तरुणाई काय करतेय? .. (पूर्वार्ध )

January 25, 2020

लेखन

arvind jagapat patra

सांगलीत पुराने वेढा घातला होता.

सांगलीत पुराने वेढा घातला होता. एका मित्राने फेसबुकवर लिहिलं. बोटी खूप कमी आहेत. दहा बारा तरुणांनी त्याला उत्तर दिलं. काय? एक म्हणाला खोटं बोलू नका. खूप बोटी आहेत. एक म्हणाला जीव जायची वेळ आली तरी सरकारला विरोध काही सुटत नाही तुमचा. उत्तर देणारे सगळे तरुण होते. एवढ्या तातडीने प्रतिक्रिया देत होते म्हणजे कुठल्या बचावकार्यात नक्कीच नसतील. 

                       परळीला काही तरुण भेटले. चहा पिता पिता सांगत होते परळीला वीट भट्ट्याचा विळखा पडलाय. परळीची वीट प्रसिध्द आहे. कारण काय तर तिथे विद्युत प्रकल्पाची राख भरपूर आहे. परळीत प्रदूषणच आहे ते. ती राख वापरून वीट तयार केली जाते. तिला मागणी आहे. म्हणून परळीत दोनशेहून जास्त वीटभट्टी सुरु आहेत. आता अशा वातावरणात कशी शुध्द राहणार हवा? सगळं प्रदूषण. मी त्यांना म्हणालो तुम्ही याबद्दल लिहित का नाही? बोलत का नाही? एकमेकांकडे बघून हसू लागले सगळे. एक जण म्हणाला आम्ही लिहून काय होणार? आणि आमचं कोण ऐकणार? पण सगळेच तरुण असे नाहीत. तिथेही बोलणारे खूप आहेत. पण राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या समर्थनासाठी बोलणारे खूप झालेत. आपल्या कामाचं बोलणारे कमी आहेत. पण आहेत.

                     फेसबुकवर जमलेली काही तरुण मंडळी. एकत्र आली. पैसे गोळा केले. शेतकर्यांना भेटू लागले. पैसे देत नाहीत. खत घेऊन देतात. बियाणं देतात. अडचणी सोडवायला मदत करतात. असाच एक तरुण आहे विनायक हेगाना. मुळचा सांगलीचा. उस्मानाबादला राहतो. काम काय? शेतकर्यांना भेटायचं. त्यांचे प्रश्न समजून घ्यायचे. शेतकरी आत्महत्या थांबल्या पाहिजेत म्हणून काम करतोय. पैसे नसतात. फिरत असतो एकटाच. त्याला शेतकऱ्यासाठी कॉल सेंटर सुरु करायचंय. नगरला एक अमर कळमकर नावाचा तरुण आहे. लग्नात खर्च केला नाही. लग्नाच्या खर्चात आणि आहेरात पण पुस्तकं घेतली. स्पर्धा परीक्षेचं वाचनालय आणि अभ्यासिका सुरु केली. हेच मुलं आषाढी एकादशी झाली की एक दिवसानंतर पंढरपूरला जातात. पंचवीस तीस जण. चंद्रभागेत जमेल तेवढी स्वच्छता करतात. परत येतात. तीच त्यांची वारी. 

बीडला धड रस्ते नाहीत शहरात. पाण्याची बोंब. पण प्रत्येक पक्षाचा मोर्चा प्रचंड गर्दीत निघतो. तरुणांची गर्दी. सगळ्यांना सत्ता मिळाली आणि सगळ्यांनी मिळून काहीच केलं नाही. पण प्रत्येक नेत्याच्या मागे तरुणांची फौज आहे. कधी कधी बीडमध्ये उद्योगधंदे न येण्याचं कारण हेच वाटतं. ही सगळी पोरं कामाला लागली तर आपल्यामागे कोण फिरणार? हा तर विचार करत नसतील नेते? खूप तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा तरुण पोरं पब्जी आणि लुडो खेळत बसलेले दिसतात. आधी कळायचं नाही दोन चार जण गोळा होऊन मान खाली घालून का बसलेले असतात? सुतक पडल्यासारखे. मग जवळ गेल्यावर लक्षात येतं लुडो खेळताहेत. हेच चित्र पुण्या मुंबईत खूप भयंकर आहे. पब्जी सारखे खेळ खेळतात पोरं. प्रचंड घाणेरड्या शिव्या आणि मारधाडीची भाषा. आई बापांनी जर हे गेम खेळताना आपल्या पोरांचं बोलणं ऐकलं तर चक्कर येऊन पडतील. पुण्यात एका चहावाल्याकडे एक दृश्य पाहिलं. दुकानाच्या मागे एक तरुण शांत बसला होता. अचानक मोबाईल काढून वेड्यासारखा हावभाव करायला लागला. आक्रमक झाला. पाच सात मिनिटात पुन्हा मोबाईल बंद करून मक्ख बसला. त्याचा तो पाच सात मिनिटातला उत्साह फक्त ऑनलाईन गेम पुरता होता. सिनेमात दहशतवादी दाखवतात तसा संशयास्पद वाटला तेवढ्या वेळात. न राहवून बोललो. पदवीधर होता. नौकरी नव्हती. कुठल्यातरी कंपनीत मार्केटिंगला होता. लोक दिवसभर अतिशय हाड हूड करून वागवतात म्हणाला. मग पाच सात मिनिट गेम खेळून सगळी भडास काढतो. त्याला व्यक्त व्हायला तेवढीच जागा होती.

पुण्यातल्या एका एटीएमला एक तरुण सुरक्षा रक्षक आहे. बघून थोडा हैराण झालो. सहसा वय झालेली माणसं दिसायची. तो मुलगा वाचत बसला होता. पुस्तक बघितलं. विश्वास बसणार नाही पण रामचंद्र गुहा यांचं पुस्तक होतं. त्याच्याशी बोललो. मराठवाड्यातून आला होता. स्पर्धा परीक्षेसाठी. बापाने थोडं शेत विकून दोन लाख रुपये त्याच्या एमपीएससी साठी ठेवले होते. दोन वर्षात उडाले. मेन्सला लटकत राहिला. अजूनही इच्छा आहे. गावी जायचं नाही परत. प्रयत्न करतोय. पण आता अवघड आहे म्हणतो. नौकरी करून शक्य नाही. आणि चांगली नौकरी मिळणार कशी? एटीएमबाहेर असतो. रूम करून रहायचा तेंव्हा आपली रूम एसी असावी असं स्वप्न होतं. आता एटीएम एसी आहे. पण हा बाहेर बसतो. एसी सहन होत नाही म्हणतो. पैसा कमवायचाय. सारखा एटीएमचा आवाज. बाहेर पडणाऱ्या नोटा. सतत पैसा कमवायची प्रेरणा मिळते म्हणतो त्या आवाजाने. फक्त पैसा कसा कमवायचा हे अजून ठरलं नाही. खरतर ठरलं तरी ते होणार कसं? चांगलं काम तर मिळायला पाहिजे. 

आयटी मधला एक तरुण. नौकरीला कन्टाळलाय. त्याचं काम फिरण्याचं. पंचवीस  वर्ष वय. पंधरा वीस देश फिरून झालेत. सारखा बाहेर. बायको सोडून गेलीय. कारण काय तर ह्याने तिला मोबाईलचा पासवर्ड सांगायला नकार दिला. मग नौकरीचा राजीनामा दिला. कारण सारखा शेतीत कुणी कोटी कमवले, कुणी शेतकरी परदेशात निर्यात करतोय अशा गोष्टी वाचायचा. सोशल मिडीयावर. एक दिवस दोन एक्कर शेती विकत घेतली. दोन तीन वर्ष कष्ट केले. लक्षात आलं की शेतीत काही पैसे मिळणार नाहीत. आता शेती विकायची म्हणतोय. पण ज्या भावात घेतली तो भाव मिळत नाही. उद्योग करायचाय नवीन. पण पुण्यातला flat ज्या भावात घेतला होता तो पण विकला जात नाही. उद्योग करणारे मित्र आहेत. त्यांच्यात बसलेला असतो. ते सांगतात धंदा डाऊन आहे. हा तेवढच समाधान मानतो. सगळेच धंदा डाऊन आहे म्हणतात हे खुपदा आशादायी असतं लोकांसाठी. आपण एकटेच चिंतेत नाही ही गोष्ट खूप लोकांसाठी चिंता घालवणारी असते.

                                     विदर्भातून आलेला एक तरुण लेखक आहे. जाहिरात एजन्सीत काम शोधत होता. छोट्या मोठ्या जाहिरात संस्थेत काम केलं. पण त्यात जगणं अवघड होतं. तसा लिहितो उत्तम. फेसबुकवर खूप मित्र होते. एका मित्राने सांगितलं सरकारच्या योजना लिहायच्या आहेत. लोकांपर्यंत पोचवायच्या आहेत. काम करशील का? हा लिहू लागला. काम खूप बोअरिंग होतं. पण पुण्यात जगायचं होतं. लिहित राहिला. गेली दोन वर्ष अशीच कामं करतोय. पैसे मिळतात. आधी गावच्या समस्या, वऱ्हाडी ठसक्यात गावच्या गोष्टी सांगायचा. मजा यायची. वाचायला. बोलायला. अशात भेटला तर एवढा रुक्ष वाटला. प्रवक्त्यासारखी भाषा झालीय. पण बिर्याणीचं बिल देताना त्याचा चेहरा उजळून निघाला होता. त्याने वेटरला दहा रुपये दिले आणि बचका भरून सोफ उचलली वाटीतली. बाहेर आल्यावर थुंकून टाकली. फालतू आहे म्हणून. खूप खटकलं ते. मिळेल ती गोष्ट उचलायची सवय चांगली नसते. आपल्याला पण पारख असली पाहिजे.

उस्मानाबादचा एक पोरगा. कॉलेजला असल्यापासून वर्गात कमी आणि सायबर कॅफेमध्ये जास्त असायचा. फेसबुक पेज काढलेत. टाईमपास म्हणून. हळू हळू लोकांचे मेसेज आले. आमची पोस्ट तुमच्या पेजवर टाकता का? पैसे देतो. अशा गोष्टी वाढत गेल्या. आज त्याचे पाच पाच लाख लाईक असलेले सात आठ पेज आहेत. लोक पैसे देतात त्यांची जाहिरात करायला. मेसेज करून. त्याने घरच्यांना बाईक मागितली होती. घरचे म्हणाले शिकत नाहीस काही नाही. नुसता मोबाईल घेऊन बसतोस. तुला कशाला बाईक पाहिजे? खूप मनाला लागलं होतं त्याच्या. चार वर्षापूर्वी त्याने नवीकोरी बाईक घेतली. फेसबुक पेजवर मिळालेल्या कमाईत. आता दुकान सुरु केलय. लोकांच्या जाहिराती करण्यापेक्षा आपल्या पेजवरून आपल्या धंद्याची जाहिरात करू असं ठरवलं. छान चाललय त्याचं. फेसबुकवर याची त्याची बाजू घेऊन वाद घालणारे, वेळ घालवणारे लोक बघितले की उस्मानाबादचा हा तरुण आठवतो. हसत असतो नेहमी. सारखा मोदींचे फोटो टाकतो. मोदी खूप चालतात म्हणतो. चार पाच त्यांच्या पोस्ट टाकल्या की एखादी जाहिरात टाकायची. हुरळल्या मेंढ्या म्हणतो तो फेसबुकवरच्या लाईक करत सुटणाऱ्या लोकांना. हे ग्राहक असतात त्याचे. मी खुपदा त्याची नेमकी विचारसरणी शोधायचा प्रयत्न केला. पण त्याला कुणीच आवडत नाही. त्याला त्याचे पेज आवडतात. ज्याच्या फोटोला, जोकला लाईक मिळतात तो त्याच्यासाठी चांगला माणूस. त्याला सोशल मीडियात कमाई सापडलीय. 

                एक मुलगी सारखी सोशल मिडीयावर अश्लील, बिनधास्त पोस्ट टाकायची. tweeter, फेसबुक, इन्स्टा सगळीकडे. कुठे दबल्या आवाजात तर कुठे जाहीर तिच्याबद्दल चर्चा असायची. चार पाच महिन्यात पोरीने हवा केली सोशल मिडीयावर. हजारो लाईक नाहीतर टीका. इनबॉक्स नक्कीच फुल असणार. चार पाच महिन्यात अचानक तिने कपडे विकायला सुरुवात केली ऑनलाईन. जुन्या सगळ्या पोस्ट बंद. आता कामास काम. पब्लिक गंडलं होतं. पोरीने खूप हुशारीने मार्केट बनवलं होतं कपड्याच्या व्यापारासाठी. 

संगमनेरमधल्या सायखिंडीचे सिताराम राऊत. वटसावित्री पौर्णिमेला त्यांनी शंभर जोडप्यांच्या हाताने शंभर वड लावले.

‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’या कथासंग्रहाची आठवी आवृत्ती आलीय. वाचकांचे मनापासून आभार. विशेषत: पत्र, मेल लिहून प्रतिक्रिया देणारी तरूण पिढी. तुमचे शब्द बळ देतात. तरूण वाचक एवढं भारी लिहितात की खुपदा वाटतं त्यांच्यासारखं थेट मनातून लिहिता यायला पाहिजे.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *