ऑक्सिजन

May 4, 2021

लेखन

arvind jagapat patra

हिमालयाच्या मदतीला धाऊन जायचं असेल तर सह्याद्रीला कायम मजबूत रहाव लागेल. आणि फक्त आपली एकीच आपल्याला आणि आपल्या राज्याला मजबूत ठेऊ शकते.

प्रिय महाराष्ट्र,

                   एक मे रोजी आपण सगळे महाराष्ट्रदिन साजरा करतो. खूप मोठ्या संघर्षातून आपण आपलं राज्य मिळवलय. पण आता आपण तो संघर्षही विसरून गेलोय आणि आपलं वैभवही. खरतर माणसाने भूतकाळात रमायचं नसतं. पण आज दुर्दैवाने परिस्थिती अतिशय वाईट आहे. माणसं खचलेली आहेत. निराश आहेत. देशातल्या कुठल्याही संकटात खंबीर असणाऱ्या महाराष्ट्राच्या क्षमतेबद्दल अशात  शंका घेतली गेली.  कितीही संकट आलं तरी मुंबई दुसऱ्या दिवशी पूर्वीसारखी सुरु असते. जगभरात त्याला मुंबई स्पिरीट म्हणतात. पण कोरोनामुळे पहिल्यांदा त्या स्पिरीटविषयी पण धाकधूक वाटली सगळ्यांना. कोरोनाशी लढताना औषधांचा तुटवडा, लसींचा तुटवडा, ऑक्सिजनचा तुटवडा आणि त्यावरून होणारं राजकारण यामुळे धास्ती निर्माण झाली. आपल्या राजकारण्यांच्या या कठीण काळातही आपापसात चालू असलेल्या वादामुळे देशात हसू व्हायला लागलं. लोक आवाक होऊ लागले. लोकांना महाराष्ट्राची काळजी वाटणं समजू शकतो. पण म्हणून कुणीही उठून महाराष्ट्राच्या क्षमतेवर शंका घेण्याची वेळ आलेली नाही. कारण हा फक्त दगडा धोंड्याचा महाराष्ट्र नाही. या देशाला शत्रूविरुद्ध ताठ मानेने लढण्याची प्रेरणा देणाऱ्या शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे.

मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा!
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा!

                   कवी गोविंदाग्रज यांनी महाराष्ट्राचं केलेलं हे सार्थ वर्णन आहे.

                   जगात प्रत्येक प्रदेशावर खुपदा अशी हतबल होण्याची परिस्थिती येते. पण कितीही संकट आलं तरी महाराष्ट्र कधी खचत नाही. लोकानी वाळीत टाकलेल्या ज्ञानेश्वरांनी महाराष्ट्र कधी विसरू शकणार नाही अशी ज्ञानेश्वरी लिहिली. गाथा बुडवण्यापासून कितीतरी प्रकारे लोकांनी तुकारामांचा छळ केला. पण त्याच तुकारामांची एकतरी ओळ उच्चारल्याशिवाय महाराष्ट्रात एकही दिवस उगवत नाही. मुलींच्या शिक्षणासाठी वेळप्रसंगी शेणाचे गोळे अंगावर झेलणारे जोतीबा आणि सावित्रीबाई फुले. आज देशातल्या मुली त्यांच्या नावाने अभिमानाने स्वतःला सावित्रीच्या लेकी म्हणवून घेतात. शिक्षण, हक्क या सगळ्या गोष्टीपासून वंचित असणारी जनाबाई साडेसातशे वर्षापूर्वी म्हणून गेली होती, सोयरे सकळ त्रिभुवन. जगाशी नातं जोडणारे शब्द आणि ते महाराष्ट्रातली एक संत कवयित्री सहज बोलून जाते. संत ज्ञानेश्वर म्हणतात, दुरितांचे तिमिर जावो | विश्व स्वधर्म सूर्ये पाहो || जो जे वांछील तो ते लाहो | प्राणिजात ||

                                     थेट सगळ्या सृष्टीच्याच कल्याणाची अपेक्षा. हा विचार महाराष्ट्रातला एक सोळा वर्षांचा मुलगा शेकडो वर्षांआधी करत होता. या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. मुघलांशी लढताना सगळीकडे आपली वतनदारी टिकवण्याची मारामारी चालू होती. त्याकाळात थेट स्वराज्याचं स्वप्न पाहून साकार करून दाखवणारे शिवाजी महाराज. इंग्रजांविरुद्ध लढताना ज्यांच्या पुस्तकाने कितीतरी क्रांतीकारकांना प्रेरणा मिळाली असे विनायक दामोदर सावरकर. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं ठासून सांगणारे लोकमान्य टिळक. आपल्या विद्वत्तेच्या जोरावर वर्षानुवर्ष अन्याय होत असलेल्या जातींना सन्मान आणि हक्क मिळवून देणारे बाबासाहेब आंबेडकर. या देशाची घटना लिहिणारे बाबासाहेब आंबेडकर. देशात सगळ्यात आधी आपल्या राज्यात आरक्षण सुरु करणारे शाहू महाराज. देशात प्लेगची साथ आली होती. लाखो बळी जात होते. अशावेळी शाहू महाराजांनी कोल्हापुरात प्लेगची साथ पसरू दिली नाही. गावच्या गावं हलवली. असं नेतृत्व ही आपली परंपरा असताना आपण चाचपडण्याची गरज का आहे? आपल्या वाढदिवसाला रक्तदान शिबीर भरवणारे गल्ली बोलातले नेते माणसं मरत असताना मोठ्या प्रमाणात प्लाझ्मा गोळा करायला का पुढे येत नाहीत? 

                   आपण महाराष्ट्राचा इतिहास पुन्हा गिरवायला हवा. तुम्हाला माहितीय? देशात रविवारची सुट्टी सुरु झाली ती सुद्धा एका मराठी माणसामुळे. नारायण मेघाजी लोखंडे असं त्यांचं नाव. किती लोकांना आठवतं? आपण एवढ्या वर्षात देशाला मराठी नेतृत्व देण्यात अपयशी ठरतोय. पण एक संत नामदेव होऊन गेले. त्यांचा तर कुठला पक्ष नव्हता, पाठबळ नव्हतं. पण भारतभर फिरले. तिकडे पंजाबमध्ये पण संत आणि इकडे महाराष्ट्रात पण संत म्हणून आदराची ओळख. शिखांचे आदरस्थान.

                   महाराष्ट्राची ही परंपरा आहे. आपण निराश होऊन चालणार नाही. एकट्या कोकणात तीन भारतरत्न आणि मुंबईत दोन भारतरत्न आहेत. क्रिकेटचा देव महाराष्ट्राचा आहे. गानकोकिळा महाराष्ट्राची आहे. महात्मा गांधी राष्ट्रपिता मानतो आपण. पण महात्मा गांधींचे गुरु गोपाळकृष्ण गोखले महाराष्ट्राचे आहेत. त्यांनी गांधीजींना भारत फिरायला सांगितला. आपल्या महाराष्ट्रात प्रेरणा घेण्यासारख्या असंख्य गोष्टी आहेत. पण आपण त्या विसरत चाललोय हे आपल दुर्दैव आहे. आपण कायम टाटांच्या जमशेदपूर या उद्योगनगरीविषयी बोलतो, वाचतो. पण आपल्या महाराष्टात शंभर वर्ष आधी लक्ष्मणराव किर्लोस्कर नावाच्या माणसाने किर्लोस्करवाडी नावाची उद्योगनगरी उभारलेली असते या गोष्टीचं आपल्याला कौतुक नसतं. मग किर्लोस्कर, गरवारे यांच्या महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असावी हा विषय डोक्यात येणार कसा? महात्मा फुले हे यशस्वी उद्योगपती सुद्धा होते हेही  लक्षात ठेवलं जात नाही. मग मराठी माणसाला उद्योग जमत नाही म्हणायला आपणच मोकळे. महाराष्ट्राने देशाला एमआयडिसीचा प्रयोग दिला. म्हणजे औद्योगिक वसाहत. पुढे देशात अशा औद्योगिक वसाहती स्थापन झाल्या. रोजगार हमी योजना पण महाराष्ट्रात आधी सुरु झाली. सहकारी साखर कारखाने ही सुद्धा महाराष्ट्राची देणगी. ग्रामस्वच्छता अभियान, महिलाना राजकीय आरक्षण या गोष्टी पण देशात सगळ्यात आधी महाराष्ट्रात झाल्या.   

                   भारत देश स्वतंत्र व्हायच्या आधी महाराष्ट्रातल्या औंध संस्थानाने लोकशाहीचा यशस्वी प्रयोग केला. महात्मा गांधींच्या मार्गदर्शनाखाली लोकांचे राज्य आले. स्त्री शिक्षण आणि विधवा विवाहासाठी अनमोल कामगिरी करणारे महर्षी कर्वे, लैंगिक शिक्षणासारख्या धाडसी पण महत्वाच्या विषयात मोलाचे काम करणारे र धो कर्वे, रयत शिक्षण संस्थे सारखी आदर्श शिक्षण संस्था उभी करणारे कर्मवीर भाऊराव पाटील. अशी भली थोरली परंपरा असलेला महाराष्ट्र. या महाराष्ट्रात कोरोनासारख्या साथीवरून राजकारण सुरु असतं तेंव्हा मनोमन खूप लाज वाटते.

                    चीनवर जपानने आक्रमण केलं होतं. चीनला मदतीची गरज होती. त्यावेळी गेलेल्या पथकात सोलापूरचे डॉक्टर कोटणीस होते. त्यांनी हजारो जखमी चीनी सैनिकांवर उपचार केले. त्यांचा चीनमध्ये पुतळा आहे. एक मराठी माणूस संकटात जात धर्म देश बघत नाही. अशा डॉक्टर कोटणीस यांच्या महाराष्ट्रात ऑक्सिजनची कमतरता असावी. त्यावर राजकारण व्हावं?

                   भारतातली चित्रपटसृष्टी सुरु झाली ती मराठी माणसामुळे. महाराष्ट्रात. आणि आज त्या जीवावर उभी असलेली ही चित्रपटसृष्टी काही हजार कोटींची उलाढाल करते. एवढी मोठी उलाढाल असलेली चित्रपटसृष्टी असताना लोक औषधासाठी वणवण फिरताहेत. जर यावेळी जनतेला मदत मिळत नसेल तर एवढा आर्थिक आणि मानसिक धक्का बसलेल्या महाराष्ट्राला आता आम्हाला मनोरंजन नको असं म्हणायची वेळ येईल.

                   पुण्यात पानशेत धरण फुटून पूर आला. पुणे उध्वस्त होत आले होते. त्यावेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण पूर्ण परिस्थिती नीट होईपर्यंत पुण्यात तळ ठोकून राहिले. किल्लारीत भूकंप झाला. सत्ताधारी, विरोधक संकटात मदतीला धावून आले. मुंबईत बॉम्बस्फोट झाले. राजकारण सोडून लोक मदतीला धाऊन आले. मग आजच आपल्या महाराष्ट्राला काय झालय? नेमकी कुणाची नजर लागलीय? पेशंट बेड शोधताहेत आणि पुढारी एकमेकावर आरोप करण्याची कारणं शोधताहेत. कधी नव्हे ते ऑक्सिजनचं महत्व लक्षात आलय. आणि पुढाऱ्यांच्या आरोपांनीच गुदमरून जायची वेळ आलीय जनतेवर. महाराष्ट्रातल्या जनतेला कोरोनाने थकवा जाणवला. दम लागला. श्वास कमी पडला. पण कोरोनामुळे झालेल्या राजकारणाने मात्र लाज आणली.

                   मुंबई महाराष्ट्रात राहिली ती आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासारख्या माणसांमुळे. ही काही राजकारणी माणसं नव्हती. तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून पण रिझर्व बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर म्हणजे चिंतामणराव देशमुख. मराठी माणूस. या देशात नोटेवर सही केलेले पहिले गव्हर्नर. ज्या मराठी माणसाची देशाच्या नोटेवर पण पहिली सही होती त्या महाराष्ट्राला कोरोनाशी सामना करताना निधीची कमतरता असावी हे दुर्दैवी आहे.

                   अर्थात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. वेळ आल्यावर स्वतःच्या हक्कासाठी मराठी माणूस स्वतःच लढू शकतो याचं उदाहरण म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळ. याआधी राजासाठी एकट्याने खिंड लढवणारे बाजीप्रभू, संताजी धनाजी, क्रांतिसिंह नाना पाटील, सेनापती बापट अशी कितीतरी मंडळी होऊन गेली ज्यांनी भल्या भल्यांना घाम फोडला. औरंगजेबाच्या दरबारात त्याच्याकडे पाठ फिरवून निघून येणारे शिवाजी महाराज ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची शिकवण आहे. देशात सगळ्यात जास्त कर भरणार राज्य ही आमची ओळख आहे. पण महाराष्ट्रावर यापुढे चुकुनही औषध आणी ऑक्सिजनसाठी हात पसरायची वेळ येऊ नये. दिल्लीचे तख्त राखणारा महाराष्ट्र ही आमची ओळख आहे. पानिपतमध्ये लढण्याची हिम्मत दाखवणारे मराठे, सुरत लुटून औरंगजेबाला दहशत बसवणारे मराठे ही आपली ओळख विसरता कामा नये. महाराष्ट्राची ही समृध्द परंपरा म्हणजे महाराष्ट्राचा श्वास आहे. ऑक्सिजन आहे. आणि देशाच्या मदतीला धावून जायचं असेल तर हा ऑक्सिजन गरजेचा आहे.    

                   आपल्याकडे युद्धाचा सुद्धा नियम असायचा. सूर्यास्त झाला की युद्धाला विराम असायचा. राजकारणालाही नियम असावा. निदान अशा संकटात राजकारणाला विश्रांती द्यावी. राज्यावर प्रेम नसेल तर देशावर प्रेम आहे हे कसं सिध्द होणार? महाराष्ट्र धर्म वाढवायचा असेल तर भेद विसरावे लागतील. इंग्रजसुद्धा एकेकाळी मराठ्यांना एवढे घाबरायचे की त्यानी कलकत्त्याच्या भोवती खंदक बनवायला सुरुवात केली. त्याला मराठा डिच असं म्हणायचे. पण नंतर मराठ्यांची एकी उरली नाही आणि दिल्ली ज्यांच्या जीवावर सुरक्षित होती ते मराठा साम्राज्य काही वर्ष लयाला गेलं. इंग्रज राज्यकर्ते झाले. आज पुन्हा एकदा महाराष्ट्राला एकीचा मंत्र जपण्याची गरज आहे. एकेकाळी दिल्लीच्या बादशाहने देशाचा कारभार महादजी शिंदेंच्या हाती सोपवला होता. पुढे आपल्या राज्यातला कारभार कुणी करायचा यावर कुरबुरी सुरु झाल्या. फुटीचा फायदा घेऊन इंग्रजांनी महाराष्ट्राचा दरारा संपवला. हा इतिहास वाईट आहे. पण महत्वाचा आहे.

             हिमालयाच्या मदतीला धाऊन जायचं असेल तर सह्याद्रीला कायम मजबूत रहाव लागेल. आणि फक्त आपली एकीच आपल्याला आणि आपल्या राज्याला मजबूत ठेऊ शकते.                      

 

                               जय हिंद. जय महाराष्ट्र.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *