गॉडफादर

August 6, 2016

लेखन

arvind jagapat patra

घर घेतलं होतं नवीन. उंच ईमारतीत.

घर घेतलं होतं नवीन. उंच ईमारतीत. आनंदाने आईला आणलं दाखवायला. खालून दाखवलं. म्हणालो तो बघ त्या तिथे राहतो. आई म्हणाली, एवढ उंच राहत्यात का? एखाद दिवशी विमान येऊन ठोसला दिला मग कळल. त्या आठव्या मजल्यावरून मी क्षणात जमिनीवर आलो. माझ्या लक्षात आलं  मी नेहमी जमिनीवर असण्याचं कारण हेच तर आहे.

परवा तुंबाराचं प्रकाशन झालं. आपण लिहिलेल्या नाटकाचं प्रकाशन या गोष्टीचा मी कधी विचारही केला नव्हता. पण झालं. खरंतर आयुष्यात अश्या योगायोगांची संख्या भरपूर आहे असं वाटायचं मला. पण तुंबारा च्या निमित्ताने लक्षात आलं की हा योगायोग नाही. हे कुठंतरी खूप आत साचलेलं आहे. दडलेलं आहे. ते असं वेगवेगळ्या टप्प्यावर बाहेर येतं. अभिनेता म्हणून मला नेहमी वाटतं की आपण आज सिनेमा साईन केला आणि लगेच शूटिंगला सुरवातही झाली. मग आपण भूमिकेची तयारी कधी केली? आणि तयारी करता आपण बर काम कसं केलं? आपण एवढे सराईत कधी झालो? तेंव्हा लक्षात येतं की खूप दिवसांपूर्वी असं पात्र मी पाहिलेलं होतं. असे लोक माझ्या पाहण्यात आहेत. त्यांना मी फॉलो करतो नकळत. तो नकळत झालेला सराव असतो. हे सगळं त्या स्तानिस्लावास्की मुळे असेल कदाचित. खरंतर या क्षेत्रात कुणीतरी गॉडफादर पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. मला मात्र माझ्या गावी घरामागे असलेला डोंगर नेहमी गॉडफादर वाटत आला.त्या डोंगरावर मी वेगवेगळ्या नाटकाचे उतारे पाठ केले. आवाजाचा सराव केला. त्या डोंगरावर असल्यावर एखाद्या स्टेजवर असल्या सारखा भास व्हायचा. आणि खाली दिसणारं अख्ख गाव मला प्रेक्षक वाटायचं. आयुष्यात खूप उंची गाठायची असे किरकोळ  मोह झाले नाही कधी. कारण मी सुरुवातच डोंगराएवढ्या उंचीवरून केली म्हणून असेल कदाचित. म्हणून फक्त भूमिका जगायची. आपण आनंद घ्यावा आणि लोकांनीही. एवढी माफक अपेक्षा आणि त्या साठी लागणारी अफाट मेहनत एवढच ठाऊक होतं.

आमच्या वडलांना कुळकायद्या मुळे खूप मोठं शेत मिळत होतं. पण त्यांनी नकार दिला घ्यायला. मला फुकट नको कुणाची जमीन म्हणाले. मग एकदा भूकंप झाला. घर पडलं. सरकार नुकसान भरपाई म्हणून पत्रे देणार होतं. पण वडील नाही म्हणाले. त्यांच्या मते भूकंप झाला यात सरकारचा काय दोष?  खरंतर वेड्यात काढलं लोकांनी त्यांना. पण ती गोष्ट खूप परिणाम करून गेली मनावर. कुठलीही सवलत नको वाटली आयुष्यात कधी. आणि लोकांना दोष देण्याचा विचारही आला नाही मग. खूप झपाटून काम केलं की रात्री झोपतांना कुणी पाय दाबून द्यावे असं वाटत नाही. कारण अंग टाकलं की झोप येते माणसाला. फक्त आपलं हे झपाटलेपण योग्य दिशेत असलं पाहिजे. कॉलेज पासून नाटकाने वेड लावलं होतं. सुनील कुलकर्णी यांच्या नाटकात काम मिळालं. एकांकिका केल्या. रानातल्या पिकाला बघून जो आनंद होतो शेतकऱ्याला तो आनंद नाटक बसतांना होऊ लागला. आपल्या वाड वडलांनी १० एकर जमीन फुलवून दाखवली होती दरवर्षी. आपल्याला फक्त हे स्टेज फुलवून दाखवायचंय. उत्साह दांडगा होता. डोंगर पाठीशी होताच. मुंबई गाठली थेट. कुर्ला नागरी सहकारी बँकेत नौकरी केली. चुनाभट्टीला राहिलो. माटुंगा स्टेशन माझं वाचनाचं, अभ्यासाचं ठिकाण.समोर जग धावत असायचं. आणि मी एका जागी शांत. पुस्तकं, नाटकं, त्यातली पात्रं सारं काही साठवून घेत होतो. भोवताल डोळ्यावाटे मनात भरून घेत होतो. ठाऊक नव्हतं हे कुठे कधी कामी येईल म्हणून. पण आपल्या पूर्वजांनी त्यांना कामी येतील म्हणून झाडं लावली होती का? त्यांनाही फक्त एवढच ठावूक होतं हे सावली देणार आहेत. फळ देणार आहेत. कुणाला हा प्रश्न गौण होता. अश्यावेळी झुलवा मिळालं. साडी घालून भूमिका करायची. पहिल्या दिवशीच साडी घेतली तालमी साठी. अभ्यास सुरु केला चालण्याचा. जग काय म्हणेल हा प्रश्न कलावंताला पडत नाही. जर त्याला स्वतःला काही म्हणायचं असेल. झुलवा ची भूमिका गाजली. कौतुक झालं. नाटक पाहून सुशीलकुमार शिंदे आपल्या भाषणात कौतुक करतांना म्हणाले की ज्याने अश्रु बरोबर भाकरी खाल्ली असेल तोच ही भूमिका करू शकतो. पु लं देशपांडे यांच्या सारखे कित्येक लोक शाबासकी देऊन जात होते. मला माझा डोंगर पाठीवर हात ठेवतोय असं वाटायचं. ही पण डोंगराएवढी माणसंचं! शंभर हत्तीचं बळ देणारी यांची शाबासकीची थाप. सभोवती खूप माणसं आहेत. पण ज्यांच्या शाबासकीची किंमत वाटावी अशी माणसं कमी होताहेत का? डोंगर नष्ट होताहेत का?

झुलवाने आयुष्याला वेगळं वळण मिळालं. यश अंगात भिनत जातंय की काय असं वाटायच्या आत झुलवा सोडलं. पुन्हा नवीन शोध. आमच्या या घरात नाटक सुरु झालं. झुलवा मधला साडी घालून रंगमंचावर वावरणारा मी अचानक एका भाईच्या भूमिकेत आलो. खूप मोठा बदल. पुन्हा अभ्यास. पुन्हा निरीक्षण. आणि आमच्या या घरात ने एक वेगळा थरार अनुभवता आला आयुष्यात. त्यातली भूमिका पोलीस, गुंड आणि सामान्य माणसं सगळ्या माणसांना भावली. लोक येऊन भेटायचे. एन्ट्री ला टाळ्या वगैरे नटाला सुखावणाऱ्या गोष्टी नेहमी घडू लागल्या. आंब्याच्या झाडाला पाड गवसला की कसं सुख वाटतं तसं समाधान रोज तालमीत एखादी नवीन जागा शोधतांना होतं. किंवा विहिरीत सूर मारून तळाशी असलेले दहा पैसे काढलेल्या माणसाला कळू शकते गंमत खूप कष्ट करून नाटकात बारीक बारीक जागा काढण्याची. वन रूम किचन आणि आमच्या या घरात या तशा खूप वेगळ्या भूमिका. सकाळी आणि संध्याकाळी वेग वेगळ्या भूमिका साकारताना वेगळाच थरार अनुभवायचो. मजा यायची. या काळात खूप टीवी मालिके वाल्यांशी भांडणं झाली. का कुणास ठाऊक? माझं आणी टीवीचं जमलं नाही फारसं. कदाचित मी अजूनही फास्ट फूडशी जुळवून घेऊ शकलो नाही. हेच कारण असेल. ते मानवत नाही मला. किंवा त्याचं आकर्षण वाटत नाही.

अबोली हा मराठी सिनेमा केला अमोल शेडगेचा. प्रमुख भूमिका. आदिवासी भाषा. अट्टाहासाने तीच भाषा पात्राला वापरली. शक्य तेवढं डिटेलिंग. अमोल शेडगे सारखा अभ्यासू माणूस दिग्दर्शक. भूमिकेला फिल्मफेअर चा पुरस्कार मिळालं. स्कूटर वर गेलो. त्या बाहुलीला आपण स्कूटरचा प्रवास घडवला याचंही वेगळंचं कौतुक होतं. एरवी फिल्मफेअरच्या बाहुलीच्या नशिबात कुठून आलीय स्कूटर नाहीतर? तर परिस्थितीची तक्रार कधी नव्हतीच. उलट अभिमानच. पुढे दरमिया मध्ये भूमिका मिळाली. मग शूल आला. शूल मधला बच्चू यादव. मनोज वाजपेयीने शोधून काढलं मला बच्चू यादव साठी. मग मी हा बच्चू यादव  शोधत बसलो. झपाटल्या सारखा. तो कसा बोलेल? तो कसा नाचेल? तो कसा हसेल? खूप विचार केला होता. फक्त एक विचार करायचा राहून गेला होता. तो म्हणजे ती भूमिका एवढी गाजेल. बच्चू यादव  हिट झाला. खरं तर हिंदीत काम करत राहिलो असतो त्यानंतर. मिळेल ते. लोक म्हणतील तसं. पण मग बँकेत काम करत होतो ते काय वाईट होतं? रोज तेच करायचं तर अभिनय का करायचा? कुरुक्षेत्र सारख्या काही हटके भूमिका मिळाल्या. ज्या मन लावून केल्या. लोकांनी त्यांना तेवढीच दाद दिली. पण मन रमेल असं फार नव्हतं. आणि दरम्यान दक्षिणेत एक वेगळच वळण घेत होतं आयुष्य.

सुप्रसिध्द तामिळ कवी आणि संत सुब्रमण्यम भारती यांच्या आयुष्यावरच्या सिनेमा साठी माझी निवड झाली. मी त्यांच्यासारखा दिसतो बऱ्यापैकी असं त्यांना वाटलं. तमिळ भाषा माझ्यासाठी नवीन होती. दिलेले सगळे संवाद अख्खे पाठ करायचो.भारतींच्या कविता मिळवल्या. भारतीमय झालो. नंतर कळलं ही भूमिका कमल हसनला करायची होती. इलया राजा यांनी सिनेमाचं संगीत केलं होतं. त्यांना माझे काही बारकावे खूप आवडले. ते म्हणाले शेवटच्या सीन मध्ये भारती पोटाच्या आजाराने त्रस्त होते हे फार बारकाईने दाखवलं तुम्ही. खरंतर ते मला माहीत नव्हतं. पण योगायोगाने ते घडलं. भारती एक बंडखोर कवी. तुकारामासारखं बरच म्हणणं त्याचं. आपणही कधी देव देव केलेले. म्हणतात ना खूप देव देव केल्याने कुणाला अमुक अमुक एक गोष्ट मिळाली. मला अजिबात देव देव केल्याने भारतीची भूमिका मिळाली असेल कदाचित. श्रद्धे प्रमाणे अश्रद्ध असण्याचेही काही फायदे आहेत म्हणा की. भारती माझ्या आयुष्यातलं एक सर्वोत्कृत्ष्ट वळण. तमिळ मधून तेलगु सिनेमा कडे माझा प्रवास झाला. एक गोष्ट मुद्दाम सांगावी वाटते. मराठीत काही लोकांना माझ्या आवाजा बद्दल खूप आक्षेप होता. पण तेलुगु मध्ये मात्र माझा आवाज, माझी शैली याचं खूप आकर्षण आहे. म्हणजे कन्नड किंवा तमिळ भाषेतले मी असलेले सिनेमे डब होऊन येतात तेंव्हा माझा आवाज मात्र मीच डब करावा असा आग्रह असतो. मी ज्या शैलीत बोलतो ती तेलुगु त्या लोकांना आवडते. खरंतर मी माझ्या सातारच्या शैलीत बोलत असेन. पण ते त्यांना आवडतं. या प्रवासात रजनीकांत सारख्या मोठ्या माणसांचा सहवास लाभला. अनेक चांगली माणसं, चांगले देश आणि चांगल्या भाषा समजल्या. बघता बघता हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड आणि इंग्रजी सिनेमात भूमिका केल्या. एवढ्या सगळ्या भाषांमध्ये आपण काम केलं हे खरच वाटत नाही बऱ्याचदा. ही दुर्मिळ गोष्ट आहे. पण याचा अभिमान वाटण्या ऐवजी आश्चर्य वाटतं. की अजूनही चांगल्या भूमिकेचा शोध सुरुच आहे. अजूनही खूप कष्ट करण्यासाठी एखादी भूमिका मिळावी असं वाटतं. अजूनही नवीन दिग्दर्शकाशी चर्चा करण्याची तळमळ असते. समजून घेण्याची इच्छा असते. खंत फक्त एवढीच असते की नक्षत्र माहीत नसलेल्या लोकांनी नक्षत्राच्या देण्यावर बोलू नये.

झाडाच्या सावली वरून वेळ किती झालाय हे ओळखणारी पिढी होती. आता सावली साठी सुद्धा जागा नाही. एवढ्या इमारती झाल्यात. झाडं उरली नाहीत फारशी. माझा गॉडफादर डोंगर होता. प्रत्येकाला आपला डोंगर मिळो. खंबीर. तटस्थ. मी साउथला गेलो पण मराठीची नाळ घट्ट आहे. म्हणून  माझी माणसं ,गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, गोष्ट छोटी डोंगरा एवढी,डँबिस सारख्या मराठी सिनेमांची निर्मिती केली. अजूनही सांगण्या सारखं खूप आहे. मांडण्या सारखं खूप आहे. यश अपयश पचवण्यासाठी असलेली पचनशक्ती तशीच राहो. ती राहीलच. आई एकदा नाटकाला आली होती. नाटक संपल्यावर भेटली. मी वाट बघत होतो ती कधी माझ्या कामा बद्दल बोलतेय. पण ती म्हणाली काय एसी गार होता बाबा.तर अशी निष्पाप माणसं आपल्या जवळ असतात तोवर आपण खूप संतुलित असतो. खरंतर कलावंताने फार कौतुकाचं भुकेल असू नये. अधून मधून बायकोने कौतुक केलं तरी पुष्कळ आहे. कारण ते जगातलं सगळ्यात दुर्मिळ कौतुक आहे याचा तुम्हाला ही अनुभव असेल. कौतुका पेक्षा शोध महत्वाचा आहे. कुणी तुम्ही ही भूमिका फार छान केली असं म्हणतं म्हणून आपण जगतो का? मला वाटतं ती भूमिका आपल्याला सापडण्याचा प्रवास मस्त असतो. त्या वाटेवरचा संघर्ष खूप इंटरेस्टींग असतो. एकदा ती भूमिका पडद्यावर आली की आपलं नातं संपलं. ती ओळख कधी एकदा पुसतो असं होतं. एखाद्या भूमिके बद्दल नेहमी बोलत राहणं म्हणजे वारंवार दहावीची परीक्षा देणाऱ्या मुलासारखं वाटतं मला. पुढच्या वर्गात कधी जाणार मग?  असो. नव्या पिढी बद्दल मात्र  फार चिंता करणारा मी नाही. मला त्यांच्यात दोष तर दिसतच नाहीत. उलट खूप अपेक्षा आहेत.  माझ्या मुलाच्या शाळेत सगळे इंग्रजी बोलतात पण मी तर त्याच्याशी घरी मराठीत बोलू शकतो ना! मी त्याला मराठी कविता पाठ करायला लावतो. तो अभ्यासाला नसताना कुसुमाग्रजांची कविता म्हणतो तेंव्हा माझ्यातला बाप खूप समृद्ध होतो.

साउथ बद्दल लोकांचं नेहमी मत असतं की तिकडे लोक मुद्दाम आपल्या भाषेतले सिनेमे पाहतात. त्यांचं भाषेवर प्रेम आहे. गोष्ट एवढी नाही. त्यांचं त्यांच्या कलेवरही तेवढच प्रेम आहे. आणि त्यांच्यात तेवढी शिस्तही आहे. प्रश्न आपलं भाषेवर किती प्रेम आहे याचा आहे. आणि प्रश्न आपली खरी भाषा कोणती हा आहे. बऱ्याच वर्षा पासून  मी बैलावरच्या कविता गोळा करतोय. त्याचं पुढे मागे सादरीकरण करणार आहे. कारण तो दस्तावेज आहे. आपल्या संस्कृतीचा. मातीशी आपली नाळ नेहमी जुळलेली राहावी हा हट्ट आहे. आता तुम्ही बारकाईने बघाल तर मनी प्लांट लावणारे लोक कमी होत चाललेत. आता पुन्हा कोरफड आणि तुळशीचं महत्व वाढतंय. मी आशावादी आहे. अस्सल बियाणं तग धरत. थोडे कष्ट जास्त लागतात. आणि गावा गावातून या क्षेत्रात धडपड करणाऱ्या माझ्या तरुण मित्रांना एवढच म्हणणं आहे. कोरफडी सारखे गुणवान असाल तर कुठे ही उगवू शकता. तुम्हाला कुणाच्या मशागतीची गरज नाही. गॉडफादर नाही म्हणून खंत नाही. डोंगर आहे ना!

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *