पांडूरंग शोधूया.

June 16, 2020

लेखन

arvind jagapat patra

यावर्षी पहिल्यांदा आपल्या पांडूरंगाला भेटायला जमणार नाही कोरोनामुळे. म्हणून ठरवलय की झाडांना भेटायचं.

राधा आणि कृष्णाची गोष्ट आहे. राधेने कायम कृष्णाच्या सोबत असावं म्हणून प्रार्थना केली. कृष्णालाच विनवणी केली. कृष्णाने तिला वर दिला तू कायम माझ्या सोबत राहशील. राधा तुळस झाली आणि त्या तुळशीची माळ कृष्णाच्या गळ्यात दिसू लागली. पण तुळशीचं नातं विठ्ठलाशी जास्त आहे. तुळशीमाळ गळा म्हणालं की आधी विठ्ठल आठवतो. कुठल्याही झाडाची गोष्ट देवाशी जोडलेली आहे. वडाची गोष्ट सावित्रीशी. शंकराची बेलाशी

सुपारीच्या झाडाचीसुद्धा अशीच एक गोष्ट आहे. महाभारत लिहून संपत आलं होतं. महाभारत सांगणारे व्यासमुनी आणी लिहून घेणारा गणपती. गणपती जरा निराश झाला होता. एवढ महाकाव्य झालं पण याचा जर पृथ्वीवर काही पुरावाच नसला तर लोक काय म्हणतील? एवढ मोठं युद्ध झालं आणि त्यातली कुठलीच जागा दिसत नाही असं कसं? व्यासाना गणपतीची ही गोष्ट पटली. 

कलीयुगाला सुरुवात झाल्यावर अर्जुन महाप्र्स्थानाला निघाला होता. तेंव्हा ज्या अग्नीने अर्जुनाला गांडीव धनुष्य दिलं होतं तो समोर आला. अर्जुनाला म्हणाला आता तुला धनुष्याचा काय उपयोग? धनुष्य मला परत दे. धनुष्य परत द्यायच्या आधी अर्जुनाने ते एकदा चालवायचं ठरवलं. अर्जुनाने पाताळात बाण मारला. तो बाण थेट हिमालयात शंकराच्या पावलापाशी गेला. शंकराच्या पावलाला स्पर्श करून पुन्हा परत आला. 

दरम्याने एवढा काळ गेला होता की त्या ताठ बाणाला टोकाला पालवी फुटली होती. बाण जेंव्हा परत आला तेंव्हा त्याचं पृथ्वीवर झाड झालं. सुपारीचं झाड. जे पूजेत महत्वाचं मानलं गेलं. पण सुपारीचं झाड पाहिलं की खरोखरच गोष्टीतल्या बाणासारखं वाटतं. 

प्रत्येक झाडाची अशी गोष्ट आपल्याला माहित असावी असं वाटतं. माणसांच्या आठवणी असतात तशा झाडांच्या असतात. झाड आपल्याच घराचा, शेताचा, बालपणाचा, तरुणपणीचा भाग असतं. पंचायतीच्या ओट्यावर बसलेले लोक उगीच अस्वस्थ वाटतात. झाडाखाली बसलेले लोक निवांत वाटतात. खुपदा शेतातल्या झाडाखाली फेटा घालून बसलेला माणूस पांडुरंग वाटू लागतो. आपल्या खूप आठवणीत पांडुरंग सोबत असतो. गावाकडचे दर आषाढीला आपल्या पांडुरंगाच्या ओढीने पंढरपुरला जाणारे लोक. कुणी वारीत सामील होतात. कुणी वारकऱ्यांची सेवा करतात

पांडुरंगाच्या आशीर्वादासाठी जो तो आपल्या आपल्या मनाने काही ना काही करत असतो. आणि हे सगळं करण्याचा उत्साह येतो कुठून? कारण आपला पांडुरंग काही मागत नाही. त्याला भक्ताकडून काहीच नको असतं. चंद्रभागेत आंघोळ करा. भेटा. आणि पुन्हा आपल्या गावी जा. पण ती एक भेट वर्षभर कष्ट करायची उर्जा देते. जरी पांडुरंग कमरेवर हात ठेवून उभा दिसत असला तरी दिवस रात्र कष्टाची कामं करणाऱ्या लोकांना बळ पुरवतो. हे सगळं झाडासारखं आहे. झाड पांडूरंगासारखच उभं असतं. पण रस्त्यावर खडी फोडणाऱ्या मजुरासाठी, शेती करणाऱ्या शेतकऱ्यासाठी, छोट्या दुकानासाठी, पिकनिकसाठी, पूजेसाठी, झोपण्यासाठी, सावलीसाठी तेच तर कामी येतं. 

यावर्षी पहिल्यांदा आपल्या पांडूरंगाला भेटायला जमणार नाही कोरोनामुळे. म्हणून ठरवलय की झाडांना भेटायचं. पांडुरंगानंतर सगळ्या जास्त जग पाहिलेलं कोण आहे? झाडं? शंभर दोनशे तीनशे वर्षांची झाडं आहेत आपल्या प्रत्येक जिल्ह्यात. त्यांना शोधायचंय या निमित्ताने. पांडुरंगासाठी जातो तसे भक्तिभावाने भेटायला जाऊया. जगात तशीही मोठी माणसं सापडत नाहीत लवकर

सापडली तरी खुपदा दुरून डोंगर साजरे असा प्रकार होतो. पण मोठी झाडं आहेत ना. आपल्या आजा पणजाच्या वयाची. त्यांच्यापेक्षा मोठी. त्यांना भेटू. त्यांचा आशीर्वाद घेऊ. आणि शांतपणे कसला गाजावाजा करता लोकांची सेवा कशी करता येते ते समजून घेऊ. पंढरपुरला जातो तेंव्हा पांडुरंगाला घट्ट मिठी मारावी वाटते. पण शक्य होत नाही गर्दीत. आपल्या गावात झाडाच्या रूपाने पांडुरंग उभा आहे. त्याला मिठी मारू. सगळ्या संतानी झाडाचं महत्व सांगितलय

आपल्या तुकोबांचे अभंग आहेत झाडावर. ही आषाढी अशी आपल्या गावोगाव असलेल्या झाडरुपी पांडूरंगाच्या सहवासात साजरी करायची. सगळ्यात जुन्या झाडाचं वय शोधायचं अंदाजे. मग आपल्याला आपल्या गावातलं, तालुक्यातलं आणि जिल्ह्यातलं मग राज्यातलं सगळ्यात जुनं झाड शोधायचंय. ही आपली खरी तीर्थक्षेत्रं आहेत. आपल्या पुढच्या पिढ्यांना त्यांची सविस्तर माहिती असली पाहिजे. आपल्यालाही. मग शोधूया ना आपल्या भागातलं सगळ्यात जुनं झाड. देव भेटल्याचा आनंद यापेक्षा फार वेगळा नसेल. 

आपल्या परिसरातल्या सगळ्यात जुन्या झाडांचा इतिहास या निमित्ताने गोळा होणार आहे.. हे सगळं कशासाठी? कारण जुनं ते सोनं असतं. हे सुद्धा जुने लोक सांगून गेलेत. माणसांचा इतिहास वाद निर्माण करतो. पण झाडांचा इतिहास फक्त आनंद देणारा असतो. हा इतिहास फक्त लिहायचा नसतो. जगायचा असतो. हा इतिहास फक्त प्रेरणा नाही. ऑक्सिजनसुद्धा देतो. श्वास घायला. आणि श्वासापेक्षा मौल्यवान दुसरं काय आहे? कोरोनाच्या काळात पुन्हा आपल्याला आपल्या श्वासाचं महत्व लक्षात आलय. आपल्या श्वासासाठी झाड जगलं पाहिजे. जपलं पाहिजे.

जय हरी विठ्ठल!

Photo © Appa Chanda Chougule

संगमनेरमधल्या सायखिंडीचे सिताराम राऊत. वटसावित्री पौर्णिमेला त्यांनी शंभर जोडप्यांच्या हाताने शंभर वड लावले.

‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’या कथासंग्रहाची आठवी आवृत्ती आलीय. वाचकांचे मनापासून आभार. विशेषत: पत्र, मेल लिहून प्रतिक्रिया देणारी तरूण पिढी. तुमचे शब्द बळ देतात. तरूण वाचक एवढं भारी लिहितात की खुपदा वाटतं त्यांच्यासारखं थेट मनातून लिहिता यायला पाहिजे.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *