अखीयोंसे गोली मारे!

March 22, 2020

लेखन

arvind jagapat patra

आपण किती हिंसक होत चाललोय. 

आपण किती हिंसक होत चाललोय. म्हणजे पूर्वीपासून आहोतच. प्रमाण वाढत चाललय. पूर्वीपेक्षा नेते जास्त ओरडतात भाषणात. म्हणजे अटलबिहारी वाजपेयी कसे कवितेसारखं भाषण करायचे. पण तो काळ गेला. बाळासाहेब ठाकरे ओरडायचे नाहीत. त्यांच्या आवाजात जरब होती. पण हळू हळू घसा ताणून ओरडणे सुरु झाले. सगळे ओरडण्याला भाषण म्हणू लागले. जो तो मुठ आवळून बोलतो. पूर्वी भाषा हिंसक होती पण त्यात धमकी नव्हती. प्रेम होतं. म्हणजे आया सहज पोराला मुडद्या वगैरे म्हणायच्या. मुडदा बसविला तुझा हे वाक्य पुतळा बसवला तुझा असं वाटायचं. तंगडे तोडायची धमकी प्रत्येक आई द्यायची. पण त्यात सत्य नव्हतं. ती भाषा होती. थोबाड फोडण्याची भाषा आपल्याकडे खरी ठरली असती तर एकही थोबाड जागेवर राहिल नसतं. आपण आक्रमक बोलणारी माणसं होतो. म्हणजे प्रपोज करणे वगैरे आपल्याला जमत नाही. आपल्याकडे प्रपोज मारतात. म्हणजे प्रेमात ही अशी मारामारीची भाषा. डोळे तर आपण पूर्वीपासून मारतो. नंतर नंतर प्रेमाला आपण लाईन मारणे असा शब्द शोधला. हिंदीत प्रेम करणे म्हणजे काय? तर मैं उसपर मरता हूं वगैरे. हिंदी वाल्यांनी आपल्याला खूप हिंसा शिकवलीय. दिल तोडना ठीक आहे. पण कलाई मरोडना हा रोमान्सचा भाग कसा काय असू शकतो? दारूच्या ग्लासातले दोन थेंब शिंपडावे तसे हिंदीत लोक जान छिडकतात. त्यांचे दिलके तुकडे तुकडे होतात. अखियोसे गोली मारे हे शृंगारिक वगैरे कसं वाटत असेल काय माहित? आपल्याकडे पण पूर्वी मदनबाण वगैरे होते. ते आता कुठे लपवून ठेवलेत काय माहित? इष्काची इंगळी डसली वगैरे तर जालीम प्रकार होते. हम आपके है कौन मध्ये सलमान खान गलोरने माधुरीला फूल वगैरे मारतो ते तर केवढ डोळे भरून पाहिलं लोकांनी. हिरो हिरोईनचा प्रेमाने हात वगैरे पिरगळतो तेंव्हा भारी वगैरे वाटतं. अशी लडिवाळ हिंसा आवडणारे लोक आपले. म्हणजे सिनेमात नवरा बायको उशीने लुटुपुटूची मारमारी करतात तेंव्हाच आपली खात्री होते की त्यांचा संसार सुखाने चालू आहे.
                 भाषेच्या बाबतीत आपण हिंसक होतो. आहोत. आपल्याला हादडून आलो, ताव मारला, फडशा पाडला असे शब्द जेवण्याच्या बाबतीत सुचतात. भाजी आवडणे म्हणजे कानातून वाफा येणे, नाकातून डोळ्यातून पाणी येणे असाही प्रकार आहे. म्हणजे खाणाऱ्याने नाक पुसायला रुमाल काढणारा की स्वयंपाक करणारयाच्या दहा पिढ्या स्वर्गात गेल्याचा फील येतो त्याला. म्हणजे गाडी पण एकशेवीसने मारली म्हणतात. म्हणजे गणपती असो किंवा नवरात्री, पावत्या आपण फाडल्याच म्हणतो. मध्ये बोललं की तोंड मारलं म्हणतो. कळ लावणे आपल्याला फिक्या वरणासारखं वाटतं. आपण काड्या करणे, आग लावणे बोलतो. समजवून सांगणे आपल्याला फार मिळमिळीत वाटतं. डोकं आपटलं किंवा माथेफोड केली म्हणतो आपण. प्रेमात सावरणे वगैरे नाही. प्रेमात पडतो आपण. रेकोर्ड सुद्धा मोडतो किंवा तोडतो आपण. लिहिण्यापेक्षा खरडलं जास्त भावतं आपल्याला. किंवा शिवी फक्त देत नाही आपण. हासडतो. हे झालं बोलण्याचं. इशारे पण कमी हिंसक नसतात. म्हणजे आपले लोक फ्लाईंग कीस पण दगड वगैरे मारल्यासारखे देतात. शाळेतल्या बाईंची एक अविस्मरणीय आठवण म्हणजे कानाखाली ठेऊन देईन असा इशारा देणारा त्यांचा हात. म्हणजे मित्र भेटले की नकळत त्याला बुक्की मारायचे खेळ पण खूप लोकप्रिय होते. मग बर्थडेला मित्राच्या पाठीत फटके देण्याचे आयात केलेले रितीरिवाज तर खूप आहेत. आमचा एक मित्र तर बोलता बोलता उगाच काचेच्या गोष्टी फोडतो. का तर म्हणे काच फुटणे शुभ आहे. कांदा बुक्कीने फोडण्यात वेगळी मजा आहे असं म्हणणारा एकतरी मित्र तुम्हाला भेटला असेल. एका झटक्यात नारळ फुटला पाहिजे असा एक पुरुषी अहंकार खूप लोकांना असतो. तसा नारळ फुटला नाही की उगाचच त्यांचा चेहरा दुखावल्यासारखा होतो. आमच्या एका मित्राला बायकोने स्टीलचा डबा उघडायला दिला. त्याला काही तो उघडता आला नाही. मग बायकोने थोडी खटपट करून स्वतःच उघडला. कितीतरी महिने ही गोष्ट त्याच्या मनाला लागून राहिली. आणि तो मन मारून जगत राहिला. डोक्यावर पडला, माती खाल्ली, शेण खाल्लं, दात घशात गेले असे कितीतरी प्रकार आहेत आपल्याकडे. आणि या हिंसक गप्पा मारत आपण अहिंसक माणसं जगत असतो. मुंगी मारत नाही कधी पण मी काय तुझं घोडं मारलय का? असं विचारत राहतो. आपल्या मनातली हिंसेची भूक अशी आपण शिव्या देत किंवा हिंसक बोलत भागवत असतो. त्यात काही चूक नाही. सहजस्वभाव आहे तो माणसाचा. या स्वभावामुळेच आपण खेळण्यात बंदुक दिली मुलांच्या. फक्त ही दबलेली हिंसा जागृत होऊ नये याची काळजी घ्यायची असते.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *