आपण महाराजांचे मावळे आहोत का?

June 6, 2018

लेखन

arvind jagapat patra

आपण महाराजांचे मावळे आहोत का?

आपण महाराजांचे मावळे आहोत का
आपण खूप कट्टर शिवभक्त असल्याचं सांगतो पण खरंच तसे आहोत का आपण आपलं आपल्याला तपासून बघण्याची गरज निर्माण झालीय.शेतकऱ्याला संपावर जायची वेळ आलेली असताना तर आपण नक्कीच कुळवाडी भूषण असलेल्या आपल्या राजाचे वारस म्हणून शोभतो काहा विचार केला पाहिजे शेतकऱ्याला संपावर जावं लागणं हे सरकारचं अपयश आहे असं म्हणून प्रश्न सुटणार नाही. आपली जवाबदारी समजून घेतली पाहिजे. औरंगजेबाने जुलुमी कर लादले होते. त्याच्या सैनिकांनी अत्याचार चालवले होते. शेतकरी हवालदिल होता. त्याकाळी कारभार बघणारे खूप मोठमोठे संस्थानिक होते. महाराजांपेक्षा जास्त वतन असलेले .

पण महाराज असं म्हणाले नाहीत की या संस्थानिकांचं काम आहे औरंगजेबाला विरोध करण्याचं. महाराज आपल्या मोजक्या साथीदारांना घेऊन लढायला सज्ज झाले.
संभाजी महाराजांची हत्या आपण नीट समजून घेतली नाही. संभाजी महाराजांच्या हत्येचा दोष आपण नेहमी औरंगजेबाला देतो आणी नामानिराळे होतो. पण संभाजी महाराजांच्या हत्येत फक्त औरंगजेबाला व्हिलन बनवून प्रश्न सुटत नाही. मुख्य कारण आहे संभाजी महाराज औरंगजेबाच्या हाती कसे लागले. एकीचा अभाव हे सगळ्यात मोठं कारण आपण आजही मान्य करत नाही. औरंगजेब दोषी आहेच. पण दोष आपल्या माणसांच्या विश्वासघाताचापण आहे हे विसरून चालणार नाही. आपल्यात एकी नाही. महाराज त्यांना कुणी काही म्हणालं म्हणून लढायला लागले का? महाराज कुणाच्या मागे जय हो म्हणून फिरणारे माणसं गोळा करत बसले नाहीत. त्यांनी लढणारे माणसं गोळा केले. म्हणून त्यांनी कधी जात बघितली नाही. लढू शकतो का एवढच बघितलं. जीवाला जीव देऊ शकतो एवढी सोपी अट होती. मग सगळ्या जातीचे लोक आले सोबत. आज अट काय असते? जातीचा आहे का? शेवटी होतं काय? ऐन निवडणुकीत दगाफटका. भांडणाच्या वेळी सोबत कुणी नाही. कोर्टकेस एकट्याने लढा. जातीच्या माणसांनी जर खरंच एकमेकांना मदत केली असती ना तर या महाराष्ट्रात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नसती आजपर्यंत. कुठल्याच जातीच्या शेतकऱ्याला आपल्या जातीच्या माणसांनी मदत केल्याचं उदाहरण नाही. नाहीतर प्रत्येक जातीच्या शेतकऱ्याला वाईट दिवस आले नसते.               

 

दुष्काळात शेतकऱ्याला सढळ हाताने तगाई दिली जायची शिवरायांच्या राज्यात. ज्यांच्यापाशी गुरं ढोर नाहीत त्यांना सरकारातून दिली जायची.

उत्पन्न पाहून कर असावा, जुलूम करू नये अशी सक्त ताकीद होती. जहागिरीची पद्धत होती आधी. जहागीरदार शेतकर्याकडून कर वसूल करायचे.

महाराजांनी ही जहागीरदारीच बंद करून टाकली होती. जमीनदार मिरासदारांचे वाडे पाडून जमीनदोस्त केले आणि त्यांनी इतर रयतेसारखी छोटी घरं बांधून रहावं असा हुकुम दिला. आज अशा उपायांची गरज आहे. जे महाराजांनी केलं तेच करायचंय. पण असं होतं का ? नाही. मग आपण महाराजांचे मावळे आहोत का
       महाराजांनी आरमार स्थापन केलं होतं. काळाच्या पुढेच होते. समुद्र ओलांडून शत्रूला जरब बसवणारी योजना केली त्यांनी .पण त्यांच्या नंतरही आपण समुद्र ओलांडणे पाप आहे अशा फालतू समजुती कुरवाळत बसलो. परदेशात लोक जायचे नाहीत. अगदी टिळक आणि गांधीना सुद्धा समुद्र ओलांडला आणि परदेश प्रवास केला म्हणून प्रायश्चित्त घ्यायला लावलं लोकांनी. आपण खरंच महाराजांचे वारस आहोत? महाराजांनी पंचांग बघून लढाया केल्या नाही. महाराजांच्या काळातले कोणते जातीभेद आठवतात आपल्याला? जाणता राजा म्हणतो ते यामुळे. खूप बालिश लोकांना महाराज फक्त महाराष्ट्राचे एवढच माहित असतं. पण महाराज दक्षिणेत, बंगालमध्ये किंवा गुजरातमध्येसुद्धा तेवढेच माहित असतात. त्याकाळी एखाद्या महाराष्ट्रातल्या माणसाने थेट सुरतवर स्वारी करून गुलामगिरीविरुध्ध एवढी मोठी यशस्वी चढाई केली. महाराष्ट्रातून महाराज आणी मावळे जातात काय आणि औरंगजेबाच्या लोकांना घाबरून पळून जायला लावतात काय. अशक्य वाटतं हे आज. पण खरं आहे. त्याकाळात इंग्रज सुरतमधेच राहिले असते. त्यांना मुंबईचं देणं घेणं नव्हतं. भले मुंबई त्यांना पोर्तुगीजांनी हुंड्यात दिली होती. इंग्रज राजपुत्राला. पण इंग्रजांना मुंबईचं महत्व लक्षात आलं ते महाराजांनी सुरतवर स्वारी केली तेंव्हा. औरंगजेबाचे लोक घाबरून पळून गेले महाराज आले हे समजल्यावर. मग इंग्रज करणार काय? कसेबसे वाचले. काही लपून बसले. पण मग लगेच त्यांनी पोर्तुगीजांनी दिलेल्या मुंबई बेटावर लक्ष दिलं. ते ताब्यात घेतलं. आणि व्यापारी बेट बनवलं. महाराज देशाचे झाले पाहिजेत. मराठीत सोशल मिडीयावर भांडत बसण्यापेक्षा प्रत्येक भाषेत महाराज कळायला हवेत ही व्यवस्था केली पाहिजे. आणि हे काम करायला फार वर्ष लागणार नाहीत. प्रत्येक शिवजयंतीवाल्यांनी वर्गणी फक्त अमुक भाषेत महाराजांचं चरित्र छापलं जावं म्हणून गोळा केली पाहिजे. देशातल्या प्रत्येक भाषेत महराजांचं अस्सल चरित्र छापलं गेलं पाहिजे. ज्यात महाराज माणूस म्हणून किती थोर होते आणी कुठल्याही जाती धर्मापेक्षा मोठे होते हे सांगितलं जाईल. महापुरुष त्यालाच म्हणतात जो जात आणि धर्मापेक्षा मोठा असतो. महाराज जाती धर्मापेक्षा मोठे होते. दुधावर प्रक्रिया केली जाते आणि लेबल लावतात. पाण्यावर प्रक्रिया करून लेबल लावतात. सत्व काढून घेतलं की लेबल लावणं सोपं होतं. अस्सल गुण संपवले की लेबल लावणं सोपं होतं. महाराजांचं सगळ्या जाती धर्माला घेऊन स्वराज्याचा महामंत्र देणारा पहिला माणूस हे अस्सल मोठेपण संपवायचं असेल तर खुशाल त्यांना जातीची आणि धर्माची लेबलं लावा. पण एक लक्षात ठेवा. बाजारात देशभक्ती विकली जाते. खरा देशभक्त नाही. महराजांचा मावळा घोड्यावर स्वार असणारा होता. त्याचा नंदीबैल होऊ नये. पाउस पडो नाहीतर नाही. मी शेतकऱ्याच्या बाजूने राहणार असं ठामपणे नंदीबैल सांगू शकत नाही. महाराजांचा मावळा सांगू शकतो. मावळा कधी कुणाची हुजरेगिरी करत नाही. मावळा कधी आपल्या राजाच्या सोबत कुणाचा फोटो लावत नाही. फक्त घोड्यावर बसलेले महाराज शोभून दिसतात. तसाच फोटो असला पाहिजे. तुमच्या गल्लीतल्या उंदरा मांजरा सोबत नाही.

महाराजांच्या पदरी असलेल्या भूषणकवीची एक आठवण महत्वाची आहे. शिवराजभूषणकाव्य लिहिणाऱ्या या भूषणकवीने महाराजांच्या दरबारात काही काळ घालवला आणि तो परत दिल्लीला गेला. त्याचा भाऊ चिंतामणकवी औरंगजेबाच्या पदरी होता. औरंगजेबाने चिंतामणकवीला सांगितले की शिवाजी राजाकडे असलेल्या तुझ्या भावाला माझ्यासमोर हजर कर. भूषण आढेवेढे घेत गेला. कारण कवीभूषण फक्त शिवरायांवरच काव्य करायचा. ते औरंगजेब कसं ऐकेल? औरंगजेबाने भूषणकवीला वर्णन करायला सांगितले. कवीभूषण यावर म्हणाला, आपण हात धुवून बसा. कारण माझा बंधू शृंगाररसपर कविता म्हणून आपले मन रिझवतो, त्यावेळी आपला हात वारंवार विजारीस लागतो. मी वीररसपर कविता म्हणणार ,तेंव्हा तो हात मिशांवर जाणार आहे !; हे ऐकून बादशहा भडकला. म्हणाला,आमचा हात तुझे काव्य ऐकून मिशांवर गेला नाही तर तुझा शिरच्छेद होईल. पण कवी भूषणने आपल्या काव्याने बादशहाला मिशी पिळायला मजबूर केलं. बादशहाने खुश होऊन कवी भूषणचा सन्मान केला.

कृष्णराव केळुस्कर यांच्या शिवचरित्रातली गोष्ट आहे ही. गोष्टीचा खरे खोटेपणा महत्वाचा नाही. मिशीवर पीळ देताना आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, आपले हात स्वच्छ आहेत का ? भ्रष्टाचार, जातीयवाद, धार्मिक तेढ यात आपले हात बरबटलेले नाहीत ना ? या हाताने शेतकरी बांधवासाठी,निसर्गासाठी, देशासाठी एकतरी काम केलेलं असलं पाहिजे. नाहीतर तोच प्रश्न पडतो, खरंच आपण महाराजांचे मावळे आहोत का असू तर या महाराष्ट्रात एकही दंगल होता कामा नये. आपण महाराष्ट्रीय माणसं महाराजांचे मावळे आहोत. आपण देशासाठी युद्धात कामी येणारे लोक आहोत. राज्यातल्या दंगलीत नाही.

अरविंद जगताप

संगमनेरमधल्या सायखिंडीचे सिताराम राऊत. वटसावित्री पौर्णिमेला त्यांनी शंभर जोडप्यांच्या हाताने शंभर वड लावले.

‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’या कथासंग्रहाची आठवी आवृत्ती आलीय. वाचकांचे मनापासून आभार. विशेषत: पत्र, मेल लिहून प्रतिक्रिया देणारी तरूण पिढी. तुमचे शब्द बळ देतात. तरूण वाचक एवढं भारी लिहितात की खुपदा वाटतं त्यांच्यासारखं थेट मनातून लिहिता यायला पाहिजे.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *