जय हिंद !

August 15, 2020

लेखन

arvind jagapat patra

जय हिंद !

जय हिंद !

इंग्रजांनी जाहीर केलं १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य देणार. पण तेंव्हा आपले काही लोक म्हणाले म्हणे की तो दिवस अशुभ आहे. थोडं मागे पुढे करा. अशा प्रकारे नको त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची झलक देश स्वतंत्र होण्याआधीच आपल्याला दिसली. खरंतर स्वातंत्र्य मिळत असताना देशातल्या अनेक संस्थानिकांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला. आपण एक राष्ट्र आहोत, आपण सारे भारतीय आहोत या भ्रमात होतो की काय असं वाटलं तेंव्हा देशाला. असे धक्के वारंवार बसत गेले. एखादी संघटना म्हणायची की हे स्वातंत्र्य आम्हाला मान्य नाही. हा काळा दिवस आहे. एखाद्या संघटनेला देशाचा झेंडा मान्य नव्हता. तर एखाद्या संघटनेला आपण या देशाचा भागच नाही असं वाटत होतं. आणि हे सगळं या देशात जाहीरपणे चालू होतं. आजही कमी अधिक प्रमाणात चालू असतं. मग प्रश्न पडतो की आपल्याला स्वातंत्र्याचं खरंच किती महत्व आहे?

स्वातंत्र्य मिळालं आणि आपण क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक यांनी दिलेलं बलिदान १५ ऑगस्टपूरतं ठेवलं. फार नेमकं सांगायचं तर लता मंगेशकर यांच्या गाण्यावर ती जवाबदारी ढकलून दिली. जरा आंखमें भरलो पानी ऐकायचं. क्षणभर भाऊक व्हायचं आणि विसरून जायचं. स्वातंत्र्याची सत्तरी उलटली तरी झेंडे रस्त्यावर टाकू नका हे सांगायची वेळ येते. हा झेंडा जमिनीवर पडू नये म्हणून लोकांनी गोळ्या झेलल्या. सरकारी कर्मचार्यांना १५ ऑगस्टला उपस्थित राहण्यासाठी सक्ती करावी लागते. जणू काही दुसऱ्या कुणाच्या देशाच्या झेंड्याला मानवंदना द्यायचीय. पंधरा ऑगस्टला लागून सुट्टी असली पाहिजे अशी अनेकांची इच्छा असते. म्हणजे पिकनिकला जाता येईल. बरं पिकनिकला जाऊ नये हा मुद्दा नाही. पण कुठल्या पिकनिक स्पॉटला देशभक्ती दिसते? तिथे झेंडा फडकवणे ही देशभक्ती नाही. तिथे असलेली स्वच्छता, शिस्त ही देशभक्ती. याबाबतीत आपण स्वातंत्र्याचा स्वैराचार असा अर्थ घेतलाय. खरंतर आपल्याला पहिल्यांदा स्वातंत्र्याचा अर्थ कळला तो आणीबाणीत. अचानक कितीतरी हक्कांवर गदा आली. सगळे खडबडून जागे होतील असं वाटलं होतं. पण आज आणीबाणीचे किस्से सांगताना लोक काय सांगतात? सक्तीने नसबंदी केली गेली. म्हणजे स्वातंत्र्यापेक्षा कुटुंबनियोजनाचा त्रास जास्त. आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतलं गेलं याचं दुखः फारकाळ राहिलं नाही. लोकांनी पुन्हा आणीबाणी आणणाऱ्या इंदिरा गांधीना निवडून दिलं. काय कारण असेल? एकतर बहुतांश लोकांना व्यक्तीस्वातंत्र्याची गरज वाटत नाही. सातत्याने कुठल्या ना कुठल्या पक्षाची किंवा व्यक्तीची विचारसरणीच जगात सगळ्यात थोर आहे असं समजून चालणारे लोक खूप आहेत. आपला आवडता नेता भ्रष्टाचारी आहे हे कळाल्यावरही जनतेला फारसा फरक पडत नाही. गुन्हेगारसुद्धा तुरुंगातून निवडून येतात. गुन्हेगार तुरुंगात असल्यावरही जनता पारतंत्र्यात असल्यासारखी मतदान करत असेल तर आपल्याला स्वातंत्र्य म्हणजे काय हे कळलेलं नाही. 

स्वातंत्र्य म्हणजे आपली राज्यघटना माहित असणे. आपल्या हक्काची आणि कर्तव्याची जाणीवच नसेल तर स्वातंत्र्याचं महत्व कळणार नाही. ज्या दिवशी १५ अाॅगस्ट एवढच २६ जानेवारीचं महत्व वाटू लागेल त्यादिवशी आपण खर्या अर्थाने प्रजासत्ताक असू. आपण हाॅर्न वाजवून वाजवून समोरच्याला वैतागून टाकणे हे स्वातंत्र्य नाही. आपला सगळ्यांचा शांततेत जगण्यातील आनंद महत्वाचा आहे. प्रत्येक मिरवणुकीत सगळेच ढोल वाजवणारे असावेत असं नाही. काही लोक एेकणारेही हवेत. रेल्वे रूळ आेलांडणे, सिग्नल तोडणे, वाटेल तिथे गाड्या पार्क करणे म्हणजे स्वातंत्र्य असं काही लोकांना वाटतं. काही लोक किल्ल्याच्या भिंतीवर स्वत:चं आणि प्रेयसीचं नाव लिहीतात. जणू काही सासर्याने किल्ला हूंड्यात दिलाय. बसच्या सीटवर, शौचालयात , झाडांवर ,नोटांवर लिहिलेलं बघून साक्षरतेचाच वैताग येतो. भर रस्त्यावर फक्त हात दाखवून रस्ता आेलांडणारे लोक बघितले की पुन्हा संस्थानिकांचं राज्य आल्यासारखं वाटतं. पण सगळंच चित्र एवढं निराश करणारं नाही. 

किल्ल्यांवर स्वच्छता करणारे तरूण दिसले, ट्रॅफिक जॅममध्ये स्वत:हून मदतीला धावणारे लोक पाहिले, आरोग्य, पाणी, शेतकरी यांच्यासाठी झटणारे लोक पाहिले, पूर किंवा वादळात लोकांचा मदतीचा ओघ बघितला की वाटतं हेच ते लोक आहेत ज्यांच्या भरवशावर इंग्रज देश सोडून गेले. नाहीतर भारतीय लोक देश चालवू शकणार नाहीत असं चर्चिलसारख्या कितीतरी लोकांचं मत होतं . महायुद्धाने कंबरडं मोडलेल्या इंग्रजांनी काढता पाय घेतला तेंव्हा ऊद्योग , शिक्षण , आरोग्य असे अनेक प्रश्न होते. पण या प्रत्येक क्षेत्रात देशाने प्रगती केली. एकेकाळी देवीचा कोप होईल म्हणून प्लेगची लस टोचून घ्यायला नकार देणारा आपला देश पोलिओमुक्त झाला. अजून खूप सुधारणा बाकी आहेत. कर्ज करून परदेशात जाणारे काही असले तरी परदेशातल्या कंपन्या विकत घेणारे पण आहेत. विचारधारांचे वाद होतील, राजकीय भांडणं होतील. अस्वस्थ वाटेल पण हा देश कधी असुरक्षीत वाटत नाही. हा देश आवडण्यासाठी हजारो कारणं आहेत. पण सगळ्या भारतीयांना आवडणारं कारण म्हणजे आपल्या प्रत्येक चूकीचं खापर आपण या देशावर फोडू शकतो. आॅफीसला जायला उशीर झाला तरी या देशाच्या लोकसंख्येपासून कारणं सांगता येतात. काही बॅंकाॅक पलीकडे जग न पाहिलेली माणसं या देशाची विमानं पण स्लो चालतात असं सांगतात. खेळात पदक मिळाले नाही तरी किंवा मुलाला कमी मार्क मिळाले तरी देशाला नावं ठेवता येतात. ज्याची एका झटक्यात बारावी निघत नाही तो पण म्हणतो या देशाचं काही खरं नाही. पण आनंदाची गोष्ट ही आहे की तरीही हा देश पंधरा आॅगस्टला वेगळाच वाटतो. अंगावर शहारे येतात मेरे देशकी धरती ऐकून. छाती फुलून येते तिरंगा बघून. सोशल मिडीयावर आलेला देशभक्तीचा पूर बघून अभिमान वाटतो. पण…

whats app वर आपआपल्या जातीच्या ग्रुपमध्ये असलेल्या पोस्ट वाचल्यावर भिती वाटते की आपली आणखी एक फाळणी जवळ आलीय की काय? आधीची धर्मामुळे झाली होती. आता जातीमुळे होईल. दुर्दैव हे आहे की आपण अजून हे मान्यच करायला तयार नाही. पण स्वातंत्र्य या मातीला मिळालंय. जातीला नाही. आणि शेकडो वर्षांपूर्वी माती होती . जाती नाही. या मातीला आपण माता म्हणतो. आपलं नातं एवढं सरळ आहे. वर्षभर वेगवेगळे झेंडे बघत असतो आपण. पण पंधरा आॅगस्टला सगळीकडे फक्त तिरंगा  बघून समाधान वाटतं. या झेंड्यातच आपल्याला एकत्र ठेवण्याची ताकद आहे. बाकी आपल्यात काॅमन आवड काय आहे? ना नेता.,ना रंग ना खेळाडू ना खाण्या पिण्याच्या सवयी. एवढ्या वैविध्य पुर्ण देशात एक फक्त तिरंगा आहे जो प्रत्येकाच्या अभिमानाचा विषय आहे. या अर्थाने जगातला सगळ्यात ताकदीचा राष्ट्रध्वज. जय हिंद!

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *