मराठी उच्चार नीट ऐका म्हणायचे. आम्ही त्यांचं ऐकलं नाही. फार गंभीरपणे घेतलं नाही ते. पण टीव्ही बघायचा कसा हे चांगल्या लोकांचं ऐकलं तर टीव्ही वरदान आहे हे नक्की. आता चांगले लोक कोण? ते टीव्हीवर पण शोधणं अवघड झालंय आजकाल. एवढी गर्दी झालीय. पण गर्दीत चांगलं माणूस शोधल्याचा आनंद जास्त असतो.

             प्रिय टीव्ही, तुझ्याकडे बघायचं कधी आणि कसं हे महत्वाचं आहे. तू सुंदर आहेस पण सूर्यास्तासारखा. कुणाला शेवटाची सुरुवात वाटतोस. कुणाला आयुष्याची सोनेरी किनार. 

 

ता.क. – निसर्गाप्रमाणे तुझी सृष्टी काळाप्रमाणे बदलतेय. पण दृष्टी पण बदलायला हवी. नाही का? 

                                                     

                                                                    तुझाच 

 

                         

The following two tabs change content below.
अरविंद जगताप

अरविंद जगताप

Writer, Lyricist, And Curious About Everything at ArvindJagtap.com
Arvind Jagtap was born on 20th September 1977. He is a poet, lyricist and scriptwriter well-known for his exploits in Marathi Cinema, the Art and Literature circuit and Television Industry. He is also a voracious reader who has developed his own heart-touching and candid writing style which incorporates colors of foolery, comedy, humor, political satire and pragmatism. Arvind has penned thought provoking articles on important issues such as farmers suicides, draught, life in rural Maharashtra, pseudo progress, urbanization and its social & ecological impact, to name a few. His work is a reflection of his ideology. It weighs in favor of generating awareness among the masses rather than simply creating pure nonchalant entertainment.
अरविंद जगताप

Written by अरविंद जगताप

Arvind Jagtap was born on 20th September 1977. He is a poet, lyricist and scriptwriter well-known for his exploits in Marathi Cinema, the Art and Literature circuit and Television Industry. He is also a voracious reader who has developed his own heart-touching and candid writing style which incorporates colors of...
Read more

Leave a Reply