प्रिय मावशी,

September 2, 2020

लेखन

arvind jagapat patra

मावशी, हिशोब काय सगळ्यांचाच चुकतो. देशाच्या काय जगाच्या अर्थव्यवस्थेचाही चुकलाय. पण आम्ही फक्त अठराशे रुपयांवर चर्चा करू शकतो. देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल कोण बोलणार?

गेले चार पाच महिने स्वतः धुणी, भांडी आणि स्वयंपाक करताहेत बहुतेक लोक. प्रत्येक घरात तुमची रोज आठवण निघतेय. फरशी पुसताना पाठ दुखावते तेंव्हा वाटतं मावशी रोज हे कसं करत असतील? भांडी घासताना कंबर दुखते उभं राहून तेंव्हा मावशी गेली किती वर्ष रोज हे करतात याचं आश्चर्य वाटतं. कित्येक वर्ष तुम्ही शांतपणे घरात येता, तुमचं काम करता आणि निघून जाता. तुम्हाला पगार दिला की विषय संपला. पण आज जाणवतय तुमचं कौतुक करायचं राहून गेलं. आपल्या घराला घरपण आणण्यासाठी प्रत्येक जण झटत असतो. त्यात काही विशेष नाही.

पण दुसऱ्यांच्या घराला घरपण देणं खूप मोठी गोष्ट असते. आज स्वतः झाडून काढताना खूप वेळा कपाटाखालून झाडायचा कंटाळा येतो. रोज दोन तरी भांड्याला साबण तसाच राहतो. खुपदा पोळीचे काठ भाजलेले नसतात. भाजीत मीठ जास्त होतं किंवा टाकायचंच राहून जातं. अशावेळी तुमच्या नावाने मनातल्या मनात खडे फोडलेले आठवतात. मग जास्तच लाजल्यासारखं होतं. तुम्ही एवढी वर्ष काम करता पण प्रत्येक नवीन घरात माणसं तुम्हाला काम कसं करायचं हे सांगत असतात. अशावेळी कमाल वाटते लोकांची. आजवर अन्नपूर्णा देवघरात नाही स्वयंपाकघरात असते हे समजून घेण्यात गेले. आई सगळी कामं एकटी करायची. आईच्या, आजीच्या काळात मिक्सर नव्हता, ओव्हन नव्हता, फ्रीज नव्हता. सगळ्या गोष्टी ताज्या बनवाव्या लागायच्या. आता तुमच्याकडे बघून आई, आजी, मावशी आठवतात.

मावशी, खरतर तुम्हाला नेहमी आरामात जगता यायला पाहिजे. पण असं एखाद्या साथीमुळे नाही. कोरोनासारख्या रोगांच्या नावात फक्त साथ असते. पण आपल्या कितीतरी माणसांची सोबत नसते या साथीच्या काळात.. तुम्ही घराचा भाग आहात. तुमचं नुकसान होणार नाही ही आमची जवाबदारी आहे. आपल्या सगळ्यांची जवाबदारी आहे. या तीन चार महिन्यात एक गोष्ट नक्की शिकलो. कामवाली नाही तुम्ही मावशी आहात. आमच्या घरातल्या एक आहात. घरातली कामं केल्यावर आई, बायको, बहिण यांच्याबद्दल आदर वाढलाच. पण तुमच्याबद्दलही खूप आदर वाटतोय मावशी.

बाकी काही काळजी करू नका. फक्त स्वतःची काळजी घ्या. तुमच्यापैकी खूप जणींनी पुन्हा कामाला सुरुवात केलीय. खूप जणी अजून कामावर जाऊ शकल्या नाहीत. थोड्या फार फरकाने सगळेच चिंतेत आहेत. पण हीच वेळ आहे एकमेकांना धीर देण्याची. समजून घेण्याची. अशाच एका मावशींचा हिशोब चुकला आणि त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला. या तणावाच्या काळात काही क्षण लोकांच्या चेहऱ्यावर हसू आलं. तो विषय तेवढ्यापुरता आहे लोकांसाठी. हसून सोडून देतील. पण तुम्ही हा विषय सोडून देण्यासारखा नाही.

तुमचा हिशोब इथून पुढे कधीच चुकायला नको. तुम्ही फक्त पैसे या गोष्टीवरच लक्ष द्या असं नाही. ते चोख घ्यायलाच हवेत. पण पुन्हा कुणी गम्मत म्हणून आपला असा व्हिडीओ तर बनवत नाही ना याची पण काळजी घ्या. तुमच्या भावनेचा असा गैरफायदा नको. मुळात तुमच्या परवानगीशिवाय तुमचा असा व्हिडीओ बनवणे आणी तो व्हायरल करणे चूक आहे. तुम्ही स्वयपाक करून लोकांचं पोट भरता. तुम्ही घराला घरपण देता. अशावेळी तुमच्या नकळत तुमचा व्हिडीओ बनवणं चूक आहे. या व्हिडीओचं यश बघून असे प्रकार वाढतील. पण तुम्ही हे सहन करू नका. दुर्दैवाने काही सिनेमांनी मनोरंजनाचा विषय बनवला तुमचा. पण त्यात कलावंत असतात. त्यांचं काम आहे मनोरंजन करणे.

पण म्हणून एखादा साधा सरळ माणूस मनोरंजनाचा विषय होऊ शकत नाही. आपल्या नकळत आपण असे व्हायरल झाल्यावर काय त्रास होतो हे लोकांना नीट लक्षात येत नाही. खुपदा स्वतःवर बेत्ल्याशिवाय कळत नाही माणसाला. अशा प्रकारचे व्हिडीओ मनस्ताप देणारे ठरू शकतात. हा व्हिडिओ खरा आहे खोटा आहे माहित नाही. पण असं कुणाच्या बाबतीत होऊ नये. मागे एक शिक्षिका आजारी होती म्हणून टेबलवर डोकं ठेवून झोपली. तर तिचा फोटो व्हायरल झाला. काय तर म्हणे बघा शिक्षक झोपा काढतात वर्गात. वस्तुस्थिती माहित नसताना एखाद्याला असा मनस्ताप देतो आपण. जिवंत माणसं मेली म्हणून श्रद्धांजली वाहतो. हे थांबायला पाहिजे. आपल्या घरातल्या लोकांचे कुणी असे व्हिडीओ टाकतात का?

मावशी, हिशोब काय सगळ्यांचाच चुकतो. देशाच्या काय जगाच्या अर्थव्यवस्थेचाही चुकलाय. पण आम्ही फक्त अठराशे रुपयांवर चर्चा करू शकतो. देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल कोण बोलणार? कारण अठराशे रुपयांचा हिशोब हसवतोय. देशाचा जीडीपी मात्र हादरवून टाकणारा आहे. हे सगळ्या जगावरचं संकट आहे. त्यातही सगळे राजकारण करतील. हे हिशोब लोक विसरतील. पण तुम्ही हिशोबाला पक्क्या रहा. ठाम रहा. आणि हे असे व्हिडीओ बनवणाऱ्यापासून सावध रहा.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *