माणसे गेली कुठे?
लेनिन आपला कोण होता? हा एक प्रश्न सारखा विचारला जातोय.लेनिनचा पुतळा पाडल्याचं आपल्याला दु:ख का वाटावं?खरं तर आपण मुघल आले,इंग्रज आले तरी शांत राहिलो.ते आपले राजे बनून राहिले.कलकत्त्यात आले ना?आपलं काय जातं?राजस्थानला आले ना?आपण सुरक्षित आहोत ना…म्हणत आपले लोकं शांत राहिले.कारण एकच होतं.देश म्हणून आपल्याला जाणीवच नव्हती.देशावर आक्रमण झालंय असं काही तेव्हा वाटलंच नसावं.नाही तर अख्खा देश काबीज करेपर्यंत आपण शांत राहिलोच नसतो.पण आपण शांत राहिलो.आपण आपल्या देशातली मंदिरं लुटून नेली तेव्हाही शांत राहिलो.तोडफोड वगैरे गोष्टीकडे आपण खूप शांतपणे बघतो.आइन्स्टाइन,मंडेला किंवा ओबामांसारखी जगभरची माणसं गांधीजींना आदर्श मानतात.त्यांचा खून करणारा देश आपला,आपल्याला लेनिनचं काय कौतुक?
लेनिनच्या निमित्ताने एक गोष्ट मात्र लक्षात आली की,जे जे नेते विस्मरणात गेलेत त्यांचा इतिहास माहीत करायचा असेल तर त्यांचा पुतळा तोडला गेला पाहिजे.दुर्दैवाने या देशात पुतळे उभारून जेवढा इतिहास कळत नाही तेवढा पुतळे तोडून कळतो.जगात सगळ्यात जास्त पुतळ्यांचा देश असेल आपला आणि पुतळे असे की ज्यांचा माणसाला काही उपयोग झाल्याचा एकही पुरावा नाही.तसं असतं तर या देशात कधी पुतळ्याची विटंबना झालीच नसती.
आपल्या देशात आधीच भरपूर महापुरुष झालेत आणि या महापुरुषांचे पुतळे खूप झालेत.पुतळे आता सांगायचे पत्ते झालेत.पुतळे अमुक ठिकाणी जायचं असेल तर पोहोचायला सोपं जावं या कामी येतात.पुतळे पगारवाढ किंवा जातीचे मोर्चे काढायचे असतील तर सुरुवातीचं जमण्याचं ठिकाण म्हणून कामी येतात.खूप ठिकाणी टवाळखोर पोरांचा जमायचा अड्डा असतो तो.खूप ठिकाणी ट्रॅफिकची समस्या असतात पुतळे.खूप ठिकाणी कबुतरं आणि कावळ्यांचे अड्डे असतात पुतळे.चौकाचं नाव असतात पुतळे.कधी भटक्या कुत्र्यांचं गाव असतात पुतळे.आरडाओरडा आणि घोषणांचं ठिकाण असतात पुतळे.गर्दीत हरवलेले निरागस मुलं असतात पुतळे.तुम्हाला शहरातलं सगळ्यात जास्त हवेचं प्रदूषण,ध्वनीचं प्रदूषण कुठे आहे,हे तपासायचं असेल तर पुतळ्याभोवती तपासा.तुम्ही कुठल्याही चौकातल्या पुतळ्यासमोर दहा मिनिटे उभं राहून दाखवा,वैताग येईल.असं वाटेल की मागच्या जन्मीचं काही तरी पाप असेल.नाही तर एवढ्या धुळीत,उन्हातान्हात,पावसापाण्या<wbr />त ताटकळत उभं वर्षानुवर्षं उभं राहणं कुणाला आवडेल का?रात्री पुतळ्याभोवती खूप डास असतात.कदाचित ते एकमेकांशी बोलत असतील.जन्मभर ज्याने रक्त आटवलं त्याचा पुतळा होतो आणि आपण पुन्हा त्याच्याच भोवती गुणगुण करायची हे बरं दिसत नाही.पुतळ्यावर आपटून जखमी झालेल्या,रक्त न मिळाल्याने अस्वस्थ झालेल्या या डासांनी एखाद्या रात्री पुतळे उभे करणारे लोकं शोधून हल्ला करायचा ठरवलं तर?असे खूप विचार येतात.पुतळ्यांचे विचार सोडले तर बाकी सगळे विचार करतो आपण.आपण पुतळ्यावर जेवढा विचार करतो तेवढा पुतळ्यांच्या विचारांचा करत नाही.आपण पुतळे उभे करण्यासाठी जेवढा खर्च करतो त्याच्या दहा टक्के जरी खर्च पुतळ्याचे विचार अमलात आणण्यासाठी केला तर?आपण पुतळ्याभोवती जेवढी रोषणाई करतो त्यातल्या एखाद्या छोट्या बल्बएवढा जरी प्रकाश आपल्या डोक्यात पडला तर?पुतळा बसवून आपण परिसर बदलतो,पण पुतळ्यापाशी बसून आपण बदलतो का?
आपण म्हणजे आपला देशच असा आहे असं नाही.सगळे असेच आहेत.अफगाणिस्तानात काय झालं?त्या युक्रेनने तर हजारएक पुतळे तोडले लेनिनचे.पण ते जरा आपल्यापेक्षा क्रिएटिव्ह आहेत.त्यांनी लेनिनचा एक पुतळा तोडायच्या ऐवजी त्याला स्टार वॉर सिनेमातल्या एका खलनायकाचं रूप दिलं.वाय फाय लावलं.लोकं मजा म्हणून बघायला येतात.मेंदू पार गंजलेले नसले म्हणजे असं काही तरी सुचतं.नाही तर आपल्याकडे पुतळा तर तोडला,पण आता त्याचं काय करायचं,हा प्रश्न.
असो,पण आपण स्वतःला प्रामाणिकपणे विचारलं पाहिजे.आपण आपल्याच महापुरुषांच्याबद्दल अफवा ऐकत तरी असतो नाही तर सांगत तरी असतो.दुसऱ्या जातीच्या माणसाची कधीच चेष्टा केली नाही एकदा तरी,दुसऱ्या जातीबद्दल खवचट बोललो नाही,अशी किती माणसं आहेत या देशात?३३ कोटी देव असूनही पन्नास कोटींपेक्षा जास्त गरीब असलेला हा देश,पुतळ्यांनी समृद्ध होणार आहे का? करोडो समाजसुधारकांचे पुतळे असून समाज म्हणून आपण एवढे मागास का याचा विचार करायची वेळ आलीय असं वाटत नाही का?पेशंट बरा झाला नाही की लोकं काही दिवसांनी डॉक्टर वाईट आहे असं म्हणू लागतात.तसं आपल्या समाजाची अधोगती अशीच चालू राहून पुतळ्याला तर दोषी धरणार नाही ना आपण?या महापुरुषांची शक्ती संपली असं तर म्हणणार नाही ना?गल्लीच्या प्रत्येक वळणावर विचारवंतांचे पुतळे असताना गल्लीत एवढं वैचारिक दारिद्र्य का? आपण सगळी जबाबदारी पुतळ्यावर टाकून मोकळं होतोय.फक्त पुतळ्यांची संख्या वाढतेय.विचारवंतांची कमी होतेय.जसा देव जेवढा श्रीमंत असेल तेवढे देवळाभोवती भिकारी जास्त असतात.आपले महापुरुष विचारांनी खूप श्रीमंत आहेत.आणि त्यांच्याभोवती मेंदू गहाण ठेवलेले लाखो आहेत.आपले संत सकळ सोयरे त्रिभुवन म्हणायचे आणि आपल्याला लेनिन झेपत नाही.आता विश्वात्मके देवे म्हणून एवढी वर्षं झाली आणि आपण आज म्हणतोय लेनिन आमचा कोण?रशियात राज कपूर सुद्धा किती लोकप्रिय होता,गांधीजी जगभर आहेत.विचारांना देशांच्या सीमा नसतात.जगातलं फेसबुक,व्हॉट्सअॅप घ्यायचं फक्त आणि त्यावरच लेनिन नको म्हणायचं.मार्क्स तिकडे बसून आपल्या देशातल्या १८५७च्या उठावावर लिहीत असायचा.त्याला काय देणं घेणं होतं?माणसं खूप आधीपासून जगाची चिंता करतात.आपली माणसं पण अशी होती.संकुचित राष्ट्रवादी नव्हती,ती माणसे गेली कुठे? आठवतं?लहानपणी आपण एक खेळ खेळायचो.कुणी जास्त पळायला लागला की त्याला असं बोट दाखवायचो आणि स्टॅच्यू करायचो.तो कितीही पळत असला तरी जागच्या जागी थांबायचा.थिजल्यासारखा…पुतळ्या<wbr />सारखा.मग आपण त्या स्टॅच्यूला बघत बसायचो,खूप वेळ.तो काही बोलू शकायचा नाही.त्याला खूप काही सांगायचं असायचं,पण आपली ऐकण्यापेक्षा गंमत बघण्याची इच्छा असायची.आपल्याला ज्ञान नको,मनोरंजन पाहिजे असतं.आपण आपल्याला कशी जादू येते चांगल्या चांगल्यांचा स्टॅच्यू करायची या आनंदात मग्न असायचो.पण आपण आता हे स्टॅच्यूकरण थांबवायला पाहिजे ना?कारण आपण आता लहान राहिलो नाही.
-अरविंद जगताप
0 Comments