ट्रेन सुटली तरीही…

June 7, 2020

लेखन

arvind jagapat patra

आपल्यापैकी फार कमी लोकांची ट्रेन इतरांच्या चुकीमुळे सुटलेली असते. आपली ट्रेन सुटण्याला कारण आपणच असतो.

मेट्रोच्या युगात आपण जातोय. म्हणजे खूप शहरांना मेट्रोची सवय होतेय. खूप शहरांना मेट्रोचं स्वप्न पडतय. आणि तरीही खूप लोकांना माहितीय मेट्रो आल्यावरही ते आपल्यासाठी स्वप्न असणार आहे. आज विमानाकडे पाहतो तसे उद्या आपण मेट्रोकडे पाहणार आहोत. देशातली कित्येक माणसं उंच उंच होर्डिंगवरच्या जाहिरातीसुद्धा विमानाकडे पहाव्या तशा पाहतात. कारण त्यांना माहित असतं या गोष्टी आपल्या आवाक्याबाहेरच्या आहेत. रहदारीत सामील असतात माणसं. पण फूटपाथवर चालणार्या कित्येक लोकांना जाणीव झालेली असते की आपली ट्रेन सुटलेली आहे.

            आरामात जगण्याची, श्रीमंत होण्याची, नौकरी मिळवण्याची, यशस्वी होण्याची अशी कुठली ना कुठली तरी ट्रेन चुकली आहे प्रत्येकाची. आणि ते ठळकपणे चेहऱ्यावर दिसत असतं. पण ट्रेन चुकलेल्या लोकांमध्ये एक गोष्ट कॉमन असते. आपल्यापैकी फार कमी लोकांची ट्रेन इतरांच्या चुकीमुळे सुटलेली असते. आपली ट्रेन सुटण्याला कारण आपणच असतो. फार कमी लोक असतात ज्यांची ट्रेन इतरांच्या चुकीमुळे सुटलेली असते. कोरोनाच्या काळात मजुरांवर पायी जाण्याची वेळ आली. केंद्र आणि राज्य या घोटाळ्यात लाखो लोक पायी चालत होते.

            एरव्ही ट्रेन सुटते त्याला आपण जवाबदार असतो. खुपदा आपला आळस. पण एक माणूस होता ज्याची ट्रेन त्याच्या आळसामुळे नाही तर स्वाभिमानामुळे सुटली. गांधीजी. त्यांना ट्रेनमधून हकलून दिलं होतं. धक्के मारून. आजचाच तो दिवस. सात जून. आफ्रिकेत घडली ती घटना. गांधीजीनी डोळ्यासमोर आपली हक्काची ट्रेन जाताना बघितली. Platform वर जखमी अवस्थेत. पण गांधीजी थांबले नाहीत. निराश झाले असतील. पण लढत राहिले. उलट जास्त जोमाने लढत राहिले. म्हणून आपण कुठली ना कुठली ट्रेन सुटल्याने निराश झालेल्या लोकांनी गांधीजी समजून घेतले पाहिजेत.

            गांधीजींच्या बाबतीत आपला सगळ्यात मोठा गोंधळ म्हणजे आपण नेहमी त्यांना कुणाच्या तरी चष्म्यातून पाहतो. सगळ्या जगात ज्या माणसाचा चष्मा ओळखीचा आहे, किंवा स्वच्छ भारतसाठी सुद्धा आपल्या सरकारला ज्यांचा चष्माच महत्वाचा वाटला असे गांधीजी मात्र बहुतेकवेळा इतरांच्या चष्म्यातून पाहिले जातात. गांधीजी भन्नाट वाटतात जेंव्हा आपण त्यांना आपल्या चष्म्याने पाहू लागतो. आपल्याला राजकीय भूमिकेची गरज नाही. माणूस म्हणून त्यांना बघता आलं पाहिजे.

            या देशात सगळ्यात आधी कुष्ठरोग्यांची सेवा सुरु करणारी जी दोन तीन माणसं आहेत त्यातले महात्मा गांधी. आणि ते सुद्धा स्वतःच्या हाताने जखमा धुऊन सेवा करणारे. ज्या काळात कुष्ठरोगाचं नाव ऐकून सुद्धा लोक घाबरायचे त्याकाळात गांधीजींच हे धाडस होतं. मुळात गांधीजींची सगळ्यात चांगली सवय होती ती इतरांपेक्षा स्वतःच्या चुका बघायची. गांधीजींकडून सगळ्यात जास्त शिकण्यासारखी गोष्ट ही आहे. त्यांनी फार कमी वेळा लोकांना दोष दिलाय. लोकांचे दोष दाखवलेत. ते सतत स्वतःच्या चुका शोधत राहिले. आणि स्वतःच्या चुकांसाठी ते शब्द वापरायचे हिमालयाएवढी घोडचूक. असं मानलं जातं की हिमालयाएवढी घोडचूक हा शब्द मुळात गांधींचा. त्यांच्यामुळे वापरात आला.

            कस्तुरबा महात्मा गांधीसोबत सावलीसारख्या राहिल्या. गांधीजी हजारो लोकांसोबत पत्राद्वारे सम्पर्कात होते. खूप पत्रांची उत्तरं ते स्वतः पाठवायचे. कस्तुरबांवर फार लिहायची वेळ यायची नाही. त्यांचं हस्ताक्षर फार बरं नव्हतं. त्या लिहायच्या ते सुद्धा एक एक अक्षर स्वतंत्र. म्हणून गांधीजी आणी आश्रमातले इतर लोक सुद्धा त्यांना सतत लिहायचा सराव करायचा आग्रह करायचेएकदा क्स्तुरबानी ते मनावर घेतलं आणी आपलं हस्ताक्षर सुधारायला वही मागितली. पण गांधीजीनी त्यांना काही रफ कागद दिले. हा गांधीजींचा स्वभाव होता. कुठलीही गोष्ट काटकसरीने वापरायची त्यांची सवय. तर सवयीप्रमाणे त्यांनी हस्ताक्षर सुधारायला आधी वही देता कस्तुरबाला रफ कागद दिले. ही गोष्ट कस्तुरबाना खूप मनाला लागली. त्यांनी ती वही तशीच गांधीजींच्या कचेरीत ठेवून दिली. खूप लोकांनी त्यांना वही देऊ केली पण त्यांनी ऐकल नाही. अगदी गांधीजींनाही आपल्या चुकीची जाणीव झाली आणी त्यांनी स्वतः कस्तुरबाना नवी वही देऊ केली. पण त्यांनी ती घेतली नाही.

            गोष्ट अगदी साधी आहे. पण समजून घेण्यासारखी आहे. गांधीजींच्या मोठेपणाचे श्रेय खूप गोष्टींना दिले जाते. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट होत्या कस्तुरबा. त्यांनी दिलेली साथ. कस्तुरबामुळे गांधीजी माणूस राहिले. कुणी महात्मा म्हणालं की गांधीजी ओशाळून जायचे. महात्मापण त्यांच्या डोक्यात शिरलं नाही. कारण अगदी चारचौघांसारखा संसार त्यांनी केला. मुलाने ऐकलं नाही. भांडण केलं. या सगळ्या गोष्टी गांधी नावाचा माणूस चार चौघासारखा होता हे सांगणाऱ्या आहेत.

            पण वेगळेपण हे आहे की त्यांनी या गोष्टी कधी जगापासून लपवून ठेवल्या नाही. सुरुवातीला गांधीजींना अंधाराची भीती वाटायची. सापाची भीती वाटायची. दिवा असल्याशिवाय ते झोपू शकायचे नाहीत. पण यातल्या कुठल्याच गोष्टीला कस्तुरबा भ्यायच्या नाहीत. त्यातून गांधीजींना आपल्या देशातल्या स्त्रिया किती कणखर आणी धाडसी आहेत याची जाणीव झाली. आणि मिठाच्या सत्याग्रहापासून पहिल्यांदा या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत बायका सहभागी व्हायला सुरुवात झाली.

            गांधीजीना आपल्या चष्म्यातून पाहायला लागलो की राजकारण आपोआप बाजूला पडतं. आणि एकदा राजकारण बाजूला झालं की माणूस म्हणून गांधीजींकडून शिकण्यासारख्या असंख्य गोष्टी आहेत याची आपल्याला जाणीव व्हायला लागते. मग आईनस्टाईन, नेल्सन मंडेला, बराक ओबामासारखी माणसं गांधीजींना एवढा आदर का देतात हे समजायला लागतं. मला गांधीजींची सगळ्यात आवडणारी गोष्ट सांगतो.

            एकदा गांधीजींना एका इंग्रज अधिकार्याने पत्र पाठवलं होतं. पत्रात खरमरीत भाषेत गांधीजींवर टीका केली होतीगांधीजींच्या सहायकाची इच्छा होती की गांधीजीनी पण तशाच भाषेत त्याला प्रत्युत्तर द्यावं. पण गांधीजीनी त्या दोन तीन पानी पत्रातली टाचणी तेवढी काढून घेतली आणि पत्र टाकून दिल. सहायक निराश झाला. गांधीजींना म्हणाला तुम्ही त्याला उत्तर द्यायला पाहिजे होतं. तुम्ही फक्त टाचणी घेतली. गांधीजी म्हणाले त्यात तेवढीच एक गोष्ट ठेवण्यासारखी होती. बाकी सगळं टाकाऊ होत. एवढ्या शांतपणे गांधीजी गोष्टी स्वीकारायचे. समजून सांगायचे. हे आपल्याला जमलं पाहिजे असं वाटतं. कारण काय घ्यायचं आणि काय टाकून द्यायचं हेच तर आयुष्याचं गणित सोडवण्याचं रहस्य आहे. आपण नको त्या गोष्टीत किती वेळ आणि उर्जा वाया घालवतो.

            ट्रेन सुटली तरी आपली गाडी रुळावर येऊ शकते, नाही जगावर प्रभाव टाकू शकते हे गांधीजींना सिध्द करून दाखवलं. म्हणून एखाद दुसरी ट्रेन सुटली की हताश होणार्या आपल्यासारख्या माणसांनी गांधीजी आपल्या नजरेने बघितले पाहिजेत. राजकारण्यांच्या नाही. कारण त्यांचा वाचायचा, पहायचा, लिहायचा आणि बोलायचा चष्मा सुद्धा वेगळा असतो.आपण कुठल्यातरी पुतळ्यासाठी कुठल्यातरी पुतळ्याचा द्वेष करत जगत असतो आयुष्यभर. लोकांच्या देवाला नावं ठेवत बसलो की आपला देव दगडाचा आहे एवढच सिद्ध होतं फक्त. कुठल्याही पुतळ्यातला माणूस समजून घेतलं तरी आपलं जग सुंदर होईल. बाकी जगात असे फार कमी देश आहेत जिथे गांधीजींचा पुतळा नाही. गांधीजी जगाला एका साध्या सत्यासाठी आवडतात. खरं बोलण्याची ताकद केवढी मोठी असते. आपल्याला जमायला पाहिजे.

 

संगमनेरमधल्या सायखिंडीचे सिताराम राऊत. वटसावित्री पौर्णिमेला त्यांनी शंभर जोडप्यांच्या हाताने शंभर वड लावले.

‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’या कथासंग्रहाची आठवी आवृत्ती आलीय. वाचकांचे मनापासून आभार. विशेषत: पत्र, मेल लिहून प्रतिक्रिया देणारी तरूण पिढी. तुमचे शब्द बळ देतात. तरूण वाचक एवढं भारी लिहितात की खुपदा वाटतं त्यांच्यासारखं थेट मनातून लिहिता यायला पाहिजे.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *