सावधान! सावधान!

लेखन

arvind jagapat patra

मराठी माणूस राजकारण निवडणुकी पुरते ठेवत नाही. ते चोवीस तास जगू लागतो. राजकारण हाच कायम उद्योग होऊन बसल्यावर माणसं उद्योगधंद्यात मोठी कशी होणार?

मराठी माणसांचा महाराष्ट्र. हिमालयाच्या मदतीला धावून जाणारा सह्याद्री म्हणून पाठ थोपटून घेणारे आपण. पण आपल्या राज्यात वीज, मोबाईल, अन्नधान्याची दुकानं यासारख्या व्यवसायात मराठी माणूस औषधाला नसेल तर हे कशाचं लक्षण आहे? मराठी माणूस व्यवसायात मागे का आहे यावर फक्त चर्चाच होतात. कृती होत नाही. अगदी अगदी छोट्या गावात सचोटीने व्यवसाय करणारे व्यापारी अमराठी आहेत. त्यांची एकी आहे. एकमेकांना धरून राहण्याची वृत्ती आहे. आपल्या लोकांना भांडवल पुरवण्याची तयारी आहे. साधा भंगार सामानाचा व्यापार बघा, लाकडांच्या वखारी बघा, देशी दारूचा व्यवसाय बघा ठराविक नावं दिसतात वर्षानुवर्ष. मोठमोठ्या बिल्डर्सची नावं बघा. मुंबईतल्या प्रमुख पन्नास उद्योगपतींची यादी बघा. देश आपला आहे. अनेक जाती धर्माचे लोक एकत्र राहतात. मोठे होतात. व्हायलाच हवेत. पण मराठी माणूस या सगळ्यात कुठे आहे ?

मराठी माणूस उद्योग धंद्यात मागे आहे याला इतर धर्माचे, राज्याचे लोक कारण आहेत असं अजिबात नाही. स्वतःच्या राज्यात इतर लोक प्रगती करू देत नाहीत असं म्हणणं म्हणजे वेडेपणा होईल. मराठी माणूस स्वतःच्या अधोगतीला कारण आहे. एकतर आपल्या मुख्यमंत्र्याची निवड कायम दिल्लीतून होत आली. त्यामुळे दिल्लीच्या कलाने कारभार करणे चालू राहिले. आपल्या नेत्यांच्या तक्रारी करण्यासाठी कायम मराठी नेते दिल्लीत असायचे. एकदा एक माजी पंतप्रधान महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करायला आले होते म्हणे. पण स्थानिक नेत्यांनी त्यांना बदामाचा शिरा दिला खायला. एकदम भारी बडदास्त ठेवली. पंतप्रधान हैराण झाले. त्यांना प्रश्न पडला इथे कसला आलाय दुष्काळ? हे लांगुलचालन वरचेवर वाढत गेलं. आपले उद्योगधंदे शेजारच्या राज्यात गेले तरी आपण शब्द काढला नाही. मराठी माणूस राजकारण निवडणुकी पुरते ठेवत नाही. ते चोवीस तास जगू लागतो. राजकारण हाच कायम उद्योग होऊन बसल्यावर माणसं उद्योगधंद्यात मोठी कशी होणार?

शिवाजी महाराजांनी अनेक दूरदर्शी निर्णय घेतले होते. त्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी वतनदार वठणीवर आणले होते. त्यांना मनमानी करायची परवानगी नव्हती. पण नंतर ती पद्धत बंद झाली. गेल्या कित्येक वर्षात राज्यातल्या नेतृत्वाने प्रत्येक तालुका कुणाला तरी आंदण दिलाय. त्यामुळे राजकीय वतनदारी सुरु झाली. घराणेशाही मजबूत झाली. इंदिरा गांधींनी संस्थानाचे अधिकार काढून घेतले. पण राजकीय संस्थानांची मक्तेदारी सुरु झाली. जी जास्त भयंकर आहे. पक्ष, विचारधारा यापेक्षा कित्येक तालुके, जिल्हे एखाद्या राजकीय घराण्याचे गुलाम बनले. हे सत्ता असलेल्या कुठल्याही पक्षात घुसून बसणारे नवे संस्थानिक इंग्रजांपेक्षा भयंकर जुलुमी बनले. आजही कित्येक मतदारसंघात ठराविक नेत्यांचे फोटो प्रत्येक ठिकाणी लागलेले दिसतात. त्यांच्या गाड्या आल्यावर बाकी लोकांनी गाड्या बाजूला घ्यायच्या असतात. त्यांच्यापेक्षा महागडी गाडी कुणी घ्यायची नसते. त्यांच्यापेक्षा मोठं घर बांधायचं नसतं. अशा नेत्यांच्या मतदाराने मोठा उद्योग उभा करावा ही अपेक्षा आपण ठेवणार कशी? अशी माणसं सामान्य माणसाना मोजेनाशी होतात. गुंड मवाली आणि खंडणीखोर लोक भोवती गोळा करतात. मग मतदारसंघातल्या सगळ्या उद्योजकांकडून हप्ते वसुली सुरु होते. अशावेळी मराठी माणसाची मानसिकता बनते की कुणाच्या डोळ्यात यायचं नाही. आपण भले आपलं काम भलं. मग गुंतवणूक नको. मोठे उद्योग नको. गाड्या नको. रिस्क नको. पर्यायाने कुठेतरी नौकरी केलेली बरी. कायम हेच चालू राहिलं.

एका मोठ्या मराठी उद्योगपतीने मुलाखतीत सांगितलं होतं, त्याच्या कंपनीत कामाला असणाऱ्या इंजिनियरचे लग्न जमत होते. कारण त्यांना नौकरी होती. पण कम्पनीचा मालक असलेल्या त्या उद्योगपतीला कुणी मुलगी द्यायला तयार नव्हतं. कारण काय तर त्याला पर्मनंट नौकरी नाही. कंपनी असली म्हणून काय झालं? ती बुडाली तर उद्या? आता काय बोलणार? मराठी माणसाला उद्योगधंद्याला प्रोत्साहन देणारी एखादी यंत्रणा सुद्धा एवढ्या वर्षात उभी होऊ शकली नाही. बहुतेकवेळा दिल्लीने लादलेल्या माणसांना आपला नेता म्हणायची वेळ आली. दक्षिणेतल्या राज्यात अशी प्रथा नव्हती. अजूनही फारशी नाही. कारण भाषा, प्रांत याबाबतीत असलेली एकी. देशासाठी एकत्र येताना पहिली परीक्षा असते तुम्ही तुमच्या तुमच्यात एकी दाखवू शकता का? आपण आपसात एकत्र यायला नेहमी कमी पडतो. एकत्र येणे म्हणजे इतर प्रांतांचा द्वेष करणे नाही. एकी असणे म्हणजे इतर प्रांतांच्या लोकांना विरोध करणे नाही. एकी असली की आपल्या समस्या कळतात. एकीकडे लाखो परप्रांतीयांना रोजगार देणाऱ्या राज्यात कुपोषण आहे याच भानही कित्येकांना नाही. फडणवीस का ठाकरे या प्रश्नावर भांडणारे आपण, पण आपल्याला लाखो बेरोजगार तरुणांची, लाखो बेरोजगार शिक्षकांची, लाखो कंत्राटी कर्मचाऱ्यांची, लाखो स्पर्धा परीक्षेची वाट पाहणाऱ्या तरुणांची काहीच पडलेली नाही. त्यांच्यासाठी कुणी भांडायचं? त्यासाठी एकी पाहिजे? प्रश्न ठाकरे की फडणवीस हा नसला पाहिजे. प्रश्न नौकरी का उद्योगधंदा हा असला पाहिजे. आणि दोन्हीपैकी एकतरी उत्तर मिळालं पाहिजे. हे विचार कायम आपल्या सगळ्यांच्या डोक्यात येत असतात. अशाच विचारातून झेंडा चित्रपटासाठी लिहिलेलं सावधान हे गीत सुचलं

काळोखाच्या साम्राज्याला तिट लावून भागणार नाही
दृष्ट लागली परक्यांची तरीही का तू जागणार नाही
उठ मराठ्या क्षितीज बघ तुला साद देत आहे
सावधान सावधान वणवा पेट घेत आहे
मरहट्ट्याच्या नशिबी जरी दुहीची मेख आहे
फितुरांना सांग ओरडून मी शिवबाचा लेक आहे
फक्त एक ठिणगी हवी जी बस तुझ्यात आहे
सावधान सावधान वणवा पेट घेत आहे

 

Photo © Sharad Patil

संगमनेरमधल्या सायखिंडीचे सिताराम राऊत. वटसावित्री पौर्णिमेला त्यांनी शंभर जोडप्यांच्या हाताने शंभर वड लावले.

‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’या कथासंग्रहाची आठवी आवृत्ती आलीय. वाचकांचे मनापासून आभार. विशेषत: पत्र, मेल लिहून प्रतिक्रिया देणारी तरूण पिढी. तुमचे शब्द बळ देतात. तरूण वाचक एवढं भारी लिहितात की खुपदा वाटतं त्यांच्यासारखं थेट मनातून लिहिता यायला पाहिजे.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *