प्रिय,

June 10, 2020

लेखन

arvind jagapat patra

खरंतर डोळयांचं काम बघायचं असतं. पण आज तुमच्याशी बोलावं वाटलं. लिहावं वाटलं. आपण कुणाचे तरी डोळे आहोत हे जाम भारी वाटतं.

खरंतर डोळयांचं काम बघायचं असतं. पण आज तुमच्याशी बोलावं वाटलं. लिहावं वाटलं. आपण कुणाचे तरी डोळे आहोत हे जाम भारी वाटतं. अर्थात जर त्या माणसाची नजर चांगली असेल तर. नाहीतर आम्हाला काय काय पहावं लागतं. खरंतर डोळेच फक्त असे असतात जे जन्मल्यापासून सारखेच असतात. डोळ्यांमध्ये वाढ होत नाही. का? कदाचित वाढ माणसाच्या दृष्टीमध्ये व्हावी अशी अपेक्षा असेल. साथ पसरली की डोळे येतात. पण चांगली दृष्टी येण्यासाठी साथीचा फायदा होत नाही. त्यासाठी स्वतःच चांगलं असावं लागतं. नाही का?

मला नेहमी प्रश्न पडतो. आम्ही डोळे एवढे नाजूक पण तुम्ही माणसं किती हिंसक बनवता आम्हाला. डोळा मारला म्हणतात चक्क. डोळा झाकला तर म्हणे मारला. अजून काय म्हणतात नजरेने घायाळ केलं. बाप रे! आधीच तुम्ही लोकांनी डोळे हे जुलमी गडे असं ठरवून टाकलेलंच आहे. ते हिंदीवाले तर अजून डेंजर. काय तर म्हणे अखियोंसे गोली मारे.

आणखी काय तर नजरों के तीर चलाये. बाप रे! डोळ्यांना केवढं बदनाम केलंय तुम्ही लोकांनी. डोळ्यात साधा धुळीचा कणसुद्धा सहन होत नाही आम्हाला. लगेच अश्रूंनी डोळे स्वच्छ करतो आम्ही. पण तुम्हा माणसांनी चालवलेली ही जी चिखलफेक आहे, तिचं काय करणार? खरंतर जे मनात असतं ते बऱ्याच लोकांच्या डोळ्यात दिसतं. मनातलं ओळखायची कला असली की डोळ्यातलं वाचायला अवघड जात नाही. पण आजकाल डोळ्यांपेक्षा चष्मेच जास्त दिसतात. तरी नशीब एखाद्याच्या मनातलं ओळखायला चष्म्याच्या नंबरचा अडथळा येत नाही अजून. डोळ्यातले भाव वाचायला लेन्सची गरज पडत नाही. तरीही नजरेतलं वाचणं कमी झालंय हे नक्की. नाहीतर चुंबन सुद्धा मेसेज मध्ये पाठवायची वेळ आली नसती माणसावर. असो.

खरंतर कांदा चिरताना सुद्धा डोळ्यात पाणी येतं. वेदना झाली तरी डोळे पाणावतात. म्हणून माणसांना अश्रुची किंमत म्हणावी तेवढी कळली नसावी. नाहीतर अश्रू ही या जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. एवढी नितळ, पारदर्शी गोष्ट कुठे आहे दुसरी? मौल्यवान हिरे बघून माणसं स्वार्थी होतात. स्त्रीचं सौंदर्य बघून घायाळ होतात. पण अश्रू बघून बहुतेक माणसं भाऊक होतात. माणूस होतात. अश्रू एवढी ताकद शस्त्रात पण नसते.

तरीही माणसांना अश्रुची किंमत कळलेली नाही. कुणी भेटल्या भेटल्या आनंदात आपल्या गळ्यात पडून रडावं, आपल्याला निरोप देताना, झाडाच्या पानावर अडकलेल्या दवबिंदूसारखा कुणाच्या तरी डोळ्यात एक थेंब यावा, बाळाच्या खोड्या बघून हसता हसता आईच्या डोळ्यात पाणी यावं, आयुष्यभर नालायक समजलेल्या मुलाच्या समजूतदारपणाने बापाने हळूच डोळे पुसावेत. हे सगळे अश्रू किती महत्वाचे आहेत. तुम्ही एकवेळ पडलात तरी तुम्हाला नंतर आठवत नाही. पण तुम्ही कधी रडलात तर ते तुम्हाला कायम आठवतं. अश्रू सहजा सहजी विसरता येत नाहीत. आता तुम्ही म्हणाल काही लोक नेहमीच रडत असतात. त्यांना काय आठवणार? अहो हे तर नक्की आठवतं ना की हा माणूस रडकाच आहे. अश्रूंबद्दल एवढ सांगण्याचं कारण एकच. डोळ्याचं आणि मनाचं खूप जपलेलं सिक्रेट असतं ते. आज आठवायचं कारण एवढच की अश्रू दाटून आलेत.

डोळ्यात अश्रू दाटून आलेत. कारण या जगात असे खूप डोळे आहेत ज्यांनी हे जग सुंदर आहे हे फक्त ऐकलंय. पाहिलं नाही. या जगात असे खूप डोळे आहेत ज्यांनी आपल्याला जन्म देणारी आई पाहिलेली नाही. या जगात असे खूप डोळे आहेत ज्यांनी आपला स्वतःचा चेहरा सुद्धा पाहिलेला नाही. ज्यांनी चंद्र आणि सूर्य पाहिलेला नाही. ज्यांना भरून आलेलं आभाळ काय असतं माहित नाही. ज्यांनी साठवून घेतलाय सुगंध मन भरून पण फुल पाहिलं नाही. एवढच नाही तर माणूस कसा असतो हे सुद्धा त्यांनी पाहिलं नाही. कारण काय तर ते पाहू शकत नाहीत. त्यांना फक्त अंदाज करावा लागतो की माणूस नावाचा प्राणी असा असेल. विचार करा काय अंदाज करत असतील ते? स्वतःचं आयुष्य संपल्यावर सरणावर डोळे जाळून टाकणारा, कबरीत डोळे पुरून टाकणारा माणूस किती क्रूर दिसत असेल त्यांना? माणूस डोळे दान करू शकतो आणी कुणाला तरी आपली नजर देऊ शकतो. अगदी सहज.

पण माणसं property वाटतात काळजीपूर्वक. संपत्ती वाटतात. पण फार कमी लोकांना वाटतं की आपली नजर पण वाटली पाहिजे. आपली दृष्टी पण जगाला दिली पाहिजे. लोकांच्या मनात खूप काळ जिवंत राहण्यासाठी लोक लाखो रुपये खर्च करतात. पुतळे बनवतात. फोटो काढतात. पण खरंतर आपले डोळे कुणाला तरी दिले तरी आपण जिवंत राहू शकतो. कुणाच्या तरी नजरेत. कुणाच्या तरी खूप जवळ. आपले वारस आपल्या डोळ्यासमोरच त्यांच्या त्यांच्या पद्धतीने जग बघू लागतात. जगू लागतात. पण या जगात कुणी तरी असलं पाहिजे जे आपल्या नजरेने जग बघेल. हे जग सोडून गेल्यानंतर आपण कुणाच्या किती आठवणीत राहतो कुणी सांगू शकत नाही.

पण चोवीस तास कुणाच्या तरी नजरेत राहू शकतो हे आपल्याला माहित आहे. विज्ञानाने ते सोपं केलंय. आजवर या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. पण आता वेळ आलीय की फक्त लक्ष नाही, नजर दिली पाहिजे. आपले डोळे नक्कीच कुणाला तरी दिले पाहिजेत. देवापुढे दिवा लावताना काहीतरी पुण्य केल्याची भावना असते प्रत्येकाच्या मनात. मग एखाद्याच्या जीवनात डोळे देऊन प्रकाश देता आला तर किती मोठं पुण्य होईल. ही ज्योत पेटवायला हवी. आपल्यापासून सुरुवात करायला हवी. माणूस गेल्यावर थोडे दिवस आठवण म्हणून घरात लावलेल्या दिव्या पेक्षा कुणाच्यातरी डोळ्यातला कायमचा प्रकाश होणं जास्त चांगलं. नाही का?

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *