प्रिय माधुरी,

May 15, 2020

लेखन

arvind jagapat patra

प्रिय माधुरी,  तुझा तेजाब सिनेमा नुकताच रिलीज झाला होता. शाळेत होतो मी. दहावी झाल्यावर सायन्स घ्यायचं का कॉमर्स हे सुद्धा ठरलं नव्हतं.

प्रिय माधुरी,

तुझा तेजाब सिनेमा नुकताच रिलीज झाला होता. शाळेत होतो मी. दहावी झाल्यावर सायन्स घ्यायचं का कॉमर्स हे सुद्धा ठरलं नव्हतं. पण लग्न करायचं तर माधुरीशी हे मात्र मी तेंव्हाच ठरवून टाकलं होतं. शाळेच्या वाटेवर वडाचं झाड होतं. आम्ही पाच सहा मित्र त्या झाडाच्या अंगाखांद्यावर वाढलो. शाळा सुटली रे सुटली की आम्ही त्या झाडावर लपून बसायचो.. शाळेतल्या मुली गप्पा मारत हळू हळू त्या वाटेवरून जायच्या. त्या झाडाजवळ आल्या की आम्ही जोरजोरात ओरडायला लागायचो. मोहिनी मोहिनी. त्या मुलींपैकी एक लाल रिबीनवाली मोहिनी बिचारी गोंधळून जायची. नंतर नंतर वैतागून जायची. एकदा तर त्या झाडापासून रडत रडतच घरी गेली होती मोहिनी. खूप वर्ष झाली त्या गोष्टीला आता. पण तुला पत्र लिहायच्या निमित्ताने सांगतो तिची एकदा माफी मागायची होती. मनापासून. आज मागतो. तिच्यावतीने तू माफ कर

खरंतर माझी बकेट लिस्ट ही अशीच आहे. तेजाबच्या वेळी खुपदा लोक चिल्लर फेकायचे गाण्यावरआम्ही मित्रांनी चिल्लर गोळा केली होती. सगळे पैसे एकत्र करून भेळ खायची होती आम्हाला. पण मी माझ्याकडची काही चिल्लर तशीच लपवून ठेवली होती. कारण मला दुसर्या दिवशी पुन्हा तेजाब बघायचा होता. त्या मित्रांना आता हे सांगितलं पाहिजेआणखी एक गोष्टभुगोलाचं पुस्तक मोठं असायचं आमचं. बाकी सगळ्या पुस्तकांचे कव्हर फाटून गेले होते. पण भूगोलाच्या पुस्तकाचं कव्हर मात्र अगदी नवीन असल्यासारखं होतं. आईला नेहमी आश्चर्य वाटायचं. पण तिला बिचारीला मी कधीच सांगितलं नाही की त्या कव्हरच्या आत माधुरीचा फोटो आहे. ते कव्हर खराब होणं शक्यच नव्हतंपण ते सिक्रेट मी आता आईला सांगणार आहे.

आमच्या शेजारी एक मुलगी रहायची. वृंदा ताई म्हणायचो मी तिला. खूप छान नाचायची. त्यांच्या घरी टेपरेकॉर्डर नव्हता. आमच्या घरी यायची. तेजाब पासून सैलाब पर्यंत सगळी गाणी लावायची. एकटीच नाचायची. पण तिला तिच्या घरच्यांनी गणपतीच्या स्टेजवर पण कधी नाचू दिलं नाही. तिची आई म्हणायची तू काय माधुरी दीक्षित आहेस का? माधुरी दीक्षितने देशाला वेड लावलं होतं पण खूप घरातल्या मुलींना माधुरी दीक्षित व्हायची परवानगी नव्हती. सोसायटीच्या सत्यनारायणातसुद्धा जरा कुणी मुलगी लिपस्टिक लावून आली की कुणीतरी म्हणायचं हमखास, बघा लागली स्वतःला माधुरी दीक्षित समजायला. तर आता ती भान हरपून नाचणारी वृंदा ताई आपल्या सासरी पाळणाघर चालवते. दिवसभर पोरांची रडापड. आपल्याला आपल्या लेकरांची रडारड सहन होत नाही. बिचारी लोकांच्या लेकरांना सांभाळत बसते. कधीतरी तिच्या घरासमोर गाडी थांबवायचीय. तिला गाडीत बसवून दूर फिरायला न्यायचंय. मग एखाद्या छान सनसेट point ला गाडी थांबवून मोठ्यानेहमको आजकल है इंतजार, क्कोई आये लेके प्यारलावायचं. वृंदाताईला सांगायचं आता नाच मनसोक्त. नाच मन भरून. हो पुन्हा तरुण. हे मला नक्की करायचंय

होस्टेलवर एक मित्र कुठून कुठून सिनेमाची मासिकं आणायचा. त्यातल्याच एका मासिकात माधुरीचा एक फोटो. बहुतेक गौतम राजाध्यक्ष यांनी काढलेला. तो त्याने होस्टेलच्या भिंतीवर लावला होता. खरंतर तोपर्यंत त्याच्या रूमकडे आम्ही ढुंकूनही बघायचो नाही. पण त्याने फोटो लावला आणि देवळात व्हावी तशी गर्दी त्याच्या रूममध्ये व्हायला लागली. तो वैतागून गेला होता आमच्यामुळे. एक दिवस त्याने आम्हाला शिव्या घालून हकलून दिलं. आम्ही सगळे हकलून दिले गेलेले मित्र बदला घ्यायच्या निमित्ताने एकत्र आलो. जवळपास चार तास चर्चा केल्यानंतर आम्ही काय केलं असेल? तो मित्र दुसर्या दिवशी दाराची कडी लावून आंघोळीला गेला तेवढ्या वेळात आमच्यापैकी एकाने जाऊन फोटोला मिशा काढल्या. हो. चक्क माधुरीच्या फोटोला मिशा काढल्या. आमचा मित्र एवढा संतापला की त्याने सगळ्यांच्या रूमवर लाथा घातल्या. तीन चार दरवाजे तोडले. आणि दोन दिवस खोलीच्या बाहेरच निघाला नाही. नंतर विसरून गेलो. पण एकमेकांशी कधीच बोललो नाही. आता माधुरीचाच मोठा फोटो त्याला गिफ्ट द्यायचा आणि झालं गेलं सगळं विसरून जायचं ठरवलंय

लहानपणी एका नातेवाइकांकडे लग्नाला गेलो होतो. तिथून आल्यावर खूप ताप आला मला. औषध घेतलं. पण दिवसभर तापलेला होतो. संध्याकाळी आईने मीठ मोहरी घेतली आणि द्रिष्ट काढलीदुसर्या दिवशी मी बरा झालो. खरतर औषधाचा पण परिणाम असेल ना. पण आईला खात्री होती की माझी द्रिष्ट काढली म्हणून मी बरा झालो. एकदा शाळेच्या स्नेहसंमेलनात सगळ्या मुली गवळणी आणि मी कृष्ण होतो. मी पुन्हा आजारी. पुन्हा आईने द्रिष्ट काढली. मी बरा झालो. मग नजर लागते वगैरे मला खरंच वाटायला लागलं. मोठा झाल्यावर आरशाकडे जास्त नजर जायला लागली तेंव्हा लक्षात आलं, आपल्याला कशी काय कुणाची नजर लागेल? पण एकूण आई ज्याप्रकारे नजर उतरवायची ते जाम भारी असायचं. आपल्याला नाही नजर लागणार पण आपल्या माधुरीला नजर लागू नये. कधीच. म्हणून आणखी एक इच्छा आहे. त्या श्रीराम नेनेना एकदा भेटायचंय. नजर कशी काढतात हे त्यांना माहित नसेल. त्यांना शिकवायचंय. एका मोठ्या परातीत पाणी भरून घ्यायचं. घागरीत थोडा जाळ टाकायचा. घागर पाण्यात पालथी घालायची. घागरीत सगळं पाणी ओढलं जातं. जाम भारी आवाज येतात. झालं. नजर काढली. खरंतर हे सगळं खोटं आहे. याचा काही फरक पडत नाही. पण आपल्या माणसासाठी आम्ही किती हळवे असतो एवढच सांगायचं होतं. प्रत्येकाच्या नजरेत माधुरीचं आपलं असं स्वप्न आहे. आणि तरी प्रत्येकाला आपल्या माधुरीला नजर लागू नये असं वाटतं. खरंतर श्रीराम नेनेना भेटून एवढच सांगायचंय की कुठल्याच आवडत्या नटीचा नवरा तिच्या चाहत्यांना आवडत नाही. पण माधुरी कदाचित एकमेव अशी अभिनेत्री असेल जिला खरंच चांगला नवरा भेटला असं तिच्या चाहत्यांना सुद्धा वाटतं.

बाकी बकेट लिस्ट मोठी आहे. माधुरीने मराठीत सिनेमा करावा असं वाटत होतं. ती इच्छा आता उशिरा का होईना पूर्ण होतेय. आणखी एक इच्छा आहे, माधुरीच्या गालावरची खळी बघून आजही हसावं तर माधुरीसारखं अशी दाद देतो आपण. पण आपल्या घरातही एक माधुरी दीक्षित आहे. तिच्या हसण्याकडे खुपदा दुर्लक्ष होतं. बऱ्याचदा तिच्या नाराज असण्याचं कारण असतो आपण. इथून पुढे घरच्या माधुरीला दिवसातून एकदा तरी दिलखुलास हसू येईल असं वागेन म्हणतो. खऱ्या माधुरीला हे जास्त आवडेल. हो ना? तर ही इच्छा पूर्ण करावीच म्हणतो.

बाकी तुला तेजाबमध्ये पाहिलं होतं तेंव्हाच आमचे अच्छे दिन आले होते. कॉलेजमध्ये अभ्यास करताना तुझा विषय एवढ्या वेळा निघायचा की पहिल्या वर्षाचे दोन विषय निघालेच नाहीत. पुढच्या वर्षी मोठ्या कष्टाने ते विषय निघाले. पण तुझा विषय अजूनही निघतोच आहे. निघतच राहील.

तुझाच चाहता

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *