मित्रा…

May 12, 2020

लेखन

arvind jagapat patra

आपण लहानपणी नेहमी कुणाची न कुणाची तरी नक्कल करत असतो. घरातल्या लोकांसारखे बोलत असतो

आपण लहानपणी नेहमी कुणाची न कुणाची तरी नक्कल करत असतो. घरातल्या लोकांसारखे बोलत असतो. शाळेतल्या शिक्षकांसारखं लिहित असतो. मित्रांसारखं वागत असतो. मग हळू हळू आपण मोठे होतो. मोठं होण्याची सगळ्यात मोठी खुण कोणती तर आपण इतरांसारखं होणं सोडून स्वतः कुणीतरी होण्याचा प्रयत्न करू लागतो. स्वतःची वाट शोधू लागतो.

पण खुपदा आपल्यातले काही लोक मोठे व्हायला तयारच नसतात. त्यांना वारंवार कुणाच्या तरी प्रेरणेची गरज असते. त्यांना कुणीतरी godfather गरजेचा वाटत असतो. त्यांनी कुणीतरी एक आवडता नेता निवडलेला असतो. त्याला ते देव मानू लागतात. तो चुकूच शकत नाही अशी त्यांची खात्री असते.

मग कुणी असाच अभिनेता निवडलेला असतो. तो नेहमीच सर्वोत्तम अशी त्यांची श्रद्धा असते. पण कुठलाच माणूस परिपूर्ण नसतो हे कळायला लागणं ही आपली समज वाढण्याची सुरुवात असते. आपल्याला लोकांचे प्रेरणा देणारे व्हिडीओ किंवा पुस्तकं न वाचताही आपला मार्ग शोधता आला पाहिजे.

एकट्या बटाट्याची भाजी तीनशेच्या आसपास वेगवेगळ्या प्रकाराने बनवता येते. हे प्रकार का शोधले गेले? आपलं स्वतःचं वेगळेपण शोधण्याच्या इच्छेने. आपली शैली निर्माण करण्याच्या प्रेरणेने.

चहा किती वेगवेगळ्या प्रकार बनवता येतो हे तर आपल्या सगळ्यांना माहितीय. जगात सगळ्यात जास्त मागणी कुठल्या गोष्टीलाय तर वेगळेपणाला. आणि वेगळेपण त्याच त्याच लोकांचे तेच तेच उपदेश किंवा सल्ले ऐकून येणार नाही. माझ्या ओळखीचे काही तरुण आहेत. जे सतत मोटिवेशनल पुस्तकं वाचत असतात. त्यांना उद्योग सुरु करायचाय. मला कळत नाही की त्यांना त्या पुस्तकांमधून काय मिळणार आहे? सुरुवात म्हणून वाचन ठीकय. 

पण सतत तेच. आपल्याला ज्या गावाला जायचंय त्या गावचा रस्ता आधी धरला पाहिजे. त्यातले मुक्काम समजून घेतले पाहिजेत. आपल्याला वाईला जायचंय आणि आपण अमेरिकेचं प्रवासवर्णन वाचत बसलो तर काहीच उपयोग होणार नाही. आधी आपण वाईची वाट समजून घेतली पाहिजे. हे समजून घेताना आपल्याला आपला मार्ग सापडेल.

पण आपण एकट्याने प्रवासाची तयारी केली पाहिजे. वास्को द गामा पहिल्यांदा भारतात आला. समुद्रात भरकटला. सोबतचे खलाशी आजारी पडले. वैतागले. परत जायचा विचार करू लागले. वास्को द गामाने भारतात जायचंच ठरवलं होतं. असं म्हणतात की त्याने जहाजावरचे सगळे नकाशे फेकून दिले. भारतात जाण्यापलीकडे दुसरा पर्याय ठेवला नाही. आणि अशा रीतीने युरोपला गरम मसाल्याचा मोठा खजिना भारतात सापडला.

थॉमस रो नावाचा इंग्रज जहांगीर बादशहाच्या काळात भारतात आला होता. भारतात व्यापाराची परवानगी मिळवायला. आधीच पौर्तुगीज भारतात आले होते. व्यापार करत होते. त्यांना दुखवायचं नाही म्हणून जहांगीर रो ला फार भाव देत नव्हता. जहांगीर त्याला दरबारात उभा रहायला सांगायचा. बाकी सगळे बसलेले आणि रो एकटाच उभा.

पण रो खचला नाही. त्याला आपला अपमान होतोय हे कळत होतं. त्याने सगळ्या गोष्टी लिहून ठेवल्यात. चिकाटीने जहांगीरची परवानगी मिळवण्यासाठी तो प्रयत्न करत राहिला. आता ह्या रो ला सगळा प्रदेश नवीन. भाषा नवीन. माणसं नवीन. तरी त्याला ही नवी व्यापारी वाट शोधावी वाटली. त्याला फार यश आलं नाही. पण त्याच्या चिकाटीमुळे इंग्रजांना जाणीव झाली की भारतात किती समृद्धी आहे.

कोलंबसची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. तो भारताच्या शोधात निघाला होता आणि त्याने अमेरिका शोधली वगैरे बर्याच गोष्टी नेहमी सांगितल्या जातात. कोलंबसला प्रेरणा मिळाली ती मार्को पोलोसारख्या धाडसी प्रवाशामुळे. ही सगळी माणसं व्यापार, सत्ता, ज्ञान मिळवण्यासाठी फिरणारी. आपला मार्ग शोधणारी.

जगातल्या गाजलेल्या प्रवास वर्णनातली सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती स्वबळावर प्रवासाला सुरुवात करणारी माणसं. पुढे त्यांना मदत करणारी, त्रास देणारी माणसं भेटत राहतात. अनुभव मिळत राहतात. पण सुरुवात स्वतःला करावी लागते.

लोक दिशा सांगू शकतात पण सोबत असतात आपले पाय. पायसुद्धा एका टप्प्यानंतर जरा थकल्यासारखे वाटतात.

मग खरी सोबत असते आपल्या मनाची. मेंदूची. पुढची वाट आपल्या मनाच्या जिद्दीवर अवलंबून असते. लोक सल्ले देऊ शकतात. विचारपूस करतात. पण बळ देणार असत ते आपलं खंबीर मन. आपल्याकडे कोलंबसचा विनोद सांगतात. आपणही कोलंबस झालो असतो पण बायको खूप प्रश्न विचारते. कुठे चालला? कधी येणार? कसे जाणार? कोण कोण सोबत आहे? हे सगळं ऐकून आपल्याकडचे कोलंबस अमेरिका शोधायचं सोडून घरीच बसतात.

पण मुळात बायकोच्या प्रश्नांची काय गरज आहे? प्रश्न स्वतः विचारले पाहिजेत. कुठे जाणार आहेस? कसा जाणार आहेस? कारण उत्तर स्वतःला हवय. जायचं म्हणजे प्रवासालाच जायला पाहिजे असं नाही. 

एका अशा वाटेवर जिथे हजारो लोकांना काम मिळेल, एका अशा मार्गावर जिथे लाखो लोकांना प्रेरणा मिळेल. एका अशा रस्त्यावर जो आपल्या मागच्या शेकडो लोकांना दिशा दाखवेल.

    आपणच आपल्याला प्रेरणा दिली पाहिजे. कारण अलार्मचं काम वाजत राहण्याचं असतं. झोपेतून उठायचं की नाही हे शेवटी आपल्यालाच ठरवायचंय.

अरीवंद जगताप

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *