बोलतो मराठी..?

February 27, 2019

लेखन

arvind jagapat patra

मराठी भाषा दिन

मराठी भाषा दिन. कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी आपण मराठी भाषा दिन साजरा करतो. २७ फेब्रुवारी. एक दिवस आधी म्हणजे २६ फेब्रुवारीला असते सावरकरांची पुण्यतिथी. मराठी भाषेला शेकडो पर्यायी शब्द तयार करून देणारे सावरकर. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांनी मनामनात रुजवलेली आपली मराठी भाषा. आज एवढ्या वर्षानंतरही तुकारामांचं एकतरी वाक्य लोक रोज बोलतात. कळत नकळत. मराठी भाषा टिकली ती ह्या लोकांमुळे. मग बँकेत, कार्यालयात, एटीएमवर पर्याय विचारले जाऊ लागले. आपण नकळत इंग्रजी का मराठी या पर्यायात इंग्रजी पर्याय निवडू लागलो. शाळेच्या बाबतीत तर इंग्रजी का मराठी असा पर्यायच उरला नाही. मराठी शाळा एवढ्या वेगाने बंद पडायला सुरुवात झाली. सु ला शी ला जाणारी माणसं टॉयलेटला जायला लागली. हात पाय धुणारी माणसं अचानक फ्रेश व्हायला लागली. दात घासतो म्हणणारी माणसं ब्रश करायला लागली. मेंदीचा हेअरडाय झाला. डब्याचा टिफिन झाला. गुरुजीचे सर झाले. गोडधोड स्वीट झालं. कडवट मात्र तसंच राहिलं. काही काही लोक तर समोर दिसेल त्या टेबलला धरून टचवूड म्हणू लागले. असं नेमकं का झालं? 

जग बदलत होतं. वस्तू बदलत होत्या. पेजर जाऊन मोबाईल येत होता. orkut, फेसबुक, ट्वीटर येत होतं. नव्या नव्या कार येत होत्या. स्पायडरमॅनच्या पुढचे सुपरहिरो येत होते. मायकल jackson थेट मातोश्रीवर आला होता. मातोश्रीवर मैफिल जमली असेल पण तो आला होता concert साठी. आता एवढ्या सगळ्या गोष्टीना मराठीत काय म्हणायचं? एवढ्या वेगात गोष्टी बदलत होत्या की त्यांना मराठीत काय म्हणायचं हेच लक्षात येत नव्हतं. मुख्य म्हणजे शोध आपल्याकडे लागत नव्हते. वस्तू आपल्याकडे बनत नव्हत्या. लेबल आपल्याकडे तयार होत नव्हते. आपण फक्त ते लेबल वापरण्यात मग्न होतो. पिझ्झा पाहिजे तर पिझ्झाच म्हणावं लागणार. भाकरीत पिझ्झापेक्षा जास्त मजा आहे असं म्हणून काय उपयोग? पिझ्झा किती देशात विकला जातो हे बघावं लागेल. भाकरी लाख पौष्टिक आहे पण ती आपल्याकडे किती ठिकाणी मिळते हे बघावं लागेल. भाकरी मिळेल का? असं विचारल्यावर चुलीवरचं मटन मिळेल अशी पाटी असणारे हॉटेलवाले पण ‘ बाई सुट्टीवर आहे’ असं म्हणतात. आपण भाकरी टिकवण्यात कमी पडतोय आणि भाषा वाचवण्यावर चर्चा करतोय.

भाषा सहजा सहजी मरत नाही. आपली लोकसंख्या बघता मराठी सहजासहजी नष्ट होणं अवघड आहे. भ्रष्ट होणं सोपं आहे. ब्रेकफास्टला एक बनाना आणि एक ग्लास मिल्क पाहिजे असं बोलत बोलत मराठी टिकणार आहे. त्याची सुरुवात झालीय. खरंतर इंग्रजी शब्द बोलू नये असं नाही. खरंतर खूप इंग्रजी शब्द आपल्याला आहे तसेच स्वीकारावे लागतील. इंग्रजी भाषा सुद्धा अशा बाहेरच्या शब्दांनीच बनलेली आहे. सगळ्यात जास्त उधार शब्द कदाचित इंग्रजी भाषेतच असतील. पण त्यांनी त्या शब्दांचा द्वेष केला नाही. त्यांना बळेच पर्यायी शब्द बनवले नाहीत. शक्य ते शब्द सहज सोप्या पद्धतीने आपल्याला बदलता येत असतील तर बदलावेत. नाहीतर आहेत तसे वापरावेत. दुसरी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे भाषेवरून होणारा अपमान. आपल्याकडे त्याचा फार मोठा इतिहास आहे. अगदी महात्मा फुलेंच्या भाषेवर पण बोललं गेलं. खरंतर महात्मा फुलेंची भाषा थेट, भिडणारी आणि ओघवती होती. पण आपल्याकडे सत्त चुका काढून काढून शुध्द भाषा कोणती आणि अशुद्ध भाषा कोणती यावर तोंडसुख घेण्यात एक वेगळाच आनंद येतो लोकांना. अशा लोकांमुळे बहुतेक लोकांवर एक दडपण येतं. पाणी म्हणायचं का पानी या गोंधळात मग ते वॉटर म्हणू लागतात. मुळात तुच्छतेने बोलल्यावर समोरचा माणूस बदलत नसतो. तो संतापत असतो. मग वर्णमालेतून एक एक वर्ण गाळायची वेळ येते.

प्रत्येक टिकणारी गोष्ट एका तत्वावर हमखास टिकणारी असते. ते तत्व म्हणजे व्यवहारमूल्य. भाषा पैसे कमवायला आवश्यक आहे का? ती जोपर्यंत आवश्यक राहील तोपर्यंत नक्कीच टिकणार आहे. पण हा नियम मराठी सारख्या भाषेला लागू होत नाही. कारण ज्ञानेश्वरी मराठीत आहे तशी इतर कुठल्याही भाषेत आपल्याला आवडणार नाही. तुकारामांचे अभंग मराठीत जे थेट सांगून जातात तसे इतर कुठल्या भाषेत ते आपण सांगितले तरी आपल्यालाच पटणार नाहीत. या संतांच्या वचनांसाठी आपण मराठीतच बोलणार. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गोष्टी आपण मराठीतच सांगणार. शाहू फुले आंबेडकर असू द्या किंवा रानडे टिळक आगरकर. या माणसांची भाषा अशी सहजा सहजी नष्ट होऊ शकते का? आपल्या या समृध्द परंपरेची पुण्याई खूप मोठी आहे. फक्त भीती एकच आहे. 

काही वर्षांपूर्वी लोक दारू पिता पिता अचानक इंग्रजीत बोलायचे. अशावेळी समजून जायचं की समोरचा टाईट झालाय. विमान ढगात पोचलंय. दारू चढलीय. तर मराठी मराठी माणसं बसलेले असताना इंग्रजी बोलणाऱ्याला चढलीय असं समजलं जायचं. पण आज काय परिस्थिती आहे? दिवसा ढवळ्या, कुठलंही नशापाणी न करता मराठी माणसं एकमेकांशी इंग्रजीत का बोलत असतील? बरं दोन मराठी माणसांनी इंग्रजी बोलण्याने काय मोठा फायदा होतो? कुणावर इम्प्रेशन पडतं? ही एकमेव फालतू गोष्ट बंद झाली तरी इथून पुढे हजार वर्ष मराठी भाषेला कसलाच धोका नाही. परप्रांतीय लोक भोजपुरी गाणी ऐकतात म्हणून हसतात आपले लोक. पण आपण स्वतःवर हसायला पाहिजे. कुणीतरी आपल्या मातृभाषेतली गाणी ऐकतो ही लाज वाटण्यासारखी गोष्ट मुळीच नाही. महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोललं पाहिजे असं म्हणतात आपल्याकडे. पण खरी गरज मराठी आहात तर मराठी बोललं पाहिजे असं म्हणायची आहे. आपण मराठीत बोलल्यावर लोक आपोआप बोलतात. सुरुवात करूया.

1 Comment

  1. Sahil Sapkal

    तुम्ही खूप महान आहात सर

    Reply

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *