जोकर

February 4, 2020

लेखन

arvind jagapat patra

जोकर

जोकर 
                    नितीन घरात एकुलता एक मुलगा. नितीनचे वडील पण एकुलते एक. आजोबा पण. खानदानीत एकुलत्या एक पोरांची परंपराच होती. म्हणून लाड पण तेवढेच. नितीनच्या आजोबाला तर उन लागू नाही म्हणून दोन माणसं असायचे सोबत. डोक्यावर चादर धरून फिरायचे. नितीनच्या वडलांना क्रिकेटची आवड होती. गडी उठला की bat घेऊन बाहेर पडायचा. दिवसभर फक्त batting. मग त्यांना बॉलिंग करायला एक माणूस ठेवला होता. नितीनचे पण असेच लाड. नितीन लहानपणी भाऊ पाहिजे म्हणून हट्ट धरून बसला. आता घरात तीन बहिणी होत्या. पण नितीनला भाऊच पाहिजे होता. शेवटी बहिणीलाच किती दिवस मुलाचे कपडे घालून खेळावं लागायचं नितीनशी. एकुलता एक मुलगा असल्यामुळे लाड जोरातच. त्यात खाण्यापिण्याचे चोचले तर विचारता सोय नसायची. पुन्हा खानदानीत सगळे मुलं पक्के मांसाहारी. दिवसात एकदा तरी मटन पाहिजेच हा नितीनच्या वडलांचा आग्रह. नितीनचे आजोबा तर मरेपर्यंत दोन तैम मटन खायचे. नितीनला शाळेत प्रवेश घ्यायला आजोबा गेले होते. मुख्याध्यापक म्हणाले वर्गात आधीच पंचवीस मुलं झालेत. आता अवघड आहे. आजोबा म्हणाले एवढे मी बोकडं खातो महिन्याला. माझ्या नादी लागू नका. माझं पोरगं आजपासून ह्या शाळेत बसणार.
                   घरात कधी कुणी मुलाला बोलायचं नाही हा नियमच होता. नितीनला लहानपणापासून नाही ऐकायची सवय नव्हती. कॉलेजला गेल्यावर पहिल्यांदा त्याला नकार ऐकायची वेळ आली. त्याचा एका मुलीवर जीव होता. ती त्याला नाही म्हणाली. नितीन दोन दिवस जेवला नाही. वडलांना लक्षात आलं नाही कारण. ते घरातल्या लोकांवर चिडचिड करायला लागले. भाजी आवडत नसल म्हणून पोरगं जेवत नाही असं वाटलं त्यांना. पण ते स्वतःसुद्धा जेवत होते. मग त्यांना बोकड फ्रेश नाही असा संशय आला. कसायाला शिव्या देऊन झाल्या. पण नितीन काही जेवत नव्हता. मग खोदून खोदून विचारल्यावर खरी गोष्ट लक्षात आली. नितीनच्या वडलांनी नितीन कॉलेजला असतानाच त्याचं लग्न लावून दिलं. नितीनला जी आवडत होती तिच्यापेक्षा सुंदर पोरगी बघून. नितीननी शिक्षण पूर्ण केलं. घरात पहिल्यापासून बांधकाम व्यवसाय चालू होता. नितीन त्यातच लक्ष घालू लागला. वाळू, सिमेंट, विटा हेच त्याचं आयुष्य होतं. व्यवसायात असला तरी नितीन व्यसनापासून दूर होता. मटणाचा खानदानी नाद सोडला तर बाकी कशाची आवड नव्हती. बायकोवर जीवापाड प्रेम करायचा. आई वडलाना मान द्यायचा. सगळं सुखात चालू होतं. पण मुल होत नव्हतं. राज्यातले अर्ध्याच्या वर देव नवस बोलून झाले होते. शेवटी लग्नाच्या सहा वर्षानंतर एका डॉक्टरच्या सल्ल्याने नवस पूर्ण झाला. नितीनला मुलगा झाला. चिकू. लाडाने सगळे प्रसादला चिकूच म्हणू लागले. नवसाचा प्रसाद चिकू झाला.
                    चिकूचे लाड चालू होते. चिकू सात वर्षांचा झाला. पण घरात सगळ्यांना चिकूचा राग येत होता. सगळ्यांना एकाचवेळी चिकूची चिंता पण वाटत होती आणी संताप पण येत होता. कारण काय? चिकू मटन खात नव्हता. मटन समोर आलं की कडू औषध समोर आल्यासारखं तोंड करत होता. नितीनला आपली खानदानी परंपरा मोडते का काय अशी भीती वाटू लागली. जी गोष्ट आपण अभिमानाने सांगत आलो ती गोष्ट मुलाला आवडत नाही हे नितीनला आणि त्याच्या वडलाना अजिबात आवडत नव्हतं. नितीनने तडजोड म्हणून चिकन देऊन पाहिलं. अंडी देऊन पाहिली. पण चिकूने कुठल्याच मांसाहारी गोष्टीला तोंड लावलं नाही. आई आणि आजीच्या डोळ्यात पाणी यायचं. एवढ्या कष्टाने कापलेला, भाजलेला कांदा, सोललेला लसून, किसलेलं खोबरं, वाटलेला मसाला, शिजवलेलं मटन सगळं वाया गेल्यासारखं वाटायचं. रागात नितीनने पोराला बळेच मटनचे एक दोन पीस खाऊ घालून बघितले. पण चिकू भडकन ओकला. एकदा मार खायच्या भीतीने चिकूने बळेच चिकन खाल्लं. पण दोनद दिवस दवाखान्यात भरती करावं लागलं. घरातल्यांनी चिकुला बळजबरी करण सोडून दिलं. पण पोरगा शाकाहारी निघाला ही गोष्ट त्या घराला खूप अपमानास्पद वाटत होती. नाक कापल्यासारखी भावना झाली होती सगळ्या घराची. पोरगा नापास झाल्यावर जसे चेहरे होतात तसे चिकूच्या घरच्यांचे चेहरे व्हायचे घरात मटन केल्यावर. कधी कधी झोपेत नितीनला वाटायचं चिकू नक्की आपलाच आहे ना? आपला असेल तर मटन खायला नाही कसा म्हणतोपण तो हा विचार मोठ्या कष्टाने बाजूला ठेवायचा. अचानक एक दिवस आजीनी नवस बोलला. गाडी करून सगळं कुटुंब देवाला गेलं. चार पाच वेगवेगळ्या देवाला नवस बोलली होती आजी. नितीनला प्रश्न होता नवस बोललाय हे देवाला कसं सांगायचं? नितीनच्या वडलाना प्रश्न होता नवस काय आहे ते पुजाऱ्याला कसं सांगायचं? चिकूच्या आईला प्रश्न पडला होता पोरगं मटन खात नाही म्हणून देवाला नवस करण बरं दिसतं का? पण आजी ठाम होती. म्हणाली देवाला कोंबड कापतोचा ना आपण. बोकडाचा नैवेद्य दाखवतोच ना. आजीचा युक्तिवाद एकदम बरोबर होता. तीन चार देवापुढे डोकं आपटून झालं होतं. घरातले सगळे आशावादी होते. शेवटी त्यांच्यासाठी चिकू देवाच्या नवसाचं फळ होता.
                 चिकू मात्र खूप वैतागला होता. घरी एवढ्या खेळणी, गल्लीत एवढे मित्र सोडून घरचे त्याला देव देव करत फिरवत होते. चिकू रडायचा. हट्ट करायचा. गाडीत रडून पडून त्याने दहा पंधरा खेळणी विकत घेतली होती. असाच एकदा गाडीतून त्याला mc donald च्या बाहेर असलेला तो जोकरसारखा माणूस दिसला. चिकू तो माणूस पाहिजे म्हणून रडू लागला. गाडी थांबली. त्या माणसासोबत चिकूचे फोटो काढून झाले. चिकू अर्धा तास त्या माणसाच्या नाकावर बुक्क्या मारत होता. शेवटी mc donald वाले वैतागले. कारण चिकू दुसर्या कुणाला त्या माणसापाशी बसू देत नव्हता. मग नितीनने आतून पाच सहा बर्गर आणले. चिकू खेळत खेळत बर्गर खाऊ लागला. घरातले सगळे त्याला बर्गर खाताना बघू लागले. चिकू एकटाच बर्गर खात होता. बाकीच्या सगळ्यांनी बर्गर कडे बघितलं सुद्धा नाही. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. कारण त्यांचा लाडका चिकू पहिल्यांदा चिकन खात होता. चिकन बर्गर. ते पण आवडीने. आजी म्हणाली मी सांगितलं होतं ना नवस केल्याशिवाय जमणार नाही. सगळ्यांना पटलं. पण आता बाकी देवांसोबत एका नवीन देवाची भर पडली. आजीने झटक्यात पिशवीतून हळदी कुंकू काढलं. mc donald वाल्या जोकरला हळद कुंकू वाहिलं. mc donald वाला डोळे मोठे करून बघू लागला. पण आजीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्या जोकरपुढे डोकं टेकवलं. दर अमावसेला नारळ वाहीन म्हणाली.
                           चिकू मजेत बर्गर खातो. आजी अमावसेला mc donald ला जाते. जोकरला नारळ वाहते. पदर डोक्यावर घेतलेली आजी आणि नातू त्या जोकरच्या बाजूला बसून बर्गर खातात. जोकरचा चेहरा बघण्यासारखा होतो. जोकरला काय विचार करत असेल ते त्या जोकरला आणि देवालाच माहित. आजी गेली की वेटर तिने त्या जोकरला लावलेलं कुंकू पुसून टाकतो. पण कुंकू लावलेला जोकर काही त्याच्या डोक्यातून जात नाही. तो हसत राहतो दिवसभर. त्याला बिचाऱ्याला कल्पना नाही, भोळसट श्रद्धेमुळे लोकानी कितीतरी जोकरना देव करून टाकलय. जो खरा देव आहे त्याला या खेळात काय मजा येते काय माहित? देव किती कनवाळू आहे माहित नाही. पण त्याचा सेन्स ऑफ ह्युमर भारी असला पाहिजे.
अरविंद

सावलीचं महत्व कळलं की ऊंचीचं कौतुक वाटत नाही.

नव्हतं गं सोपं सावित्री होणं
बाईच्या जन्माचं केलं तू सोनं

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *