प्रिय सचिन

April 24, 2019

लेखन

arvind jagapat patra

प्रिय सचिन

प्रिय सचिन
खरंतर मी एक लग्न ठरलंय म्हणून आईच्या हातून स्वयंपाक शिकणारी मुलगी होते जेंव्हा तू क्रिकेट खेळायला लागलास. माझं लग्न झालं त्या दिवशी मी एवढ्या कष्टाने केलेल्या माझ्या मेकअपपेक्षा मांडवात तुझीच चर्चा होती. पाकिस्तानचा अब्दुल कादिर तुला म्हणाला की नव्या बॉलरला काय मारतोस? मला मारून दाखव. आणि अब्दुल कादिरच्या पुढच्या ओव्हरमध्ये तू चार सिक्स आणि एक फोर मारला होतास. शप्पथ सांगते माझ्या लग्नात एवढ्या हौसेने केलेले गुलाबजाम त्यादिवशी फिके पडले. लोक तुझ्या खेळाचंच जास्त कौतुक करत होते. खूप राग आला होता मला तुझा. 

पहिल्या रात्री अगदी लाजून बसले होते. नवरा आला. खूप वेळ मी मानच वर केली नाही. नवरा म्हणाला, तेंडूलकरने धुतल्यावर अब्दुल कादिरने सुद्धा एवढा वेळ मान खाली घातली नव्हती. पुढे पुढे तर नवरा सारखं सारखं तुझ्याविषयीच बोलू लागला. तुला वयाचे अठरा वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच कशी कार मिळाली. नीट दाढी मिशा फुटायच्या आधीच तू कशा ब्लेडच्या जाहिराती करायला लागलास वगैरे. खर खोटं माहित नव्हतं. मला कळण्याचा तो भाग नव्हता. मला फक्त तुझ्याविषयी राग होता. शेजारी मी एवढी नटून थटून बसलेली असायचे आणि नवरा टीव्हीकडे बघत असायचा. त्याच्यासाठी क्रिकेट म्हणजे फक्त सचिन तेंडुलकर विरुध्ध बाकीचे देश. मी एवढी मन लावून स्वयंपाकघरात रोज नवीन पदार्थ करायचे आणि नवरा ताटाकडे न बघता टीव्ही बघत तुझ्या फटकेबाजीचं कौतुक करायचा. मी लग्नात कोणती साडी नेसले होते हे आता नवऱ्याला आठवतसुद्धा नाही. पण तू पहिला सामना सुनील गावस्करने दिलेले pad घालून खेळला होतास हे त्याला पक्कं ठाऊक असतं. माझा नवरा महापालिकेत आहे. पण तो ऑफिसला जाताना तू मैदानावर आभाळाकडे बघत जातोस तसाच जातो. 

खर सांगते सचिन मला क्रिकेट मधलं काही कळत नव्हतं. अगदी नाईलाज म्हणून मी क्रिकेट बघायचे. नवरा बघतो म्हणून. आता तू प्रत्येकासाठी अगदी घरातलाच आहेस म्हणून सांगते, कित्येकदा नवऱ्याने आपल्याला जवळ घ्यावं असं वाटायचं आणि नवरा नेमकं टीव्ही जवळ असायचा. विचार कर किती राग येत असेल तुझा. खर सांगते आधी नवरा वेडा वाटायचा मला. पण हळू हळू मलाच वेड लागलं क्रिकेटचं. सासू सासऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करता करता नाकी नऊ येतात आमच्या. तुला तर खेळताना शंभर कोटी भारतीयांच्या अपेक्षेचं ओझं होतं. नेहमीच. मला आठवतं तू खेळत असलास की रस्त्यावर ट्राफिक नसायचं. या वेळात पटकन जाऊन आपलं काम करता येईल असं सगळ्यांना वाटायचं. पण तू खेळत असताना घराबाहेर कोण पडणार? सगळे घरीच. तू रस्तेच काय काळजाचे ठोके पण थांबवायचास रे बाबा. तू खेळत असताना माझा नवरा एकदा घरातल्या नव्याकोऱ्या सोफ्यावर बसला होता रेलून. आणि नेमका तू आउट झालास. माझा नवरा त्यानंतर तू खेळत असताना त्या सोफ्यावर कधीच बसला नाही. माझे सासरे सासू आजारी होती म्हणून पहिल्यांदा चहा करत होते उत्साहात आणि तुझं पहिलं शतक पूर्ण केलंस तू नेमकं. त्या दिवशीपासून तू खेळायला आलास की माझे सासरे न चुकता स्वतः चहा करतात. माझ्या सासूचे डोळे आनंदाने भरून येतात. आधी सासऱ्याना चहा करताना बघून यायचे. नंतर तुला बघून. तू भल्या भल्या लोकांना पार बदलून टाकलस. 

मथ्यू हेडन तुझं कौतुक करताना असं म्हणाला होता की मी देव पाहिलाय. तो भारतासाठी चौथ्या क्रमांकावर batting करतो. पण बऱ्याचदा तू आम्हाला आमच्यातला एक वाटतोस. कुठलीही चांगली गोष्ट घडली की तुला वडलांची आठवण होते. तू आकाशाकडे बघतोस. तुझी आई तुझ्यासाठी प्रार्थना करते. एक मराठी माणूस आश्चर्याने ‘आईला’ म्हणतो. तुझ्यासारखंच.

सचिन, तू निवृत्त झालास तो दिवस ठळकपणे आठवतो. तुझी २२ यार्डातली २४ वर्ष चाललेली घोडदौड त्या दिवशी थांबणार होती. भारताचे दोन खेळाडू batting करत होते. पण पहिल्यांदा हा देश आपलेच खेळाडू आउट व्हायची वाट बघत होता. कारण त्यांना आपल्या सचिनला खेळताना बघायचं होतं. तू आलास. खेळलास. अचानक तुझा झेल गेला. वेस्ट इंडीजच्या सामी ने तो पकडला. पण त्याला आनंद काय होणार? तो बिचारा रडायला लागला तू आउट झालास म्हणून. शत्रूलाही कौतुक असणारा खेळाडू होतास तू. आफ्रिकेच्या हंसी कोनियेने सांगितलंय, त्याला gary कर्स्टनला बऱ्याचदा आठवण करून द्यावी लागायची की तू कव्हरमध्ये फिल्डिंग करायला उभा आहेस, सचिनचं कौतुक करायला नाही. माझ्या नवऱ्याला मी काय म्हणाले ते लक्षात नसतं. पण तुझ्याबद्दल कुणी कुणी काय म्हणून ठेवलंय ते सगळं पाठ आहे.
इथून पुढे लोक कधीतरी असं घडेल की तुझा एखादा रेकॉर्ड मोडला जाईल. पत्रकार तुला विचारतील, सर तुमचा रेकॉर्ड मोडला. कसं वाटतंय? आणि तुझ्या चेहऱ्यावर प्रश्न असेल नेमका कोणता रेकॉर्ड? शंभर शतक करणाऱ्या माणसाने काय काय लक्षात ठेवायचं? पण माझ्या एक गोष्ट मात्र आयुष्यभर लक्षात राहील सचिन. निवृत्त झाल्यावर भाषण करताना तू म्हणालास, बायकोसोबतची पार्टनरशिप माझी सगळ्यात बेस्ट पार्टनरशिप आहे. त्या दिवशी आधीच डोळे पाणावले होते पण ते ऐकलं आणि रडायलाच लागले मी. माझाच काय जगातल्या प्रत्येक बायकोचा चुकून तुझ्यावर कधी राग धरला असेल तो आनंदाश्रुत वाहून गेला. 

माझा नवरा गल्लीत अंडर आर्म खेळताना सगळी तुझीच नक्कल करतो. तुझ्यासारख्या धावा काढणं त्याला जमत नाही बाकी सगळं जमतं. पण धावा काढणं नाही जमलं तरी बायकोचं असं तुझ्यासारखं मनमोकळ कौतुक करायला त्याला जमो एवढीच अपेक्षा.

असं म्हणतात की जगात दोन प्रकारचे batsman आहेत . एक प्रकार म्हणजे तेंडुलकर आणि दुसऱ्या प्रकारचे बाकी सगळे. सचिन तू ज्याचा देवावर विश्वास नाही त्या माणसालाही हात जोडायला लावलेस. देव आहे असं म्हणायला लावलंस. तू आमच्यासाठी देव आहेस. मेल्यावर आम्हाला खरा देव कसा असतो दिसेल कदाचित. पण जिवंतपणी आम्ही तुझ्याकडेच देव म्हणून पाहतो. आणि आम्हाला सगळ्यात प्रिय एकच मंत्र आहे. ‘ सचिन सचिन’ हा मंत्र आम्हाला आजही जिंकण्याचं बळ देतो. कारण या मंत्राचा चमत्कार आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलाय. तू निवृत्त झालास आणि नवऱ्याने क्रिकेट बघणं सोडून दिलं. मीच आता कम्प्युटरवर जुनी match लावते. पुन्हा एकदा घरात तोच उत्साह येतो. खर सांगते जुने सामने बघतानाही तू आउट होऊ नये एवढच वाटत राहतं. आपोआप हात जोडले जातात. राष्ट्रगीत जसं कितीदाही ऐकलं तरी आपण ज्या जोशात उभे राहतो तसं तुझा खेळ बघताना नेहमीच एक उत्साह असतो. लव्ह यु सचिन!!!

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *