स्वच्छ भारतासाठी..

July 3, 2020

लेखन

arvind jagapat patra

सार्वजनिक ठिकाणं आपल्या देशाचा भाग नसतात का?

भारत लवकरच महासत्ता होणार असं स्वप्न आपण पाहतो. पण ज्या देशातल्या ठराविक लोकांना पिढ्यानपिढ्या जीव धोक्यात घालून गटार साफ करावे लागतात, आजही आधुनिक सोई , यंत्र दिल्या जात नाहीत तो देश खरंच एवढ्या लवकर महासत्ता होणार आहे?

घरातलं शौचालय स्वच्छ करण्याची लाज वाटणाऱ्या लोकांनी सार्वजनिक शौचालयाचे काय हाल केले असतील याचा अंदाज आपण बांधू शकतो. भारतातल्या कुठल्याही सार्वजनिक शौचालयात जाऊन बघा. दारूच्या बाटल्या. गुटखा आणि पान खाऊन थुकल्याने रंगलेल्या भिंती घाणेरड्या गोष्टी लिहिलेले दरवाजे हेच चित्र दिसतं.

हे बघून आपल्याला तिथे स्वच्छता करावी असा विचार येतो का? उलट असं वाटतं हि घाण करणाऱ्याला थोबाडीत ठेवून द्यावी. पण या देशात ही सार्वजनिक शौचालय स्वच्छ करणारे हजारो कामगार आहेतजे शांतपणे लोकांची सगळी विकृती सहन करत आपलं काम करत असतात. का? त्यांनी हे का करायचं? काही लोकांनी हि घाण का साफ करायची

असे प्रश्न आपल्यासारख्यांना पडतात. पण जे लोक हे काम करतात त्यांच्या पुढे प्रश्न असतो पोटाचा. आपल्या पंतप्रधानांनी स्वच्छ भारत सारखी महत्वाची मोहीम सुरु केली. त्यात फोटो पुरता झाड हातात घेऊन स्वच्छतेचा संदेश देणारे अनेक लोक आपल्याला खूप थोर वाटतात, पण रोज लोकांची घाण साफ करणारे लोक मात्र आजही अपमानास्पद जीवन जगतात. पोटासाठी लोक हे काम करतात. पण हे काम केल्यावर त्यांना जेवण जातं? आपल्याला हा प्रश्नही पडतं नाही.

सार्वजनिक बस मध्ये पण प्रवास करायला नको वाटतं लोकांना. सार्वजनिक दवाखान्यात पण स्वच्छता नसते म्हणून जायचं टाळतात लोक. सार्वजनिक ठिकाणं आपल्या देशाचा भाग नसतात का? 

मग तिथे ठरवून घाण करण्याची मानसिकता का असते लोकांची? आपल्यात गाडगेबाबा नावाचे स्वच्छतेचा कृतीतून संदेश देणारे संदेश देणारे संत होऊन गेले हे विसरलो आपण. निदान गाडगेबाबाना संत तरी म्हणतो आपण, पण स्वच्छतेचं एवढ मोठ काम करणाऱ्या लोकांना कशी वागणूक देतो आपण? वेळेवर पाणी सुद्धा देत नाही कुणी. त्यांचे आभार मानायची तर आजवर गरज वाटली नाही आपल्याला.जनता आणि सरकार दोघेही नकळत सावत्र वागणूक देतात

एक शेर आहे 

क्या फर्क पड़ता है सरकार पांडवों की हो या कौरवों की
जनता तो द्रौपदी होती है
सरकार कौरवों की हो तो उसका वस्त्रहरण किया जाता है
सरकार पांडवों की हो तो उसे दांवपर लगाया जाता है. 

सफाई कामासारखी महत्वाची कामं करणाऱ्या लोकांची अशी अवस्था आहे. त्यांच्यासाठी या देशातल्या लोकांना शौचालयात पुरेसं पाणी टाकण्याची बुद्धी होवो. भिंतीवर लिहिण्याची, थुंकण्याची अक्कल येवो ही प्रार्थना. सगळ्या कर्तृत्ववान लोकांना आपण तुमचं काम असच धडाडीने चालू राहो अशा शुभेच्छा देतो. पण या लोकांचं काम चालू राहणे सोडा, दुसऱ्या कुणावरच हे काम करण्याची वेळ येवो. विज्ञानाला या लोकांचा शोध लागो

विज्ञानाचा यांच्या आरोग्यासाठी वापर होवो. आपण एक करू शकतो. सार्वजनिक ठिकाणी जास्तीत जास्त स्वच्छता पाळायला सगळ्यांनी सुरुवात करणे आपल्या हाती आहे. कित्येक देशात सफाईचं काम करणाऱ्या लोकांना कमीपणा वाटत नाही. कारण तेवढ्या आधुनिक सुविधा दिल्या जातात. मान दिला जातो. ही बुद्धी आपल्यालाही होवो.
कुठल्याही संकटात, रोगराईत सफाई कर्मचारी राबत राहतात. त्यांच्या जिद्दीला, संघर्षाला सलाम !

 

Photo © Sharad Patil

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *