पाकिस्तानचं यान

March 29, 2020

लेखन

arvind jagapat patra

गाव तसं शांत.

गाव तसं शांत. रात्री भजनाचा काय तो आवाज. बाकी सगळे आपापल्या कामात. गावात एक शाळा आहे. त्या शाळेत तात्याची मुलगी कविता शिक्षिका आहे. तात्या तसा दोनदा सरपंच राहिलेला माणूस. आता तिसऱ्या वेळी बायकांसाठी राखीव होतं पद. तात्याने बायकोला उभं केलं. सरपंच पद एवढे वर्ष घरात राखणारा माणूस म्हणजे साधी गोष्ट नाही. तात्याच्या शब्दाबाहेर कधी कुणी जायचं नाही गावात. तात्याला उलट बोलायची ताकद होती ती फक्त कवितात. तात्याचा पोरीवर खूप जीव. पोरगी पण तात्या कधी तंबाखू खाताना दिसले की सरळ हातातली तंबाखू फेकून द्यायची. दुसरं कुणी असं केलं असत तर तात्यानी तिथच मुडदा पाडला असता. तात्याचा राग पण एकदम भयंकर. एकदा तात्याला जीवनचं कुत्रं भुंकल. तात्यानी घरून तलवार आणली आणि त्या कुत्र्याच्या मागं लागला. कुत्रं घाबरून पळत सुटलं. लोकांनी कसाबसा तात्याचा राग आवरला. एकदा लाईट गेली म्हणून तात्यांनी लाईनमनला मारलं होतं. ढाब्यावाल्यानी मटन संपलं म्हणून सांगितलं तर त्याचे सगळे टेबल तोडून टाकले होते. तर अशा तात्याला आज एक नवीनच न्यूज मिळाली. त्यांची पोरगी कविता शाळेतल्या शिक्षकाच्या प्रेमात पडली होती. त्याचं नाव श्रीकांत. श्रीकांतची जात वेगळी. कविताची जात वेगळी. श्रीकांत वेगळ्या वस्तीत राहणारा. तात्याची आणि श्रीकांतच्या घरची काहीच बरोबरी नव्हती. तात्याने आधी माणूस पाठवून श्रीकांतला दम दिला. पण श्रीकांत काही ऐकत नव्हता. शेवटी तात्या शाळेत गेले आणि पोरांसमोर श्रीकांतला छडीनी मारलं. आणि उद्यापासून शाळेत आलास तर तंगड तोडून टाकीन अशी धमकी सुद्धा दिली.

                           श्रीकांत घाबरून गेला. पण त्याच्या वस्तीत राहणाऱ्या लोकांनी तात्याला धडा शिकवायची तयारी सुरु केली. काठ्या आणल्या. रात्री तात्यावर हल्ला करायचा ठरलं. तात्याला कुणकुण लागली. माणसं जमा झाली. अख्ख्या वस्तीलाच झोडपून काढायचं ठरलं. सगळे रात्र व्हायची वाट बघायला लागले. तेवढ्यात टीव्हीवर बातमी आली. पाकिस्ताननी पहिल्यांदाच एक यान सोडलं होतं. ते नेमकं अर्ध्या वाटेत बंद पडलं. आता ते जमिनीवर आदळणार आहे. आणि ते सुद्धा आपल्या भागात. पळून पळून पळणार किती? कुठल्याही क्षणी यान येणार आणि सगळं गाव बेचिराख होणार. काही लोक म्हणाले सगळ्यांनी गाव सोडून जायला पाहिजे. तर काही म्हणाले नेमकं कुठं पडल ते सांगता येत नाही. जवळ आलं की दूर पळायचं. त्यात अर्धवट शहाणा दिन्या म्हणाला यान असं एसटी सारखं येत नसतं. दिसलं की बाजूला व्हायला. एका सेकंदात आदळन ते. फार फार एक तास राहिलाय आपल्याकड आता. अशा एकावर एक गोष्टी कानावर येत होत्या. पण धरणगावचं नाव उगीच धरणगाव पडलं नव्हतं. मागे धरण होणार होतं तरी गाव जागचं हलला नाही. गाव सोडून गेलं की माणसाच वाटोळ होतं अशी गावातल्या लोकांची श्रद्धा होती. त्यात कुणीतरी बातमी आणली की पुन्हा धरण करायचंय सरकारला म्हणूनच अशा अफवा पसरवायला लागलेत. पाकिस्तानला एवढी अक्कलय का? यान बनवायची. आहे त्या जमिनी आणि घरदार सोडून जायची कुणाचीच इच्छा नव्हती. आणि गेलं तरी वाटोळ होणार याची पुरेपूर खात्री होती. म्हणून मग सगळे देवासमोर जमले. नेहमी प्रमाणे कौल घेतला. त्यात गाव सोडून जायचं नाही असाच कौल मिळाला. आता लोकांनी ठरवलं मेलो तरी गाव सोडायचं नाही. मग करायचं काय? मजा. मरायचंच आहे तर मजा करून मरू अशी

                      ज्याने त्याने आपल्या आपल्या परीने मजा करायला सुरुवात केली. गावातल्या दारूच्या दुकानातली सगळी दारू दहा मिनिटात संपली. ज्यांनी आयुष्यात दारूच्या थेंबाला हात लावला नव्हता त्यांनी अख्खी बाटली संपवली. काही शाकाहारी लोकांनी मटन खाऊन बघितलं. आयुष्यभर नवर्याच्या धाकाने साडीच नेसलेल्या बायकांनी गाऊन घालून बघितले. काही लोक हायवेला लागून असलेल्या कलाकेंद्रात गेले. लावणी बघायला. पण नाचणाऱ्या बायका घाबरून पळून गेल्या होत्या नुकत्याच. ढोलकीवाला आपली ढोलकी विसरली म्हणून ती परत न्यायला आला होता. पण त्याला सोडून बायका निघून गेल्या. गावातल्या लोकांनी दुधाची तहान ताकावर भागवावी म्हणून त्याला ढोलकी वाजवायला लावली. माने दाजीनी त्याच्याच अंगावर पैसे उधळले. त्यांना एकदा तरी कलाकेंद्रात जाऊन पैसे उधळायचे होते. आज इच्छा पूर्ण झाली. गावात एका माणसाने तर कहरच केला. शेजारणीला लव्ह यु म्हणाला. सांगताच मेलो असतो पण आज सांगून टाकतो असं पण बोलला. त्या बाईचा नवरा अंगावर धावून आला तर बचाव म्हणून काठी पण घेतली होती सोबत. पण तिचा नवरा रागावला नाही. थोड्या वेळाने मरायचंच आहे तर कशाला मारायचं उगीच असा विचार केला त्याने.

                          सगळ्यात वाईट हाल शंकरचे आणि बळीचे होते. दोघांचं पाच सहा दिवसांपूर्वीच  लग्न झालं होतं. एका मांडवात. शंकर आजच देव देव करून आला होता. बळीच्या मात्र बायकोची अचानक अडचण आली म्हणून त्यांचं देवाला जायचं लांबलं होतं. आता बळीच्या बायकोची अडचण नव्हती. पण देवाला जाऊन आलो नाही म्हणून बळीला बायको जवळ जायला कसंतरीच वाटत होतं. आजपर्यंतची परंपरा होती. आधी कुलदेवतेचं दर्शन मग संसार. मग मधुचंद्र. आता मात्र खूपच मोठी अडचण आली होती. बायको जवळ जायचं तरी कसं? बोलता बोलता बळीने बायकोला आपल्या खोलीत बोलवलं तर त्याच्या आईने रागात बघितलं. बळीच्या बायकोला वसकून बस इथेच म्हणाली. बळी निराश झाला. आयुष्यात एक तास उरलाय का दोन ते पण माहित नाही. आपण मधुचंद्र साजरा करताच मरणार असं त्याला स्वच्छ दिसत होतं. पण आईच्या विरोधात जायची त्याच्यात हिम्मत नव्हती.

                            शंकर वेगळ्याच चिंतेत होता. देवाला जाऊन आल्यावर बायकोची अडचण सुरु झाली होती. असा असून अडचण नसून खोळंबा झाला होता. बळीला अडचण नसून अडचण होती. शंकरला खरच अडचण होती. दोघेही घरात सारखी चिडचिड करत होते. बायकांना काही कळत नव्हतं काय करावं? बळीने मित्रांना आपली अडचण सांगितली. पण या विषयावर कोण काय मार्गदर्शन करणार? जसा जसा वेळ जात होता तसा बळीचा संयम संपत चालला होता. सगळं गाव आपापल्या परीने मजा करत होतं. पण बळीची आई देवा समोरून हलायला तयार नव्हती. तिने माळ हातात घेऊन जप सुरु ठेवला होता. देव आपली विनंती ऐकेल आणि यान आपल्या गावात पडणार नाही यावर तिचा विश्वास होता. पण ती सोडली तर या गोष्टीवर घरात कुणाचाच विश्वास नव्हता. आपण लग्न होऊन सुद्धा ब्रम्हचारी म्हणूनच मरणार याची बळीला खात्री झाली होती. त्याने परत एकदा बायकोला खुणेने बोलवलं. बायको चोर पावलांनी त्याच्या खोलीकडे निघाली. पण बळीच्या आईने देवा समोरची घंटी घेतली आणि एवढ्या जोर जोरात वाजवायला सुरुवात केली की बायको वेगात परत आली. सासू जवळ निमूट पणे बसून राहिली. बळीच्या आईने रागातच तिला पोथी दिली. नजरेनेच वाच म्हणून सांगितलं. आता बळीची बायको जोर जोरात पोथी वाचायला लागली

                        गावात अफवा अजूनही वेगाने सुरूच होत्या. तात्या आणि वस्तीतले लोक वैर विसरून एकत्र ग्रामपंचायतीच्या सभागृहात जमले होते. सभागृहात एरव्ही तात्या समोर कुणी पान पण खात नाही. आज कुणी बिडी ओढत होता. कुणी दारू पीत होता. कुणालाच कुणी अडवत नव्हतं. हॉलच्या बाहेर सायकलचं दुकान होतं. हवा भरता भरता पंप निसटला आणि जोरात आवाज झाला. एका सेकंदात सगळे मेल्या सारखे पडून राहिले. नंतर लक्षात आलं सायकलच्या पंपाचा आवाज झाला. लोकांना वाटलं यान कोसळलं. तात्या म्हणाले पाकिस्तानच्या यानाचा आवाज ह्याच्यापेक्षा मोठा थोडाच असणार? शिवा म्हणाला पाकिस्तानच्या यानावर नाही अणुबॉम्बवर पण माझा विश्वास नाही. मला खात्री आहे त्यांच्या यानात पेट्रोल नसणार म्हणून ते पडत असणार. आता पेट्रोलच नसल्यावर स्फोट कसा होणार मला सांगा? अशा काही बाही गोष्टी सांगून लोक एकमेकांना दिलासा देत होते. पण फुटक्या तोंडाचा बाळ्या म्हणाला की अमेरिका पाकिस्तानला पाहिजे ती मदत करती. त्यांच्या यानातलं पेट्रोल संपूच शकत नाही. आहो नवाज शरीफच्या बाईक मधलं पेट्रोल संपलं तरी अमेरिका भरून देती. मुश्रर्र्फच्या फोनमधी पन्नासचा रिचार्ज सुद्धा अमेरिका मारून द्यायची. लई ग्याटम्याटय दोघांच. असं काही ऐकलं की पुन्हा गावकरी निराश व्हायचे. सगळे हॉलमध्ये टीव्ही पुढे बसले होते. आणि शंकर मात्र आपल्या नशिबाला शिव्या देत दारू पीत होता. नेमकी आजच अडचण यायची होती का? शंकरला आता नीट उभं सुद्धा राहता येत नव्हतं एवढी दारू झाली होती. अचानक तो म्हणाला मला दुसरं लग्न करायचं. आताच्या आता. त्याच्या बायकोसोबत करवली म्हणून आलेली भारती घाबरून आतल्या खोलीत पळून गेली. शंकर एकटक त्या खोलीकडे बघत होता. बळी एकटक पोथी वाचणार्या बायको कडे बघत होता. श्रीकांत एकटक कविताच्या घराकडे बघत होता. कविता खिडकीत येऊन एकटक श्रीकांत कडे बघत होती. गावाचं लक्ष नव्हतं. गाव एकटक पाकिस्तानने सोडलेलं यान कधी पडतंय ते बघत होतं.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *