उपोषण

March 13, 2022

लेखन

                    महापालिकेच्या बिल्डींगसमोरची झाडाखालची जागा सदाची आहे. नावावर नाही. पण सदा तिथे असतो. कितीतरी आयुक्त आले गेले पण सदा हलला नाही. तो झाडाखाली बसून असतो किंवा झोपून असतो. गेल्या कित्येक वर्षात त्याला त्याच्या घरचे शोधायला आले नाही. सदापण कधी घराकड गेला नाही. कारण त्याचं त्याला माहित. त्याला कुणी विचारलं तर तो सांगत नाही. एक शब्द बोलत नाही. कुणी काही खायला दिलं तर खातो. नाहीतर बसून राहतो. दाढी वाढलेली आहे म्हणून बरं. ती सतत कुरवाळत राहणे एवढ एक काम सदा करतो. रोज हजारो लोक काहीतरी काम घेऊन येतात. पण सदा एकमेव माणूस आहे जो रोज महापालिकेसमोर असतो पण त्याच तिथं काहीच काम नसतं. त्याच्या नावावर कुठे घर असेल असं वाटत नाही. पण महापालिकेपाशी असलेल्या नळाचं पाणी पिताना पाणी पट्टी भरावी लागेल का काय? अशी चिंता त्याच्या चेहऱ्यावर दिसते. झाडाखाली झोपलेला असताना पण तो अस्वस्थ असतो. जणू काही मालमत्ता कर भरायची शेवटची तारीख आहे. एकूण सदा चिंतेत असतोच.

                    आजकाल सदाची चिंता वेगळीच होती. त्याला झाडाखाली बसायलाच मिळत नव्हतं. दर दिवसाआड तिथं कुणी ना कुणी काही ना काही मागण्या घेऊन आंदोलन करायचे. मोर्चे त्या लिंबाखाली थांबायचे. मग मोर्चाचं रूपांतर सभेत व्हायचं. त्या गोंधळात सदा बिचारा कुठेतरी उन्हात बसून रहायचा. त्याला लोक मोर्चातून, सभेतून हकलून द्यायचे. उपोषण असेल तर सदाची जास्तच गोची व्हायची. कारण उपोषण वाले लवकर हलायचे नाहीत. मंडप आणि गाद्या टाकून पडून रहायचे. मग सदाला त्या तिथे जायची परवानगीच नसायची. मोर्चेवाले लगेच निघून जायचे म्हणून सदा त्यांच्यावर रागवायचा नाही. पण उपोषण वाले त्याला आवडायचे नाही. कारण ते दोन चार दिवस त्याची जागा सोडायचे नाहीत. खूपवेळा सदा उपोषण करणाऱ्या लोकांवर धाऊन जायचा. दूर बसून त्यांना सतत उठ तिथून असे इशारे करायचा. नवीन नवीन उपोषण करणारे घाबरून जायचे. दोन चार सराईत उपोषणवाले सदाला घाबरायचे नाहीत. त्यांचा उपोषण हा पोटापाण्याचा धंदा होता.            

                    एक दिवस भलताच प्रकार झाला. एक उपोषण सुटल्यावर लोक निघून गेले. मंडपवाल्याने रात्र खूप झाली म्हणून मंडप तसाच ठेवला होता. मग सदा रात्री कुणी नाही बघून त्या गादीवर झोपला. खूप भारी वाटलं त्याला. त्याच्या डोक्यात आलं की आपण उपोषण केलं पाहिजे. एक दिवस नाही. रोज. पण खूप वेळ विचार करूनही त्याला कुठलीच मागणी सुचली नाही. सदा त्या गादीवर झोपू शकला नाही. रात्रभर विचार करत राहिला. आपण उपोषण केलं तर कुठली मागणी करायची? कुणी नौकरीसाठी उपोषण करतो, कुणी पगारासाठी, कुणी पेन्शनसाठी. आपण कशासाठी उपोषण करायचं? सदाला काहीच सुचत नव्हतं. विचार करता करता त्याने कूस बदलली. त्याला आश्चर्याचा धक्का बसला. उपोषण करणारे एक पिशवी विसरून गेले होते. त्यात काजू बदाम होते. सदा खुश झाला. पण काही क्षणच. पुन्हा उपोषणाचा विचार त्याच्या डोक्यात घोळू लागला. आपण जर उपोषण करायचं ठरवलं तर आपल्याला जमेल का? आपण किती दिवस उपाशी राहू शकतो? आजपर्यंत अशी वेळ खुपदा आली. पण कधी केळीचा गाडीवाला खराब केळी फेकून द्यायच्या ऐवजी सदाला देऊन जायचा. कधी समोरचा हॉटेलवाला उरलेले भजे किंवा वडे द्यायचा. खरतर सदाने परिस्थितीला कंटाळून खूप वर्षापूर्वी मरायचं ठरवलं होतं. पण त्याला खूप वाईट अनुभव आला. तुमची परिस्थिती वाईट असली की जग तुम्हाला मरू देत नाही. आणि तुमची परिस्थिती खूप चांगली असली की लोक तुम्हाला सुखात जगू देत नाहीत. सदा विचार करत राहिला. समोर असलेली काजू बदामची पिशवी त्याला सारखी खुणावत होती. पण आज उपोषणाला मागणी सापडल्याशिवाय काही खायचं नाही हे सदाने ठरवून टाकलं.

                    सदाला काहीतरी मानसिक त्रास होता. कुणाशी बोलायची इच्छाच नसायची त्याची. पण आज त्याला जास्त त्रास होत होता. काहीतरी बोलावं वाटत होतं. काहीतरी मागावं वाटत होतं. पण काय मागायचं कळत नव्हतं. आपलं आयुष्य एवढ निरर्थक आहे की आपली काही मागणीच असू शकत नाही हे त्याला वेदना देणारं होतं. मग तो त्याच्यासारख्या खूप लोकांचा विचार करत राहिला. आपल्या देशात असे कितीतरी लोक आहेत ज्यांची काही मागणीच नाही. आपल्या देशात असे लाखो लोक रस्त्यावर आहेत ज्यांना स्वतःसाठी नेमकं काय मागावं हेच कळत नाही. अचानक त्याला उपोषण करणाऱ्या लोकांबद्दल आदर वाटू लागला. कुणी भ्रष्टाचाराबद्दल उपोषण करायचं, कुणी पाणी येत नाही म्हणून उपोषण करायचं. एकदा तर एका बाईने डुकरं खूप झालेत म्हणून उपोषण केलं होतं.

                    सदा सगळे विषय आठवत राहिला. यातल्या कुठल्या विषयावर आपण उपोषण करायचं? कुत्रे भुंकत होते. त्यांनी त्याला रात्र रात्र झोपू दिलेलं नव्हतं. या कुत्र्यांना अटक करा म्हणून उपोषण करायचा विचार त्याच्या डोक्यात आला. पण कितीतरी रात्री या कुत्र्यांशी खेळत घालवल्या होत्या. या कुत्र्यांचा आधार होता. महापालिकेने जर सर्व्हे केला तर त्या परिसरात सगळ्यात जास्त प्रमाणिक ते कुत्रेच असतील. पालिका दरवर्षी तोट्यात जाते. तिजोरी रिकामी होते. पण कुत्रे कधीच अधिकारी किंवा नगरसेवकावर भुंकत नाहीत. कुत्र्यांकडून माणसं प्रेरणा घेत असतील का माणसांकडून कुत्रे ?  थोडावेळ सदा वेगळ्याच विचारात गढून गेला. अचानक त्याच्या लक्षात आलं की पालिकेचं कुत्र्यांसाठी पण बजेट आहे. गाड्या आहेत.  पण त्याच्यासारख्या माणसांसाठी काही नाही. आणि तरीही त्याच्याकडे पालिकेला मागावं असं काही नाही. त्याला आता जास्तच लाज वाटायला लागली स्वतःची.

               सदा चार चौघांसारखं घर मागू शकला असता. पण घर आलं की कर आला. वीज आली. बिल आलं. खरतर त्याला फक्त ते लिंबाचं झाड महत्वाचं होतं. ते झाड सोडून तो गेली काही वर्ष राहूच शकत नव्हता. खरतर त्या झाडाजवळ मोठं ड्रेनेज होतं. खुपदा भयंकर वास यायचा. पण लोक सावलीमुळे तो वास सहन करत थांबून रहायचे. समोर महापालिका असल्यामुळे खुपदा साफ सफाई व्हायची. माणूस आत उतरायचा. सदा पूर्णवेळ ती सफाई बघत रहायचा. तो माणूस बाहेर येईपर्यंत सदा त्या ड्रेनेजच्या तोंडाशी बसून रहायचा. त्या दिवशी येणारी जाणारी माणसं त्याला वेडा ठरवायची. एरव्ही शांत आणि साधा वाटणारा सदा लोकांना विचित्र वाटायचा. पण सदाने नियम बदलला नाही. तो ड्रेनेज सफाईच्या वेळी तसाच बसून राही. तो असं का करायचा हे सुद्धा त्याने कधीच कुणाला सांगितलं नाही. पण त्या ड्रेनेजमध्ये त्याचे वडील गुदमरून वारले होते. सदाला वाटायचं आत गेलेला माणूस त्यांना घेऊन येईल. असं त्याला वर्षानुवर्ष वाटत राहिलं. त्याने कधी नुकसानभरपाई मागितली नाही. हे कळलं कसं?

                    रात्री उपोषण करायचं तर कोणती मागणी करायची? हा विचार करत सदा त्या रात्री झोपलाच नाही. आणि पहाटे कधीतरी त्याचा डोळा लागला तो कायमचा. डॉक्टरचा असा अंदाज आहे. शवचिकित्सा झाली नाही. शेजारी काजू बदाम असताना सदा मेला. बाप मेला त्याच जागी. खरं सांगायचं तर त्याला नुकसानभरपाई म्हणून बापाची नौकरी देऊ केली होती. पण सदाची हिंमत झाली नाही. अधिकारी म्हणाला होता, हो का नाही ते वेळ घेऊन सांग. सदा कधीच सांगू शकला नाही. तो वाट बघत राहिला. बापाच्या जागी काम करायला हो म्हणायचं का नाही म्हणायचं हे त्याला ठरवता आलं नाही. बाप ड्रेनेजमध्ये काही वेळात गुदमरून मेला होता. सदा कितीतरी वर्ष बाहेर गुदमरत राहिला. बापाला शोधत राहिला. त्याला काहीच मागता आलं नाही. स्वतःसाठी काही मागता न येणारे लोक असेच शांतपणे नाहीसे होतात. त्याच झाडाखाली कधी कधी एक भविष्य सांगणारा बसायचा. पोपट घेऊन. तो सदाची डेड बॉडी बघून मनात म्हणाला, सदाला चांगला भिकारीसुद्धा होता आलं नाही. तेवढ्यात पुन्हा नवीन मोर्चा आला. पुन्हा नवीन मागण्या सुरु झाल्या. 

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *