आपण वाया गेलेली माणसं…

March 6, 2017

लेखन

arvind jagapat patra

संस्काराच्या नावाखाली खूप गोष्टी आपल्याकडून करवून घेतल्या जातात

संस्काराच्या नावाखाली खूप गोष्टी आपल्याकडून करवून घेतल्या जातात. उदाहरणार्थ आपल्याला नेहमी खरं बोलावं, खोटं बोलू नये असं सांगितलं जातं. आणि या सत्याच्या आग्रहामुळे आपण लहानपणी दोनचारदा तरी चांगलाच मार खातो. मग खरं बोलण्यावरचा आपला विश्वास हळू हळू उडू लागतो. कारण आई बाप सांगतात खरं बोललास की मारणार नाही. मात्र खरं बोलून पण बऱ्याचदा मार खावा लागतो. हळू हळू मुलं खोटं बोलणं जास्त पसंत करतात. पाहुण्यांसमोर जास्त बोलू नये असं सुद्धा सांगितलं जातं लहानपणी. त्याचा एवढा अतिरेक होतो की बर्याच मुलांना पाहुणे एकतर शिष्ट तरी समजतात किंवा माठ तरी. तर असं सांगितलेल्या गोष्टी निमुटपणे करत गेलो की खूप तोटे सुद्धा सहन करावे लागतात. आई बाप जरी मुलांचे शत्रू नसले तरी त्यांनाही बऱ्याचदा या गोष्टी लक्षात येत नसतात. मोठेपणी म्हणजे आपण अठरा वगैरे वर्षाचे झालो की आपल्याला चहूबाजूंनी मतदान करणे कसं पवित्र कार्य आहे हे सांगायला सुरुवात होते. मतदान करणे म्हणजे राष्ट्रभक्ती. मतदान करणे म्हणजे देशसेवा. मग आपण पंधरा ऑगस्टला तयार होऊन, छाती पुढे करून भारावलेल्या अवस्थेत जसे शाळेत जायचो तसे मतदानाला जाऊ लागतो. आजकाल तर बोटांचे फोटो वगैरे टाकायची स्पर्धाच असते लोकांची. तर आपण असे खूप निवडणुकीत मतदान केलेले लोक मेंढरासारखे वागलो असं वाटू लागतं निकाल लागल्यावर. खरंच आपल्या मताची काही गरज होती का? असा प्रश्न तुमच्या डोक्यात येत नाही का?
निवडणुकीचा निकाल लागला की एक गोष्ट हमखास होते ती म्हणजे हरलेले लोक जिंकलेल्या लोकांनी पैसे देऊन मतदान करवून घेतलं वगैरे ठराविक साचाचे आरोप करू लागतात. राजकारण्यांचे एकमेकांवरचे आरोप म्हणजे इम्रान हाश्मीच्या सिनेमातलं चुंबन दृश्यच म्हणा ना. म्हणजे ते चुंबन आहे का हल्ला आहे हेच कळेनास होतं. तर या आरोपांची त्यांना लाज सुद्धा वाटत नाही आणि खंत सुद्धा. पण आपल्याला मात्र मेल्याहून मेल्यासारखं होतं. आपण कुठे पैसे घेऊन मत दिलं होतं? मग बिनधास्त आपल्याबद्दल असं कसं बोललं जाऊ शकत? खरतर यांचं एकमेकांना नाव ठेवणं हे रोज व्हिस्की पिणाऱ्याने रोज रम पिणाऱ्याला बेवडा म्हणण्यासारख आहे. दोघंही सारखेच. फक्त ब्रांड वेगळा. तरीसुद्धा कधी कधी हरलेले लोक बोलतात की जातीमुळे दुसरा पक्ष निवडून आला. लोकांनी जात बघून मतदान केलं. मला सांगा हा निर्लज्जपणाचा कळस आहे की नाही? जाती पातीचा प्रचार करणार हेच. पुन्हा जातीकडे बघून मतदान झालं म्हणून ओरडणार हेच. हे म्हणजे सनी लिओनिने लोक माझ्याकडे डोळे फाडून बघतात म्हणून तक्रार करण्यासारख झालं.
निवडून आलेले आणि पराभूत झालेले एकमेकांचा उद्धार करताना कधीच सरळ आरोप करत नाहीत. म्हणजे कोथळा बाहेर काढण्याची धमकी दिली तरी साधं एकमेकांचं नख सुद्धा काढत नाहीत हे लोक कधी. मागे राहुल गांधी जसे मोदींच्या भ्रष्टाचाराचे पुरावे देणार होते. काय झालं त्याचं? या लोकांना वाटतं लोक विसरतात. पब्लिक मेमरी इज अलवेज शॉर्ट. पण तसं नाही. लोकांना आता जाब विचारायचा कंटाळा आलाय. नाकात बोट घालणाऱ्या माणसाला आपण तुम्ही असं का करता? म्हणून विचारत नाही. आपण दुर्लक्ष करतो. चार हात लांब राहतो. पुढाऱ्यांच्या सवयी अशाच आहेत. त्या सुधारणार नाहीत हे आता देश स्वतंत्र होऊन सत्तर वर्ष होत आले तेंव्हा लक्षात आलं आपल्या. काही लोक अजूनही प्रामाणिक आहेत. पण ते आता उठून दिसत नाहीत पूर्वीसारखे. कारण सोपं आहे. तुळशीच्या रोपांमध्ये असला तरी गांजा लक्षात येतो. पण गांजाच्या रोपात तुळस असेल तर कशी ओळखू येणार? सध्या चांगल्या पुढाऱ्यांचं गांजाच्या शेतातल्या तुळशीसारखं झालंय. त्यांच्याकडे कुणाचं लक्ष जात नाही. किंवा गांजाच्या शेतात कोण कशाला तुळस शोधायला जाईल? त्याने काय असा फायदा होणार आहे?
चांगले पुढारी दुर्मिळ आहेत हे मान्य. पण या लबाड नेत्यांनी आपली पापं झाकण्यासाठी आपला उपयोग का करावा? आम्ही मतदार आहोत. उन्हातान्हात उभे राहून मत देतो. काही उपयोग होणार नाही हे माहित असून निष्ठा दाखवतो. आणि हे नेते पडले की म्हणणार मशीन खराब होत्या. बोगस मतदान झालं. म्हणजे मतदारांनी जो कौल दिला तो खोटा. हेच शहाणे. प्रत्येक वेळी हे लोक मतदान पद्धतीवर संशय घेणार. जो थेट मतदारांवर असतो. मोठ्या प्रमाणावर दारू वाटली गेली असं म्हणतात नेते. अरे तुम्ही पण तेच केलं होतं. पण तुमची पिऊन लोक शुद्धीतच राहिले. तुमच्यासारखी तुमची दारू पण बोगस निघाली. शुध्द न हरपल्यामुळे लोकांनी तुमच्या विरोधात मत दिलं. मान्य करा. पण आजवरचा इतिहास आहे. पराभव हे लोक सहजा सहजी मान्य करत नाहीत. कॉंग्रेसला मतदान केलं जायचं त्या काळात विरोधातले लोक म्हणायचे लोक सुशिक्षित नाहीत आपल्याकडे. त्यांना पंजाच माहितीय फक्त. तिथेच मत देतात. मग इतर पक्षांना मत द्यायला लागल्यावर कधी धार्मिक आरोप झाले. कधी जातीय. पण एक साधी गोष्ट या लोकांना लक्षात येत नाही. मुळात सरासरी मतदान साठ टक्के होतं. त्यात तीस टक्के मत घेणारा पण जिंकतो किंवा वीस टक्के मत घेणारा पण. याचा अर्थ हा काही शंभर टक्के जनतेचा कौल नसतो. तरी आपण जनमत त्या बाजूने आहे असा त्याचा अर्थ काढू शकतो. पण आपल्या मनात नेहमी येतं की शंभर टक्के मतांपैकी किमान सत्तर टक्के मत मिळवणाराच विजयी समजला जावा असा नियम असायला हवा. डॉक्टर व्हायला नव्वद टक्के सुद्धा अपुरे पडतात. पण शहर, गाव, जिल्हा सांभाळणाऱ्या लोकांना मात्र हा नियम नाही. आणि मुख्य म्हणजे हे लोक आपण जनतेचे सेवक आहोत असं म्हणतात. मग आपण मालकासारखे वागण्याऐवजी गुलामासारखे का वागतो? आपण सेवक निवडायचे काही निकष ठरवत का नाही? आपण घरात किंवा शेतात गडी ठेवायचा तर तो सत्तर वर्षाचा ठेवतो का? आपण दुकानात कामाला माणूस ठेवायचा तर तो पोलीस केस असलेला गुंड किंवा मवाली ठेवतो का? आपण साधा कार चालवणारा ड्रायव्हर ठेवायचा तर त्याला खरंच चालवता येईल की नाही याची दहादा खात्री केल्याशिवाय ठेवत नाही. मग राज्यकारभार चालवायला आपण असे डोळे झाकून कसे लोक निवडतो? ही चूक गेली कित्येक वर्ष होतेय. म्हणजे दोष आपल्यात पण आहे. नाही का?
दोष आहे पण तो नेमका काय आहे कळत नाही. सध्यातरी एकच लक्षात येतंय. हॉटेल मध्ये जर फक्त फिंगर बाउल ही एकमेव डिश असेल तर माणूस क्वालिटीचा काय विचार करणार? हात धुवून घ्यायचाच विचार करणार. सध्या राजकारणात पण फार विशेष पर्याय नाहीत. पक्षांची नावं वेगळी आहेत. सत्तेत माणसं सेम आहेत. वर्षानुवर्ष. म्हणून राहून राहून वाटतं आपल्या मताने खरंच काही बदल झाला का? पण निराश होऊन चालणार नाही. एक दिवस बदल होईल. बघूया. आकाशात भरारी घेईल असं वाटणारा मुलगा जेंव्हा नाक्यावर चकाट्या पिटत असलेला दिसतो तेंव्हा बापाला लक्षात येतं. आपला पोरगा वाया गेला. विकासाचं स्वप्न बघून दिलेलं आपलं मत सुद्धा खड्ड्यातून प्रवास करताना वायाच गेलंय असं वाटतं. या दृष्टीने गेली कित्येक वर्ष आपण वाया गेलेली माणसं आहोत.

– अरविंद जगताप.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *