प्रिय इंडिया उर्फ भारत देशा

November 22, 2017

लेखन

arvind jagapat patra

खरंतर तुझ्या नावापासूनच गोंधळ आहे माझा लहानपणापासून

खरंतर तुझ्या नावापासूनच गोंधळ आहे माझा लहानपणापासून. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर इतर मुलांसारखा मी तुला वेगवेगळ्या नावाने बोलत आलोय. तुला हिंदुस्तान म्हणण्यात एकेकाळी केवढा आनंद व्हायचा. पण हिंदुस्तान हा शब्द नेमका कसा आला हे शोधता शोधता पार वाट लागली. किती वाद आहेत तुझ्या नावात सुद्धा. आपण बोलू तेच खरं, किंवा आपण वाचू तेच सत्य एवढा नेभळट मेंदू नसल्याने मी अजून निश्चित काही ठरवू शकलो नाही की तुला नेमकं काय म्हणायचं? खरंतर कुठल्याच नावावर मला आक्षेप नाही. इंडिया, भारत, हिंदुस्तान असं काहीही म्हणालो तरी काही फरक पडणार नाही. पण आपण एखादं नाव का घ्यायचं हे निश्चित माहित असायला हवं ना. नावांचा इतिहास असतो. इंडिया या नावाच्या केवढ्या अफवा आहेत सोशल मिडीयावर. त्याचा लॉन्ग फॉर्म पाठवतात. कुणी रेड इंडियन्सशी भलते नाते जोडतात. हिंदुस्थान या शब्दाचा इतिहास हा तर एक वेगळाच विषय आहे. यावर कितीतरी वेगवेगळ्या गोष्टी वाचायला भेटतात. कुणी म्हणतात हा शब्द पर्शियन आहे. ते लोक आपल्या कडचा सिंधू शब्द उच्चारू शकत नव्हते. ते ला म्हणतात. मग ते सिंधूच्या खोऱ्यातल्या लोकांना हिंदू म्हणायला लागले. असं बरच काही. तर एकूण मी गोंधळात आहे. या देशाच्या तीन नावांपैकी कुठलं नाव मला आवडतं? आणि मग एक ओळ कामी येते. इंडिया that इज भारत. पण पुन्हा शरद जोशींच्या मांडणीकडे मी वळतो. इंडिया विरुद्ध भारत. गाव आणि शहर यातली दरी. आणि आज गाव आणि शहराच्या मध्ये लोंबकळत असलेल्या माझ्यासारख्या कित्येकांना इंडिया आणि भारत यातला एक देश निवडता येत नाही.
शहरांच्या इंडियाने मला आश्रय दिलाय. ग्रामीण भारताने माझ्या आजवरच्या पिढ्या सांभाळल्यात. यातलं नेमकं काय हवंय आपल्याला? आज जो बुलेट ट्रेन आणि मॉल संस्कृतीचा विकास दिसतोय तो नक्की हवाय का? बुलेट ट्रेनला मनातून विरोध करावा वाटत नाही पण पाठिंबाही देता येत नाही. आज अशा वळणावर आलोय आपण जिथे विकास हवाय का नको हेच नीट कळत नाही. विकास म्हणजे नेमकं काय हेच नीटसं सांगता येत नाही. फाईव्ह स्टार दवाखाने हवेत का किमान स्वच्छता असलेले सरकारी दवाखाने? सरकारी मदतीच्या जोरावर उभे फाईव्ह स्टार दवाखाने गरीबाला उभं करत नाहीत. ती अट असताना सुद्धा. पेट्रोलची महागाई दुष्काळाचा एक्स्ट्रा कर घेऊन येते. त्यातलं माझ्या गावात काय जातं ? का फक्त शहरवासियांना आपण दुष्काळ कर देतो ही उपकाराची भावना फक्त? गाव आणि शहरात मी असा अडकत चाललोय. शहराला नाकारण्याचा क्रूरपणा मला माझ्या गावच्या मातीने दिलेला नाही. शहरात असलेल्या माणसाच्या आशेवर गावात दिवस काढणारे कितीतरी लोक आहेत. सुट्टीत कधी एकदा गावात जातो याची वाट बघत शहरात दिवस काढणारे कितीतरी लोक आहेत. आधीच्या पिढ्या गावातल्या मातीचा वास वगैरे बोलायच्या. अनुभवायच्या. आता गावात वेगळाच वास घर करतोय. हळू हळू गावाच्या मातीचा वास बदलतोय हे खूप लोकांच्या लक्षात सुद्धा येत नाही. शहर यायचं तेंव्हा एक विचित्र वास नाकात शिरायचा गावातल्या माणसाच्या. आता फार फरक वाटत नाही हे जास्त दुर्दैव आहे. गावात पहिल्यांदा एसटी आली तेंव्हा गावातल्या लोकांनी नोटांचा हार घातला होता. बुलेट ट्रेनच्या उद्घाटनाचा सोहळा बघताना गावात पहिल्यांदा एसटी आली ते वर्णन जास्त आठवत होतं. एसटी गावात आली तेंव्हा लोकांना वाटत होतं की आता विकास येईल. भरभराट होईल. मात्र हळू हळू घडत गेलं ते वेगळंच. महिना महिना शहरात जाणारे पुरुष दररोज सकाळ झाली की शहरात जाऊ लागले. उगाच वेळ काढू लागले शहरात. सिनेमे. दारू. पत्ते. लॉटरी. कलाकेंद्र. मटका. क्रम बदललाय. पण अधोगतीच्या दिशेने वाटचाल सुरु झाली. डोक्यावर भाजीपाला आणि दूध दही नेणाऱ्या बायका फक्त सुखात एसटी मध्ये जायला लागल्या. माणसं एसटी मध्ये बसायला एवढी गर्दी करायची की दारापाशी एखाद्या युद्धाचा प्रसंग असायचा. खिडकीतून टोप्या, चुंबळ आणि उपरणे टाकून जागा पकडणे हे नेहमीचं काम असायचं. काही माणसं बसमागे असलेली संकटकाळी वापरायची खिडकी वापरायचे बस मध्ये शिरायला. संकट नसताना त्या संकटाच्या खिडकीचा मोह एवढा होता की कित्येक गावात एसटी खरंच संकट ठरली. गावातला तरुण एसटीने गायब व्हायला लागला. अधाशासारखा शहर पाहू लागला. तिथेच रमू लागला. पण एसटी शाप का वरदान असा निबंध होईल एवढा मोठा बदल केला एसटी ने गावात. कित्येक पोरांच्या शिक्षणाला दिशा दिली. डी एड करण्याचं स्वप्न पाहणारी पोरं एसटी मुळे डॉक्टर झाली. वर्षा सहा महिन्यात जत्रेत, लग्नात जिलेबी आणि भजे खाणारी पोरं रोज कागदात गुंडाळून आलेला फाफडा, चिवडा आणि बालुशाही पाहू लागली. आधी ते कागद गावात जीवापाड जपून ठेवले जायचे. झोपडीच्या आधाराला असलेल्या लाकडात असे तेलकट कागद काळजीपूर्वक जपून ठेवले जायचे. हळू हळू एसटी गावात पोलीस टाईम्स सारखे कितीतरी पेपर घेऊन यायला लागली. कागदाचा ढीग झाला. लोकांना कागदाची किंमत राहिली नाही. पुढे पुढे प्लास्टिकच्या पिशव्या पण वाढल्या. वावटळ यायला लागली तेंव्हा आता कागद आणि कॅर्री bag पण उडायला लागल्या. कागद आणी प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन उडणारी वावटळ जास्त भयंकर होती. पण हा फरक फार कुणाच्या लक्षात आला नाही. गाव आणि शहराच्या सीमेवर आपण ही बदललेली वादळ झेलत जगत आहोत. शहरात प्लास्टिकच्या फुलांची साथ आली होती घरोघर. सजावट म्हणून. आपण नाक मुरडत होतो. गावाची आठवण काढत होतो. पण गावाकडे रुखवतात हे प्लास्टिक कधी घुसलं आपल्याला कळलेलं नाही. आपण शहराला नाव ठेवत होतो त्या त्या गोष्टी गावात अगदी सहज शिरल्या. गावात बैनाडेची बायको त्याच्या मागे बसून बाईकवर गेली तो विषय एकेकाळी महिनाभर चर्चेला होता गावात. आज गावाने हे सहज स्वीकारलंय. जगदाळेच्या सुनेने गाऊन घातला हे सुद्धा किती वादळी प्रकरण होतं गावात. ते पण आता स्वीकारलं सगळ्यांनी. पण आपण शहरातले गावात राहिलेले लोक मात्र अजून दोन्हीकडचे बदल स्वीकारायला तयार नाही. आपल्याला गावात पण बदल नकोय आणि शहरात पण. खरंतर आपण शत्रू आहोत का दोघांचे? दोन्ही गोष्टींबद्दल आपल्याला आपुलकी आहे. शहरातल्या सोसायटीमध्ये असलेल्या शेजाऱ्या बद्दल, गावातल्या नातेवाइका बद्दल, शहरातल्या झोपडपट्टीबद्दल, गावकुसाबाहेरच्या लोकांबद्दल. सगळ्यांविषयी आपल्याला तळमळ आहे. पण फक्त तळमळ. या सगळ्या लोकांचा विकास नेमका कशात आहे? आपण ठामपणे सांगू शकतो का?
प्रिय इंडिया, आज हे द्वंद्व खूप त्रास देतंय. गावासाठी किंवा शहरासाठी काय योग्य हे ठरवता येत नाही. आपण कुठे बरे हे कळत नाही.गावात उरलेल्या नातेवाइकांनी आपलं गाव सोडावं, शेती सोडावी आणि शहराकडे यावं? का आपल्याला मनातून वाटतं तसं शहराचे पाश सोडून गावाकडे जावं? शेती परवडते असं सांगणारा कुणीच भेटत नाही असा काळ. शहरात सुखी आहे असं सांगणारा तरी कोण भेटतो? कुणी ट्राफिक बद्दल चिडचिड करतो. कुणी हवे बद्दल. प्रदुषणाबद्दल. पिशवीत येणाऱ्या दुधाबद्दल तर कुणी पालेभाजी बद्दल. पण आज गाव आणि शहरात तरी किती फरक राहिलाय? स्पर्धा गाव आणि शहराला सारख्याच पातळीवर आणतेय. गाव आणी शहरातली केमिस्ट्री फार बरी नसली तरी गाव आणि शहरातली रसायनं सारखी आहेत. रसायनांचं प्रमाण सारखं आहे. गावोगाव आता तंदूर रोटी आणि चिकन कंटकी राज्य करतेय. कितीतरी गावात ढाब्यावर जेवताना भाकरी मिळणार नाही असं उत्तर ऐकलंय. भाकरी थापायला कुणी नाही. रोटी पाहिजे असेल तर सांगा असं म्हणतात. कधी कधी बरं वाटतं यांना भाकरी थापायला बायका मिळूच नयेत. पण त्रास होतो की आपण काय खातोय? ते ही गावात? गावातल्या मुलांना या तंदुरी रोट्या कशा आवडायला लागल्या? चिकन कंटकी कशी आवडायला लागली? शहरात ट्रेन आणि विमान चालवायला बायकांनी कधीच सुरुवात केलीय. पण शहर असो किंवा गावोगाव, भाकरी थापायला अजून बायका कशाला पाहिजेत हॉटेलवाल्यांना? बायका विमान चालवू शकतात पण पुरुष भाकरी थापू शकत नाही असं काही आहे का? पुन्हा वाटतं गावाने कशाला अडकायचं त्या भानगडीत? जर लोकांना पालक पनीर आणि बटर रोटी पाहिजे असेल तर का अडकून पडायचं भाकरी थापायच्या भानगडीत? का मेथीच्या काड्या निवडायच्या? का पालक निवडत बसायचं? एकदाच पालकाची पेस्ट करायची आणी वाढायची. सोपं आहे. पण मन तयार होत नाही.
गावाकडून आपल्या अपेक्षा जास्त असतात. शहरात बदल जास्त पटकन स्वीकारतो आपण. मनी प्लांट शहरात दिसला तर त्रास होत नाही. पण गावात घरापुढे आपल्याला तुळस अपेक्षित असते. शहरात अशोकाची झाडं आपल्याला खटकत नाहीत. गावात दिसली की त्रास होतो. शहरात रांगोळीचं स्टीकर खटकत नाही. गावात स्टीकर दिसलं की त्रास होतो. गावाकडून आपली अपेक्षा गावासारख राहण्याची असते. गावातल्या बायकांनी मोठं कुंकू सोडून टिकली लावायला सुरुवात केली हीच केवढी क्रांती. शहरात मात्र आपण रोज बदलणाऱ्या fashion वर चर्चा करतो. प्रियंका चोप्राने कुठला आठ दहा फूट जमिनीवर फरशी पुसल्यासारखा ड्रेस घातला. केवढी चर्चा झाली त्याची सोशल मिडीयावर. बाकी ग्रामीण भागातल्या मुलींचे फोटो कसे? डोक्यावर चार पाच हंडे. आणि ramp walk ची तुलना. मॉडेल पेक्षा ती जास्त सुंदर दिसते कारण ती कष्ट करते अशी वर मखलाशी. म्हणजे तिने तसंच डोक्यावर चार पाच हंडे घेत पाणी भरावं का? त्यानेच मुली सुंदर दिसतात का? वजन कमी रहावं म्हणून चॉकलेट, आईस्क्रीम कटाक्षाने टाळणाऱ्या नट्या समाधानी आहेत? का चॉकलेट आईस्क्रीम कधी भेटणारच नाही हे गृहीत धरून ढोरमेहनत करणाऱ्या गावातल्या पोरी समाधानी आहेत? कुणाचं आयुष्य जास्त बरं आहे? पहाटे हजारो लोकांच्या गर्दीत ट्रेन पकडून कामावर जायचं आणि मध्यरात्री घरी यायचं हे बरं? का पाच सहा तास आपल्या शेतात काम करून घरी येणं बरं? नेमकं काय बरं? शहरात आयुष्याशी खेळतो तो जुगार? गावात आयुष्याशी खेळतो तो जुगार? शहरात पैसा मिळतो. पण स्वतःसाठी वेळ किती मिळतो? गावात त्यामानाने वेळ मिळतो. पण त्या वेळेचं काय करायचं? नेटवर्क नाही. मनोरंजन नाही. लाईट नाही. आपण कुठे बरे आहोत?
गावातली हवा शुध्द, गावातली माती भारी अशी फसवणूक तर नाही करत ना आपण आता आपली? गावातला माणूस शहरात येताना भाजीपाला आणतो. ज्वारी आणतो. डाळी आणतो. तूप आणतो. आपण गावात काय नेतोय? गावातल्या पोरांना कॉम्प्लेक्स यावा असे कपडे. मोबाईल. खरंतर गाव आता शहराशी स्पर्धा करतंय. कधीही जिंकता येणारी स्पर्धा. आणि त्या स्पर्धेत गावपण हरवत चाललंय. आपल्यासारखी मधोमध असलेली माणसं बदलणारी गावं सहन करू शकत नाही. वरचेवर सुजत चाललेली शहरं आपल्याला रुचत नाहीत. वाडे जाऊन आलेली सिमेंटची घरं आपल्याला बघायला बरी वाटत नाहीत. रिकामे पडलेले गोठे आपल्याला अस्वस्थ करतात. आपल्याला जग सुंदर हवंय. पण ते लोकांनी करावं ही अपेक्षा आहे. शहरात स्वच्छता महापालिकेने ठेवावी. गावात गावपण लोकांनी जपावं. आपण फक्त बघत रहावं. अपेक्षा व्यक्त करत राहाव्यात. सेंद्रिय शेती केली पाहिजे असे सल्ले देत राहावेत. कुणी शेणखत कुठून आणायचं? असं विचारलं की आपण गाई पाळाव्यात म्हणायचं. गाई कोण सांभाळणार? असं विचारलं तर आपण त्यांच्या मुलांकडे बघावं. शेतकऱ्याच्या मुलाच्या डोळ्यात शिकून अधिकारी व्हायची स्वप्नं आहेत. त्यांचं काय?
आपल्या अपेक्षा खूप आहेत. गटारात एखादा माणूस वाहून जातो तेंव्हा अख्ख्या शहराला वेदना होते. ती योग्य आहे. पण हजारो लोकांचं आयुष्य या गटारात जातं. ती साफ करण्यात जातं. त्यांच्यासाठी कधी ह्ळहळ व्यक्त होणार? या माणसांनी गटारात राबत राहिल्यावर शहर स्वच्छ राहणार असेल तर स्वच्छतेचा आग्रह सुद्धा अतिरेक वाटू लागतो. कांद्याचा भाव वाढला की आकाश पाताळ एक करणाऱ्या लोकांना फवारणी केलेली पिकं पाहिजेत. शेतकरी जगेल का? आपल्याकडे फुलं आहेत. पण ती आपल्याला जिवंत माणसाला देण्यापेक्षा कुणाच्यातरी समाधीवर वाहण्याची जास्त इच्छा आहे. इंडियाच्या बुकेमध्ये जी फुलं असतात ती फार कमी वेळा भारताच्या शेतीतली असतात. ती इंडियातच उगवलेली असतात. इंडियाचं मशरूम, पनीर, बेबी कॉर्न, लेट्युस, ओट्स यापासून भारत खूप दूर आहे. इंडियाच्या खाण्याच्या सवयी बदलत जाताहेत. पाचशे रुपयांचा पिझ्झा खाताना आपण धूडक्यात गुंडाळलेली बाजरीची भाकरी आठवत राहतो. ना पिझ्झा चवीने खातो आपण. ना ती खरपूस भाकरी आता नशिबात आहे. आपण आठवणीत रमतो आणि चुलीवरच्या भाकरी बद्दल बोलू लागतो. या चुलीने कित्येक बायकांना कैदी बनवून टाकलेलं असतं. पिढ्यान पिढ्या. फुकनी घेऊन जीव तोडून चूल पेटवत राहणाऱ्या बायका. आता कुठे त्यांच्या नशिबात gas चं सुख आलंय. आणि आपलं मन काही चुलीतून बाहेर येत नाही. आपल्या कित्येक पिढ्यांनी gas चा शोध लागलेला नसल्याने केलेली बेसुमार वृक्षतोड आपण आठवत सुद्धा नाही. आपण हळवे होतो ते चुलीवरच्या मटनाच्या चवी साठी. पण कित्येक दुर्मिळ झाडं, कित्येक बायकांचं आयुष्य त्या चुलीने बेचिराख केलंय हे आपल्याला आठवायचं नसतं. आपण गाव म्हणजे सगळच भारी असं ठरवून टाकलेलं असतं. तिथेच म्हशी धुतल्या. तिथेच कपडे धुतले. तिथेच आंघोळ केली. तेंव्हा नदी वाहत होती. आता ते कसं जमेल?
वासुदेवाच्या आठवणी काढायच्या, रायरंद कसा हसवायचा हे सांगायचं, गोंधळी कसे भारी होते हे लिहायचं. पण या लोकांच्या आयुष्याची कशी वाताहात झाली ते मात्र आठवायचं नाही. आपल्या परंपरा या लोकांच्या आयुष्याशी कधी जीवघेणा खेळ खेळू लागल्या कळलं सुद्धा नाही. गावातले टेलर किंवा सुतार कसे एका फटक्यात टाकाऊ होत गेले हे लक्षात सुद्धा आलं नाही. गरजा बदलत गेल्या. मागणी बदलत गेली. तांबोळी हरवून गेले. शेतात गावाचा वाटा ठेवणाऱ्या कुणब्याच्या वाट्याला एकटेपण आलं. एकट्याने राबायचं. जनावरं सुद्धा जड झाले. आपण त्याला तसं एकट्याला सोडून आलेले अपराधी लोक आहोत. आपण धड भारताचे नाही आणि धड इंडियाचे नाही. आपण शहरातला गोंगाट नको म्हणून शहरापासून दूर राहण्याची धडपड करणारे, गावात संधी नसल्याने गावाबाहेर राहणारे लोक. आपण आपल्या हाताने गावकुसाबाहेर आलोय. शहराच्या वेशीबाहेर श्वास घेत थांबलोय. आपण आपल्या घरात सुद्धा पालात राहिल्यासारखे राहतोय. आपण कायम शहरात राहू असं आपल्याला कधीच वाटत नाही. आपण गावात परत जाऊ अशीही शक्यता वाटत नाही. आपण ग्रामीण परंपरेचे ढोल बडवत वेदना आळवत राहणारे गायक आहोत. आपण शहराशी एकनिष्ठ राहू शकलेल्या कोंडमारा शोकांतिकेचे नायक आहोत. कदाचित या काही शेवटच्या पिढ्या आहेत गाव आणी शहरं जवळून पाहिलेल्या. पण आपली पिढी धड शहराची होऊ शकली ना धड गावाची. कधी कधी माळावर पडलेल्या शेणातली ज्वारी सुद्धा उगवून येते. पण तिचं काहीच होत नाही. काही दिवस एक हिरवी आशा. जिवंत असल्याची खुमखुमी. मातीशी नाळ असल्याची जाणीव. या पलीकडे काही नाही. बाप जाद्यांची नाळ तिथेच असते गावात पुरलेली. आपली नाळ दवाखान्यातल्या कचऱ्यातून कुठे अदृश्य झालीय काय माहित? आपली नाळ कुठे आहे ते माहीतच नसलेली माणसं आहोत आपण. शहराच्या मिठीत राहून गावाच्या आठवणी काढत बसणारी माणसं आपण.
प्रिय इंडिया उर्फ भारत देशा,
देशभक्ती वगैरे ठीक आहे. आमचा नेमका देश कोणता हेच कळत नाही आम्हाला. इंडिया का भारत? आम्हाला काय हवंय? एक जण म्हणाला एक्स्प्रेस ट्रेन जायच्या तेंव्हा रेल्वे रूळाशेजारी बसलेल्या लोकांचे टमरेल उडून जायचे. बुलेट ट्रेन आली की ते लोकच उडून जातील टमरेल सकट. बुलेट ट्रेनच्या वेगापेक्षा दुप्पट वेगाने हे विचार येतात आमच्या डोक्यात. असे विचार येणं चूक आहे का? विमानात जेंव्हा ढग दाटून आलेले असतात तेंव्हा घोषणा होते. मौसम खराब है. आमच्या दृष्टीने ढग दाटून येणे हा मौसम चांगला असतो. म्हणून इंडियात मन रमत नाही. पण गावात राहणं जमत नाही. हे द्वंद्व कधी संपणार आहे?
अरविंद जगताप

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *