प्रिय टीव्ही
आजवर तुला बोलायची कधीच वेळ आली नाही. तुझ्यावर फार विचार करायची सुद्धा वेळ आली नाही. खूप लोक तर बोलतात टीव्ही आल्यापासून लोकांनी विचार करणच सोडून दिलं. कमी केलं. काही ठिकाणी असं घडत असेल. पण आपण एखाद दुसऱ्या उदाहरणावरून सरसकट विधान करण्यात आघाडीवर असतो. असो. टीव्ही असतो हे ऐकून होतो. त्यात माणसं दिसतात हे माहित होतं. पण टीव्ही पहिल्यांदा पाहिला ते मला ठळक आठवतंय. खूप लहानपणी. इंदिरा गांधींची हत्या झाली होती तेंव्हा. ८४ चा काळ. एका वाड्यात पन्नास साठ लोक जमले होते. इंदिरा गांधींचे अंतिम संस्कार चालू होते. लोक रडत रडत ते बघत होते. ते सगळं अविश्वसनीय होतं. इंदिरा गांधी यांच्या हत्ये एवढच. दिल्लीत चालू असलेली गोष्ट आपण इथे आपल्या गावात पाहू शकतो ही गोष्ट केवढी अविश्वसनीय होती. त्यानंतर काही दिवसांनी मित्राची आजी वारली. तो धावत ज्यांच्याकडे टीव्ही होता त्या वाड्यात गेला. त्याला वाटलं आपली आजी पण आता टीव्ही वर दिसणार. आमच्या भागातल्या खूप मुलांना माणसं मेली की टीव्हीवर दिसतात असं वाटायचं. कारण आम्ही टीव्ही तेवढ्यापुरताच पाहिला होता. ज्यांच्याकडे टीव्ही असायचा ते तिजोरीसारखा जपून ठेवायचे. टीव्ही झाकायला एक खोकं असायचं लाकडी. आणि त्यावर कव्हर किंवा कापड असायचं. टीव्ही असलेल्या घराची मालकीण श्रीदेवी एवढाच भाव खायची. त्या काळात टीव्ही काही ठराविक तासच दिसायचा. बाकीच्या काळात फक्त खरखर. त्याला आम्ही टीव्हीला मुंग्या आल्या असं म्हणायचो. तेंव्हा एकच कार्यक्रम सगळे बघायचे. तक्रार नव्हती. आम्ही लहानपणी क्रिकेटचे सामने बघायचो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध match असली की मोठी अडचण व्हायची. ते सामने पहाटेच सुरु व्हायचे. मग पहाटे पाच वाजताच ज्याच्या घरी टीव्ही असेल त्याचा दरवाजा वाजवायचा आणि हळूच त्याच्या घरात घुसून टीव्ही पुढे निर्लज्जपणे बसायचं ही एक वेगळीच कला होती.
टीव्हीला दोष देणारे लोक खूप आहेत. पण मेरीट मध्ये आलेल्या मुलाचं श्रेय आई बापांनी घ्यायचं आणी नापास झालेल्या मुलाचं श्रेय टीव्हीने घ्यायचं हा अन्याय आहे. एखाद्या मुलीने नकार दिला की तिचं चारित्र्य वाईट असा प्रकार. टीव्ही आपण बंद करू शकतो हा जगातला महत्वाचा शोध आहे. आणि सुदैवाने ही सोय जगातल्या पहिल्या टीव्ही पासून आहे. तरीही टीव्हीला दोष दिला जातो हे वाईट आहे. जगातल्या कित्येक ज्येष्ठ नागरिकांचा कितीतरी मोठा काळ टीव्हीने सुसह्य केलाय. कितीतरी बायकांचा लेकरांना जेवू घालण्याचा प्रश्न टीव्हीनेच सोडवलाय.
आता टीव्ही पुढे मोबाईलचं आव्हान आहे. टीव्ही काही अंतरावर असतो. मोबाईल हातात. खिशात. टीव्ही आता पालक वाटतो. मोबाईल मित्र. तेवढी जवळीक असलेला. पण आज कधी नव्हे तो टीव्ही घरात गरजेचा वाटू लागलाय. टीव्हीच्या निमित्ताने तरी कुटुंब एकत्र येतं. आपापल्या मोबाईलच्या स्क्रीन ऐवजी एकाच टीव्हीच्या स्क्रीनकडे बघत बसणारं कुटुंब अचानक एकत्र कुटुंब वाटू लागतं. त्यामुळे टीव्हीवरच्या मालिकेतल्या कुटुंबापेक्षा मला एकच मालिका बघणाऱ्या कुटुंबाविषयी जास्त आनंद वाटतो. मालिका संपल्यावर कोण चुकीचं होतं आणि कोण बरोबर होतं यावर दोन मिनिट का होईना चर्चा होते. एकमेकांशी बोलणं होतं. आपण आपल्या चुकांवर बोलणं बंदच केलंय. पण लोकांच्या चुकांवर बोलण्याच्या निमित्ताने का होईना आपण बोलतो तरी. आपले फोटो फेसबुकवर टाकून त्याच्या लाईक मोजत बसण्याची आपली आत्मकेंद्रित वृत्ती यानिमित्ताने थोडी विस्तारते. आपण आपल्या पलीकडे जग बघतो.
प्रिय टीव्ही, लोक सांगतात त्यापेक्षा खूप जास्त फायदे आहेततुझे. आमचा मुलगा नापास झाला हे सांगणं पालकांना खूप जड जातं. त्यापेक्षा तो खूप टीव्ही बघतो हे सांगणं सोपं असतं. गल्लीतली एक मुलगी पळून गेली तिच्या प्रियकरासोबत तर तिच्या घरच्यांसकट सगळ्या भेटायला येणार्यांनी टीव्हीलाच दोष दिला. तिच्या घरच्यांचं दुखः थोडं हलकं झालं. आपले दोष झाकायला एवढी अप्रतिम गोष्ट नव्हती मोबाईलच्या आधी. तरीही घरबसल्या खूप गोष्टी दाखवल्या बद्दल आभारी आहे.
आम्ही तुझे ऋणी आहोत अशी भाषा वापरणार नाही. कारण तू आमची भाषा बदललीस. या देशातल्या सामान्य माणसाला जगाच्या भाषेचं ज्ञान टीव्ही मुळे झालं. आम्हाला आमचे शिक्षक इंग्रजी बोलणं शिकायला टीव्हीवरच्या बातम्या ऐकायला सांगायचे. मराठीचे शिक्षक काही अभिनेत्यांचं नाव सांगून त्यांचे मराठी उच्चार नीट ऐका म्हणायचे. आम्ही त्यांचं ऐकलं नाही. फार गंभीरपणे घेतलं नाही ते. पण टीव्ही बघायचा कसा हे चांगल्या लोकांचं ऐकलं तर टीव्ही वरदान आहे हे नक्की. आता चांगले लोक कोण? ते टीव्हीवर पण शोधणं अवघड झालंय आजकाल. एवढी गर्दी झालीय. पण गर्दीत चांगलं माणूस शोधल्याचा आनंद जास्त असतो.
ता.क. – निसर्गासारखी तुझी सृष्टी काळाप्रमाणे बदलतेय. पण दृष्टी पण बदलायला हवी. नाही का?

तुझाच

– अरविंद जगताप.

The following two tabs change content below.
अरविंद जगताप

अरविंद जगताप

Writer, Lyricist, And Curious About Everything at ArvindJagtap.com
Arvind Jagtap was born on 20th September 1977. He is a poet, lyricist and scriptwriter well-known for his exploits in Marathi Cinema, the Art and Literature circuit and Television Industry. He is also a voracious reader who has developed his own heart-touching and candid writing style which incorporates colors of foolery, comedy, humor, political satire and pragmatism. Arvind has penned thought provoking articles on important issues such as farmers suicides, draught, life in rural Maharashtra, pseudo progress, urbanization and its social & ecological impact, to name a few. His work is a reflection of his ideology. It weighs in favor of generating awareness among the masses rather than simply creating pure nonchalant entertainment.
अरविंद जगताप

Written by अरविंद जगताप

Arvind Jagtap was born on 20th September 1977. He is a poet, lyricist and scriptwriter well-known for his exploits in Marathi Cinema, the Art and Literature circuit and Television Industry. He is also a voracious reader who has developed his own heart-touching and candid writing style which incorporates colors of...
Read more

Leave a Reply