प्रिय गौतम बुद्ध

May 26, 2021

लेखन

arvind jagapat patra

अत्त दीपो भव. एका दिव्याने हजारो दिवे उजळू शकतात. तो एक दिवा होण्याची सुरुवात झाली पाहिजे.

                   तुम्ही स्वतःच स्वतःचा प्रकाश व्हा म्हणालात आणि एकदम अंधारातून वाट सापडल्यासारखं वाटलं. जग सुखाच्या शोधात हिंडत असताना तुम्हाला दुखः शोधावं वाटलं. समजून घ्यावं वाटलं. आज जग खूप जवळ आलय माहिती आणि तंत्रज्ञानामुळे.  आपल्या मोबाईलवर घरबसल्या माणसं जगभर डोकावून पहात असतात. पण स्वतःमध्ये डोकावून पाहणं विसरून गेलोय आम्ही. तुम्ही हेच सांगायचा. जगभर माणसं गोंगाटाला वैतागून शांतीच्या शोधात आहेत. आणि तुम्ही हे कधीच सांगून ठेवलय. खूप साध्या, सहज पद्धतीने. तुमचं स्मरण तुमच्या गोष्टी आठवून केलं पाहिजे.

                   एकदा तुमच्याकडे काही माणसं एका माणसाला घेऊन आले. त्याला दोन्ही डोळ्यांनी दिसत नव्हतं. त्याचे मित्र त्याला सांगत होते की प्रकाश नावाची गोष्ट असते. पण त्या बिचाऱ्याला प्रकाश असू शकतो या गोष्टीवर विश्वासच नव्हता. लोकांनी त्याची खूप समजूत काढली. प्रकाश असा असतो, असा दिसतो वगैरे सांगून. पण तो ऐकत नव्हता. तो म्हणायचा मला प्रकाशाला स्पर्श करून दाखवा. आता लोक त्याला प्रकाशाचा स्पर्श कसा करून दाखवणार? मातीचा स्पर्श होऊ शकतो. फुलाचा स्पर्श होऊ शकतो. लोक त्याला समजवून थकले.

                   पण तो काही प्रकाश असतो ही गोष्ट मान्य करायला तयार नव्हता. शेवटी काही लोकांना खबर लागली की जवळच्या गावात तुम्ही आलाय. लोक त्या माणसाला तुमच्याकडे घेऊन आले. लोकांनी तुम्हाला सांगितल की आम्हाला या अंध मित्राला सांगायचंय की प्रकाश असतो. पण याचा विश्वास बसत नाही. हा म्हणतो मला प्रकाशाला स्पर्श करायचाय. आता तुम्हीच याची काहीतरी समजूत काढा.

                   गौतम बुद्ध म्हणजे प्रत्येक समस्येचं समाधान याची लोकांना खात्री होती. पण तुम्ही त्या लोकांना सांगितल की माझ्याकडे या माणसाच्या प्रश्नाचं उत्तर नाही. तुम्ही या माणसाला घेऊन जा. प्रकाश कसा असतो ते मी याला समजवून सांगू शकत नाही. लोक निराश झाले. त्यांना वाईट वाटलं. बुद्धाकडून समस्येचं समाधान अपेक्षित होतं त्यांना. पण तुम्ही म्हणाले या माणसाला उपदेशाची नाही उपचाराची गरज आहे. उपदेश याचं समाधान करू शकणार नाही. फक्त उपचारच याचं समाधान करू शकतील. याला लवकरात लवकर वैद्याला दाखवा.

                   मित्र त्या माणसाला उपचार करायला घेऊन गेले. काही काळातच त्या माणसाला पुन्हा दिसू लागलं. त्या माणसाला आता फक्त तुम्हाला म्हणजे बुद्धाला भेटायची, बघायची ओढ होती. तो तुम्हाला येऊन भेटला. तुमचे आभार मानले. आणि म्हणाला की माफ करा. माझी चूक झाली. मला वाटायचं प्रकाश नसतो. पण प्रकाश आहे . खरच असतो. तुम्ही त्याला म्हणालात की तुझी चूक होती. पण तुझा हट्ट अगदी बरोबर होता. जी गोष्ट आपण पाहिली नाही त्यावर विश्वास का ठेवायचा? तो अंधविश्वास झाला. उलट तू प्रकाश बघण्याचा हट्ट धरलास म्हणून तुझी नजर तुला पुन्हा मिळाली. तुला दृष्टी प्राप्त झाली. जर तू लोकांच ऐकून प्रकाश आहे हे मान्य केलं असतं तर तुला कधीच तुझी दृष्टी मिळाली नसती.

                   छोटी गोष्ट आहे. पण डोळे उघडणारी आहे. आपण हट्ट धरला पाहिजे. सत्याचा. आपण स्वतः पाहण्याचा. आजकाल कितीतरी गोष्टी माहित नसताना, पाहिलेल्या नसताना लोक एकमेकांना पाठवत असतात. जिवंत माणसाला श्रद्धांजली वाहून टाकतात. खरतर हे विकार असतात. आजार असतात. दुसऱ्यावर अवलंबून राहणे, स्वतःच्या मेंदूने विचार न करणे हे आजार आहेत. खूप माणसाना आपण आजारी आहोत हे सुद्धा कळत नाही. किंवा आपल्याला नेमकं काय होतय याची जाणीव नसते. एकदा असाच एक माणूस तुमच्याकडे आला. श्रीमंत होता. त्याला त्याच्या श्रीमंतीचं सुख नव्हतं. जमवलेल्या संपत्तीची चिंता होती. एवढी संपत्ती असल्यावर झोप कशी येणार. सतत चोरांचे विचार. चोरीची भीती. तो माणूस तुमच्याकडे आला. तुम्ही त्याला सोबत घेऊन गेला. चालता चालता त्याच्या पायात काटा टोचला. तुम्ही त्याला म्हणाला, विचार करू नकोस. काढून टाक तो काटा. नाहीतर वेदना होतच राहील. लवकरात लवकर मुक्त हो. त्या माणसाच्या मेंदूत प्रकाश पडला. आपल्याकडे जमवलेली अतिरिक्त संपत्ती या काट्यासारखी आहे.

                   आपल्याला जेवढी गरज आहे तेवढी संपत्ती पुरे आहे. बाकी काटे आहेत. ते टोचत राहणार. वेदनाच देणार. झोप येणार नाही. भीती वाटत राहणार. एवढ्या सहज चालता चालता तुम्ही लोकांच्या समस्या दूर करायचा. कुठलीही अवघड गोष्ट नाही. जादूटोणा  नाही. सहज आपुलकीने बोलता बोलता माणूस आपल्या समस्येवरचा उपाय घेऊन जायचा तुमच्याकडून.

                   एकदा एक माणूस तुम्हाला भेटला. स्वतःच्या नशिबाला दोष देणारा. आपण या जगात सगळ्यात कमनशिबी आहोत असं मानणारा. आपल्यावर अन्याय झालाय असं वाटणारा. तुम्ही त्याला एक चमकणारा दगड दिला. म्हणालात बाजारात जाऊन हा दगड विकण्याचा प्रयत्न कर. त्या माणसाचा विश्वास बसला नसणार. पण सहज प्रयत्न म्हणून त्याने एका माणसाला तो दगड विकत घेणार का म्हणून विचारून पाहिलं. खूपवेळ तो माणूस दगडाकडे बघत राहिला. त्याने सांगितलं, दगड काही फार भारी नाही. पण तरीही मी तुला या दगडाच्या बदल्यात दहा अंबे देऊ शकतो. तो माणूस दगड घेऊन दुसर्या एका माणसाकडे गेला. त्या माणसाने पण खूप वेळ दगडाकडे पाहिलं. विचार केला. आणि म्हणाला दगड चमकतोय म्हणून मी तुला या दगडाच्या बदल्यात एक पोतं गहू देऊ शकतो. माणसाने दगड आता एका सोनाराकडे नेला. सोनार त्या दगडाकडे बघतच राहिला. म्हणाला मी तुला या दगडाचे दहा हजार रुपये देतो. माणूस दगड घेऊन पुढे निघाला. पण सोनार त्या माणसाचा पिच्छा सोडायला तयार नव्हता. सोनाराला तो दगड पाहिजेच होता. सोनार आता पैसे वाढवून द्यायला तयार होता. हळूहळू लाख रुपये द्यायला तयार झाला.

                   आता त्या माणसाने दगड विकायचा विचार सोडून दिला होता. त्याला त्याच्या प्रश्नाच उत्तर मिळालं होत. माणसाच त्या दगडासारखच तर आहे. किंमत लक्षात आली पाहिजे. एकदा आपली किंमत लक्षात आली, आपल्या जगण्याचा उद्देश लक्षात आला की बाकी गोष्टी सोप्या होतात. आणि किंमत स्वतः ठरवायची नसते. लोक करत असतात. माणसात आणी हिऱ्यात फक्त एकच तर फरक असतो. हिऱ्याला घडवणारा कारागीर असतो. पण माणसाला मात्र स्वतःच स्वतःला घडवावं लागतं. स्वतःच्या जीवनाला स्वतःच आकार द्यावा लागतो. मग बाजारात तुमची किंमत ठरू लागते. वाढू लागते.

                   अशा कितीतरी गोष्टी ऐकल्यात. काही खरच तुमच्या असतील. काही तुमच्या नावाने जोडल्या गेल्या असतील. पण तुम्ही दीपस्तंभ होता. आजही आहात. माणसाचा स्वतःवर विश्वास वाढवणारे. जगात ज्यांना ज्यांना खऱ्या शांततेचा शोध घ्यायचा असतो त्यांच्यासमोर गौतम बुद्ध हे नाव येतच. त्यांना तुमच्याबद्दल वाचावं वाटतं. तुम्ही स्वतः शोध घ्यायला निघालात. आज तुमच्या शोधात, तुम्ही दाखवलेल्या शांततेच्या मार्गाच्या शोधात जग निघालय. तुमची ती चिंतनमग्न मुद्रा, तुमची ती ध्यानस्थ मुद्रा कायम दिलासा देताना दिसत असते जगभर. देशच नाही तर जग बाहेरच्या संकटाला तोंड देतय. त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतय.

                   पण या सगळ्या संकटाचं उत्तर जो तो बाहेर शोधतोय. इतरांमध्ये शोधतोय. अशावेळी तुमच्या विचारांची गरज वाटते. प्रत्येकाने स्वतःमध्ये डोकावून बघण्याची गरज वाटतेय. कुठली मोठी साथ येते तेंव्हा त्यात आपलाही खारीचा वाटा असतो हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवं. जगात दुखः आहे. पण जगात बुद्धही आहे. भारताने जगाला दिलेल्या सर्वोत्तम गोष्टीपैकी तुम्ही एक आहात.

               तुम्हीच सांगितलंय, एका दिव्याने हजारो दिवे उजळू शकतात. तो एक दिवा होण्याची सुरुवात झाली पाहिजे. अत्त दीपो भव. आम्ही खोट्या सुखात लोळण घेत होतो. दुखः विसरून गेलो होतो. या साथीच्या संकटाने पुन्हा भानावर आलो. आता आम्हाला जाणीव झालीय की आम्हाला स्वयंप्रकाशित व्हावं लागेल. अत्त दीपो भव.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *