हिरो व्हायचंय का?

February 19, 2019

लेखन

arvind jagapat patra

चित्रपटात काम करायचं हे स्वप्न करोडो तरुण तरूणींचं असतं

चित्रपटात काम करायचं हे स्वप्न करोडो तरुण तरूणींचं असतं. डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय असं सांगत असले तरी खूप लोक मनातल्या मनात स्वतःला शाहरुख किंवा करीना कपूरच्या जागी बघत असतात. गाणी कानाने ऐकत असतात. मनात मात्र स्वतः पडद्यावर नाचत असतात. यात चूक काहीच नाही. प्रत्येकाला हिरो व्हावं वाटणं स्वाभाविक आहे. पण या हिरो होण्याच्या नादात हजारो लोक झिरो होण्याकडे प्रवास करत असतात ही फार भयंकर गोष्ट आहे. तुम्ही इतर कुठल्याही क्षेत्रात अपयशी झालात तरी तो अनुभव कुठे ना कुठे कामी येतो. पण अभिनयातलं अपयश अवघड असतं. तरी या क्षेत्राचं वेड मात्र झपाटून टाकणारं आहे. त्यासाठी काय काय नाही करत लोक. त्याला कारणही तसंच आहे. अमिताभ, शाहरुखच्या घरासमोर शेकडो लोक जमतात त्यांना बघायला मिळावं म्हणून. सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकाला, शास्त्रज्ञाला किंवा चांगला रस्ता किंवा पूल बनवणाऱ्या इंजिनियरला बघायला अशी गर्दी होत नाही. खरंतर हे सुद्धा हिरो असतात. पण आपल्याला हिरो म्हणजे एकच वाटतो. सिनेमात काम करणारा. मग लाखो तरुणांना असाच हिरो व्हावं वाटतं. त्यातून जसे काही अफलातून अभिनेते जन्म घेतात तशाच फसवणुकीच्या लाखो कथाही जन्म घेतात. 

एक निर्माता चित्रपट काढायचा म्हणून वर्षभर ऑडीशन घेत होता. शेकडो कलाकारांकडून त्याने पैसे घेतले. सिनेमात काम देतो म्हणून. नंतर गायब झाला ते कायमचा. गावोगावचे उत्तम अभिनयगुण असलेले तरुण तरुणी केवळ योग्य ठिकाणी ओळख नाही म्हणून अशा लोकांच्या नादी लागतात. पैसे आणि वेळ गमवून बसतात. खुपदा निर्माताच फसत असतो. सिनेमाची काही जाण नसलेले लोक दिग्दर्शक म्हणून मिरवतात. निर्मात्याला glamour दाखवून पैसे घालायला लावतात. त्याला बिचाऱ्याला कशाचा काही अंदाज नसतो. असे कित्येक निर्माते दरवर्षी तयार होतात. एका चित्रपटानंतर गायब होतात. मराठी चित्रपटसृष्टीची गंमत अशी आहे की चित्रपट बनवून द्यायला खूप मराठी माणसं आहेत पण चित्रपट विकून द्यायला मात्र एखाद दुसराच मराठी माणूस सापडेल. हिंदी सारखे आयटम सॉंग बनवायची निर्मात्यांची खूप इच्छा असते. पण एकदा मराठी चित्रपटाचं संगीत विकलं जातं का? या गोष्टीचा शोध त्यांनी घेतला पाहिजे. आपल्या नात्यातल्या मुलाला किंवा मुलीला संधी देण्यासाठी चित्रपट बनवणाऱ्या लोकांची संख्या कमी नाही. म्हणजे विचारलं तर साधं नाव पण सांगता न येणारे पोरं या लोकांना हिरो बनवायचे असतात. अशा चित्रपटांची संख्या सुद्धा कमी नाही. आणि या सगळ्या चित्रपटांमुळे मराठी चित्रपट चालत नाहीत असं चित्र मोठ्या प्रमाणावर तयार होतं.
एका शहरात एक दिग्दर्शक ऑडीशन घ्यायला गेले. मुलं मुली जमले होते. त्यातल्या एका मुलीचे नीट मेकअप करून फोटो काढायचं दिग्दर्शकाने ठरवलं. शहरातल्या एका ब्युटी पार्लरला तिला घेऊन गेले. महागडा फेस pack आणि काय काय सुरु झालं. मुलीने गळ्यातली सोन्याची चेन आणि पर्स दिग्दर्शकाकडे ठेवायला दिली. अर्धा तास नट्टापट्टा चालू होता. नंतर मुलगी बाहेर आली तर दिग्दर्शक केंव्हाच पळून गेला होता. चेन पण गेली. पर्स पण गेली. वर पार्लरचे पैसे तिलाच भरावे लागले. बरं एवढ होऊन दिग्दर्शकाचा साधा नंबर सुद्धा नव्हता कुणाकडे. अशा पद्धतीच्या घटना सर्रास चालू असतात. चित्रपट महामंडळ विनापरवानगी ऑडीशन घेऊ देत नाही. पण छोट्या शहरात या गोष्टी लोकांना माहित नसतात. कुठल्याही ऑडीशनला आई बाप आपल्या मुलांना घेऊन पोचलेले दिसतात. चित्रपटात काम देतो म्हणून अनेक संस्था चालू आहेत. ज्यात होणारी फसवणूक भयंकर आहे. संपूर्ण देशातून हजारो मुलं चित्रपटात काम करायचं म्हणून घरून पळून येतात. घरीच चोऱ्या करून येतात. मुंबईत संघर्ष करता करता चुकीच्या मार्गाला लागतात.
मुंबईत काही काही बिअर बार असे आहेत जिथे प्रत्येक टेबलवर रोज नवीन सिनेमा बनतो. मुंबईत नवीन आलेल्या माणसाला भूलथापा देऊन पार्टीचा खर्च उचलायला लावला जातो. दुसर्या दिवशी नवीन गिर्हाईक. चला हवा येऊ द्या सारख्या कार्यक्रमात सिनेमाचे प्रमोशन करायला कुणाला एक रुपया द्यावा लागत नाही. पण या नावावर पण पैसे उकळण्याचा प्रयत्न काही भुरट्या लोकांनी केला. सिनेमात काम करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. आपल्या स्वप्नासाठी खूप लोक कितीही पैसे खर्च करायला तयार होतात. पण मुळात सिनेमात काम द्यायला एखादा पैसे मागत असेल तर तो सिनेमा काढायला कुठून पैसे खर्च करणार? चांगला सिनेमा करणारा माणूस चुकुनही अभिनेत्यांना पैसे मागत नाही. हे क्षेत्र मृगजळासारखं होतं. पण आता इतके चॅनेल आहेत की काम मिळवणं खूप अवघड गोष्ट नाही. आपल्या शहरात किंवा गावात चांगली नाटकं किंवा एकांकिका करत राहिलात तरी तुमच्याकडे नक्की लक्ष जाईल. सोशल मिडिया आज बसल्याजागी तुम्हाला जगभर पोचवू शकतो. साउथ मधल्या स्वतःच्या शेतात वेगवेगळ्या पाककृती बनवणाऱ्या बाईला जगभर करोडो लोक बघतात. इंदुरीकर महाराजांचं कीर्तन करोडो लोक ऐकतात. गावाकडच्या गोष्टी सारखी वेबसिरीज स्वतःच्या गावात राहून बनवणारे तरुण महाराष्ट्रात लोकप्रिय होतात. हे सगळं शक्य होतं स्वतःच्या कर्तृत्वावर आणि कष्टावर विश्वास असल्याने. पैसे देऊन हे शक्य नाही. 

आज मुंबईत हजारो असे तरुण आहेत जे चित्रपटात नाव कमवायला आले होते. यश मिळालं नाही. आता परत कुठल्या तोंडाने गावी जायचं म्हणून मुंबईत राहतात. पडेल ते काम करतात. शिवम पण असाच एक. वडील नाटकात काम करायचे. अपघातात वारले. आता आई एकटी असते. धुणीभांडी करते. शिवम मुंबईत जाऊन हिरो होईल हे स्वप्न आई पाहतेय त्याला दहा वर्ष झाली. शिवम पहिली काही वर्षं निर्मात्यांच्या दारोदार हिंडला. छोटे मोठे चार पाच रोल मिळाले. त्यापेक्षा फार काही घडलं नाही. एका दिग्दर्शकाकडे त्याच्या घरचं काम करू लागला. घरगडी बनून. केवळ एक चांगला रोल मिळेल या आशेने. दिग्दर्शक त्याला प्रत्येक सिनेमाच्यावेळी स्वप्न दाखवायचा. शिवम रात्र बेरात्र दिग्दर्शक सांगेल ती कामं करायचा. अर्ध्यावेळा पार्टीसाठी दारू आणून दे. चखना आणून दे. रात्री उशिरा जेवण आणून दे. ग्लास उचलून ठेव. हळू हळू येणाऱ्या मित्रांना रात्री गाडी चालवता येणार नाही म्हणून घरी सोडून ये. या कामामुळे शिवम गाडी शिकला. आता शिवम त्याच दिग्दर्शकाकडे ड्रायव्हर आहे. शूटिंगच्या सेटवर वेगवेगळ्या नट नट्यांसोबत फोटो काढतो. आईला पाठवतो. आई मोबाईलमध्ये का होईना पोरगा हिरो सोबत दिसतो म्हणून समाधानी आहे. एक दिवस तिला आपल्या मुलाला थियेटर मध्ये जाऊन पडद्यावर पहायचंय. त्या आशेवर ती आजही धुणी भांडी करतेय. प्रत्येक भांडं घासून चकचकीत करताना तिला आपला नाही आपल्या हिरो झालेल्या मुलाचा चेहरा दिसत असतो. 

शिवमच्या आई सारखे कितीतरी आई बाप वाट पाहून असतात. मागे राजपाल यादवने एका कार्यक्रमात किस्सा सांगितला होता. खूप वर्ष मुंबईत स्ट्रगल केलेला एक मुलगा आपल्या गावी जातो. घरी वडील त्याच्यावर खूप नाराज असतात. वडील डिस्कव्हरी सारखी वाहिनी बघत असतात. त्यात घोडे हत्ती दाखवत असतात. वडील मुलाला म्हणतात आता घोडे आणि हत्तीपण आले टीव्हीवर. तू कधी दिसणार? स्ट्रगल करणाऱ्या मुलाकडे याचं उत्तर नसतं. खरंतर या गोष्टीचं उत्तर कुणाकडेच नसतं. पण या क्षेत्रात आपण यशस्वीच झालं पाहिजे याचं ओझं बाळगून हजारो तरुण तरुणी आपल्या अवती भवती फिरताना दिसत असतात. यातले बरेच स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतात ही एक चांगली गोष्ट आहे. पण यातले खूप जण नैराश्येच्या गर्तेत जातात. हे अपेक्षेचं ओझं त्यांना सहन होण्याच्या पलीकडे असतं. अगदी गाण्याच्या, नाचण्याच्या कार्यक्रमात आई बाप जे ओझं आपल्या मुलावर टाकत असतात ते बघून भीती वाटू लागते. आपल्याकडे लहान मुलांवर खूप सिनेमे येतात. खूप रिअॅलिटी शो असतात. पण या मुलांची मनस्थिती काय असते हे जवळून बघायला पाहिजे. त्यांच्यातलं निरागसपण, बालपण हरवत जातं. आपण कुणीतरी विशेष आहोत ही जाणीव मोठ्या माणसांना सुद्धा सहजा सहजी झेपत नाही. ग्लॅमर न पेलवलेले कित्येक मोठे स्टार आपण बघतो. ही तर लहान मुलं आहेत. ते या सगळ्या गोष्टीला कसं तोंड देत असतील? अशा क्षेत्रात खूप वेळा आपण आपला खरा चेहरा हरवून बसतो. आपण आपल्याला नक्की ओळखलेलं असेल तर ठीक आहे. नाहीतर स्वतःबद्दल भलतेच गैरसमज बाळगत माणसं जगत राहतात आयुष्यभर. मेकअप धुतला जातो रोज. पण मुखवटा गळून पडत नाही. आणि या मुखवट्याचा आदर्श घेऊन आणखी लाखो भावी मुखवटे तयार होत राहतात. रजनीकांत सारखा एखादा नट आहे तसा जगू शकतो. आपल्याच आरत्या ओवाळून घेण्याच्या या शर्यतीत होर्डिंगला अभिषेक होऊनही रजनीकांत जमिनीवर असतो. खरं खरं जगण्यात यश आलं की कुठल्याच अपयशाने माणूस खचत नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की हिरो व्हायला आपण पडद्यावरच दिसायला पाहिजे असं नाही हे चित्र निर्माण व्हायला हवं. शेकडो अब्दुल कलाम निर्माण व्हायला हवेत जेणेकरून तरुणांना वाटेल की फक्त अँग्री यंग मॅन नाही मिसाईल मॅन पण हिरो होऊ शकतो. फक्त पडद्यावरच्याच नाही खऱ्या आयुष्यातल्या हिरोला पण आपण ग्लॅमर मिळवून दिलं पाहिजे. पडद्यावर यायला सलमान, शाहरुख कशाला व्हायला पाहिजे? धोनी, मेरी कोम, मिल्खा सिंग सारख्या छोट्या गावातल्या हिरोंची गोष्ट सुद्धा पडद्यावर येतेच. त्यासाठी स्वतःच नाचलं पाहिजे असं नाही. आपलं चांगलं काम लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. एवढच.

संगमनेरमधल्या सायखिंडीचे सिताराम राऊत. वटसावित्री पौर्णिमेला त्यांनी शंभर जोडप्यांच्या हाताने शंभर वड लावले.

‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’या कथासंग्रहाची आठवी आवृत्ती आलीय. वाचकांचे मनापासून आभार. विशेषत: पत्र, मेल लिहून प्रतिक्रिया देणारी तरूण पिढी. तुमचे शब्द बळ देतात. तरूण वाचक एवढं भारी लिहितात की खुपदा वाटतं त्यांच्यासारखं थेट मनातून लिहिता यायला पाहिजे.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *