प्रिय किशोर कुमार

August 6, 2018

लेखन

arvind jagapat patra

प्रिय किशोर कुमार,

प्रिय किशोर कुमार,

खरंतर ज्याने आपलं नाव मनावर गोंदवून ठेवलंय त्याला काय लिहिणार? तुझी कित्येक गाणी काळजावर कोरून ठेवलीत. तुझ्या गाण्यांशी जोडलेले आठवणींचे असंख्य शिलालेख आजही जसेच्या तसे उभे राहतात डोळ्यासमोर. पल पल दिल के पास तुम रहती हो ऐकताना मन आजही तेवढच हळवं होतं. तू रात्र रात्र गप्पा मारणाऱ्या आम्हा चार पाच जणात कॉमन होतास. तू गावाकडं भर दुपारी रानात होतास. तू मेसवर जेवून होस्टेलच्या पलंगावर निद्रानाश झाल्यासारखा पडून राहणाऱ्या प्रत्येकाच्या कानात होतास. आज ते काहीच उरलेलं नाही. फक्त तू मनात आहेस. 

तू शास्त्रीय संगीत शिकलेला नव्हतास या गोष्टीवर अजूनही विश्वास बसत नाही. खरंतर हेच तुझ्या दैवी असण्याचं कारण वाटतं. जीव भुकेने व्याकुळ झालेला असला तरी तुझं चिल चिल चिल्लाके ऐकून सगळं काही विसरून जायचो. घरच्या आठवणीने डोळे व्याकुळ झालेले असले तरी तुझं आंखो में क्या जी लागलं की भान हरपून जायचं. खरंतर प्रत्येक अडचणीवरचा उपाय आहेस तू. आम्ही मित्र खुपदा आदराने तुझा उल्लेख डॉक्टर किशोर कुमार असा करायचो ते यासाठीच. देव आनंद, राजेश खन्ना हे तसे आमच्या आधीच्या पिढीचे अभिनेते. पण ते आम्हाला जवळचे वाटायचं कारण तुझा आवाज. तुझा आवाज आमचा होता. राजकारणात या देशातल्या तरुणाईला कधी हक्काचा आवाज भेटला नाही. कारण तरुण नेतृत्व असण्याची परंपरा आपल्याकडे नाही. त्यामुळे गेली कित्येक वर्ष तूच तरुणाईचा आवाज होतास. करवटे बदलते रहे सारी रात हम सारखी गाणी आपल्याकडे बघून लिहिलीत की काय असं प्रत्येकाला वाटायचं ते तुझ्या आवाजातल्या आर्ततेमुळे. घरातल्या टेपवर किशोर कुमारच्या गाण्यांच्या तीन तरी कॅसेट असणं हे वेड लागल्याचं प्रमाणपत्र होतं. मी आजही मैत्री करताना जरा गोंधळलेला असतो. लवकर कुणाशी सूर जुळत नाही. पण समोरचा जर किशोर कुमारचा चाहता असेल तर माझ्या दृष्टीने तो डोळे झाकून मैत्री करण्यासारखा माणूस असतो. कारण किशोर कुमार आवडायला माणूस दिलखुलास असावा लागतो. त्याला एकाच वेळी एक आंख मारी तो आणी चिंगारी कोई भडके ऐकण्याची आवड असली पाहिजे. तो फक्त दुखः कुरवाळत बसणारा असून चालत नाही. जीवन के सफर में राही आणि इक लडकी भिगी भागीसी दोन्ही गाणी त्याला तेवढीच आवडावी लागतात. हे सोपं नसतं. तुमचं जगण्यावर प्रेम असल्याशिवाय तुम्हाला किशोर आवडू शकत नाही. तुम्हाला एखाद्या महालाचे भग्न अवशेष दिसत असतील तर तुम्हाला किशोर आवडत नाही. तुम्हाला त्या भग्न अवशेषात उमलून आलेलं एखादं फुल दिसत असेल तर नक्कीच तुम्हाला किशोर कुमार आवडत असणार. ट्राफिक मध्ये शेजारच्या गाडीतल्या खिडकीत दिसणारं लहान मुल बघून तुम्ही मनातल्या मनात हसत असाल तर तुम्ही मन्ना डे चे चाहते असू शकता. तुम्ही जर त्या मुलाला जीभ दाखवून चिडवत असाल तर तुम्ही नक्कीच किशोर कुमारचे चाहते आहात. किशोरचा चाहता असण्यासाठी फक्त गाणी ऐकून चालत नाही. ती गाणी जगणारा माणूस असावा लागतो. कलंदर नजरेने जग बघणारा माणूस असावा लागतो.

प्रिय किशोर दा,

तुझे कधीही आभार मानावे वाटले नाहीत कारण तू नेहमीच आमचा हक्काचा माणूस होतास. आहेस. काही लोक रफी आणि किशोर अशी तुलना करतात. पण किशोरचा चाहता या तुलनेच्या भानगडीत पडत नाही. त्याला स्पर्धा मान्य नसते. गाणं हा जगण्याचा भाग असतो. तुझ्या चाहत्याला दुय्यम भूमिका मान्य नसते. तो हिरोच असतो. त्याला अमिताभ फक्त आवडत नसतो. तो स्वतःच अमिताभ असतो. कारण एकाच वेळी angry यंग man असावं लागतं आणि विनोदाची जाण पण कम्पल्सरी असते. किशोरच्या चाह्त्यात अमिताभ सारखं हे मिश्रण हमखास असायलाच पाहिजे. नाही का? तुझी गाणी नेहमी चार्ली चाप्लीनच्या सिनेमासारखी वाटतात. हास्य आणि करून रसाचं एवढ सहज आणी बेमालूम मिश्रण चार्ली नंतर फक्त आणि फक्त किशोर कुमारकडेच आहे. त्यामुळे तुझी गाणी कधी अंधारात बसून ऐकावी वाटली नाही. एका कोपऱ्यात बसून गुणगुणावी वाटली नाही. किशोर कुमार हा आपल्या एकट्याच्या जगण्याचा भाग नसतो. किशोर कुमार नेहमी मिळून मिसळून ऐकण्याचा, गुणगुणण्याचा सोहळा असतो. चिंगारी कोई भडके सुद्धा आम्ही समूह गीतासारखं म्हणायचो. आणी अरे यार मेरे तुम भी हो गजब सुद्धा सगळी पिकनिकची बस मोठ्याने म्हणायची. किशोर कुमार ही चोरून प्रेम करण्याची गोष्ट नाही. अभिमानाने मिरवण्याची गोष्ट आहे. बरीच गाणी अशी असतात की ती आपण एकट्यात गुणगुणत असलो आणि कुणी ऐकलं की तिकीट नसताना तिकीट चेकर ने पकडल्यावर जसा चेहरा होतो तसे दिसतो आपण. खासकरून उदास प्रेमगीत. पण किशोरचं असं एकही गाणं नाही. किशोरची गाणी नेहमी नव्या बाईकवर फिरताना जसा उत्साह असतो तशा चेहऱ्याने म्हणू शकतो आपण. खूप गाणी ऐकताना आपण हळवे होतो पण खचून जात नाही. एखाद्या चष्मेवाल्या पोरीकडे बघून पण जीवन से भरी तेरी आंखे मजबूर करे जिने के लिये म्हणू शकतो आपण. कारण मुळात आवाजात केवढा आशावाद आहे. शोखियो में घोला जाये हे गाणं दुसऱ्या कुणाच्या आवाजात सहन पण होणार नाही. किशोर तुझी गाणी आणि तुझा आवाज यांचं अजरामर नातं आहे. तुझ्यानंतर तुझ्या आवाजाची भ्रष्ट नक्कल करणाऱ्या अनेक आवृत्त्या आल्या. पण आम्हाला काहीच पटलं नाही. आपलं वाटलं नाही. कारण फक्त आवाजाची नक्कल करता येऊ शकते. कलंदर स्वभावाची नक्कल कशी करणार? दिलदार वृत्तीची नक्कल कशी करणार?

किशोर, तू आमच्या प्रत्येक समस्येवरचा उपाय आहेस. पण तुझ्यामुळे एक समस्या मात्र नेहमी उभी राहते. माझ्यातली तुला नेमकी कुठली गोष्ट जास्त आवडते? असं प्रेयसीने विचारल्यावर जी अवस्था होते ना नेमकी तशीच अवस्था कुणी तुला किशोरचं कुठलं गाणं जास्त आवडतं? असं विचारल्यावर होते. किशोरचं एक गाणं कसं काय आवडू शकतो. आम्ही प्रेयसी सारखं प्रेम करतो तुझ्या गाण्यावर. प्रेयसीची कधी एक गोष्ट आवडते का? तिचे केस आवडतात. तिचं हसणं आवडतं. तिचे डोळे आवडतात. तिचं बोलणं पण आवडतं. तिचं रुसणं पण आवडतं. खरंतर प्रेयसीची प्रत्येक गोष्ट आवडत असते म्हणून तर ती प्रेयसी असते. नाहीतर हसण्यामुळे माधुरी दीक्षित आणि दिसण्यामुळे दीपिका आवडते. नटी एखाद्या गोष्टीमुळे आवडते. प्रेयसी तिच्या सगळ्याच गोष्टीमुळे आवडते. तसाच तू आहेस किशोर. तुझं प्रत्येक गाणं आवडतं आम्हाला. एखाद दुसरं नाही. तू प्रत्येक गाण्यात जीव ओतलाय हे ऐकताना जाणवतं. म्हणून तुझं प्रत्येक गाणं आम्ही तेवढच जीव ओतून ऐकतो. ऐकत राहू. तरुण होतो. बापाचंही न ऐकण्याचं ते वय असतं. पण तेंव्हापासून तुझं मात्र न चुकता ऐकतोय. आताही बऱ्याचदा बायकोचं ऐकावं लागतं. खूप वेळा आम्ही ऐकून न ऐकल्यासारखे करतो. पण तुझा आवाज ऐकू आला की मग मात्र बाकी काहीच ऐकायची इच्छा उरत नाही. म्हणून एकच सांगतो बाकी कुणाच्या माहित नाही पण मी आयुष्यभर तुझ्या मात्र ऐकण्यात राहीन. कारण मला ते खूप आवडतं.

तुझाच

अरविंद जगताप.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *