प्रिय २०१९

December 30, 2018

लेखन

arvind jagapat patra

प्रिय २०१९

प्रि­ २०१९

मला वाटलं येतं का नाही यंदा नवीन वर्ष? २०१८ तसं लईच लांबलचक गेलं. हनुमानाच्या शेपटीसारखं. हनुमान कोणत्या जातीचा ते काही अठरात समजलं नाही. आता एकोणीसमधीच कळल कायकी. एकोणीस आल्याव एकच टेन्शन आलं. आमच्याकड आर्धे दोस्त एकोनावीस म्हनतेत. त्यातले आर्धे आता पुण्यात आसतेत. त्यांचा आता वर्षभर पानउतारा व्हनार. आमचे मास्तरच एकोनावीस म्हणायचे त्याच्यामूळ आम्हाला बी सवय लागली. आसा पैलाच फॉल्ट एकोणीसमधी दिसतोय. खरंतं सरत्या वर्षाच्या टायमाला मागच्या वर्षात काय घडलं हे आठवाय पायजे. पर अठरामधी सगळ्याला गेल्या चार वर्षात आसं बोलायची सवय झालीय. त्याच्या आधी देशात सगळे गेल्या साठ वर्षात आसं बोलायचे. देशातले सगळे हिशोब गेल्या साठ वर्षात नाहीतं गेल्या चार वर्षात आशेचं होतेत. शेजारचा दिन्या मागच्या वर्षी ३६ टक्के मार्क घेऊन पास झाला. त्याच्या बापानी पेढे वाटले आन म्हणला गेल्या साठ वर्षात आपल्या गावात कुणी ३६ टक्के घेतले नव्हते. दिन्यानी करून दाखविलं. गावातल्या पोरांनी हप्ताभर दिन्याचा डीपी ठिवला होता whatsapp वर.

एकवीसव्या शतकात अठरा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल काहीतरी खास होऊन जायला पायजे आशी आमची इच्छा होती. म्हणजी आठरावं लागल्यासारखं काहीतरी वाटाय पायजे ते काय वाटलं नाही. राहुल गांधीनी आपुन एकटेच तरुण वाटाव म्हणून एकदम वयस्क लोक सी एम करून टाकले. सगळा गुलाल म्हताऱ्या कोताऱ्या लोकालाच लागणार आसल तरुण पोरं काय फक्त मतदान करून बोटाला शाई लावायला पायजेत का? म्हणून आठरा पूर्ण होऊन एकोणीस सुरु झाल्याच्या आनंदात राजकारणात तरुण रक्ताला वाव दिला पायजे. तरुण रक्त फक्त डोके फोडायच्या कामीच नाही यायला पायजे. आमच्या पक्याला म्हणलं दोन हजार अठरा कसं गेलं? अंबानीच्या पोरीचं लग्न झालं हे बरं झालं. आता त्यालाबी घरात काही मोठा खर्च उरला नाही. बऱ्याच गोष्टी स्वस्त होत्यान बघ. पक्याचं म्हणणं खर व्हायला पायजे एकोणीसमधी. चंद्या चार वर्ष झाले मुंबईला गेलाय. डायव्हर झालाय. त्याला म्हणलं ह्या टायमाला तरी सातशे रुपये वापस कर त्यो म्हनला बिजनेस लईच डाऊन हाये जीएसटी पाई. आता त्याला सीएसटी आन जीएसटी मधलाबी फरक कळत नाही. पण जीएसटीचं भ्याव दाखवून लई लोकानी एकमेकाला उधार देणं बंद केलंय. पितृपक्षासारखं वागले लई लोक वर्षभर. व्यवहारच करीत नव्हते. एकोणीसमधी जीएसटीचे कारणं देणं बंद होऊदे बाबा. जीएसटी आपल्या डोक्याच्या भायेरचा इशय हाये. पर मटनशॉप वाल्याचा सलमान जशी दर महिन्याला हेअर स्टाईल चेंज करतो तशे जेटलीकाका दर महिन्याला जीएसटीत काही ना काही चेंज करतेत. म्हणून नव्या वर्षात माझंबी एक सजेशन देतो. ज्या गावात एसटी जात नाही त्या गावाला जीएसटीतून सूट द्यायला पायजे जेटलीकाकानी.

बऱ्याच चौकाचौकात बेरोजगार पोरांचा घोळका गप्पा मारीत बसलेला दिसतो. तिथं पान टपरीत मावा चोळणारयाचे हात सोडले कुनाच्याच हाताला काम नाही. पोरांच्या हाताला काम भेटू दे. बऱ्याच पानवाल्यांनी आता सोता मावा चोळायचं बंद करून गिर्हाईकालाच ती जवाबदारी दिल्याचं दिसतंय. पण ह्याच्यापेक्षा येगळ काम तरुण करू शकतात असं लोकल पुढार्याला कळू दे. आमच्या तालुक्यात एका फोटो स्टुडीओचे आता पंचवीस फोटो स्टुडीओ झाले. काही दिवसानी हे फोटोवाले एकमेकाचेच फोटो काढतेन कायकी. आपले माणसं एकानी एक सुरु केलं की सगळे त्याचीच नक्कल करतेत. आता आमच्याकड दोन वर्षात पंधरा चिकन सिक्स्टी फाईव इकनारे गाडे झाले. मी काय म्हनतो निदान चिकन फिफ्टी सिक्स तरी नाव द्या. काही तं चेंज करा बिट्याहो. एकोणीसमधी चिकन कंटकी आन चिकन सिक्स्टी फाईव्ह ला काहीतरी पर्याय भेटू दे. पाणीपुरी, दाबेलीवाल्या भवती पोरी शाहरुखखानपेक्षा जास्त गर्दी करत्यात तरी त्यात मराठी पोरं कामून इंटरेस्ट घेत नसतेन ह्याचंबी उत्तर भेटू दे. आता हे सगळं डोक्यात कामून येतं लोक नवीन वर्षाचे संकल्प करतेत. का बॉ मी एक तारखेपसून अमुक करीन. तमुक करीन. आन इतके लोकं पाहतो मी ज्यांची अवस्थाच नसती एक तारखेला काही करायची. इतके डांगडिंग करतेत थर्टीफस्टला की यक तारखेला मंग काहीच होत नाही. ह्या समद्यात मला चिन्मय लई भारी वाटतो. यक नंबरचं गुणी पोरगंय.थर्टी फस्टच्या दोन चार दिवस आधीपसून दिवसरात्र फक्त मेसेज पाठवित राहतो. हे आपलं नववर्ष नाही. पण परवा मोक्कार बंड्यानी चिन्मयच्या एक सनदिशी थोबाडीत मारली चारचौघात. म्हनला दहादा तेच तेच मेसेज कामून पाठवितो? बंड्याचं चुकलंच. बंड्याला आन चिन्मयला दोघालाबी नवीन वर्ष चांगलं जाऊ दे.

प्रिय एकोणीस, आता अठरा पूर्ण झाल्यावर तू अति संवेदनशील झाला असणार. कोणत्याबी कारणावरून तुझ्या भावना भडकणार. त्याच्यामूळ काही सूचना करतो. गाय ह्या विषयावरून लई राडे होतेत. इथून पुढं सरकारनी सगळ्या गाई सरकारनी ताब्यात घेऊन टाकल्या पायजेत. आन तिकीट लावून दर्शन सेवा सुरु केली पायजे. आपले लोक हेल्मेट घालायलाबी नाही म्हनतेत. आशा लोकांसाठी त्यांच्या त्यांच्या जाती धर्माचे टिळे लावलेले हेल्मेट बनविले पायजेत. एकबी माणूस हेल्मेट घालायला नाही म्हणणार नाही. बायकांना एवढी आडचन होती तरीबी सरकार हायवेला, सिटीत शौचालय बांधीत नाही. जागेची आडचन आसल मला वाटतं स्थानिक पुढाऱ्याच्या कार्यालयात शौचालय बांधलं पायजे. त्या वास्तूला कधीतरी कुणाच्या अडचणीत कामी आल्याचं पुण्य लाभल. देशाला जर आपले सगळे कर्ज फेडायचे आसतेन सोशल मिडीयावर पोस्ट करायचा दहा रुपये चार्ज ठिवला पायजे. हे सोशल मिडीयावर आचकट इचकट लिहिणारे काही काही लोकं तेच आसतेत जे सार्वजिनक संडासात भिंतीवर लिहायचे. ह्यानला फुकटात लिहायची सोय ठीवलीच नाही पायजे. नव्या वर्षात करता येण्यासारख्या आशा खूप गोष्टी सुचत्यात. पण हे समद करायचं कुणी? आधीच प्रश्न कमी नाहीत. इथं शेतकरी यवढा भडकलाय आन राज्याला फुलटाईम कृषीमंत्री नाही. एकोणीसमधी तरी भेटू दे. सातवा वेतन आयोग लागू व्ह्तोय. बरं वाटलं. शेतकऱ्यासाठी यकच आयोग लागू करायचाय त्याचंबी कायतरी होऊन जाव यंदा. बेरोजगारीमूळ पोरांचे लग्न जमना झाले. नौकरीच्या जागा नसत्यान जाउद्या त्यानला लुडो खेळायला तरी जागेची काही सोय व्हाय पायजे.

अकरा कडून व्हत्या, पंधरा कडून व्हत्या त्याच अपेक्षा एकोणीसकडून हायेत. लई काही नाही. सरकारी नौकराला जसं रिटायर व्हायचं वय हाये तसं आमदार खासदारालाबी आसलं पायजे. रोज तेच तेच फोटो पाहून लई बोर होतं. कवा कवा कळतच नाही पेपर कालचाय का आजचाय? रस्ते खड्डेमुक्त व्हणार हा एकच जोक पुढारी दर टायमाला सांगतेत. त्यानला निदान रोज यक नवा जोक तरी सांगायची सकती व्हायला पायजे. तीनदा तलाक म्हणल्याव आधी कसा तलाक व्हायचा तसं तीनदा राजीनाम दिऊ म्हणलं की राजीनामा मंजूर झाला पायजे. आशे काही नियम केल्याबिगर आता जनतेला बदल झाल्यावानी वाटणार नाही. होर्डिंग लावणाऱ्याला दीपिका पडुकोण नाही तं आलीया भटचा तरी फोटो कंपल्सरी करा. कामून माकडावानी थोबाडं पहायचे उठलं की आम्ही?

आमचा चंद्या म्हणतो कामिगिरी कमी पडली धोनीलाबी बशवितेत. तसं पुढाऱ्यांच्या बाबतीतबी व्हायला पायजे. अधिकाऱ्याच्या बाबतीतबी व्हायला पायजे एकोणीसमधी खूप काही व्हाव वाटतं. बाकी काही नाही झालं तरी चालल पण यंदाच्या निवडणुकीत फक्त पुढारी लढले पायजेत. सामान्य माणसांच्या यकमेकात लढाया होऊ नाही यवढी अपेक्षा.

एकोणीसच्या लई लई शुभेच्छा!

अरविंद जगताप.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *