दोन तीन वर्षं सलग पाउस नव्हता
दोन तीन वर्षं सलग पाउस नव्हता. गवत बघायला भेटत नव्हतं. कोंबड्या बोकड कापून खाल्ले कुणी विकून टाकले. गुरांचं काय करायचं हा प्रश्न होता. कारण विकत कोण घेणार? चारा कोण देणार? माणसांचे, जनावरांचे हाल हाल झाले. माझ्या सावलीत येऊन बसायचे सगळे. तसा मी विलासच्या शेतात. बांधावर. शंभर वर्षं आधी उगवलो. सखारामअप्पानी एका वडाची फांदी तोडून आणली आणि लावली बांधावर. त्यांचा पोरगा बाजीराव माझ्या फांदीला लावलेल्या झोळीत झोपायचा. बाजीरावचा पोरगा शिवादाजी माझ्या फांदीला बांधलेल्या झोळीतच दुपारभर निवांत असायचा. आई बाप शेतात आणि पोरं माझ्या सावलीत. घरातल्या सगळ्या पोरींचे झोके माझ्याच फांदीला. माझ्या खोडात भाकरी झाकून ठेवायचे सगळे. शिवादाजीचा पोरगा विलास. विलासची पोरंसुद्धा माझ्याच अंगाखांद्यावर खेळली. चार पाच पिढ्या माझ्या सावलीत मोठ्या झाल्या.
सखारामअप्पांनी मला इथं बांधावर आणून लावलं. रस्त्याच्या बाजूला. माझ्या डोळ्यासमोर वीस पंचवीस वेळा रस्त्याचं काम झालं. एकदा तर माझ्या सावलीतच डांबर जाळत होते. जीव गुदमरून गेला होता त्या डांबराच्या धुरानी. मातीची वाट होती. मुरूम आला. खडी आली. डांबर आलं. आता सिमेंट आलं. भारत स्वतंत्र झाला नव्हता. माझ्या सावलीत कधी स्वातंत्र्य चळवळीच्या बैठका झाल्या. कधी ग्रामपंचायतीचं राजकारण शिजलं. कधी मटन पार्टी झाली. कधी दुष्काळाचे गाऱ्हाणे ऐकले. कधी गारपीटीला शिव्या ऐकल्या. कधी भावा भावांमधली भांडण ऐकली. आमचं झाडांचं बरं आहे. आमच्यात भावकीचे भांडण नसतात. ज्याला जेवढ वाढता येईल तेवढ वाढायचं. वड मोठा झाला म्हणून आंब्याच्या पोटात दुखत नाही. पायरी आंबा मोठा झाला म्हणून शेंदरी आंबा रुसत नाही. खरतर फार कमी लोकांना वड किती मोठा होऊ शकतो हे बघायला मिळतं. चार चार पाच पाच एक्कर पसरलेले वडाचे झाडं आपल्याच देशात आहेत. अख्खा बाजार वडाच्या झाडाखाली भरतो असे कितीतरी गावं आहेत. खरतर वडाचा आणि वटसावित्री पौर्णिमेचा संबंध माहित असतो लोकांना फक्त. पण वडाचा आणि व्यापाराचा संबंध आपल्या देशात खूप जुना आहे. वडाला इंग्रजीत बनियान ट्री म्हणतात. हे नाव इंग्रजांनी का दिलं याची एक गोष्ट आहे. आपल्या देशात पूर्वी व्यापार वडाच्या झाडाखाली चालायचा. कलकत्ता भागात तर व्यापारी लोकांचा अड्डा म्हणजे वडाचं झाड. आणी तिकडच्या व्यापाऱ्यांना बनिया म्हणायचे. अजूनही तो शब्द आहे. तर इंग्रजांनी बघावं तेंव्हा बनिया बसलेले दिसणाऱ्या वडाच्या झाडाला बनियान ट्री म्हणायला सुरुवात केली.
मी खरतर फक्त वड आहे. पण माणसं माझ्यामुळे लोकांसाठी राबणाऱ्या महापुरुषाला आधारवड म्हणतात. खूप बर वाटतं. स्त्रिया सात जन्म एकच नवरा मिळावा म्हणून वडाला फेऱ्या मारतात. बायका, माणसं, लेकरं सगळ्यांनाच वड जिवाभावाचा होता. पण आजकाल वडच दिसत नाही. शहरात वडीलधारी माणसं आणि वड अचानक महत्वाचे वाटेनासे झाले. खरंतर पुराणात, अध्यात्मात, धर्मात ज्या गोष्टीचं महत्व असतं त्या गोष्टी टिकून राहतात. पुजल्या जातात. पण माणसं जेवढी दगडाच्या देवाला मानतात तेवढी शेकडो वर्षापासून ज्यांना देव मानलं जातं अशा जिवंत झाडांना मात्र मानत नाहीत. कितीतरी झाडांना माणसं भूताखेतामुळे ओळखतात. आधी देव म्हणून ओळखायचे. माणसाला संपत्तीचा देव म्हणजे कुबेर माहित असतो. आणी संपत्तीची देवी म्हणजे लक्ष्मी. या दोघांचं वडाशी घट्ट नातं आहे. कुबेर सगळ्या संपत्तीचा हिशोब ठेवणारा. कुबेर यंत्र बिंत्र करतात लोक. घरात लावतात. खिशात ठेवतात. पण आता खूप कमी लोकांना माहित असतं की आपले पूर्वज कुबेर वडावर राहतो असं मानायचे. त्यामुळे वडाच्या झाडाला शेकडो वर्षं कुणी कुऱ्हाड लावली नाही. लक्ष्मी आठवड्यातल्या कुठल्यातरी वारी वडाच्या झाडावर मुक्काम करते असंही मानतात. म्हणून एवढी वर्षं वड टिकून होता. पण अचानक सगळं बदलून गेलं. वड नकोसा झाला. पिंपळ मुंजामुळे ओळखला जाऊ लागला. उंबर साफ सफाईमुळे नको वाटू लागला. टूथब्रश आणि टूथपेस्ट चांगले शोध आहेत. पण म्हणून लिंब बिनकामाचा वाटला पाहिजे का? तुम्ही ज्यांना खूप श्रद्धेने तुमच्या समस्येवर उपाय विचारत आला त्यांनी तुम्हाला कधी दारातला पिंपळ कापायला सांगितला,कधी शेवगा तोडून टाकायला सांगितला. झाड तोडणे हा समस्येवरचा उपाय कसा होऊ शकतो? आपल्या आयुष्यातली सावली, झाड, फुल, फळ नष्ट करणे म्हणजे समस्या सोडवणे आहे का?
आज देशातल्या काही राज्यात केवळ ऑक्सिजन न मिळाल्यामुळे लहान लहान मुलांना जीव गमवावा लागला. तरीही या देशात जिवंत ऑक्सिजनचे साठे असलेल्या झाडांचं महत्व कळत नसेल तर अवघड आहे. आपली देशी झाडं ऑक्सिजन पुरवणारी आहेत. प्रदूषण कमी करणारी आहेत. विदेशी झाडांची तक्रार करत नाही. पण जसं तुम्हाला मनातून वाटतं की खूप पिझ्झा खाणे आपल्या मुलांच्या आरोग्याला चांगले नाही. तसाच मुद्दा विदेशी झाडांचा आहे. गुलमोहर, बनावट उंचच उंच वाढणारा अशोक, गिरिपुष्प प्रमाणाच्या बाहेर लावून आपण आपलं नुकसान करतोय. आपण बीडमध्ये संमेलन घेतोय. वड, चिंच, आंबा, पिंपळ, उंबर, कवठ यांच्यासारखे आपल्या भागातले अनेक झाडं आहेत. लिंबासारखं गुणकारी झाड नाही. लिंबाचं झाड तुम्हाला नेहमी हिरवं गार दिसणार. आपली माणसं ओळखायला शिकता आलं पाहीजे असं माणसाना खूप वाटत असतं. ज्योतिषाला पैसे देऊन तुम्ही काय ऐकता? तर तुम्ही सगळ्यांच्या मदतीला जाता. पण तुमच्या मदतीला कुणी येत नाही. पण ज्याची कुणाची शपथ घ्यायची ती घेऊन सांगा देशी झाड कधी तुमच्या मदतीला आलं नाही? तुम्ही शेतकरी असला तर तुमच्या लक्षात येईल तुमच्याकडून प्रत्येकाला काही ना काहीतरी पाहिजे. वाटा पाहिजे. पण झाडाने तुमच्याकडे कधी काहीं मागितलय का? तुम्ही म्हणाल पाणी मागितलय. तुम्ही खरच प्रामाणिकपणे विचार करा वडाच्या झाडाला किती वर्ष पाणी टाकावं लागलं? आम्ही खात्री देतो आम्हाला जगवण्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागणार नाहीत. उसाएवढे नाही, कापसाएवढे नाही. उस कापूस तुम्हाला किती हमीभाव देतो माहित नाही. पण वड हमी देतो. लिंब हमी देतो. आंबा हमी देतो. फळ देईल, फुल देईल नाहीतर किमान सावली देईल. तुम्हाला काहीतरी देतच राहील. मला सांगा आजच्या जगात कोण एवढी खात्री देतो?
पुराणात एक श्लोक आहे त्यानुसार वड, चिंच, लिंब, पिंपळ, कवठ, बेल अशी झाडं लावणारा माणूस हमखास स्वर्गात जातो. स्वर्ग कुठे आणि कसा आहे मी सांगू शकत नाही. पण एक नक्की सांगू शकतो की ही झाडं तुम्ही जिथे लावाल तिथे शंभर टक्के स्वर्ग असेल. आणि असा स्वर्ग स्वर्गात पण नसेल.
मी वड या संमेलनाचा अध्यक्ष म्हणून एवढच सांगतो… माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी नवा विचार नाही. एकच एक जुना विचार आहे. पण जो तुम्हाला गरजेचा आहे. तो म्हणजे ऑक्सिजन. इथून पुढच्या अध्यक्षाने अशी कुठल्याही मानधनाशिवाय आपण लोकांना काय देणार आहोत ही घोषणा करावी ही अपेक्षा. अर्थात कुठलंही झाड काहीतरी देणारच. फक्त झाडाकडून माणसाने एक गोष्ट घ्यावी.. आपली सावली मोठी करावी. शरीराने जाड होऊन नाही…आपण लावलेलं झाड होऊन.
0 Comments