भक्तांचा लोचा..

February 25, 2017

लेखन

arvind jagapat patra

आपल्याकडे भक्तीमार्गाची मोठी परंपरा आहे

आपल्याकडे भक्तीमार्गाची मोठी परंपरा आहे. वारकरी संप्रदाय आहे ज्याच्यामुळे अजूनही आपण एवढ्या आक्रमणांनंतर आपली संस्कृती टिकवून ठेवलीय. वर्षभर आपली कामं करून विठ्ठलाच्या भेटीला जाण्याची, कुठल्याही कर्मकांडात अडकता केवळ देवाची भेट घ्यायला जाण्याची ही भक्ती परंपरा केवढी थोर आहे. या परंपरेत तुम्ही देवाला एकेरी बोलू शकता, त्याला नाव ठेवू शकता, त्याला जाब विचारू शकता. एवढी समृद्ध भक्ती परंपरा जगाच्या पाठीवर फार कमी ठिकाणी असेल. मग मनात विचार येतो आपल्या देशाच्या राजकारणात जो भक्तिमार्ग आहे तो असा आक्रस्ताळा का आहे? दोन्ही बाजूने आक्रमक असलेल्या या नव्या राजकीय भक्तांचा लोचा काय आहे?
राजकीय भक्तीमार्गात आपण एखाद्याला एवढ डोक्यावर घेतो की त्याला आपल्या खालच्या माणसाचे काय हाल चालू आहेत हे कळत नाही. आणि आपल्याला तो वर काय करतोय हे लक्षात येत नाही. त्याला आपल्याला ओझं झालंय याची जाणीव आहे का नाही हे सुद्धा आपल्याला कळत नाही. मग त्याचं छद्मी हास्य सुद्धा आपल्याला हुंदके वाटू लागतात. आपल्यासाठी दिलेले. भक्त देवाला बिघडवतो आणि देव भक्ताला बिघडवतो. दोन्ही बाजूने गोंधळ चालू असतो. त्यात आपल्याला काही देणं घेणं नाही. पण हे भक्ती प्रकरण जेंव्हा देशाशी संबंधित असत तेंव्हा जरा गंभीर व्हायला पाहिजे. देश हा भक्तीने चालत नाही. युक्तीने आणि शक्तीने चालतो. केवळ घोषणा देऊन युध्द लढता येत नाही. अफवा पसरवून देशाची प्रगती होत नाही. विरोधकांना बदनाम करून आपल्या नेत्याच्या चारित्र्याला झळाळी येत नाही. तरीही हे मार्ग राजकारणात अवलंबले जातात. राजकीय नेत्यांना हे डावपेच शोभतात. त्यांची मानसिकता असते तशी. पण सामान्य माणूस कधी या कुटील डावपेचात अडकला नव्हता. सोशल मिडियामुळे म्हणा किंवा कुठल्या असुरक्षिततेमुळे म्हणा पण सामान्य माणूस आता कुटील राजकारणी होत चाललाय. तो आपल्या राजकीय देवांचा बाजार मांडायला लागलाय. यात राजकीय देवांचा काय फायदा आहे माहित नाही पण भक्तांच मात्र मोठं नुकसान होणार आहे. खरंतर भक्त आक्रस्ताळे असले की देव विनाकारण बदनाम होतो हा साधा नियम आहे.
आपण आधी देवभक्त आणि राजकीय भक्त यांच्यातला फरक बघू. देवभक्त आपल्या घरातलं तेल, मीठ, पीठ घेऊन भक्ती करतो. नारळ विकत घेऊन देवळात जातो. राजकीय भक्त सोशल मिडीयावर पडीक असतो. आपल्या शेजारच्या एटीम मध्ये पैसे मिळतात का नाही याची सुद्धा त्याला माहिती नसते. तो ज्या पक्षाचा आहे त्या पक्षाला एटीम मध्ये पैसे मिळत नाहीत असं वाटलं तर तो तसं लिहितो. देवभक्त देवळात कधी एकशे एक चकरा मारतो. कधी एकवीस. पण राजकीय भक्त जागच्या जागीच फिरत असतो. त्याला आपल्याला लोक फिरवताहेत हे सुद्धा लक्षात येत नाही. देवाचा भक्त सतत देवाचं नाव घेत असतो. राजकीय भक्त सतत विरोधकांच नाव घेत असतो. देवाचा भक्त नेहमी चांगले शब्द मुखी यावेत असा प्रयत्न करतो. राजकीय भक्त शिवीगाळ करत असतात चोवीस तास. देवाचा भक्त डोकं टेकवत असतो फक्त देवापुढे. राजकीय भक्त दिवसभर डोकं आपटत असतो. असं म्हणतात की भक्ती जेंव्हा वास्तूत प्रवेश करते तेंव्हा त्या वास्तूचं मन्दिर होतं. पण राजकीय भक्ती जर का एखाद्या वास्तूत शिरली तर त्या घराचे वासे फिरले म्हणून समजायचं. ते घर फुटलं म्हणून समजायचं. कुटुंबाला जोडणारा देव असतो पण भावा भावांमध्ये वैर निर्माण करणारं राजकारण असत. भक्ती जेंव्हा एखाद्या कार्यात प्रवेश करते तेंव्हा त्या कार्याची सेवा होते. पण राजकीय भक्ती एखाद्या कामात शिरली की त्या कामाचं वाटोळ होतं. गरिबी हटवण्यासाठी एवढे मोर्चे झाले. मोर्चे काढणारे श्रीमंत झाले आणि गरीब तसेच राहिले. शेतकऱ्यांच्या नावाने तर शेकडो नेते तयार झाले. पण ते आमदार खासदार झाले. या पक्षातून त्या पक्षात उड्या मारत राहिले. शेतकरी बसला कपाळावर हात मारत. माकडाला मारुती समजायची चूक केली की असं होतं. माकड ते माकडच. या झाडावरून त्या झाडावर जाणार. मारुतीराया एवढा मोठा भक्त नाही. पण म्हणून माकडांना नेते बनवायची चूक करण्यात पण अर्थ नाही. दोन चार सन्माननीय नेते सोडले तर शेतकऱ्याची नेहमी फसवणूक होत आली. शेतकऱ्यावर एवढ विस्तारानं लिहिण्याच कारण या भक्तीचा सगळ्यात वाईट परिणाम शेतीवर होतो.
गावात फिरा. तुम्हाला कमानी दिसतील. मोठमोठ्या. या कमानींचा काय उपयोग असतो? कुठल्या तरी सरपंच, पंचायत समिती सदस्याच्या नावाने असलेल्या कमानी साधी सावली सुद्धा देऊ शकत नाहीत माणसाला. किंवा पावसापाण्यात या कमानीच्या खाली तुम्ही उभे सुद्धा राहू शकत नाही. या कमानी फक्त भक्तीचं प्रदर्शन करत असतात. पाउस पाण्यात तुम्ही देवळात जाऊ शकता. सावलीत बसू शकता. पण राजकीय भक्ती दाखवण्यासाठी उभ्या केलेल्या कमानी कुणाच्याच कामी येत नाहीत.
भक्तांचे चार प्रकार सांगतात. एक भक्त तो असतो जो अडचणीत असल्यावर देवाला हाक देतो. भक्ती करतो. असे भक्त देवाचे जास्त असतात. पण राजकीय पक्षात कमी असतात. राजकीय भक्त स्वतः कधी अडचणीत नसतात. पण ते नेहमी देश अडचणीत असल्याचा प्रचार करत असतात. जर सत्ताधारी विचारांचे असतील तर देश कधी नव्हे एवढा सुखात आहे असं चित्र निर्माण करत असतात. म्हणजे आधी कडाक्याची थंडी असायची पण आमचे साहेब आल्यापासून गुलाबी थंडी पडायला लागली असं म्हणायला हे बावळट लोक कमी करत नाहीत. दुसरा भक्त तो असतो जो उपभोगासाठी देवाची भक्ती करत असतो. असे भक्त किरकोळ पदांसाठी, पुरस्कारासाठी किंवा कंत्राटासाठी लाचार असतात. तिसरे भक्त असतात देवाचं स्वरूप जाणून घेण्यासाठी उत्सुक लोक. असे भक्त त्यातल्या त्यात तटस्थ असतात. पण यांची संख्या अगदीच कमी असते. एकूणच भक्तांची सगळ्यात मोठी अडचण म्हणजे यांना गॉसीप वाचण्याची खूप आवड असते. दुर्दैवाने यांचं वाचन फक्त सोशल मिडियापुरत मर्यादित असत. म्हणून मग यांची दृष्टी मोबाईलच्या स्क्रीन एवढीच व्यापक असते आणि मेंदू मेमरी कार्ड एवढाच असतो. जो यांनी एकदा एखाद्या पक्षाची लंगोट घातली की पूर्णपणे format होऊन जातो. मोबाईलच्या दुकानातल्या पोरांची battery चालू आहे का नाही हे बघण्याची एक गावठी पद्धत असते. ती म्हणजे ते battery ला जीभ लावून बघतात. राजकीय भक्तांची अशीच मानसिकता असते. ते कुठल्याही विषयात तोंड मारून बघतात. जोरात झटका बसला की सोडून देतात. पण एखादी बंद battery असली की तिच्याशी खेळत बसतात. कुत्रा जसा हाडाशी खेळत बसतो. त्यात त्याचं पोट भरणार नाही हे त्याला माहित असत. पण वेळ जाण्याचं ते उत्तम साधन असल्यामुळे कुत्रा तेच हाड तासनतास चघळू शकतो. स्वतःच लपवू शकतो. त्यावर माती उडवू शकतो. पुन्हा शोधत बसू शकतो. पुन्हा चघळत बसू शकतो. कुठल्याही प्राण्याची भांडण बघितली तर एक लक्षात येतं त्यांना किमान माहित असत की ते का भांडतात. त्यात त्यांचा काय फायदा होणार आहे? पण बऱ्याच लोकांना हेच माहित नसतं की ते का भांडताहेत? सोशल मिडीयावर आरडा ओरडा केल्याने देशाला कोणता फायदा होणार आहे? एकच माणूस प्रत्येक वेळी बरोबर असू शकत नाही. एकच पक्ष प्रत्येक वेळी बरोबर असू शकत नाही. मग दोन्ही बाजूचे लोक असे एकमेकांवर का तुटून पडतात? दोन्ही बाजू किती फोल आहेत हे वरचेवर सिध्द होत आलंय तरी पोकळ भक्ती थांबत नाही. सगळ्या पक्षात माणसं आहेत आणि माणसं चुका करणार हा साधा नियम आहे. मोहाला बळी पडणार हे स्वाभाविक आहे. आणि आजकालचे पक्ष बघितले तर माकडांनी लगडलेल झाड वाटतात. या झाडावरचं माकड त्या झाडावर गेल्यावर आपल्याला ओळखू येत नाही. ते त्याच झाडावर असेल आधीपासून असं वाटू लागतं. इतकं बेमालूम पक्षांतर होत असत आणि लोक मात्र विनाकारण गोंधळ घालत असतात. असो.
आजवरचा सगळ्यात यशस्वी भक्तिमार्ग म्हणजे वारकरी संप्रदाय. अजूनही माळ घातली तरी व्यसन सोडायची ताकद असणारा. वेळ आल्यावर देवाला जाब विचारण्याची धमक असणारा. आणि कुणी जाब विचारला म्हणून त्याच्या अंगावर धावून जाणारा. उलट त्याला सुद्धा डोक्यावर घेणारा. म्हणून एवढी मोठी संतपरंपरा निर्माण होऊ शकली. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस. अशी आपली परंपरेची भक्कम इमारत आहे. या इमारतीला राजकीय भक्त घुशीसारखे पोखरत चाललेत. वेळीच सावध होणं गरजेचं आहे. वारीत वेगवेगळे आवाज ऐकू येतात. ज्ञानेश्वर, तुकाराम, चोखोबा, एकनाथ, जनाबाई. प्रत्येकाच्या जाती वेगळ्या. विचार वेगळे. पण वारीत कसलं बंधन नाही. सगळे आवाज, सगळे विचार ऐकण्याची आपली संस्कृती आहे. खरंतर चांगल्या गोष्टीला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणता येवो एवढीच बुद्धी हवी आहे. पण जर दोन्ही बाजूच्या राजकीय भक्तांना सगळे आवाज दाबून फक्त एकच आवाज ऐकायचा असेल तर काय होईल? ती अंत्ययात्रा होईल. तिथे फक्त एकच आवाज येतो. राम नाम सत्य हैं.
अरविंद जगताप.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *