महात्मा गांधी. जहां होंगे वहां.

July 10, 2020

लेखन

arvind jagapat patra

गांधीजी नोटांवर आहेत. गांधीजी ओठांवर आहेत. गांधीजी भिंतीवर आहेत. फक्त गांधीजी आपल्या आचरणात नाहीत. विचारात नाहीत. 

एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने कॉलेजच्या काळात बाहेरगावी निघालो होतो. बस एका डेपोत थांबली होती. दृश्य नेहमीप्रमाणेच. गोंगाट, गर्दी. त्यात चारपाच डुकरं फिरताना दिसत होते. समोरच्या सीटवर बसलेली मुलगी म्हणाली ते बघ राष्ट्रपिता. डुकराकडे बघून ती राष्ट्रपिता म्हणत होती. तिला आम्ही हसावं असं वाटत होतं. पण त्यात विनोद काय आहे हे आम्हाला लक्षात आलं नाही. मुळात त्यांना राष्ट्रपिता का म्हणायचं? खरंतर गांधीजी ऐकून माहिती होते. फार वाचलेलं नव्हतं. पण गांधीजी या माणसाबद्दल काही लोकांना किती तिटकारा आहे हे त्यादिवशी पहिल्यांदा जाणवलं. त्याकाळात एक शेर वाचला होता. 

उसके दुश्मन है बहोत, आदमी अच्छा होगा. 

गांधीजींबद्दल असंच काही वाटू लागलं. हळू हळू त्यांच्याबद्दल वाचायला लागलो. त्यांच्यासारख आपण जगू शकत नाही, वागू शकत नाही असं आपल्याला वाटायला लागतं. पण मुळात या देशात त्यांचा चमत्कारी पुरुष किंवा थेट देशाचे शत्रू असाच विचार केला जातो. गांधी एक माणूस होते हे फार कमी लोक लक्षात घेतात. गांधीजी आपल्यासारखेच होते. त्यांना राग यायचा. ते हट्टी होते. ते विनोदी होते. ते बायकोशी भांडायचे. त्यांच्या मुलाशी त्यांचे वाद होते. हे सगळं चार चौघासारखच होतं. तरीही आपल्याला ते आपल्यासारखे वाटत नाहीत. खरतर आजकाल डायट वाल्या तज्ञांकडून जेवण झाल्यावर लगेच पाणी पिऊ नये किंवा अमुक गोष्टी कराव्यात असं लोक पैसे देऊन शिकत असतात. हे सगळं गांधीजींचे विचार वाचले तरी शिकायला मिळतं.  

पण आपल्या देशात जेवढी विविधता आहे तेवढाच विरोधाभास. म्हणजे स्वदेशीचा आग्रह धरणारे काही लोक ज्या माणसाने स्वदेशीचा सर्वोत्तम विचार दिला त्या गांधीना बेंबीच्या देठापासून विरोध करताना दिसतात. हिंदुत्ववादी असणारे काही लोक या देशातल्या आदर्श हिंदू अशा गांधीजीना विरोध करतात. खरंतर ज्या नित्यनेमाने गांधीजी रोज प्रार्थना करायचे तशी विरोध करणारयापैकी किती लोक करत असतील? आज भक्त शब्दाचा अर्थ संकुचित झालाय. ज्याच्या त्याच्या पक्षापुरता. पण गांधीजींचे खरे भक्त म्हणावेत तर ते होते सरदार पटेल. आयुष्यभर गांधीजींच्या विचारसरणीने वागले पटेल. पण ज्यांना पटेल खूप आवडतात त्यांना गांधीजी मात्र आवडत नाहीत. म्हणजे त्यांना पटेल आवडतात. पटेलांना गांधीजी आवडायचे. कट्टर मुस्लिमांना पण गांधी आवडत नाहीत. कारण काय तर गांधीजी हिंदू. हे राम म्हणाले होते. प्रार्थना करायचे. आणि काही लोक तर गांधीजींना विरोध  करतात त्याचं  कारण काय तर लोक विरोध करतात.  

पण एवढ सगळं असूनही गांधीजी आहेत. चौकात आहेत. पटेल रोडवर आहेत. आंबेडकरनगरमध्ये आहेत. विवेकानंद चौकात आहेत. इंग्लंड अमेरिकेत आहेत. जगभरात जिथे लिहिणारी वाचणारी माणसं आहेत तिथे गांधीजी आहेत. 

गांधीजी नोटांवर आहेत. गांधीजी ओठांवर आहेत. गांधीजी भिंतीवर आहेत. फक्त गांधीजी आपल्या आचरणात नाहीत. विचारात नाहीत. शाकाहाराचा पुरस्कार करणारा जगातला सगळ्यात प्रभावी माणूस होते गांधीजी. पण शाकाहारी माणसांना त्यांचं हे ऋण मान्य असतं का? गांधीजी गोपाळकृष्ण गोखलेना आपला गुरु मानायचे. एका मराठी माणसाला. गोखले म्हणाले देश फिरा. गांधीजी शांतपणे सगळा देश फिरले. भारत समजून घेतला. दुसरा मराठी माणूस म्हणजे आपले टिळक. टिळक वारले आणि काँग्रेसची सूत्र गांधीजींच्या ताब्यात आली.  

नेहरू, पटेल आणि सुभाषचन्द्र बोस अशा तीन स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या नेत्यांना सोबत घेऊन कॉंग्रेसचा कारभार चालवला त्यांनी. एवढी प्रतिभावान माणसं एकाचवेळी एकाच पक्षात होती. बरं सुभाषबाबू भांडण करून गेले तरी महात्मा गांधींच्या विषयी त्यांना असलेल्या आदरात तिळमात्र फरक पडला नाही. गांधीजींच्या खूप गोष्टी नेहरूंना मान्य नसायच्या. पटेलांना मान्य नसायच्या. रुसवे असायचे. एकमेकांना पत्र पाठवले जायचे. आज आपल्याला इतिहास उलगडतो तो या लोकांच्या पत्रातून. गांधीजींची पत्र वाचायला हवीत. काय भारी इंग्रजी होतं त्यांचं. खरतर गांधीजींची लेखनशैली हा केवढा महत्वाचा विषय आहे. पण या विषयावर कुणी फारसं लिहित नाही. बोलत नाही. आज टाईम management वर वेगवेगळे वर्कशॉप घेतात लोक. पैसे खर्च करून हा विषय शिकतात.  

पण गांधीजींच्या छोट्या छोट्या गोष्टी शिकल्या तरी हा विषय खूप सहज शिकता येतो. वेळेचा उपयोग या गोष्टीबाबत जगात गांधीजी हे एकच उदाहरण शिकलो तरी पुरेसं आहे. बरं गांधीजी हे स्वतःच्या बाबतीत नाही तर इतरांच्या बाबतीतही करायचे. म्हणजे लोकांना वेळेचं नियोजन करून देणं आवडायचं त्यांना. कुणी म्हणालं लिहायला वेळ मिळत नाही, कुणी म्हणालं वाचायला वेळ मिळत नाही की लगेच गांधीजी त्याला टाईम टेबल आखून देणार. गांधीजी एकावेळी दोन रुमाल वापरायचे खुपदा. कारण काय तर एक नाक पुसायला आणी एक तोंड पुसायला. नाक पुसायचा रुमाल तोंड पुसायला कसा वापरणार? सध्या साध्या गोष्टीत गांधीजी आदर्श उदाहरण घालून द्यायचे. 

गांधीजींच्या आयुष्यातला आणखी एक मराठी माणूस म्हणजे विनोबा भावे. विनोबा गांधीजींचे शिष्योत्तम. विनोबा भावेंनी गांधीजींचा कुठला गुण सगळ्यात जास्त घेतला तर भाषा. विनोबांची मराठी किती छान होती. पु ल देशपांडे यांच्या शाब्दिक कोट्या आपल्याला माहित आहेत. पण विनोबा त्यांच्या आधी असं खूप काही लिहून गेलेत. विनोबा भावे म्हणयचे की सर्वच प्रश्न सोडवून सुटणारे नसतात, काही प्रश्न सोडून दिले की मगच सुटतात. किंवा त्यांचं आणखी एक वाक्य आहे, सरकारी प्रकल्प असरकारी नहीं होते. हा विनोद गांधीजींच्या सहवासात आणखी बहरत असणार. कारण गांधीजी उगाच गंभीर नसायचे. सतत काही न काही प्रयोग करत रहायचे. खाण्याचे, औषधाचे, रोजच्या कामांचे. त्यांच्या आश्रमातली व्यवस्था अभ्यास म्हणून पाहिली पाहिजे.  

आपल्याकडे व्यवस्थापन शास्त्रात नेहमी परदेशी उदाहरण देऊन शिक्षण दिलं जातं. खरतर गांधीजींच्या आश्रमातली व्यवस्था, गांधीजींचा मिठाचा सत्याग्रह, चले जाव आंदोलन हे विषय किती महत्वाचे आहेत. दांडी यात्रा कशी सुरु झाली, त्यात कुठल्याही सोशल मिडियाचा, फोनचा आधार न घेता गावोगाव लोक कसे गोळा होत गेले, त्यातला बायकांचा सहभाग कसा वाढला? या गोष्टी व्यवस्थापनाचा आदर्श नमुना म्हणून शिकल्या पाहिजेत. खरतर आज चमत्कार वाटाव्या अशा या गोष्टी आहेत. पण आपण त्यांचं महत्व ओळखण्यात कमी पडतोय. गांधीजींचा तिरस्कार वाटणाऱ्या लोकांनी पण या गोष्टी शिकल्या पाहिजेत. 

गांधीजी देशभर फिरत असायचे. देशभरातून लोक त्यांना पत्र लिहायचे. पण ती पत्र गांधीजींपर्यंत पोचायची कशी? आश्चर्य वाटेल पण गांधीजींना येणाऱ्या पत्रावर बऱ्याचदा…

महात्मा गांधी
जहां होंगे वहां 

असा काहीसा पत्ता लिहिलेला असायचा. आणी ती पत्र  गांधीजींपर्यंत पोचायची सुद्धा. प्रचंड मोठा पत्रव्यवहार, वर्तमानपत्रातलं नियमित लेखन, हिंदू धर्माविषयी लिखाण, ग्राम स्वराज समजून सांगणारं लिखाण, आत्मचरित्र. काय काय लिहून ठेवलय एकाच माणसाने. गांधीजींविषयी बोलताना आपण नेहमी या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे. एकाच आयुष्यात या माणसाने अशक्य वाटतील अशी अनेक मोठ मोठी कामं केलेली आहेत. त्यांच्यावरच्या कुठल्याही टीकाकराची स्वप्नात पण एवढी कामगिरी असू शकत नाही. तरीही गांधीजींना देशातल्या प्रत्येक गोष्टीला जवाबदार धरलं जातं. कुठल्याही पदावर नसलेल्या माणसाला या देशातल्या प्रत्येक घटनेची जवाबदारी दिली जाते. आणि फार कमी वेळा त्यांना यशाचं भागीदार केलं जातं. गांधीजींना जिवंतपणीच द्वेषाचा सामना करावा लागला. मुस्लिमांनी हिंदू म्हणून दोष दिला. हिंदूंनी मुस्लिमांची बाजू घेतात म्हणून दोष दिला. हे सगळं ते शांतपणे सहन करत होते. एवढी ताकद कुठून आणायचे काय माहित? पण बंदे में था दम हे त्यांच्यासाठी खरच सार्थ आहे. 

सरदार पटेलांच्या बाबतीत बोलताना, लिहिताना गांधी नेहरूंना बदनाम केल्याशिवाय काही लोक पुढे जाउच शकत नाहीत. पण गांधीजींनी सरदार पटेलांच्या बाबतील लिहिलेल्या काही ओळी वाचल्यावर त्यांच्यातलं नातं नेमकं कसं होतं हे समजून घेता येईल. 

सरदार पटेलांच्याबरोबर तुरुंगवासात राहायची मिळालेली संधी हा माझ्या आयुष्यातला एक अतिशय आनंदाचा प्रसंग होता. त्यांचं असीम धैर्य आणी ज्वलंत देशभक्ती मला माहित होती. पण त्या १६ महिन्यात मिळालं तसं त्यांच्या सहवासात राहण्याचं भाग्य मला मिळालं नव्हतं. त्यांचं माझ्यावरचं प्रेम आणी आत्मीयता बघून मला माझ्या आईची आठवण होत असे. त्यांच्यासारख्या व्यक्तीच्या र्हुदयात एवढी आईची माया असेल अशी कल्पनाही मी कधी केली नव्हती. माझी प्रकृती किंचितही बिघडली तर पुढच्या क्षणी ते माझ्याशेजारी असत आणी मला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीची जातीने काळजी घेत.” 

असं नातं दोन नेत्यांमध्ये बघायला मिळेल का? त्याग, निष्ठा, प्रेम, आदर या सगळ्या गोष्टी गांधी आणि पटेल यांच्या नात्यात होत्या. एका पत्रात गांधीजी लिहितात, पटेल माझ्याबरोबर आहेत. दिवसातून अनेकवेळा ते मला विनोद सांगत असतात. त्यांच्या विनोदावर मी पोट धरून हसतो.’ आपण नेहमी पटेलांना पोलादी पुरुष म्हणून बघतो. आपण तेवढाच इतिहास शिकतो. पण इतिहास आपल्या अभ्यासापेक्षा खूप मोठा असतो. खुपदा खूप वेगळा असतो. मुख्य म्हणजे सगळी हाडामांसाची माणसं असतात. आपण दैवतीकरण केलं नाही तर आपल्याला महापुरुषांमधला माणूस समजायला मदत होते. आणि एकदा एखाद्या महात्म्यातला माणूस आपल्याला आवडायला लागला की आपण त्याला जास्त समजू लागतो. त्याची आरती करत नाही. द्वेष करत नाही. त्याला स्वच्छपणे बघू लागतो. मला कुणी गांधीजींचे दोष सांगितले तर राग येत नाही. कारण दोष नाही असा माणूस जगात कुठेच नाही आणि कुणीच नाही याची मला खात्री आहे. गांधीजींच्या खूप गोष्टी मला पटत नाहीत. पण म्हणून चांगल्या गोष्टीपण समजून घ्यायच्या नाही असं थोडच आहे? मला गांधीजींची सगळ्यात आवडणारी गोष्ट कोणती असेल तर आज सुदैवाने कुठल्या जाती धर्माच्या चष्म्यातून गांधीजींकडे कुणी बघत नाही. एका तटस्थ माणसाचं जीवन वाचतोय असं वाटू लागतं. भारतात कुणीच त्यांना जातभाई म्हणत नाही. गुजराती म्हणून जास्त जवळीक दाखवत नाही. गांधीजी यांच्याकडे गांधीजी म्हणून बघता येतं. फार फारतर बापू. 

आजही आपल्या देशाचे पंतप्रधान परदेशात जातात तर तिथे असलेल्या गांधीजींच्या पुतळ्याला भेट देतात. कुठे पुतळा असतो. स्मारक असत. स्वच्छ भारत योजना असेल तर गांधीजी असतात. गांधीजीं शिवाय पान हलत नाही. हलणार नाही. गोळ्या घालून मरणाऱ्यापैकी गांधी नव्हते. शिव्या शापाने डगमगणारे गांधी नव्हते. द्वेष त्यांच्या पाचवीला पुजलेला होता. आहे. आजही दोन ऑक्टोबरला दारू मिळत नाही म्हणून त्यांच्या नावाने बोटं मोडणारे आहेतच. पण गांधीजी सरकारी कार्यालयाच्या भिंतीवर शांतपणे हसत असलेले दिसतात. आधीच्या सरकारच्या गरिबी हटाव घोषणा ऐकून पण ते असेच हसत होते. आता अच्छे दिनच्या घोषणा ऐकूनही तसेच हसतात. त्यांनी कॉंग्रेस विसर्जित करायला सांगितली होती. पण आज असा कुठला पक्ष आहे जो त्यांना मान्य असता? कारण आपण त्यांना शोधू शकलो नाही अजून. कदाचित पुन्हा त्यांना पत्र पाठवाव लागेल. महात्मा गांधी. जहा होंगे वहा.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *