एक्सची गोष्ट

June 4, 2020

लेखन

arvind jagapat patra

डॉक्टर अभय बंग यांचा एक लेख वाचत होतो. त्यात त्यांनी एक गोष्ट सांगितलीय. गोष्ट अशी की- ‘पुरातन काळी एका खेड्यात एक म्हातारा मेला.

डॉक्टर अभय बंग यांचा एक लेख वाचत होतो. त्यात त्यांनी एक गोष्ट सांगितलीय. गोष्ट अशी की– ‘पुरातन काळी एका खेड्यात एक म्हातारा मेला. त्याला तीन मुलं होती. म्हाताऱ्याने मरताना आपलं मृत्युपत्र करून ठेवलं होतं. त्यात लिहिलं होतं की, ‘माझ्याकडे जेवढे बैल आहेत ते तिन्ही मुलांमध्ये वाटावेत. पण त्यांची कुवत आणि गरजेनुसार हा वाटा वेगवेगळा करावा. निम्मे बैल मोठ्या मुलाला द्यावेत. एकतृतीयांश बैल दुसऱ्या मुलाला आणि एकनवमांश बैल हे तिसऱ्या मुलाला द्यावेत.’ अडचण अशी की, बैल होते एकूण 17.

             त्यामुळे त्याचे एकद्वितीयांश, एकतृतीयांश आणि एकनवमांश असे तीन वाटे कसे करायचे? बैल कापावे? वाद मिटविण्यासाठी त्यांनी गावच्या प्रमुखाला बोलावलं. तो आपल्या बैलावर बसून आला. त्याने समस्या ऐकून घेतली आणि म्हणाला, ‘तुमचे वडील माझे मित्र होते. मी तुमच्या पित्यासारखाच आहे. तुमच्या वडिलांच्या 17 बैलांमध्ये माझाही एक बैल जोडून देऊ.’ आता बैल झाले 18. त्यातले एकद्वितीयांश म्हणजे नऊ बैल दिले एका मुलाला, एकतृतीयांश म्हणजे सहा बैल दिले दुसऱ्या मुलाला आणि एकनवमांश म्हणजे दोन बैल दिले तिसऱ्या मुलाला. एकूण झाले सतरा. आणलेला अठरावा बैल परत घेऊन तो म्हातारा निघून गेला.’

             ही गोष्ट उपनिषदात आहे. ही गोष्ट ऐकून आपल्या मनातले कितीरी प्रश्न सुटतात. गोष्ट सांगून झाल्यावर अभय बंग सांगतात की, माझ्यासाठी तो युरेका क्षण होता. हा 18 वा बैल बीजगणिताच्याक्षसारखा आहे. तो तुम्ही धरला तर प्रश्न सुटतात आणि पुन्हा तो शेवटी जसाच्या तसा अलगद कायम राहतोच की! पण आपण जर हट्टच धरून बसलो कीक्ष नाहीच मानायचा, तर मात्र बैल कापावा लागेल.’

             खरच आपले पण खूप प्रश्न सुटतात ही गोष्ट ऐकून. आपण हा अठरावा बैल कधी गृहीत धरत नाही. आपणही गणितात x धरलेला असतो. गणित सोडवलेल असतं. पण शाळेतला हा x आपण जगण्यात खूप कमी वेळा गृहीत धरतो. खुपदा शाळेतला नाही पण कॉलेजमधली ex आपण जास्त लक्षात ठेवतो. पण सध्या आपण ex बद्दल नाही x बद्दल विचार करूया. या अठराव्या बैलाबाद्द्ल. खुपदा आपण कुणाच्यातरी भांडणात पडतो.

             आपल्याला लक्षातही येत नाही की आपण नकळत कुणाची तरी बाजू घ्यायला लागलोय. आणी नकळत आपण त्या भांडणात सामील होतो. भांडण सोडवायचं राहून जातं. मध्यस्थी करायची आपण विसरून जातो. कारण फक्त आपण आपला अठरावा बैल सोबत घेतलेला नसतो. आपला x आपण गृहीत धरलेला नसतो. भांडण सल्ले देऊन सुटत नाही. आपली त्यातली भूमिका महत्वाची असते. आणि भूमिका नेहमीच प्रत्यक्ष काही देण्याची असावी लागते असं नाही. फक्त आपला x गृहीत धरता आला पाहिजे. आपल्यालाही आणि समोरच्यालाही.

             मदत करायची म्हणजे घरातून मागून पैसे नेऊन द्यायचे असा प्रकार नसतो. पुरात मदत केली गेली. आपण आपल्या घरात बसून जमेल ते सामान पाठवले. पण आणखी एक महत्वाची गरज होती ती प्रत्यक्ष मदत पोचवायची. हे काम पण महत्वाचं होतं. तिथे काम करणारा माणूस आपला x गृहीत धरून होता. जीव धोक्यात घालत होता. आणी तो जीव धोक्यात घालून काम करतोय हे लोकांना दिसत होतं. म्हणून खुपदा आपल्याकडे मदत करण्यासाठी काही नाही म्हणून गप्प बसून राहणं हे स्वतःला समजून घेण्यासारखं आहे.

             हीच गोष्ट हा पक्ष चांगला का तो पक्ष याबाबतीत. असा वाद घालणारे लोक आपल्या x ला गृहीत धरत नाहीत. आपलं काय योगदान आहे हे समजू शकत नाहीत. किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. कुठलाच पक्ष राष्ट्र घडवत नसतो. राष्ट्र नागरिक घडवत असतात. माणसं घडवत असतात. आणि माणूस म्हणून आपलं योगदान हे पक्षाच्या योगदानापेक्षा जास्त महत्वाचं असतं. या देशात हत्तीशी त्यांच्या भाषेत संवाद साधू शकणारी माणसं आहेत. आणि हत्तीच्या तोंडात फटाके फोडणारी माणसं आहेत. आपण यातले कोण आहोत ते आपल्याला तपासायचं आहे.

             आपला बैल अठरावा आहे असं सांगणे खूप मोठी गोष्ट आहे. आपला बैल कुणाला देऊन टाकणे ही तर खूपच मोठी गोष्ट आहे. पण लोकांनी हिशोब करण्यापुरता का होईना आपला बैल गृहीत धरणे ही देशभक्ती आहे. हा आपला x लोकांच्या मनाला आधार देणारा असला पाहिजे. समाजसेवा म्हणजे लोकांना काही देणे असा प्रकार नसतो. आपण सोबत आहोत याची जाणीव करून देणे ही खूप मोठी गोष्ट आहे. आपण मनापासून सोबत असलो की वाद मिटतो. समस्या मिटते. गरज असते ती आपण फक्त बघ्यासारखे उभे राहता सामील होण्याची.

             आता पुन्हा तो काळ आलाय. लोक म्हणतील देशासाठी अमुक करा. तमुक करा. या नंबरवर पैसे टाका. त्या नंबरवर पैसे टाका. ज्यांच्याकडे आहेत ते टाकतातच. पण आपल्याकडे नाहीत म्हणून नाराज व्हायची गरज नाही. आपला x सोबत असला पाहिजे. तो गृहीत धरता आला पाहिजे. आपण प्रश्न सोडवू शकतो याची आपल्याला जाणीव झाली पाहिजे. देशातले अर्धे प्रश्न का सुटलेले नसतात? कारण आपण अवलंबून असतो. नेत्यावर, सरकारवर. कोरोनात सरकार हात धुवायला सांगेल. पण साबण आपल्याला आणावी लागेल. कोरोनात सरकार मास्क वापरायला सांगेल. पण आजारी पडायचं नसेल तर प्रतिकारशक्ती आपल्यात असली पाहिजे. सरकार सूचना देईल. प्रतिकारशक्ती नाही. त्यामुळे आपला आपण प्रश्न सोडवू हा आत्मविश्वास आधी आपल्याला वाटला पाहिजे. कुठल्याही हिरो हिरोईनच्या x factor पेक्षा हा आपला x factor जास्त महत्वाचा आहे.

 

फोटो सौजन्य : अभय कानविंदे.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *