ऑलम्पिक मेडल

August 16, 2016

लेखन

असं म्हणतात की पृथ्वीवर सगळ्यात जास्त काय आहे तर पाणी आहे. पण आपल्याला ते खोटं आहे असं वाटायला लागलंय अशी पाणीटंचाई आहे. आपल्याकडे हजारो गावं अशी आहेत

असं म्हणतात की पृथ्वीवर सगळ्यात जास्त काय आहे तर पाणी आहे. पण आपल्याला ते खोटं आहे असं वाटायला लागलंय अशी पाणीटंचाई आहे. आपल्याकडे हजारो गावं अशी आहेत ज्यांनी पावसाची वाट पाहणं कधीच सोडून दिलंय. ते फक्त tanker चीच वाट बघत असतात. अशाच एका तळेगाव नावाच्या गावातला तरुण दत्तू भोकनल. नाशिक मधल्या चांदवडजवळचं गाव. वडील कुटुंब चालवण्यासाठी विहीर खोदायचं काम करायचे. दत्तू कधी त्यांच्यासोबत जायचा तर कधी पाण्याच्या tanker च्या रांगेत तासनतास उभा राहायचा हंडाभर पाण्यासाठी. विहीर खोदणाऱ्या माणसाचे पाण्यासाठी हे हाल. त्यात गंभीर आजाराने अचानक वडील वारले. कुटुंबात मोठा असल्याने दत्तूला नौकरी करण्याशिवाय पर्याय नव्हता. तो सैन्यात भरती झाला.
                      सहा फूटपेक्षा थोडी जास्तच उंची असलेला दत्तू नौकानयन स्पर्धेसाठी उत्तम आहे असं आर्मीतल्या कोचला वाटलं. त्यांनी दत्तूला रोइंग नावाच्या खेळाची ओळख करून दिली. लांबून भल्या मोठ्या पाण्यात बोटींचा खेळ बघून दत्तूला राग आला. किती ही पाण्याची नासाडी. आणि भीतीही वाटली. आयुष्यात आपण एवढ प्रचंड पाणी पाहतोय. बुडालो तर?
                     पण ठरलं. खेळायचं. ज्या पाण्याने आपल्या गावाकडे पाठ फिरवली त्या पाण्याकडे आपण पाठ फिरवायची नाही. फक्त चार वर्षं झाली दत्तू हा खेळ खेळतोय. पण आता तो एशियन champion आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या खेळत आपल्या देशातून त्याची एकट्याची  ऑलिम्पिकसाठी निवड झालीय.
                     भारतासाठी खेळणे किती मोठी गोष्ट आहे हे मात्र तसं दत्तूच्या उशिरा लक्षात आलं. लोकांनी सांगितल्यावर. कारण त्याच्या डोळ्यासमोर होतं फक्त गाव आणि दुष्काळ. पाणी त्याला अजूनही गोल्ड मेडल सारखं वाटतं. पण आता त्याला आशा आहे देशासाठी मोठा पराक्रम केला तर कदाचित त्याच्या गावाकडे लोकांच लक्ष जाईल. गावाचं नशीब बदलेल.
                     दत्तू इतरांसारखा फक्त पाणी टंचाईची चिंता करत बसला नाही. संघर्ष करत त्याने पाण्यावर विजय मिळवलाय. दुष्काळातून येऊन पाण्यावर राज्य करणाऱ्या या खणखणीत नाण्यावर आता देशाची नजर आहे.  दत्तू तुला आमचा सलाम! तूला बघून खरंच म्हणावं वाटतं जय जवान ..जय किसान

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *