प्रिय दिसले सर

January 28, 2021

लेखन

arvind jagapat patra

तुम्ही शिक्षणासाठी क्यूआर कोड वर काम केलं. विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रश्नावरही एखादा कोड बनवा. हे कोडं सुटलं पाहिजे.

पत्रास कारण कीशिक्षणासाठी तुम्ही केलेल्या कामाबद्दल जागतिक पुरस्कार मिळाला. मनापासून अभिनंदन सर. मी एक जिल्हा परिषद शाळेत शिकणारा विद्यार्थी आहे. मला तुमचा खूप अभिमान वाटतो. एवढे वाद, एवढा भ्रष्टाचार असूनही आपला देश कशाच्या बळावर टिकून आहे? असा प्रश्न लोकांना पडतो. त्याचं उत्तर आहे तुमच्यासारखे प्रामाणिक शिक्षक. मुलं खिचडीसाठी नाही तुमच्यासारख्या शिक्षकासाठी शाळेत येतात. पण हेच अजून बऱ्याच मोठमोठ्या लोकांना कळत नाही. म्हणून मुलांच्या शिक्षणापेक्षा खिचडीवर जास्त चर्चा आणि खर्च होतो. मी अजून लहान आहे. मला कळत नाहीत खूप गोष्टी. म्हणून मी या विषयावर लिहिणार नाही. मला तुम्हाला वेगळच सांगायचंय. मी परीक्षेबद्दल पण बोलणार नाही. मी रोज पेपरमध्ये वाचतो. सरकारचीच वेळोवेळी परीक्षा चालू असते. कधी वेळ मिळाला तर होईल आमची पण परीक्षा. मी तो विचार करत नाही. खरं सांगायचं तर मी माझ्या भविष्याचा विचारच करत नाही. मी विचार करतो माझ्या वडलांच्या भविष्याचा. खरच.

                    सर माझे वडील एकदम चांगले आहेत. पण लहानपणापासून मी कधी त्यांना हसताना बघितलं नाही. सगळ्या जगाची चिंता असल्यासारखा चेहरा असतो त्यांचा. मी त्यांना कधी निवांत झोपल्याचं पण बघितलं नाही. माझे वडील आमच्या शेजारी राहणाऱ्या रम्याच्या बापासारखे दारू पिणारे असते तरी काही वाटलं नसतं. रम्याचा बाप पिऊन झोपतो तरी. पण माझे वडील झोपतच नाहीत. सगळ्या गावाला अभिमान होता माझे वडील कधी दारू पिणाऱ्या सोबत बसत नाहीत, बारमध्ये जात नाहीत. पण दारूला कधी शिवलेले माझे वडील काही वर्षापासून धाब्यावर वेटर म्हणून काम करतात. रोज रात्री. गिर्हाईकांना दारू द्यायला. आजी म्हणते माझे वडील शिकले नसते तर काही वाटलं नसतं. पण माझे वडील एमए बीएड झालेत. पीएचडी केलीय त्यांनी. काय फायदा झाला? गावात त्यांना सगळे डॉक्टर म्हणून चिडवतात. धाब्यावर ओळखीचे लोक गमतीने दारू ऐवजी डॉक्टर औषध आणा लवकर म्हणतात.

                    गुरुजी, आम्हाला शाळेत शिकवतात. कोणतच काम वाईट नसतं. पण जेंव्हा पीएचडी करून पण तुम्हाला धाब्यावर वेटरचं काम करावं लागतं ना तेंव्हा खूप वाईट वाटतं. मी रोज माझ्या वडलांच्या डोळ्यात ते दुखः बघतो. दारू पिणाऱ्या माणसापेक्षा माझ्या वडलांचे डोळे लाल होतात. दारू पिणारा माणूस बळजबरी ह्याला त्याला बोलून मोकळा होता. पण माझे वडील त्यांचं दुखः कुणालाच सांगू शकत नाहीत. सांगणार कसं? माझा काका पण डीएड करून घरीच बसलाय. वडलांच्या बीएड साठी आणी काकाच्या डीएड साठी आजोबांनी शेती विकली. आजीनी सोनं गहाण ठेवलं. आणि आता माझ्या काकाला कुणी पोरगीच देत नाही. आज ना उद्या नौकरी लागेल ह्या आशेवर वडलांचं लग्न तरी झालं. म्हणून मी तुम्हाला हे पत्र लिहू शकतोय.

                    माझ्या वडलांनी पण खूप पत्र लिहिले. आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री. सगळ्यांना पत्र लिहिले. पण काही फरक पडला नाही. उत्तर सुद्धा आलं नाही. शिक्षक भरती झालीच नाही. पण मला वाईट कशाचं वाटतं सांगू? अजूनपण माझे वडील एका विनाअनुदानित कॉलेजमध्ये शिकवतात. आमच्या वर्गातले काही पोरं शाळेत जेवढ्या पैशाचे चॉकलेट खातात तेवढे पैसे पण माझ्या प्राध्यापक असलेल्या बापाला पगारात भेटत नाहीत. माझा काका चार वर्ष एका शाळेवर जवळपास फुकट काम करतोय. गुरुजी तुम्हाला विश्वास बसणार नाही पण कॉलेजमध्ये माझ्या वडलांच्या हाताखाली शिकलेले पोरं कमवायला लागले. धाब्यावर खायला प्यायला येतात. त्यांना माझे वडील वेटर म्हणून सर्व्हिस देतात. वर्गात नीट शिकत नाही म्हणून माझ्या वडलांनी शिक्षा केलेले पोरं एका बैठकीत हजार रुपये बिल करतात. कधी कधी मला वाटतं ते पोरं माझ्या वडलानाच एवढ शिकायची काय गरज होती म्हणून शिक्षा करतील. आपल्या विद्यार्थ्यांनी बिल देताना दिलेली टीप माझ्या वडलाना खूप काही शिकवून जात असणार.

                    गुरुजी शिक्षणाचा पश्चाताप वाटायची वेळ कुणावर येऊ नये. पण आजोबा म्हणतात कुत्र्याच्या छत्र्यासारखे डीएड बीएड कॉलेज निघाले होते. हे कॉलेज कुणाचे होते हे वेगळं सांगायची गरज नाही. ज्यांनी हाताला काम द्यायला पाहिजे होतं त्यांनी लाखो पोरं बेरोजगार करून टाकले. लाखो रुपये डोनेशन घेऊन. आज त्यातले बरेच कॉलेज गायब झाले. पण डीएड बीएड झालेल्या लोकांनी काय करायचं? त्यांना कसं गायब होता येईल? एकीकड गणित विज्ञान शिकवायला शिक्षक नाही असं सरकारच म्हणतय. आणी दुसरीकडे शिक्षक भरतीचं नाव काढत नाही. वशिला नसल्यामुळे प्राध्यापक व्हायचं स्वप्नं बघणारे पोरं शिपायाच्या पदासाठी अर्ज करायला लागले. गुरुजी ही वेळ कुणी आणली? प्राध्यापक व्हायला किती पैसे मोजावे लागतात हे काय लपून राहीलय का? पन्नास पन्नास लाख रुपये भरून प्राध्यापक झालेला माणूस विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणाचे धडे देताना किती कॉमेडी दिसत असेल. जाऊद्या. तुमच्याशी बोलावं वाटलं. तुम्ही एक आदर्श शिक्षक आहात म्हणून. लहान तोंडी मोठा घास झाला. पण खरच माझ्यासारख्या शाळेतल्या मुलाला कळतय ते नेत्यांना का कळत नसेल हो गुरुजी?

                    माझ्यापुरतं सांगतो. गुरुजी तुम्हीच मला सांगा, आयुष्याचं एवढ वाटोळ होऊनही माझे वडील मला अभ्यास कर म्हणतात तेंव्हा मला किती त्रास होत असेल. मी शिक्षणमंत्र्याला विनंती करतो…. मला नापास करा…..शप्पथ सांगतोवडलांच्या टेन्शनमुळे मी अभ्यास करत नाहीमला माझा प्राध्यापक बाप बेरोजगार होऊन घरात बसलेला असताना बाकीच्या शिक्षकाने कितीही चांगल शिकवलं तरी पटणार नाही…..आणि शिकून आपल्या बापाची अशी अवस्था झालेली असल्यावर मला शिकण्यात काय इंटरेस्ट वाटणार? गुरुजी, तुम्ही आपल्या शिक्षकांचं नाव जगात मोठं केलय. पण अजून खूप शिक्षक, प्राध्यापक गुणवत्ता असूनही फक्त संधी नाही म्हणून बेरोजगार आहेत. जिथे शिक्षकांचे असे हाल होत असतील तिथल्या शिक्षणाचे काय हाल होतील ? तुम्हाला पुरस्कार मिळाल्यावर सगळे मंत्री, राज्यपाल तुमच्यासोबत कौतुकाने फोटो काढत होते. म्हणून तुम्हाला पत्र लिहिलं. कदाचित तुमचं ऐकतील. शिक्षकांचेच प्रश्न सुटत नसतील तर शिक्षणाचे प्रश्न तरी कसे सुटतील.

                    तुम्ही शिक्षणासाठी क्यूआर कोड वर काम केलं. विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रश्नावरही एखादा कोड बनवा. हे कोडं सुटलं पाहिजे.

चूकभूल द्यावीघ्यावी.

तुमचाच….

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *