प्रिय पंकजाताई, रोहितदादा, सुजयदादा

December 16, 2020

लेखन

arvind jagapat patra

तुम्हा तिघांना एकत्र लिहितोय. एकत्र का? तुम्ही तिघेही राज्यातले तरून नेतृत्व आहात. तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत.

तुम्हा तिघांना एकत्र लिहितोय. एकत्र का? तुम्ही तिघेही राज्यातले तरून नेतृत्व आहात. तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. खरतर तुमच्याकडून असलेल्या तुमच्या घरच्यांच्या राजकीय अपेक्षा तुम्ही पूर्ण केल्या आहेत. इथून पुढेही त्यांचं स्वप्न पूर्ण करणार आहात. पण आज मला माझ्या स्वप्नाविषयी बोलायचंय. माझ्यासाख्र्या दहा बारा लाख उसतोड कामगारांविषयी बोलायचंय. तुम्हा तिघांशी बोलायलाच पाहिजे कारण तुम्ही तिघेही साखर कारखान्याशी संबंधित. ज्या बीड आणी नगर जिल्ह्यातून सगळ्यात जास्त उसतोड कामगार राहतात त्याचे तुम्ही प्रतिनिधी.

तुमचं जसं जन्मापासून उसाशी नातं आहे तसंच माझंही. गरोदर असूनही आई उसतोडणीसाठी आली होती. कोपीतच जन्म झाला माझा. पाचट लहानपणापासून सोबतीला. ते उसाचं पाचट आहे का आयुष्याला मारलेली पाचर आहे हे मला अजून ठरवता आलेलं नाही. उस तुमच्यासाठी जवळचा मित्र आहे. पण आम्हा उसतोडकामगाराच्या पोरांसाठी शत्रू. या उसामुळेच ऐन दिवाळीत आमचं गाव ओस पडलेलं असतं. तुम्हाला माहितीय पण खूप लोकांना विश्वास बसणार नाही दोनशे घरांच आमचं गाव दिवाळीत सुतक पडल्यासारखं शांत असतं. घरातले कर्ते माणसं उसतोडणीला पश्चिम महाराष्ट्रात निघून गेलेले असतात. घरात फार फारतर म्हातारी माणसं आणि त्यांच्या भरवशावर मागे राहिलेली लहान पोरं. आजोबा होते तोपर्यंत मी पण गावातच रहायचो. आई वडील बैलगाडीत बसून उसतोडणीला निघायचे. लोक म्हणायचे टोळी निघाली. उस तोडायला जाणाऱ्या लोकांना टोळी म्हणतात. खूप त्रास देतो तो शब्द जीवाला

दोन चार वर्षाच्या लेकरांना घरातल्या म्हाताऱ्या माणसाच्या हवाली करून बिचारे आई बाप सहा सहा महिन्यासाठी निघून जातात. पोटाची आग मिटावी म्हणून. चुलीतली आग पेटावी म्हणून. पण दरवर्षी सहा महिन्याचं ते पोरकेपण वाट्याला आलेल्या प्रत्येक पोराच्या डोक्यातली आग कुणी समजून घेऊ शकलेल नाही. खरतर आधी आजी आजोबापण उस तोडायला जायचे. अरे हो, तुमच्यात आणि आमच्यात अजून एक साम्य आहे. आधीच्या पिढीपासून तुमचे कारखाने आहेत. आणि आधीच्या पिढीपासून आम्ही उसतोड कामगार आहोत. खरतर मी तुम्हाला मालक म्हणायला पाहिजे. पण तुमची तरुण पिढी मालक नौकर असे भेदभाव करणारी नाही हा विश्वास वाटतो. हां..तर मी सांगत होतो आजोबा उस तोडायला जायचे. एका वर्षी असेच बैलगाडीतून जात असताना एका ट्रकनी धडक दिली. आजी ट्रक खाली आली. आजोबाचा एक पाय चाकाखाली आला. ट्रकवाला थांबला सुद्धा नाही. पण तुम्हाला सांगतो मला त्या ट्रक वाल्याचा एवढा राग आला नाही. बोलून चालून गुन्हाच केला होता त्यानी. पण रस्त्यात मोठ मोठ्याने ओरडणारे माझे आई बाप, शेवटच्या घटका मोजणारी आजी, आणि तुटलेला पाय घेऊन सरपटत आजीपाशी जाऊन धीर सोडू नको म्हणून पांडुरंगाचा हवाला देणारे माझे आजोबा. दोन तास माझ्या आजीनी त्या रस्त्यावर मदत मिळायची वाट पाहिली. पण कुणी धावून आलं नाही. पहाटे पहाटे आजीनी त्या परक्या गावातल्या रस्त्यावर जीव सोडला. तिकडच कुठतरी जाळून टाकलं आजीला. तेंव्हापासून अपंग झालेल्या आजोबासोबत मी गावात थांबायला लागलो. सहा सात वर्षाचा मी आणि एक पाय नसलेले आजोबा. कोण कुणाला सांभाळायचं माहित नाही.

उसतोड मजुराला कळत नाही आयुष्यभर. कारखाना आपल्याला सख्ख्या आईसारखा जगवतोय का सावत्र आईसारखा वागवतोय. लहानपणी कधी झाडाला झोळी बांधायचे माझी. कधी बैलगाडीला. लहानपणापासून उसतोडमजुराच्या पोरांनी रडायचं नाही हे ठरलेलं असतं. मोठा भाऊ नाहीतर बहिणच आई होतो लेकराची. कारण कोपीतल्या बायकांचं जगणं म्हणजे फक्त शोकांतिका असते. पहाटे थंडीच्या कडाक्यात आंघोळ उरकून दिवसभराचा स्वयपाक करायचा. धुणेभांडे आवरायचे. आणि हातात कोयता घेऊन आपल्या नशिबाचा राग काढत उसावर सपसप वार करायचे. सुट्टीच नाव काढायचं नाही. अगदी आजारी पडायची सुद्धा परवानगी नाही. हाड गोठवणारी थंडी एवढी की आयुष्याची होळी करण्याची इच्छा व्हावी. हे सगळं तुम्ही बघत आला असणार. आम्ही जगत आलोय.

सांगायचं एवढच आहे की लाकडी घाण्याच्या रसवंतीला असलेला बैल जसा एकाच जागी गोल गोल फिरत असतो तसे आम्ही वर्षानुवर्ष त्याच त्या कारखान्यासाठी, त्याच त्या शेतात राबत आलोय. उसाला भाव मिळाल्यामुळे नाराज शेतकरी आणि तोंडाला पानं पुसल्यासारखी भाववाढ मिळालेले उसतोडमजूर. खुपदा रसवंतीला बांधलेल्या घुंगराचा आवाज ऐकू येतो. खूप लोकांना तो मधुर आवाज वाटतो. माझ्या डोक्यात तिडीक जाते. कारण त्या रसवंतीच्या चाकात उसाच्या ऐवजी आमचं आयुष्य पिळून निघत असल्याचा भास होतो. पण लढायला तर पाहिजे. तुम्हीही. आम्हीही. शेतकऱ्याला भाव मिळण्यासाठी. शेतमजुराला भाव मिळण्यासाठी. कधी बाभळीच्या, कधी लिंबाच्या झाडाला झोळी बांधलेली असायची आईने लहानपणी. आमच्या नशिबात लिंबोणीच्या झाडामागे लपलेला चंद्र नव्हता. झोळीत पडल्या पडल्या थेट सूर्याच्या डोळ्यात डोळे घालून बघत आलो लहानपणापासून. आम्ही पाचटात रांगलोय. उसाचे पाते तलवारीसारखे अंगावर वार करायचे. पण त्रास वाटला नाही. आम्हाला त्रास फक्त जेंव्हा पुढारी शब्द फिरवतात तेंव्हा होतो. यावेळी पुन्हा मजुरी वाढेल असं वाटलं. पण मनाजोगती वाढली नाही. कधी कधी असं वाटतं आम्ही वर्षाची नाही जन्माची उचल घेतलीय का काय? आयुष्यभर राबतच रहायचं का काय

आमची प्रत्येक पिढी हा कोयता पुढच्या पिढीच्या हातात द्यायचा नाही म्हणून दुप्पट जोमाने राबत असते. पोराला नौकरी लाऊन देण्यासाठी आयुष्यभर राबणारा बाप नकळत पोराच्या हातात कोयताच देऊन जातो खुपदा. उसालासुद्धा डोळे असतात. पण उसाची कृपादृष्टी आमच्यावर का होत नाही काय माहित ? एकतर आमच्या हाताला योग्य दाम द्या नाहीतर आमच्या हातातला हा कोयता तरी कायमचा काढून घ्या. तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत म्हणून लिहीलय. उस गोड असतोच. उसतोड कामगाराचे शब्दही गोड मानून घ्या.

तुमचाच

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *