मेमरीची एक गंमत असते. वय वाढत जाते तशी मेमरी कमी होत जाते. मेमरी कार्डचंही असच. जसजसं तंत्रज्ञान प्रगत झालं, मेमरी कार्ड बारीक बारीक होत चाललेत. अर्थात साठवण वाढत चाललीय. एकाच कवितेची कितीतरी पानं असायची वहीत. खाडाखोड भरपूर. आपण केलेल्या चुका दिसत रहायच्या कायम पानोपानी. आता laptop मुळे तसं होत नाही. आपल्या चुका आता क्षणात मिटवता येतात. म्हणून खुपदा वाटतं चुका दिसत नाहीत हे काही बरं नाही. चुका एवढ्या सहज लपवता यायला नकोत. त्या शिकवणाऱ्या असतात. मेमरीत त्या राहिल्या पाहिजेत. मागे वळून बघितलं तर चुकाच खूप आठवतात. वर्गात वहीच्या मधल्या पानावर लिहिण्यापेक्षा मागच्या पानावर लिहायची हौस होती. काहीबाही ओळी, चित्र, हिशोब. ते शेवटचं पान केवढं भारी वाटायचं. त्या शेवटच्या पानावरच्या गोष्टी आपण जगलेल्या असतात. बाकी खारे वारे, मतलई वारे, संपृक्त द्रावण आणि पायथागोरस फक्त पुस्तकात राहतात.

गावाची ओढ होती. मातीचा लळा होता. म्हणून जमिनीवर राहण्यात कायम आनंद वाटतो. कायम मोठमोठ्या लेखकांना भेटायची हौस होती. विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे, नारायण आठवले अशा लोकांना काही ओळख नसताना कॉलेजमध्ये असतानाच भेटलो. अशी माणसं भेटली की स्वतःला लेखक म्हणायचं धाडस होत नाही. पण लेखक व्हायची इच्छा नक्कीच होते. आपण जे काही लिहितो ते कसं आहे हे लोक ठरवत असतात. पण मला वाटतं माझ्यात चांगल्या लेखकाचा एक गुण नक्की आहे. आणि तो म्हणजे लिहिण्याचा आळस. सुरुवातीपासून मला लिहायचा कंटाळा आहे. आमच्या एका सरांनी सांगीतल होतं की, कागद झाडाचा बनतो. म्हणून काहीही लिहिताना विचार करायचा की खरच आपल्या ओळींसाठी कागद वाया घालवायचा का? पर्यायाने झाडच वाया घालवायचं का ?

लेखक म्हणजे लिहिणारा माणूस हा एक मोठा गैरसमज असतो. लेखक म्हणून जगणं भन्नाट असतं. शोधत राहणं महत्वाचं असतं. जोपर्यंत आपण शोधत असतो तोपर्यंत आपण लेखक असतो. लिहिणारे खूप लोक असतात. लेखक कमी असतात. लेखक लवकर कागदाकडे वळत नाही. तो गोष्टी जगत राहतो. बघत राहतो. सुदैवाने शाळेत असताना स्नेहसंमेलनात लेखक यायचे. लेखक म्हणजे कुणीतरी भारी माणूस असतो, खूप छान गोष्टी सांगणारा हे लहानपणापासून मनात ठसलं होतं. शंकर पाटील, द. मा. मिरासदार, कुसुमाग्रज, विंदा, वसंत बापट, पाडगावकर, पूल देशपांडे अशी कितीतरी माणसं ऐकायला वाचायला मिळायची. ही माणसं फिरणारी होती. माणूस वाचणारी होती. हे लोक खरे स्टार होते. साने गुरुजी यांची श्यामची आई हे पुस्तक वाचलं नसेल तर आपण मराठी नाही. तुकारामाचा अभंग ऐकला नसेल तर आपण मराठी नाही. हे सगळं शाळेत आपोआप वाचायला मिळालं. दुसऱ्या लेखकाचं एखादं पुस्तक दुकानात मिळाल्यावरही अगदी पुरस्कार मिळाल्यासारखा आनंद वाटणारी माणसं माझ्या ओळखीची आहेत. खजिना शोधल्यासारखी आयुष्यभर दुर्मिळ पुस्तकं शोधणारी कितीतरी माणसं मला माहित आहेत. एखादी चांगली कविता किंवा ओळ ऐकली की कधी एकदा दुसऱ्याला ऐकवतो असं होणारे असंख्य मित्र आहेत. आपल्या मित्राने लिहिलेलं आवडलं नाही की फोन करून किंवा भेटून बिनधास्त शिव्या देणारी माणसं जवळ आहेत हे मोठ्ठ भाग्य. खरतर ही माणसं आपल्याला घडवत असतात. आपण लेखक असलो तरी माणसं फक्त पात्र नसतात. आधी मित्र असतात. चांगल्या लेखकाच्या कलाकृतीत त्याचा भवताल डोकावत असतो. त्याच्या अवती भवतीची झाडं, नद्या, पक्षी, माणसं त्याच्या लेखनात डोकावत असतात. लेखनात त्यांचं योगदान मोठं असतं.

आपल्या लिखाणात आलेल्या निसर्गाला आपण कधी धन्यवाद देत नाही. आपण जगलेल्या गावाचे, शहराचे आपण आभार मानत नाही. पण टपरीवर उभे राहून घेतलेले दहा दहा कप चहा आणि जगभरच्या गप्पा. रात्री बेरात्री केलेली फिरस्ती. बस डेपोवर बसची वाट बघत काढलेल्या रात्री, नाटकाच्या तालमी, मित्रांची हॉस्टेलची रूम, वेगवेगळ्या संघटनेत, पक्षात झपाटून काम करणारे कार्यकर्ते मित्र असे अनेक लोक. हे सगळे आपल्या लेखनात सतत डोकावत असतात. या सगळ्यांचे कधीतरी आभार मानावे वाटतात. मी एका अर्थाने सुदैवी समजतो की डाव्या उजव्या सगळ्या विचारधारेचे लोक चांगले मित्र आहेत. जवळपास प्रत्येक संघटनेत काम करणारे लोक जवळचे आहेत. वेगवेगळ्या पक्षात काम करणारे कार्यकर्ते नेहमी सम्पर्कात असतात. या सगळ्यांचा संघर्ष जवळून पाहिलाय. धावपळ करून पदरच्या पैशांनी कार्यक्रमात हारतुरे आणणाऱ्या कार्यकर्त्याला साधे झेंडूचे फुल सुद्धा मिळत नाही. नेत्याच्या रक्तदान शिबिराला रक्त द्यायला पन्नास पोरं घेऊन येणारा कार्यकर्ता स्वतःच्या बापाला मात्र दवाखान्यात बेड मिळवून देऊ शकत नाही. आपला नगरसेवक कोरोनामुळे भरती आहे हे कळल्यावर दवाखान्यात त्याच्या रूमच्या बाहेर खिडकीत रात्र रात्र बसून राहिलेले कार्यकर्ते माहित आहेत. या सगळ्यांच्या गोष्टी खूप चीड आणतात. कीव आणतात. पण ही सगळी जिवाभावाची मंडळी असल्यामुळे जवळ असतात. हे सारखं सारखं लिखाणात डोकावत जातं. म्हणून पत्रास कारण की…. किंवा विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? सारखी गाणी लिहून झाली. गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा सारखे चित्रपट किंवा चला हवा येऊ द्या मध्ये लिहिलेली पत्रं किंवा कथा असोत. कार्यकर्ता हा माझ्या लिखाणाचा विषय असतोच. हे ठरवून होत नाही. आपोआप होत जातं. धडपडणारे लोक नेहमीच जवळचे वाटतात. त्यांची काळजी वाटते. आणि आपण काळजी करू लागलो की आपण आपोआप लिहू लागतो. सुरवंट दिवसेंदिवस पान कुरतडत असतं आणि मग कधीतरी त्याचं फुलपाखरू बनतं. फुलपाखरू व्हायचं स्वप्न प्रत्येकाचंच आहे. पण तोवर आपण पानं कुरतडत राहिली पाहिजेत.