प्रिय २०१८

January 1, 2018

लेखन

arvind jagapat patra

प्रिय २०१८

प्रिय २०१८

हे नववर्षा! तुझं स्वागत आहे. खरंतर नवीन वर्षाचा पहिला दिवस साजरा करायला हवा. पण आम्ही सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस साजरा करणारी माणसं. जुन्या वर्षाला निरोप देता देता एवढा उशीर होतो की नव्या वर्षाचा पहिला सूर्योदय बघायचा राहून जातो कित्येकांचा. आणि काही काहींचा निरोप समारंभ थेट सुर्योदयापर्यंत रंगतो. पण सूर्याकडे पाहण्याची ताकद उरलेली नसते त्यांच्या नजरेत. खरतर खूप संकल्प असतात. खूप मागण्या असतात नवीन वर्षाकडून. 

हे २०१८, पिढ्यान पिढ्या कष्ट घेऊन कित्येक आई बापांनी मुलांच्या तुलनेत मुलींचं प्रमाण कमी करण्यात यश मिळवलंय. त्यांच्या तरुण मुलांना आयुष्य एकट्याने काढण्याची शक्ती मिळू दे. उगाच पोरींची तोंडं बघत बसतात बिचारे. सगळं डिजिटल होत चाललंय. व्यापाऱ्यांना, ठेकेदारांना नवीन युक्ती मिळू दे. मालात भेसळ करतात नाहीतर. आपले नेते बेताल बडबड करतात, त्याच त्याच जीभ कापून टाकण्याच्या धमक्या देतात. त्यांना नवीन धमक्या सुचू दे. विधानसभेत अंताक्षरी खेळण्याची पद्धत येऊ दे. तेच ते निषेध आणि कारवाईचे रडगाणे आता बोअर झालेय. ठराविक महिला सरपंचांच्या नवऱ्याच्या मांडीला फोड येऊ दे. बसता येऊ नये त्याला. त्यानिमित्ताने कित्येक महिला सरपंचाना व्यासपीठावर तरी बसायला मिळेल पहिल्यांदा. घरातला कचरा रस्त्यावरच्या खड्ड्यात टाकण्याचा कायदा येऊ दे. एका दिवसात खड्डे बुजतील तरी. मोबाईलचा सेल्फी कॅमेरा नष्ट होऊ दे. ओठांचे चंबू गबाळे बघण्याचा वैताग आलाय. ऑफिसला दांडी मारणाऱ्या लोकांना पगारवाढ मिळायची सोय कर. गर्दी कमी होईल लोकलची. कारने एकटे ऑफिसला जाणाऱ्या लोकांना रात्री बारापर्यंत ओव्हरटाईम दे. ट्राफिकच्या समस्येवर दुसरा काय उपाय करणार? पूल धडाधड कोसळताहेत. आपल्या मुलांच्या आयुष्याची किंमत असेल तर पुलांच्या आयुष्याची पण किंमत करायला ठेकेदारांना अक्कल दे. हॉटेलमध्ये आग लागते आणि लोक गुदमरून मरतात. हॉटेलच्या सुरक्षेची जवाबदारी लहान मुलांना देता आली तर बघ. फटाके उडवताना यापेक्षा जास्त काळजी घेतात मुलं. महापालिकेला उगीच त्रास नको. देशभक्तीवर बोलायला कर लावता आला तर बघ. सुमार लोक देशभक्तीवर बोलतात तेंव्हा देशाची जास्त चिंता वाटू लागते. रोज सकाळी मोबाईलवर सुविचार पाठवणाऱ्या लोकांना पाकिस्तानात पाठवता आलं तर बघ. हा सगळ्यात मोठा सुविचार असेल.  

हे नववर्षा, happy न्यू इअर. इंग्रजीत यासाठी की मराठीसाठी आम्ही काय केलं? मराठी शाळा बंद पडण्याची घोषणा तेवढी फक्त मराठीत होते. एवढा एकच धडा घेतलाय असं वाटतं. मराठी वाचवायला फर्ड्या इंग्रजीत सां<wbr />गणारा कुणी नेता भेटू दे. मराठीत सांगितलेलं कळत नाही लोकांना. आणि हो, मेट्रो बघायला लोक लोकलने येतील. तेवढ्यासाठी तरी लोकलची अवस्था जरा बरी व्हावी अशी प्रार्थना कर. मेट्रोच्या आवारात फेरीवाल्यांकडून जास्त हप्ता घेण्याची शक्ती दे नेत्यांना. फेरीवाल्यांची गर्दी कमी व्हायला तेवढा एकच उपाय आहे आपल्याकडे. फवारणीसाठी कीटकनाशक पुरवणाऱ्या कंपन्यांना शेतकऱ्यासाठी थेट विष बनवायची परवानगी मिळू दे. फवारणीमुळे शेतकऱ्यांचा जीव जातो आणि मग कंपनीवर नाव येतं. एवढ्या थोर कंपनीवर कारवाई करायची वेळ येते सरकारवर. सरकारला ते किती जड जातं. दरवर्षी शेतकरी बिचारे हमीभावाची मागणी करतात. त्यांना एक आयडिया दे. एक वर्ष काहीच पिकवू नका म्हणावं. आज तुम्हाला न विचारणारे लोक बघा मग कसा भाव देतील. सरकारलापण थोडं भान दे. फक्त पक्षाच्या जागा वाढताहेत. नौकरीच्या जागा वाढवण्याची आठवण दे. विसरून जातात लोक कामाच्या गडबडीत.

आणि हो २०१८ चे सुरवातीचे काही दिवस आम्ही २०१७ च लिहू कागदावर. त्याची पण सवय करून घे. विरोधी पक्षाला पण शहाणपण दे. केवळ मलबारहिलच्या वर्षात बदल होण्याची वाट पाहतात. नव्या वर्षात राज्यात बदल व्हायला आवाज उठवण्याची प्रेरणा दे. माझ्यासारख्या सामान्य माणसांना स्वतःच्या कर्तव्याची जाणीव दे. शहाणपणा शिकवण्यात वेळ जातो आमचा. एकमेकांना जवाबदार धरण्यात आम्ही तरबेज आहोत. तू आम्हाला स्वतः जवाबदारी घ्यायला शिकव.

तुलाही शुभेच्छा!

सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

– अरविंद जगताप.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *