ट्राफिक पत्र

October 1, 2018

लेखन

arvind jagapat patra

प्रिय तरुण मित्रा ,

प्रिय तरुण मित्रा ,

        या ट्राफिक पोलिसाचा नमस्कार!

रोज पावती लिहितो. आज पत्र लिहितोय. मला माहितीय तुझ्यासारखे अनेकजण मला शत्रूच समजतात. शाळेत आपल्याला शिस्त लावण्यासाठी आपले कान पकडणारा मास्तर सुद्धा आपल्याला शत्रूच वाटतो. नंतर आयुष्यात पायावर उभं राहिलो की त्यांच्याबद्दल आदर वाटू लागतो. त्यांचं बरोबर होतं हे लक्षात येतं. आमच्या बाबतीत असं काही होत नाही. खरंतर सिग्नल तोडून भरधाव वेगात जाताना पाय तोडून घेतलेली माणसं आठवण काढतात. थांबलो असतो तर बरं झालं असत म्हणतात. पण अशी आठवण आम्हाला नकोशी असते.           

  वाहनांचे आवाज, विनाकारण वाजणारे हॉर्न, गाडयांमध्ये उगाच मोठ्याने वाजणारी गाणी या सगळ्यांची आता एवढी सवय झालीय की काहीवेळ घरी शांतपणे बसलं तर आपल्याला वेड लागेल असं वाटायला लागतं. सिग्नलवर अर्धा मिनिट थांबला तरी तुम्ही किती अस्वस्थ होता. तुम्हाला सिग्नल खूप मोठा आहे, जास्त वेळ लावतो असं वाटून चिडचिड होते अर्ध्या मिनिटात. विचार करा आम्ही दिवसभर त्या सिग्नलपाशी उभे असतो. शहरातल्या प्रदुषणाचे आकडे वाचून घरातल्या घरात गुदमरल्यासारखं होतं लोकांना. आम्ही त्या धुळीत आणि धुरात उभे असतो दिवसभर. चोवीस तास तुमच्या गाड्यांचा धूर आमच्या नाकात शिरतो. पण आमच्याबद्दल एकदाही बरा विचार तुमच्या मनात शिरत नाही. आम्ही तुमच्यासाठी नक्की काय करतो हे बघायचं असेल तर आमच्या फुफ्फुसात डोकवून बघा. सगळा कार्बन दिसेल. ही आमची सगळ्यात मोठी कमाई असते ड्युटीवरची. असो. 

         मित्रा, कितीतरी वेळा मी गाडी अडवली आणि ती नेमकी कुठल्यातरी राजकीय नेत्याच्या नातेवाईकाची निघाली. या राजकारण्यांना एवढे नातेवाईक कसे असतात कळत नाही. आणि महागड्या कारमध्ये फिरणाऱ्या या राजकारण्यांचे जवळचे नातेवाईक बाईकवर कसे फिरतात हा पण प्रश्नच आहे. तर हे लोक आम्हाला धमक्या देतात, बदली करू म्हणतात. मी म्हणतो खूप वर्षं झाले साहेब बदली होत नाही. बघा ना जरा बदलीचं. मग आपोआप शांत होतात. एखाद्या स्त्रीची गाडी अडवली की तिला खूप मोठा अन्याय झाल्यासारखा वाटतो. आजूबाजूचे लोक सुद्धा असं बघतात की जणू काही आम्ही छेड काढतोय त्या स्त्रीची. तरुण पोरं रेसिंग करतात रस्त्यावर. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच गायब होतात. त्यांच्या गाडीचा नंबर सुद्धा बघू शकत नाही आम्ही. पण त्यांच्या आई बापांना तर माहित असतो ना. चूक फक्त त्या पोरांची नाही. आई बापांची पण आहे. प्रवासात टाईम पास म्हणून घेतलेला पेपर आपण सांभाळून ठेवत नाही. फेकून देतो रस्त्यावर. रस्त्यावर मोकाट सुटलेली ही पोरं सुद्धा अशीच टाईमपास म्हणून जन्माला घातलीत असं वाटतं. रस्त्यात वाहतुकीला अडथळा आणणारी, मोकाट जनावरं कोंडवाड्यात कोंडून ठेवतात. या मोकाट पोरांचं काय करणार? कितीतरी पोलिसांचा जीव गेलाय या सैतानांच्या भरधाव गाडीखाली.

               मित्रा, खूप राग येतो. मला सांग रागवायचं पण नाही का आम्ही? असं काय बोललो होतो मी तुला? फक्त लायसन्स देणार नाही म्हणालो अशी गाडी चालवली तर. तू थेट शिवीगाळ करायला लागलास. मी पण संतापलो होतो. पण तू थेट हल्लाच केलास माझ्यावर. तुझा मित्र आणि तू. मी पोलीस असलो तरी साधी काठी सुद्धा नसते माझ्याजवळ. त्या हल्ल्यातून मी वाचू शकलो नाही. रस्त्यावर अपघात झालेल्या कित्येक जखमी लोकांना हॉस्पिटलमध्ये नेलं मी. पण मी त्या दिवशी हॉस्पिटलपर्यंत पोचू शकलो नाही. मनात येतं तुला माफ करावं मन मोठं करून. पण नाही. तुला शिक्षा झाली पाहिजे. आणि अशी शिक्षा झाली पाहिजे की इथून पुढे कुणीही पोलीसावर हात उचलायची हिम्मत करणार नाही. तुझ्या सारख्यांना माफ करून चालणार नाही.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *