दया पवार पुरस्कार समारंभात सयाजी शिंदे यांच्याबद्दल

September 24, 2018

लेखन

arvind jagapat patra

थोडीफार ओळख मिळाली त्याच माणसाच्या कर्तृत्वाची ओळख करून देण्याचा हा प्रसंग

थोडीफार ओळख मिळाली त्याच माणसाच्या कर्तृत्वाची ओळख करून देण्याचा हा प्रसंग. अशावेळी त्यांची ओळख करून द्यायची गरज नाही. त्यांना कोण ओळखत नाही अशी घासून गुळगुळीत झालेली विधानंकरण्यात अर्थ नाही. दुर्दैवाने आपल्याकडे सेलिब्रिट सगळ्यांना माहित असतात. माणूस म्हणून त्यांची फार ओळख आपल्याला नसते. रस्त्याच्या दुर्दशेबद्दल किंवा अपघातांबद्दल हळहळ व्यक्त करणारे खूप नामवंतआपल्याला ठाऊक आहेत. पण अपघात झालेल्या व्यक्तीला सगळी कामं सोडून स्वतःच्या गाडीत घालून दवाखान्यात नेणारी फार कमी माणसं मला माहित आहेत. सयाजी शिंदे त्यातलं ठळक नाव. सामाजिक भानालाकृतीची जोड देणारी माणसं मनाला जास्त भावतात.

संवेदनशील हा शब्द आजकाल कुठेही, कुणाबद्दलही वापरला जातो. खरंतर संवेदनशील या शब्दातली सगळी संवेदना आपण नष्ट करून टाकायच्या मागे आहोत. पण ज्या माणसांच्या जगण्याचीरीत बघून खरंच जगाविषयी संवेदनशील असणं म्हणजे काय हे लक्षात येतं ते सयाजीराव. इंग्लंड अमेरिकेत प्रवासात हातात मराठी लेखकांची पुस्तकं घेऊन फिरणारे सयाजीराव. गावातल्या मित्रांचे रात्री अपरात्री आलेलेफोन उचलून आपुलकीने बोलणारे सयाजीराव. आपलं वाचन किती आहे हे दाखवण्यात धन्यता मानणाऱ्या गर्दीत ते उठून दिसतात कुठल्यातरी खेड्यातल्या एखाद्या कवीची कविता पाठ करून आपल्याला ऐकवूनदाखवतात तेंव्हा. पामुकवर जवळपास कामुक होऊन चर्चा करणाऱ्या मंडळींना प्रकाश होळकर कसा भारी कवी आहे हे त्याची कविता ऐकवून सांगणारे सयाजीराव मला अफलातून वाटतात. त्यांना एखादा लेखकआवडतो म्हणजे त्याचं पुस्तक घरातल्या शेल्फवर असण्यापूरतं ते नातं उरत नाही. ते त्या लेखकाला प्रत्यक्ष भेटायला जातात. दया पवारांच्या त्यांनी अशाच भेटी घेतल्या. गप्पा मारल्या. सयाजीरावांच्या नाट्यप्रवासातदया पवारांचं मार्गदर्शन महत्वाचं आहे. सयाजी शिंदे यांचा साउथच्या चित्रपटापर्यंतचा  प्रवास आपल्याला माहित आहे. पण मला त्यांनी झुलवा नाटकाच्या वेळी उत्तम बंडू तुपे यांच्याशी चर्चा करायला मुंबईहून स्कूटरवरपुण्याला केलेला प्रवास महत्वाचा वाटतो. तुम्हाला मिळालेला फिल्मफेअर पुरस्कार स्वीकारून तुम्ही स्कूटरवर घरी आला होता. फिल्मफेअरच्या बाहुलीला स्कूटरवर फिरवणारे कदाचित तुम्ही पहिले अभिनेते असाल. हाप्रवास मला intresting वाटतो. दया पवार यांच्यासारख्या लेखकांच्या आवर्जून घेतलेल्या भेटी, निळू फुले यांच्यासारख्या थोर अभिनेत्यांना स्वतः गाडी चालवत त्यांची आवडती गाणी ऐकवत केलेला प्रवास मला खूपमहत्वाचा वाटतो. एकेकाळी कांजूरमार्गच्या झोपडीत राहणारे सयाजी शिंदे नाटकं वाचण्यासाठी शांत जागा शोधत शेवटी माटुंगा स्टेशनवर बसून राहायचे. साताऱ्यात आपण पाठ केलेले संवाद ऐकून दाखवायला कुणीनसलं की डोंगरावर जाऊन बसायचे. डोंगर त्यांना godfather वाटतो. डोंगराएवढा खंबीर godfather मला नाही वाटत चित्रपट किंवा साहित्यात दुसर्या कुणाचा असेल. 

लेखकातला माणूस समजून घेण्याची त्यांना आवड आहे. म्हणून रंगनाथ पठारे, भालचंद्र नेमाडे यांच्यासारख्या अनेक लेखकांच्या भेटीगाठी ते आवर्जून घेत असतात. त्यांनी एका रात्रीत बसून तुंबारा नावाचंनाटक लिहिलंय. ते आता प्रकाशित पण झालंय. सयाजी शिंदे लेखक म्हणूनही किती अस्सल आहेत ते तुंबारा वाचल्यावर लक्षात येतं. कारण एवढ्या लेखकांच्या गोतावळ्यात राहूनही तुंबाराची शैली अगदी स्वतंत्र आहे.त्यांची स्वतःची आहे. निसर्गाविषयी एवढ उत्तम आणि सखोल चिंतन मराठी नाटकांमध्ये खूप कमी वेळा आलंय या गोष्टीची नोंद रंगभूमीवर घेतली जावो ही अपेक्षा. सयाजीरावांच कवितेवरचं प्रेम अस्सल आहे याचापुरावा म्हणजे आजवर त्यांनी ऐकवलेल्या शेकडो कवितेत स्वतःची एकही कविता कधीच ऐकवली नाही. कवितेवर एवढ निरपेक्ष प्रेम ही गोष्ट दुर्मिळ आहे. त्यांच्याविषयी सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे मराठीतल्या बैलया विषयावरच्या असंख्य कविता त्यांच्या संग्रही आहेत. बैलावरच्या कविता एखाद्या अभिनेत्याने आपल्या व्यस्ततेतून गोळा कराव्यात आणि लोकांना आवर्जून वाचायला द्याव्यात ही मला खूप मोठी गोष्ट वाटते. स्वतःच्याकवितेत रमलेली माणसं खूप बघायला मिळतात. पण लोकांच्या कवितेत रमणारा माणूस बघितला की आपण म्युझियममधली एखादी मौल्यवान वस्तू बघतोय असं वाटतं. बैल या विषयावर या कविता घेऊन मागच्यावर्षी साताऱ्यातल्या मित्रांसोबत त्यांनी कविता नाट्य केलं. त्यातल्या काही प्रयोगात भूमिका केली. बैल या विषयवारचं, एकूणच कृषीसंस्कृतीवरचं या प्रकारचं ते मराठीतलं पाहिलं नाटक असेल. 

सयाजी शिंदे यांच्या अभिनयाबद्दल बोलण्याचं हे स्थळ नाही. अमिताभचा आणि त्यांचा एक वेगळा रेकॉर्ड आहे. अमिताभचा एक सिनेमा वारंवार channel वर लागतो. सुर्यवंशम. सयाजी शिंदेंचे वेगवेगळेडबिंग केलेले पन्नास तरी सिनेमे कुठल्याही वेळी टीव्हीवर चालू असतात. त्यांनी दक्षिणेत एवढे सिनेमे केले यापेक्षा महत्वाचं आहे की दक्षिणेतले काही दिग्दर्शक सयाजी शिंदे सिनेमात असलेच पाहिजे असा हट्ट धरूनअसतात. कुणाला ते लकी वाटतात. कुणाला त्यांचं पात्र सिनेमात असणं आवश्यकच वाटतं. कुणाची त्यांनी सिनेमात असायलाच पाहिजे ही श्रद्धा असते. खरंतर साउथमध्ये बाहेरच्या माणसाने एवढ काम करण हीआश्चर्यकारक गोष्ट आहे. तमिळमध्ये भारती नावाच्या कवीची भूमिका त्यांनी केली. विद्रोही कवी, समाजसुधारक सुब्रमण्यम भारती यांची भूमिका सयाजी शिंदे यांच्या वाट्याला येणं ही महत्वाची गोष्ट आहे. याभुमिकेमुळे त्यांना दक्षिणेत अक्षरशः भारतींचे चाहते देवासारखी वागणूक देतात. कवितेवर प्रेम करणाऱ्या माणसाला एका कवीच्या भूमिकेने एवढा सन्मान मिळावा हा किती महत्वपूर्ण योगायोग आहे. 

सयाजी शिंदे आपल्याला गेल्या काही वर्षात सह्याद्री देवराईमुळे वेगळ्या रुपात दिसताहेत. झाडावर प्रचंड प्रेम करणाऱ्या या माणसाला आपली सर्वोत्तम भूमिका गवसलीय असं वाटतं. त्यांच्या याकामाला जवळून पाहण्याचा योग मला आलाय. महाराष्ट्रात सहा सात ठिकाणी सह्याद्री देवराई उभी आहे. माणदेश, बीड, संगमनेर, औरंगाबाद सारख्या ठिकाणी लाखाच्या घरात झाडं लावली गेली, जगवली गेली.सह्याद्री देवराई हे सामाजिक कार्य आहे असं त्यांना वाटत नाही. तो आपला छंद आहे असं ते म्हणतात ही गोष्ट खूप महत्वाची आहे. प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याने समजून घेण्यासारखी आहे. सयाजी शिंदे यांच्याचित्रपटातल्या कोणत्या भूमिका लोकांच्या लक्षात राहतील हे आपण आताच सांगू शकत नाहीत. पण सह्याद्री देवराई ही सयाजी शिंदे यांची दुष्काळ, पर्यावरण, पाउस आणि पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी घेतलेली ठामभूमिका आहे. त्यांची ही भूमिका महाराष्टात लाखो झाडांच्या रुपात मातीत मूळ घट्ट रोवून उभी आहे. शेकडो वर्षं ही भूमिका जिवंत राहणार आहे. सावली देणार आहे. फळ देणार आहे. एकतर मेणबत्ती पेटवून मोकळंव्हायचं नाहीतर टेंभा मिरवत फिरायचं असा हा काळ. त्यात तुम्ही झाडांच्या हिरव्यागार मशाली पेटवल्या हे खूप मोठं आणि जागृती निर्माण करणारं काम आहे. परवाच पुन्हा एकदा सह्याद्री देवराईत गेलो होतो. बीडला.सह्याद्री देवराई आज एखाद्या दीर्घ कवितेसारखी दिसते. लवकरच तिचं महाकाव्य होवो.

तुमच्या कार्याला आणि कारकिर्दीला शुभेच्छा!

संगमनेरमधल्या सायखिंडीचे सिताराम राऊत. वटसावित्री पौर्णिमेला त्यांनी शंभर जोडप्यांच्या हाताने शंभर वड लावले.

‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’या कथासंग्रहाची आठवी आवृत्ती आलीय. वाचकांचे मनापासून आभार. विशेषत: पत्र, मेल लिहून प्रतिक्रिया देणारी तरूण पिढी. तुमचे शब्द बळ देतात. तरूण वाचक एवढं भारी लिहितात की खुपदा वाटतं त्यांच्यासारखं थेट मनातून लिहिता यायला पाहिजे.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *