उषा मडवी

December 27, 2016

लेखन

आपल्या देशासाठी एवढे सैनिक जीव देतात.

आपल्या देशासाठी एवढे सैनिक जीव देतात. मग आपल्या जंगलासाठी आपला जीव गेला तर काय फरक पडतो? हे विचार आहेत गोंदियामधल्या उषा मडावी यांचे. जंगलं देशाचा श्वास असतात. आणि आदिवासी जंगलांचे प्राण असतात. इंग्रजांनी आदिवासींचा जंगलावरचा हक्क नाकारला आणि वनखात्याकडे कारभार दिला. जंगलांची दुर्दशा सुरु झाली. आदिवासी जंगलांना आपलं घर समजून जपतात. जंगल त्यांच्या जगण्याचं बळ असत. नौकरीच साधन नसतं फक्त. पण आदिवासींना हटवून नौकरशाही आली. हळू हळू जंगलं कंत्राटदारांच्या ताब्यात गेली. बेफाम वृक्षतोड सुरु झाली. वाळू तस्करी आणि दगडखाणी वाढल्या. अधिकारी दुर्लक्ष करत होते. स्थानिक आदिवासी भीतीपोटी हे सगळं मूकपणे सहन करत होते. सगळं आयुष्य जंगलात गेलेल्या उषा माडवी मात्र अस्वस्थ होत्या. आपलं जंगल वाचवण्यासाठी काय करता येईल हा विचार करत होत्या. अचानक एक शासकीय आदेश त्यांच्या मदतीला आला. वनकर्मचार्याना स्थानिक आदिवासींची संयुक्त वनसमिती स्थापन करण्याचा आदेश होता तो.
आदिवासी गोळा झाले. समिती तयार झाली. पण जंगलतोड थांबवायची. वाळू तस्करीला विरोध करायचा म्हणजे मोठ्या गुत्तेदारांशी शत्रुत्व घ्यायचं. म्हणून समितीचा अध्यक्ष व्हायला कुणी तयार नव्हतं. अशावेळी हिंमत करून उषाताई पुढे झाल्या. अध्यक्षपद स्वीकारलं. २४ जणांच्या समितीत अर्धे अधिक पुरुष होते पण कुणी सभेला सुद्धा यायचं नाही. जंगलपाहणीसाठी तर दूरच. उषाताई खचल्या नाही. दोन तीन स्त्रियांना सोबत घेऊन जंगलाची पाहणी करायला लागल्या. विनापरवाना जंगलातून खनिजचोरी करणाऱ्या लोकांना विरोध करायला लागल्या. दगड खाणीची परवानगी दाखवा म्हणून विचारायला लागल्या. एक बाई आपल्याला विचारते हे ठेकेदारांना कसं सहन होणार? त्यांनी उषाताईंना हकलून लावण्याचा प्रयत्न केला, धमक्या दिल्या. पण उषाताई सोबत आता स्त्री शक्ती होती. बायका जीवे मारण्याची धमकी दिली तरी ऐकत नाहीत हे बघून गावकऱ्यांच्या मदतीने लाच देण्याचा प्रयत्न केला गेला. पण उषाताई आणि त्यांची टीम प्रलोभनाला बळी पडली नाही. गावातले काही लोक राजकारणामुळे उषाताई आणि त्यांच्या सोबतच्या स्त्रियांवर खोट्या केस करण्यात आल्या. अगदी चोरीचे आरोप लावण्यात आले. पण उषाताई खंबीरपणे लढत राहिल्या.
उषाताईंनी फक्त जंगलतोडीविरोधात काम केलं असं नाही. दारूबंदी घडवून आणण्यात त्यांचा वाटा मोठा आहे. दारूच्या व्यापारावर अधिकारी कारवाई करत नव्हते. तेंव्हा या बायकांनी धमकी दिली की जर कारवाई झाली नाहीतर आम्हीच घराघरात दारूविक्री सुरु करू. ही मात्रा लागू पडली. गावात दारूबंदी झाली.
जंगलातल्या ठेकेदारांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी उषाताई जायच्या तेंव्हा दिवस दिवसभर त्यांना फक्त बसवून ठेवलं जायचं. पंचनामा न करता परत पाठवलं जायचं. सगळं चित्र निराश करणारं होतं. पण उषाताईंनी प्रयत्न चालू ठेवले. सागवान चोरून नेणाऱ्या ट्रक, वाळूच्या ट्रक अडवायला सुरुवात केली. रात्री जंगलात गस्त घालायला सुरुवात केली. वैतागून लोकांनी त्यांच्या चारित्र्यावर आरोप करायला सुरुवात केली. पण स्त्रिया खंबीर होत्या. उषाताईंचे पती मात्र ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे होते. रात्री बेरात्री ते किंवा मुलगा उषाताई सोबत गस्त घालत. या स्त्रियांच्या एकीमुळे चित्र बदलायला सुरुवात झाली. उषाताईंनी एवढ्या संकटातून माघार न घेण्याचं आणखी एक कारण होतं. यापूर्वीही पुरुषांची अशी एक समिती सरकारने काही वर्षांपूर्वी बनवली होती. पण त्या समितीला जंगलतोड थांबवण्यात अपयश आलं. त्यामुळे लोक म्हणायचे जे काम पुरुषांना जमलं नाही ते या बायकांना काय जमणार? उषाताईंनी ठरवलं आपण हे बदलून दाखवायचं. आज त्यांच्या भागातलं जंगल हिरवंगार आणि घनदाट आहे. स्थानिक लोक आणि अधिकारी त्याचं श्रेय उषाताईंना देतात. जंगलात पुन्हा जिवंत झालेले झरे उषाताईंचं कौतुक करणारी गाणी गाताहेत असं वाटतं. केवळ झाडंच नाही तर तिथल्या माणसांचेही चेहरे फुललेले दिसतात.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *