ती जन्माला आली असती तर तिचं नाव काय ठेवलं असत माहित नाही
ती जन्माला आली असती तर तिचं नाव काय ठेवलं असत माहित नाही. पण मोठी झाल्यावर बाकी तरुण पोरानी तिला अनेक नावाने ओळखलं असत. आजही इतर मुली ओळखल्या जातात तसं. म्हणजे सामान, छावी, आयटम, पुंगी, डाव, मशीन, टवका इत्यादी. पण अशा कुठल्याच नावाने ओळख मिळायच्या आधीच तिचं जगणं संपल. याला सुदैव म्हणावं का दुर्दैव? ती जन्माला आली असती तर बसमध्ये दोनचार सीट राखीव असतात आणि निवडणुकीत महिला राखीव सीट असत हे तिला कळल असत. पण निवडणुकीत उभं राहण्याचा विषयच नव्हता. तिला पायावर सुद्धा उभं राहू दिलं नाही. आज कुणा एका मुलीची गोष्ट सांगणार नाही. अशा नाव नसलेल्या अशा करोडो मुली या देशात मारल्या गेल्यात. गर्भात. अजूनही ही हत्या चालू आहे. राजरोसपणे ते खुनी सज्जन माणसाचा बुरखा पांघरून वावरत असतात आपल्या अवती भवती. आपण विचारही करू शकणार नाही अशा खुनाच्या एकाहून एक भयंकर पद्धती वापरल्या जातात मुली गर्भातच मारून टाकण्यासाठी. देशात काही ठिकाणी जन्मलेल्या मुलीच्या गळ्यावर बाजेचा पाय ठेवला जातो आणि त्या बाजेवर चक्क जन्मदात्या आईला बसवलं जातं. ऐकून विश्वास बसत नाही पण या घटना घडलेल्या आहेत. एवढे क्रूर माणसं या जगात आहेत.
स्त्री भ्रूण हत्ये विरोधात कठोर कायदे येऊनही हे प्रकार बंद होत नाहीत कारण यात फक्त आईबाप नाही तर सरकारी कर्मचारी, डॉक्टर आणि काही ढोंगी सामाजिक संस्था सुद्धा सहभागी आहेत. देशात काही भागात दवाखान्यात कम्पाउंडरच एजंट म्हणून काम करतात. खूप ठिकाणी रिक्षावाले सुद्धा यात सहभागी असतात. गरोदर बाईला हे रिक्षावाले ठराविक डॉक्टरकडे नेतात. तिथे सोनोग्राफी केली जाते. त्यात मुलगा आहे का मुलगी हे डॉक्टर काहीच सांगत नाही. बाहेर आल्यावर रिक्षावाला सांगतो. आणि मग ते कुटुंब एका रिक्षावाल्याच्या सांगण्यावरून गर्भ ठेवायचा का नाही हा निर्णय घेतं. अशाच एका केसमध्ये रिक्षावाल्याने मुलगा आहे असं सांगितलं होतं पण मुलगी झाली. त्या मुलीच्या बापाने रिक्षावाल्याला भर चौकात मारला. केस झाली. आणि मग लक्षात आलं रिक्षावाला असं शेकडो लोकांना फसवत होता. आपल्या गर्भातल्या बाळाच्या जीवन मरणाचा प्रश्न एका रिक्षावाल्याच्या म्हणण्यावर ठरवणारे आई बाप राक्षस म्हणावेत का माणसं?
स्त्री भ्रूण हत्या होऊ नयेत म्हणून गिरीश लाड नावाचे एक मित्र खूप मोठं काम करतात. नावाजलेले आहेत. या विषयावर त्यांचा खूप अभ्यास आहे. त्यांच्या मते पुरोगामी म्हणवला जाणारा हा महाराष्ट्र, जिजाऊ आणि सावित्री बाई फुले यांचा वारसा सांगणारा हा महाराष्ट्र स्त्री भ्रूण हत्येत खूप आघाडीवर आहे. अगदी राजस्थान सारख्या राज्यांना आपण याबाबतीत मागे टाकलंय. या गोष्टीवर नियंत्रण आणायला तंत्रज्ञान असूनही आपण ते वापरायला तयार नाही. याचा अर्थ काय होतो? अशा माणसांचे परिश्रम वाया का जातात? कारण भ्रष्टाचाराची एक खूप मोठी साखळी आहे. तिला नष्ट करण्याची आपल्या व्यवस्थेत हिंमत नाही. आणि दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की बरेच डॉक्टर्स सुद्धा भ्रष्टाचारात राजरोस सामील असतात.
सोनोग्राफी सेंटर चालवणारे डॉक्टर्स वैद्यकीय अधिकारी किंवा सिव्हील सर्जनला घाबरून असतात. हे लोक कधीही तपासणी करून, दोष दाखवून सोनोग्राफी सेंटर बंद करू शकतात. पण जर याच लोकांशी नीट सेटिंग केली की सोनोग्राफी सेंटर वर धाड पडण्याची शक्यता नसते. महसूलवाले अधून मधून त्रास द्यायची शक्यता असते. त्यांची पण मर्जी राखायला सुरुवात केली की तो धोका पण संपतो. मग उरतात पत्रकार. त्यांनी बातमी देऊच नये अशी व्यवस्था केली की जगात कुणीच शत्रू उरत नाही. राजरोसपणे आपला अवैध व्यवसाय करायला तुम्ही मोकळे. आणि हे सर्रास चालू असत. कितीही कठोर नियम आले तरी पळवाट काढायला आपले लोक खूप हुशार. आधी डॉक्टर बिनधास्त पेशंटला सांगायचे मुलगा का मुलगी? नंतर शूटिंग व्हायला लागली चोरून. मग काही खूप शहाण्या डॉक्टर लोकांनी डोकं लावलं. आपल्या केबिनमध्ये डाव्या बाजूच्या भिंतीवर देवीचा फोटो लावला आणि उजव्या बाजूच्या भिंतीवर देवाचा फोटो लावला. मुलगा असेल तर डॉक्टर फक्त देवाच्या भिंतीकडे बघणार. मुलगी असेल तर डॉक्टर देवीच्या भिंतीकडे बघणार. पेशंट समजून जाणार मुलगा का मुलगी? गर्भपातासाठी कितीतरी काळ देवाचा आधार घेतला गेला. मग ह्या गोष्टी सुद्धा बाहेर कळायला लागल्या. म्हणून डॉक्टर लोकांनी देवाची सुटका केली. पुढे काही डॉक्टर लोकांनी मुलगा असेल तर मंगळवार आणि मुलगी असेल तर शुक्रवार असं सांगायला सुरुवात केली. असे वेगवेगळे कोडवर्ड वेगवेगळ्या ठिकाणी वापरले गेले. वापरले जातात.
एका बुवाबाजी करणाऱ्या बाबाची गोष्ट बघा. हा बाबा मुलगा आहे का मुलगी हे गरोदर बाईच्या पोटावर हात ठेवून ओळखायचा म्हणे. तशी प्रसिद्धी होती त्याची. त्याच्याकडे हजारो लोक यायचे. तो बाबा पोटावर हात ठेवायचा आणि बाईला सांगायचा मुलगा. किंवा मुलगी. मग त्याच्याकडच्या वहीत त्या बाईच नाव लिहायचा आणि पुढे मुलगा का मुलगी लिहून ठेवायचा. काही वर्षात बाबाला पोलिसांनी पकडला. अटक झाली. चौकशी सुरु झाली. चौकशीत पोलिसांनी विचारलं तुला फक्त पोटावर हात ठेवून कसं कळत मुलगा का मुलगी? तो बाबा म्हणाला मला तसं काही कळत नाही. मी अंदाजे सांगायचो. फक्त वहीत लिहिताना एक काम करायचो. मी जर बाईला मुलगा सांगितला असेल तर माझ्या वहीत मुलगी लिहायचो आणी मी जर बाईला मुलगी सांगितली असेल तर माझ्या वहीत मुलगा लिहायचो. पोलिसांनी विचारलं तू असं का करायचा? त्याने सांगितलं उद्या जर ज्या बाईला मुलगा सांगितला तिला मुलगाच झाला तर ती पेढे घेऊन येणार हे मला माहित होतं. पण चुकून मुलगी झाली तर तिला मी माझी वही दाखवायचो आणि म्हणायचो मी तुला मुलगा सांगितला असं होऊच शकत नाही. हे बघ माझ्या वहीत लिहून ठेवलंय की तुला मुलगी होणार. काय बोलणार त्या नालायक बाबाला? लोकांची फसवणूक करणारे माणसं डोकेबाज असतात. नको तिथं डोकं चालवणारे. आणि अशा लोकांकडून फसवणूक झाली तरी कुणी यांना भांडायला जात नाही. कारण हा विषय जाहीर भांडायचा नसतो. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत लोक जगत राहतात. म्हणून या लोकांचं भांडं फुटत नाही. आणखी हजारो लोक फसत जातात.
लोक म्हणतात मुलींचं प्रमाण कमी होतंय. आता मुलांचं लग्न कसं होणार? पण फक्त मुलांचे लग्न व्हावेत म्हणून आपल्याला मुली वाचवायच्या का? आपण मुलीला कसं वागवतो हा विचार कुणी करायचा? तिला जर सन्मानाने वागवलं गेलं, तिच्या लग्नासाठी गावातल्या माणसाला जमीन विकावी लागली नाही, तिच्या अब्रूच्या चिंतेपाई आई बापाला रोज रात्री काळजी वाटत असेल तर अशा देशात कुणाला मुलीला जन्म द्यावा वाटेल? मुलगी जिवंत राहण्यापेक्षा ती या जगात सुरक्षित राहील का हा विचार मोठा आहे. स्त्रियांना आरक्षण हवंच पण सगळ्यात महत्वाच आहे संरक्षण. जोपर्यंत स्त्रिया सुरक्षित नाहीत तो पर्यंत कुठल्या आई बापाला आपल्या घरात मुलगी हवी असं वाटेल? आणि स्त्रिया सुरक्षित राहण्यासाठी सरकारने प्रयत्न करून काही होणार नाही. आधी रस्त्यात मुलीची छेड काढणाऱ्या मुलाच्या आईने चारचौघात त्याच्या थोबाडीत मारायला शिकलं पाहिजे. अशा पोरांना त्यांच्या आईने भर रस्त्यात झोडपलं पाहिजे तर त्याला इतर बायकांचा आदर वाटेल. आईने वेळीच कान धरला तर, बापाने वेळीच कॉलर धरली तर हे प्रकार थांबतील. नाहीतर तुम्ही लाडाने मुलीचं नाव काहीही ठेवलं तरी कार्टे तिला सामान, छावी, आयटम, पुंगी, डाव, मशीन, टवका म्हणणार. आणि हे ऐकून कुठल्या आई बापाला आपल्याला मुलगी व्हावी असं वाटेल?
0 Comments