टच वूड!

June 3, 2020

लेखन

arvind jagapat patra

सहज बोलता बोलता मराठी माणसंही एखाद्या लाकडी वस्तूला हात लावून टच वूड म्हणतात.

सहज बोलता बोलता मराठी माणसंही एखाद्या लाकडी वस्तूला हात लावून टच वूड म्हणतात. खुपदा लाकूड सापडलं नाही तर काचेला किंवा लोखंडाला हात लावून सुद्धा टच वूड म्हणतात लोक. खरतर ही काही आपली पद्धत नाही. पण जगाची रीत आपण स्वीकारली. म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी. त्यात काही आपल्याला आक्षेप नाही. आणि लाकडाचं महत्व सांगणारीच गोष्ट आहे. पण ही झाली जगाची रीत. आपली गोष्ट वेगळी आहे. आपण बोलता बोलता देव दगडाचा करून टाकला. दगडात देव आहे हे समजून चालू लागलो. पण खरी गोष्ट ही आहे की आपला देव निसर्ग आहे. आपण सगळ्यात जास्त मानतो ते सूर्याला. सकाळी सकाळी सूर्याकडे पाहून हात जोडणारी असंख्य माणसं आजही आहेत. नदीला देव मानणारी माणसं आपण पूर्वीपासून आहोत. तसाच आपला देव आहे झाड. आपण नको तिथे देव शोधतो. मुळात आपण हेच समजून घेत नाही की देवाचे आणि आपले नाते काय आहे? फक्त मागायचे? नाही. आपली भक्ती, आपली सेवा पण अपेक्षित आहेच ना. मग ती कुठल्यातरी देवळाच्या दारात बसून राहणे, फेऱ्या मारत राहणे ही भक्ती आहे का? दानपेटीत सुट्टे पैसे टाकणे ही भक्ती आहे का?

                   भक्तीचा हा शॉर्टकट आहे. आणि तो आला कारण आपण खरे देव विसरत चाललो. नदी देवीचं रूप आहे म्हणायचं आणि त्यात सांडपाणी, केमिकल मिसळू द्यायचं ही कुठली भक्ती आहे? डोंगर फोडून टाकायचे ही कुठली भक्ती आहे? आणि या गोष्टीना धार्मिक माणसं किती विरोध करतात? नारळ, हळद, कुंकू, सुपारी, बेल, आपटा असा कुठलाही प्रकार घ्या. झाड आहे. मुळात आपण झाडाचीच पूजा करणारी माणसं. देवळांकडे आपण कला म्हणून बघायला पाहिजे आणी निसर्गाकडे देव म्हणून. देवळांची निर्मिती माणसाने केलीय. दगडाचा देव माणसाने केलाय. ती माणसाची कलाकृती आहे. पण आपल्या संस्कृतीने, परंपरेने एवढच नाही तर आपल्या देवांनीही झाडांना नेहमी पवित्र मानलं. पूजा केली. कारण खरा देव आहे निसर्ग. नदी, समुद्र, जंगल, डोंगर. पण बारकाईने पाहिलं तर खऱ्या देवापासून आपण सगळेच किती लांब चाललोय. आपल्या देवळातल्या देवाला हात जोडून आपण आपली भक्ती सिध्द करतोय. पण तो वाचनालयाची तहान Whatsapp वर भागवण्यासारखा प्रकार आहे.

                   आपल्याला गौतम बुद्धाला बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली हे माहित असतं. आपल्याला बुद्ध आवडतो. आपण त्याला आपल्या भिंतीवर ठेवतो. पण स्वतः वृक्षाकडे जात नाही. महिनोन महिने उलटून जातात आपण एखाद्या झाडाला साधा हात लावत नाही. आपण वाचतो भगवान महावीरांच्या आयुष्यात पण झाडाचं तेवढच महत्व आहे. शंकराच्या आणि बेलाच्या गोष्टी आपण ऐकून असतो. तुळशीचं महत्व आपल्याला माहित असतं. तरी आपल्याला हा खरा देव लवकर ओळखू येत नाही. खरतर जगात आपला देव आपल्यावर प्रसन्न झालाय की नाही हे कळायची इच्छा असणारा माणूस झाड लावल्याशिवाय राहू शकत नाही. झाडाला फुल येणे, फळ येणे या सारखा आशीर्वाद दुसरा कुठला असू शकतो?

                   पारिजातकाची एक सुंदर गोष्ट आहे. नारदाने दिलेलं पारीजातकाचं फुल कृष्ण मोठ्या प्रेमाने रुक्मीणीला देतो. ही गोष्ट सत्यभामेला कळल्यावर ती खूप रागावते. रुक्मीणीला फूल दिलय तर मला पारिजातकाचं झाड हवं म्हणून हट्ट धरून बसते. ते झाड फक्त इंद्राकडे असतं. आणि पारिजातकाचे झाड दुसर्या कुणाला द्यायची इंद्राच्या बायकोची इच्छा नसते. त्या झाडासाठी कृष्ण आणी इंद्राच युध्द होतं. तुल्यबळ युद्धात कृष्ण इंद्राचा पराभव करतो आणि पारिजातकाचे झाड घेऊन येतो. आपल्या बायकोसाठी. देवांच्या प्रेमाची, परक्रमाची किंवा ज्ञानप्राप्तीची गोष्ट झाडाशी संबंधित आहे. या सगळ्या झाडाचं महत्व सांगणाऱ्या गोष्टी किती वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला सांगितल्या आहेत. पण आपण त्यातलं नेमकं झाडाचं महत्व समजून घ्यायला कमी पडतोय का? आपण एखाद्या देवाच्या फोटोला जेवढा वेळ देतो, मूर्तीला जेवढ पाणी देतो तेवढ झाडाला दिलय का? मूर्तीसाठी काहीच करू नका असा मुद्दा नाही. पण आपल्या देवांनाही प्रिय असलेल्या झाडाकडे आपण दुर्लक्ष करतोय. देवानी झाडासाठी युध्द केलेत. आपण थोडे कष्ट करायला हरकत नाही.

                   अॅडम आणि इव्हच्या गोष्टीत काय होतं? झाडाचं फळ खायला देवाने नकार दिलेला असतो. पण अॅडम आणी इव्ह फळापासून दूर राहू शकत नाहीत. जरी शाप असला तरी. कारण तिथूनच त्यांचं जग सुरु होणार असतं. शेवटी ते ज्ञानाचं झाड होतं. आत्मभानाची सुरुवात होती. टच वूड म्हणण्याएवढ आत्मभान आपल्याला आहे. पण गरज आहे ती झाड लावायला मातीत हात घालण्याची. आपलं असं एक झाड असलं पाहिजे. असं म्हणतात की घर आणि लग्न या गोष्टी कितीही प्रयत्न केला तरी वेळ आल्याशिवाय होत नाहीत. खरतर प्रयत्न केल्याशिवाय काहीच होत नाही. पण खूप कमी प्रयत्न करूनसुद्धा झाड लावता येतं. आपलं असं हक्काचं झाड उगवता येतं. चार माणसासाठी लाखो रुपये घालून, माहिनाभर हजारो लिटर पाणी देऊन घर बांधण्याएवढ झाड लावणं अवघड नाही. आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या सावलीत कुणी उभं राहू शकत नाही. किमान आपल्या झाडाच्या सावलीत उभं राहील. चला सावली पेरूया. म्हणजे खुपदा टच वूड म्हणताना लाकूड सापडत नाही अशी परिस्थिती येणार नाही. थेट झाडाला हात लावता येईल. टच वूड!

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *