देव चोरला

January 13, 2021

लेखन

arvind jagapat patra

लोकांना आवडेल असंच मांडत राहण्यापेक्षा आपल्याला जे मांडणं गरजेचं आहे ते लिहित राहणं महत्वाचं असतं.

                     आपण काय शोधतो हे खूप महत्वाचं असतं. मोठ मोठ्या चित्रप्रदर्शनात जाऊन काही लोक चित्र बघणारे माणसं बघत बसतात. बीचवर जाऊन समुद्राकडे पाठ करून धावणारे किंवा वाळूत पडून असलेले लोक बघण्यात काहींचा इंटरेस्ट असतो. त्यात चुकीचं काही नसतं. प्रत्येकाच्या निरीक्षणाचा भाग आहे तो. मी खुपदा सिनेमा बघायला म्हणून गेलेले लोक पूर्णवेळ काहीतरी खात बसलेले किंवा मोबाईलवर बिझी असलेले बघितलेत. मलाही खुपदा राजकीय नेत्यांच्या सभेला गेल्यावर त्यांच्या भाषणापेक्षा त्यांच्या आसपास वावरणारे कार्यकर्ते जास्त दिसतात. मुद्दाम साहेबांच्या कानात बोलणारे, काहीतरी करून व्यासपीठावर चढून एकदा तरी साहेबांच्या सोबत दिसण्याचा अट्टाहास करणारे लोक. हे फक्त राजकारणात आहे असं नाही. थोड्या फार प्रमाणात सगळ्याच क्षेत्रात आहे. कार्यकर्ते हा माझा जिव्हाळ्याचा विषय. खरतर कायम दुर्लक्षित असलेला. पण माझ्या लिहिण्यात कसा न कसा कार्यकर्ता डोकावतोच. गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा मधला नारायण वाघ कार्यकर्त्याचंच प्रतिनिधित्व करतो. फक्त सिनेमाच नाही तर गाण्यातही हा कार्यकर्ता खुपदा आलाय. 

                     देव चोरला हे गाणं मी मोरया चित्रपटासाठी लिहिलं. संगीतकार आणि दिग्दर्शक अवधूत गुप्ते. झेंडा चित्रपटात गाणी लिहिली त्याला राजकीय कार्यकर्त्यांचा संदर्भ होता.मोरया चित्रपटात गणपती मंडळासाठी मन लावून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा संदर्भ होता. खरतर गाणं केवळ देव या विषयाच्या निमित्तानं होतं. ते व्यापक अर्थाने माणसांचा देव या विषयाला स्पर्श करणारं झालं. अवधूत गुप्ते यांच्या सोबत काम करताना सामाजिक विषयावर भाष्य करण्याची नेहमी संधी मिळत गेली. या सिनेमाच्या वेळी हे एक वेगळं म्हणणं मांडायची अवधूत गुप्ते यांची इच्छा होती. कुठेतरी आपल्या भोवती असणारी आभाळा सारखी माणसं कमी होत चालली. देवत्व असणारी मंडळी दुर्मिळ होत चालली. आणि देवा च देवपण माणसांच्या राजकारणाने झाकोळून जाऊ लागलं. देव छोटा मोठा ठरवू लागले लोक. देवाच्या संपत्ती वर त्यांची तुलना होऊ लागली. हे अतिशय वेदनादायी चित्र गेल्या काही वर्षात अधिक प्रकर्षाने समोर येताना दिसतय.

देव चोरला माझा देव चोरला
भला थोरला माझा देव चोरला 

                     देवाच्या नावाने माणसं गटा तटात विभागली गेली की गोंधळ वाढू लागतो. देव माणसं जोडणारा असतो. आपल्या नावाने विभागणी होईल असं देवाच्या गावीही नसेल. आपल्या भक्तांच्या सहवासात जेवढं समाधान वाटत असेल तेवढं झगमगाटात किंवा रोषणाईत कुठे समाधान वाटत असेल ? मुळात देव भक्ताची श्रीमंती कशाला बघेल? त्याला श्रीमंतीत, संपत्तीचं ओंगळ प्रदर्शन करण्यात धन्यता मानणाऱ्या लोकात इंटरेस्ट असेल का? खऱ्या देवाचं माहित नाही पण राजकीय नेत्यांचं मात्र उलट आहे. त्यांना देवत्व देतात लोक. पण ते आपले मोठ मोठे होर्डिंग लावणाऱ्या लोकांच्यात जातात. पेपरमध्ये आपल्या पानभर फोटोची जाहिरात देणाऱ्या, आपल्या प्रवासाचे बिल देणाऱ्या, महागडे गिफ्ट देणाऱ्या, गर्दी जमवणाऱ्या लोकांच्यात वावरतात. त्यांचा सामान्य माणसाशी संपर्क तुटत चाललेला आहे. पूर्वी मोठमोठे नेते लोकांमध्ये मिसळायचे. गाठीभेटी घ्यायचे. आज आमदार सुद्धा पोलीस घेऊन फिरतात. भोवती सतत माणसं. सामान्य माणूस त्या गर्दीतून नेत्यापर्यंत पोचू शकत नाही. गावाची समस्या मांडणारे, मत मागणारे लोक राहणार मात्र शहरात. शहराच्या झगमगाटात लोडशेडिंगवाल्या गावाची आठवण तरी येत असेल का? ही झाली नेत्यांची गोष्ट. आपण देवाच्या बाबतीत वेगळं काय करतो? मोठेपणा, भपका, श्रीमंतीच्या नादात अस्सल भक्ती हरवून जाते. डीजेच्या आवाजात आपल्यापैकी कित्येकांच्या मनातल्या प्रार्थना ऐकूच जात नसतील. अशावेळी आपला देव नक्कीच आपल्याकडे पाठ फिरवून गेला असं वाटत राहतं. 

झगमग पाहूनिया पाठ फिरवून गेला
रोषणाई मध्ये माझा देव हरवून गेला
नाही उरली भक्ती भाव नाही उरला
देव चोरला माझा देव चोरला                     

शब्द आपण लिहून जातो. तो विचार पोचतो. कधी पोचत नाही. पण आपण बोललोय हे समाधान पण महत्वाचं असतं. लोकांना आवडेल असंच मांडत राहण्यापेक्षा आपल्याला जे मांडणं गरजेचं आहे ते लिहित राहणं महत्वाचं असतं. आता या गाण्याबद्दल. या गाण्याची एक खास जागा मनात आहे. कारण शास्त्रीय संगीता सारखी चाल याआधी माझ्या कुठल्याच गाण्याला नव्हती. देव चोरला हे गाणे खास शास्त्रीय प्रकारात अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केले. राहुल देशपांडे, अवधूत गुप्ते या दोघांनी ते आपापल्या शैलीत गायलय. एकाच गाण्याला असे दोन तगड्या गायकांचे सूर लाभणे ही भाग्याचीच गोष्ट. पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे दिग्दर्शकाला जे म्हणायचं आहे त्या कसोटीला उतरणे. अवधूत गुप्ते यांच्यासाठी गाणं लिहिताना त्यांच्याकडून मिळणारी दिलखुलास दाद खूप बळ देऊन जाते. आणि विचार मांडता येतो. ज्यावर गुप्तेशी एकमत असतं.

हरवूनी गेले संत काल उरलेले थोडे
पावलाचे नसे मोल आज महागले जोडे
नाही उरली भक्ती नाही भाव उरला
देव चोरला देव चोरला

फोटो © शरद पाटील (फोटोवाला पाटील)

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *