आदेश भाउजी

April 23, 2018

लेखन

arvind jagapat patra

भाउजी, 

आम्हा बायकांना थेट होम मिनिस्टर बनवणारे भाउजी. एरव्ही बायकांना मिनिस्टर व्हायची संधी किती मिळते? त्यातही
होम मिनिस्टर. देशात असो किंवा राज्यात, बाकी मंत्रीपद बायकांना देतात. पण होम मिनिस्टर होणं सहसा कुठेच बायकांच्या
वाट्याला येत नाही. ते बायकांचं काम नाही असा समज अजूनही आहे. खरतर स्त्रियांवरचे अत्याचार आणि गुन्ह्याचं प्रमाण बघता
आपल्या देशात कायदा आणि सुव्यवस्था बायकांच्या हातात असली पाहिजे. असो. तुमच्यामुळे टीव्हीवर होम मिनिस्टर होण्याची
संधी मात्र हजारो बायकांना मिळाली.

आज तुम्हाला माझी गोष्ट सांगावीशी वाटते. खरंतर खूप घरातली गोष्ट आहे. संसार कर्तव्य केल्यासारखा चालू
असतो. कित्येक नवरा बायको तर आज जेवायला काय करायचं? या विषयापलीकडे बोलतच नाहीत. खूप नवरे आपण पैसे कमवून
आणतो हेच आपलं बायकोवरचं प्रेम समजतात. माझा नवराही तसाच. रोज ऑफिसला जाताना घाई. चिडचिड. रोज ऑफिसहून
आल्यावर आपल्याला ऑफिसात किती टेन्शन असतं हेच सांगत बसणं. सगळ्या जगाची चिंता आपल्यालाच असल्यासारखा पेपर
वाचत बसणारा नवरा कित्येक घरात असतो. तरीही या देशाच्या चिंता का संपत नाहीत याचं मला नवलच वाटतं. कोणत्या नेत्याने
कोणत्या देशात काळा पैसा ठेवलाय याची खबर असणारे नवरे असतात. पण आपल्या घरात शेंगदाणे कुठल्या डब्यात ठेवलेत हे मात्र
त्यांना माहित नसतं. शरद पवारांच्या वाक्याचे चार चार वेगवेगळे अर्थ लावणारा माझा नवरा, माझ्या वाक्याचा सोपा अर्थ पण का
समजू शकत नाही हे मला कळत नाही. देवेंद्र फडणवीसांचं वजन कमी झालंय हे पण त्याच्या लक्षात आलं. मी महिनाभरापासून योगा
करतेय हे मात्र अजून त्याच्या गावीही नाही. विराट कोहलीची batting बघायला अनुष्का शर्मा बसलेली दिसली की माझ्या नवऱ्याला
राग येतो. तो लवकर आउट होईल असं वाटतं. म्हणजे स्वतः बायकोला कुठे घेऊन जायचं नाही. आणि लोक आपल्या बायकोला घेऊन
गेले तर त्याला पण नाव ठेवायचं.

असा आमचा संसार. सासूचा कुठल्या कुठल्या दिवशी उपवास असतो ते लक्षात ठेवायचं आणि सासऱ्यांची शुगरची गोळी
आठवणीने त्यांना खायला सांगायची. बाकी सगळे एकमेकांच्या कामात. काम काय तर प्रत्येकाने आपल्या मोबाईलमध्ये डोकं खुपसून
बसायचं. नवरा आला की टीव्हीवर न्यूज बघतो. मोबाईलमध्ये मित्रांनी पाठवलेले पांचट विनोद वाचून एकटा हसत असतो. ते विनोद
पांचट असतात हे मला माहित आहे कारण मी अधून मधून नवऱ्याचा मोबाईल तपासते. त्यातही बायकांवर विनोद जास्त. पुरुषांना
बायकांवरच्या गमती एकमेकांना सांगण्यापेक्षा बायकोशी थोडं गमतीत बोलायला काय होतं मला कळत नाही. बरेच नवरे बायकोशी
अर्थसंकल्पावर बोलल्यासारखे बोलत असतात. हे भाव वाढले. हे कमी झाले. ते अर्थमंत्री तरी बिचारे अधून मधून शेरो शायरी
ऐकवतात. नवऱ्याना तेही जमत नाही. एकूण आम्ही एका घरात राहून एकमेकांशी फार कमी बोलणारी माणसं. पण त्यादिवशी तुम्ही
घरी आलात आणि आमचं जगच बदलून गेलं.

तुम्ही येणार म्हणून कधी नव्हे ते आम्ही चौघे घर कसं आवरायचं हे ठरवत बसलो. नवऱ्याने घरातल्या गोष्टीत
मदत केली. सासूने पहिल्यांदा मला आग्रहाने तू हिरवीच साडी नेस असं सांगितलं. मी पहिल्यांदा सासूची वेणी घालून दिली. सतत
बनियनवर असणार्या सासरेबुवांनी कोट घातला. सगळं नवीन नवीन वाटायला लागलं. तुम्ही काय विचारलं तर काय बोलायचं याचा
सराव केला. आम्ही एकमेकांचा कौतुक सोहळा साजरा करायचा हे ठरवून टाकलं होतं. आमचं घर किती प्रेमळ आहे हे दाखवण्याची
अगदी जोरदार तयारी केली होती आम्ही. तुम्ही पण अगदी हसत खेळत बोलायला सुरुवात केली. पण घरचं माणूस नाही वाटलात
तुम्ही भाउजी. तिथे तुमचं चुकलं. तुम्ही घरच्यासारखे वागला नाहीत. घरातलं माणूस म्हणजे आपल्याकडे लक्ष देता आपल्या
कामात मग्न असलेलं माणूस याची मला सवय झाली होती. घरचं माणूस म्हणजे एकमेकांना गृहीत धरणं, डोकं दुखतंय असं सांगितलं
तरीसुद्धा जवळ येता दुरूनच गोळीचं नाव सांगणं. घरचं माणूस म्हणजे घरात असून नसल्यासारखं अशी सवयच झाली होती. आणि
तुम्ही मात्र एकदम वेगळे वागत होता. विचारपूस करत होता. असंख्य प्रश्न विचारत होता. माझ्या नौकरीचं काय झालं हे मला किती
वर्षात कुणी विचारलंच नाही. एवढी शिकलेली असून मी घरी का बसलेय हा प्रश्नच पडला नव्हता कुणाला. माझ्या हातच्या
थालीपिठाचं एवढ मनमोकळं कौतुक कुणी केलंच नव्हतं. आणि तिथेच सगळा सराव, सगळी तयारी विसरून गेले मी. तुमच्यासमोर,
कॅमेरासमोर मी घरातल्या लोकांशी भांडले. मला किती एकाकी वाटतंय हे सांगत राहिले कितीतरी वेळ. मनमोकळी रडले त्यादिवशी.

सगळे शांत झाले होते. मीसुद्धा जरा वेळाने भानावर आले. आपण हे काय करून बसलो याची जाणीव झाली. आता नवरा, सासू
सासरे काय काय बोलतील याची जाणीव होऊन घाबरून गेले. पण घडलं उलटंच. त्यादिवशी आम्ही सगळेच एकमेकांशी मनातलं
बोललो. राग मनात असूनही सासूबाईना मी जिंकावं असं वाटत होतं. मी अधून मधून गाते हे नवऱ्याच्या लक्षात होतं. त्याने मला
तुमच्यासमोर गाण्याचा आग्रह केला. सासर्यांनी आमच्या सासूबाईवर किती सुंदर कविता केली होती. हे सगळंच माझ्यासाठी नवीन
होतं. आम्ही एकमेकांना पुन्हा भेटलो. एकमेकांविषयी काय वाटतं हे सुद्धा आम्ही एवढे दिवस सांगू शकलो नव्हतो. तुमच्या निमित्ताने
खूप काही बोललो.

अजूनही कधीतरी नवरा मोबाईलमध्ये तोंड खुपसून बसलेला असतो. सासू सासरे टीव्ही बघत असतात. मग मी तुम्ही
दिलेली पैठणी नेसते. पुन्हा गप्पा सुरु होतात. नवरा पुन्हा एकदा म्हणतो तू पैठणीत खूप छान दिसतेस. मी म्हणते हेच जरा हसून
म्हणा. नवरा म्हणतो, सारखं सारखं हसायला मी काय आदेश बांदेकर आहे का? आणि मग आपण खूप मोठा जोक केला असं समजून
थोडासा हसतो. ते सुद्धा खूप गोड वाटतं.
thanks वगैरे म्हणणार नाही. असेच हसत रहा. पुरुष मिशी हे पुरुषीपणाचं लक्षण समजतात. पण आम्ही बायका
मिशी आडचं निर्मळ हसू चांगल्या माणसाचं लक्षण समजतो. हसत रहा.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *